डॉ. गुरुनाथ थोंटे

महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रे आहेत. यात नुकतेच पैठण येथे पाचवे संशोधन केंद्र सुरू करण्यात आले. एवढय़ा मोठय़ा संख्येने संशोधन केंद्र असतानाही या फळांच्या शेती व्यवसायात आजही खूप अस्थिरता आहे. चांगले उत्पादन नाही, बाजारपेठ नाही, फळबागांच्या जमिनीची अवस्थाही खालावलेली आहे. या सर्व परिस्थतीवर मात करायची असेल, तर या संशोधन पद्धतीची दिशा बदलावी लागणार आहे.

Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
Urgent inspection of hospitals
देशभरातील रुग्णालयांची तातडीने तपासणी मोहीम; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उचलले पाऊल

महाराष्ट्रात विविध फळ संशोधन केंद्रे आहेत. यामध्ये सर्वात जास्त लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र आहेत. सन १९५९ मध्ये श्रीरामपूर येथे पहिले फळ संशोधन केंद्र स्थापन झाले. सन १९६५ मध्ये काटोल येथे दुसरे केंद्र चालू झाले. सन १९८५ मध्ये नागपूर येथे तिसरे केंद्र निर्माण झाले. सन २००६ मध्ये बदनापूर येथे चौथे केंद्र सुरू झाले. आता पाचवे गेल्याच वर्षी २०२१ मध्ये पैठण येथे स्थापित करण्यात आले. लिंबूवर्गीय फळावर संशोधन करण्यासाठी ही सर्व केंद्रे सुरू केलेली असताना आज या फळाची, त्यातही मोसंबी या प्रमुख पिकाची स्थिती काय आहे, हे तपासणे गरजेचे आहे. केवळ उत्पादकता वाढवण्यापेक्षा गुणवत्ता असलेले उत्पादन वाढवणे, सोबतच उत्पादन घेताना त्या जमिनीचे आयुष्यही चांगले राखणे हे महत्त्वाचे आहे. यासाठीच नेमके काय करायला हवे याबाबतचे संशोधन आणि त्याचे शेतकऱ्यांपर्यंत योगदान दिले जाणे आवश्यक आहे.

या सर्व संशोधन केंद्राची उद्दिष्टे जवळपास सारखी आहेत. यातील काही महत्वाची पुढीलप्रमाणे १) लिंबूवर्गीय पिकाची कीड रोग मुक्त कलमे तयार करणे २) जातिवंत मातृवृक्षाची लागवड करणे ३) नवीन वाण विकसित करणे. पैठण येथील केंद्रात ग्रेिडग, पॅकेजिंग, मार्केटिंग, निर्यात इत्यादी बाबीचा अतिरिक्त समावेश आहे. आता यापुढे भविष्यात संशोधन केंद्र स्थापन करण्यापूर्वी आज अस्तित्वात असलेल्या केंद्राचा काही अभ्यास होणे गरजेचे आहे. यामध्ये या सर्व केंद्रांचा ‘एम्पिरिकल डाटा’ गोळा करणे आणि यासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या समितीने पुढील बाबींवर माहिती संकलित करावी १) आतापर्यंत संशोधन केंद्राने विकसित केलेले कीड रोग मुक्त वाण २) संशोधन केंद्रावरील डायबॅक व फळगळ झालेल्या मातृवृक्षाची माहिती ३) प्रत्येक संशोधन केंद्राने विकसित केलेले वाण व त्यांची गुणवैशिष्टे ४) संशोधन शिफारशीच्या अंमलबजावणीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नफ्यातील वाढ /घट ५) रासायनिक खतांमुळे घसरलेली जमिनीतील कर्ब पातळी ६) डायबैक व फळगळ यावर उपाय न सापडल्यामुळे शेतकऱ्याचे झालेले नुकसान ७) जैविक संशोधन व शिफारशी नसल्यामुळे झालेला पर्यावरणीय ऱ्हास ८) रासायनिक शिफारसीमुळे उत्पादित विषयुक्त फळे खाऊन निर्माण झालेल्या व्याधी ९) त्या व्याधी दुरुस्तीसाठी झालेला खर्च १०) राज्यात साठवणूक क्षमता नसल्याने साठवणुकीच्या अभावी शेतकऱ्याचे झालेले नुकसान ११) संशोधन केंद्राच्या शिफारशीने अब्जाधीश झालेले निविष्ठा उत्पादक व करोडपती झालेले विक्रेते यांची यादी १२) रासायनिक शेतीच्या अंमलबजावणीत तोटय़ात गेलेली शेती. त्यातून घडलेल्या आत्महत्या १३) आत्महत्याग्रस्त कुटुंबाची खालावलेली मानसिक व आर्थिक अवस्था १४) केंद्रावरील मंजूर पदांपैकी रिक्त पदे १५) शासनाचा संशोधन केंद्रावर आतापर्यंत झालेला खर्च अशा बाबी वरील ‘एम्पिरिकल डाटा’ गोळा करणे आवश्यक आहे. त्याची संगणकीय पृथक्करण करणे आवश्यक आहे. असे काही केले आणि त्यातून महाराष्ट्रातील संशोधनाची आजची स्थिती काय आहे, हे समजल्यावरच नवीन संशोधन केंद्र स्थापण्याचा निर्णय घ्यावा.

महाराष्ट्रात/ भारतात गरजेपेक्षा अधिक फळे उपलब्ध आहेत. यामुळे आज अधिक रासायनिक फळांच्या उत्पादनाची गरज नाही. दुसरीकडे रासायनिक पद्धतीने तयार केलेल्या फळांना निर्यातीसाठी वावही कमी आहे. आज प्रतिकूल नैसर्गिक वातावरणात दर्जेदार उत्पादनाची खात्री नाही. बिगर हंगामी उत्पादनाचा खर्च अधिक असतो. त्यालाही सध्या खूप मोठे नैसर्गिक प्रतिकूलतेचे ग्रहण लागलेले आहे. शेतीतून उत्पादित फळांची कवडीमोल भावाने विक्री करावी लागते. त्यामुळे फळशेती नफ्यात नाही.

या सर्व परिस्थतीवर खालील उपाययोजना केल्या तर फळशेती नफ्यात येऊ शकते १) जागोजागी स्टॉल उभारणीस प्रोत्साहन/ चालाना देने. २) पोषणमूल्याबद्दल जागृती निर्माण करणे ३) निसर्ग उपचार तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणे ४) शासकीय दवाखान्यात फळ आहाराचा समावेश करणे ५) मोसंबी रसापासून ‘क जीवनसत्त्व’च्या गोळय़ा बनविणे व वाटप करणे ६) शासकीय व निमशासकीय कार्यालयात आयोजित प्रशिक्षण, चर्चासत्र, कार्यशाळा , शेतकरी मेळाव्यांमध्ये फलरस वितरणास प्रोत्साहन देणे ७) बाहेरील राज्यात मार्केटिंगसाठी साखळी निर्माण करणे ८) ‘आई सी ए आर’ विकसित शून्य ऊर्जा साठवणूक गृह उभारणीसाठी अनुदान देणे.

भविष्यात सेंद्रिय मोसंबीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पैठण येथील केंद्रावर सेंद्रिय फळ उत्पादनास संशोधनामध्ये प्राधान्य देणे. मराठवाडय़ात काही सेंद्रिय उत्पादक शेतकरी आहेत. त्यांचे मशागती तंत्राचे ज्ञान इतरास व्हावे म्हणून कृषी शास्त्रज्ञ /शेतकऱ्यांचे /विस्तरकांचे चर्चासत्र आयोजित करणे. त्या शेतकऱ्यांच्या शेतावर ज्यांच्याकडे सेंद्रिय उत्पादन घेतले जाते तेथे क्षेत्रीय भेटी आयोजित करावी. केंद्र शासनाच्या सेंद्रिय शेती योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना द्यावा. भारतातील काही राज्यात सेंद्रिय मोसंबी उत्पादन तंत्रज्ञानाबाबत संशोधन झालेले असेल. त्याची अंमलबजावणी पैठण येथील संशोधन केंद्रावर करावी लागेल. सेंद्रिय उत्पादन कमी येते हा गैरसमज प्रथम कृषी शास्त्रज्ञ यांच्या मनातून काढावा लागेल. उत्पादनापेक्षा उत्पन्नाची मानसिकता त्यांच्यात निर्माण करावी लागेल. यानंतर रासायनिक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या मानसिकता बदल करण्यासाठी प्रबोधन करावे लागेल. सेंद्रिय शेती अधिक सक्षम होण्यासाठी प्रथम जमिनीतील सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कृषी विस्तरकासह सर्वाना धावे लागेल. सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनानेच मोसंबी मातृवृक्षास अनुकूल अशा उपायावर संशोधन हाती घ्यावे लागेल. सेंद्रिय कर्ब वाढ होण्यासाठी कायमस्वरूपी पिकाचे अवशेष याचा वापराव्यतिरिक्त इतर कोणताही सोपा उपाय नाही. याबाबत संशोधन हाती घ्यावे लागेल. अर्थात या सर्वाची प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्मजीव शास्त्रज्ञाची नेमणूक संशोधन केंद्रावर करावी लागेल.

राज्यातील उर्वरित चार मोसंबी संशोधन केंद्रावर अस्तित्वात असलेले मातृवृक्षाचा उपयोग सेंद्रिय अन्नद्रव्य व्यवस्थापन संशोधनासाठी करावा लागेल. अन्नद्रवे व्यवस्थापनात ‘माइकोरिहजा’ या बुरशीचा मोठा सहभाग असतो. त्यावर संशोधन मोसंबीसाठी करावे लागेल. ‘ट्राईकोडर्मा’ या बुरशीचाही यात मोठा वाटा आहे.

मोसंबीसंबंधी यावर संशोधन करावे लागल. जैविक कीडनियंत्रणासाठी मित्र कीड संवर्धन प्रयोगशाळा उभी करावी. ज्यामध्ये सर्व किडीच्या नैसर्गिक नियंत्रणासाठी मित्र किडीचे प्रजोत्पादन घ्यावे लागेल. त्याचे प्रशिक्षण सेंद्रिय मोसंबी उत्पादकास द्यावे लागेल. जमिनीतून मिळणारी मित्र बुरशी जशी मायकोरायझा /ट्रायकोडर्मा बाबत वेगवेगळे संशोधन हाती घ्यावे लागेल. त्याद्वारे रोग नियंत्रणाचे उपाय मग तो डायबॅक वर असो की फळगळीवर असो, याचे प्रात्यक्षिक केंद्रावर करून त्या ठिकाणी शेतकरी भेटी आयोजित कराव्या लागतील.

अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे सेंद्रिय धडे शेतकऱ्यास देताना जमीन ही अन्नपूर्णा आहे. लाव्हारसापासून खडक व खडकापासून जमीन निर्माण होते. खडक हे अनेक मूलद्रव्याचा एकत्रित संयोग आहे. म्हणजे खडकापासून बनलेली जमीन अन्नपूर्ण आहे. सेंद्रिय जमिनीत कोटी सूक्ष्म जिवाणू आहेत. त्यांना अनुकूलन म्हणजे हवा ओलावा सेंद्रिय पदार्थाचे गरज एवढे जमिनीतील व्यवस्थापन केले तर जमीन पिकाच्या वाढीचे १८ मूलद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करतात. याबाबतचे सखोल व व्यापक संशोधन सेंद्रिय मोसंबी उत्पादकासाठी आवश्यक आहे ते करावे लागेल. याबाबत कृषी शास्त्रज्ञही भूसूक्षमजीवशास्त्रज्ञ नसल्यामुळे (ते कृषी रसायन शास्त्रज्ञ असतात.) ते विश्वास ठेवणार नाहीत. असे जर नसते तर जंगलातील, बांधावरील झाडे आणि पावसाळय़ात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गालिचे अंथरल्यासारखी तरवट दिसले नसते. सबब कृषी रसायन शास्त्रज्ञांनी याबाबत आता परीक्षण करावे .

भविष्यात वातावरणातला बदल हा इतर पीक उत्पादकाप्रमाणे मोसंबी उत्पादकांसाठी मोठे आव्हान आहे. त्यात कमाल व किमान तापमानातील चढ-उतार हा एक घटक आहे. यामुळे पीक उत्पादनात जमिनीतील ‘मायकोरायझा’चे जाळे जमिनीत मोठय़ा प्रमाणावर असेल, तर मोसंबी पिकात या चढउतारास तोंड देण्याची क्षमता आपोआप निर्माण होते. याबाबत संशोधन हाती घेणे गरजेचे आहे. दुसरा घटक म्हणजे जमिनीतील पाण्याचा ताण /अतिरिक्त ओलावा. तो निर्माण झाल्यास तोंड देण्याची क्षमता निर्माण करण्यातही या बुरशीचा व ट्रायकोडर्माचा सहभाग असतो. याबाबतीतही संशोधन करावे लागेल. डायबॅकच्या अनेक कारणांपैकी जमिनीतील शत्रू बुरशी व निमेटोडच्या नियंत्रण आतही मायकोरायझा सहभागी असते. यावर मोसंबी पीक केंद्रिबदू समजून संशोधन होणे गरजेचे आहे. मोसंबी पिकामध्ये फळगळ यामागे अन्नद्रव्य अनुपलब्धता हे एक मुख्य कारण आहे. अशावेळी ‘मायकोरायझा’द्वारे अन्नद्रव्ये उपलब्ध होत असल्यामुळे त्या दिशेने जर संशोधन झाले तर ते मैलाचा दगड ठरू शकते. जमिनीत रासायनिक खताच्या वापराने क्षाराचे प्रमाण वाढले आहे. पीएच, क्षारता इत्यादी वाढ झालेली आहे ती सेंद्रिय उत्पादनासाठी मोठी अडचण आहे. ‘मायकोरायझा’ ही पिकात क्षार प्रतिबंधक क्षमता निर्माण करते. त्याबाबत मोसंबीसाठी अशा प्रकारचे संशोधन फलदायी ठरू शकते. पीकवाढीचे पाच घटक जसे सूर्य प्रकाश, हवा, जमीन आणि जमिनीतील जिवाणू ओलावाबाबत एकत्रित संशोधन निश्चितच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. तेव्हा या घटकाचा ही संशोधनात समावेश करावा. पैठण येथील केंद्रात फक्त ग्रेिडग, पॅकेजिंग, मार्केटिंग, निर्यात यावर संशोधनात्मक भर द्यावा. बाकी राज्यातील उर्वरित संशोधन केंद्रावर उपरोक्त दर्शविलेल्या बाबींवर विभागणी करून संशोधन तातडीने हाती घ्यावे म्हणजे सेंद्रिय मोसंबी उत्पादनास भविष्यात अधिक चालना मिळेल. ज्या दिवशी सेंद्रिय मोसंबी नागपूर संत्रीप्रमाणे मोसंबीचे एक विशिष्ट ‘ब्रँड’ तयार होईल. मोसंबी उत्पादक शेतकरी चार दिवस सुखाचे पाहतील. संशोधकास मानाचा मुजरा करील. त्या वेळी शेतकरी खरा बळिराजा होईल.