तेजांकितांचा आनंद क्षण. . .

संगणक शास्त्राात घेतलेले शिक्षण आणि शेती यांचा मेळ घालण्याचा विचार मी केला.

लोकसत्ता तरुण तेजांकित या पुरस्कारात शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील तरुणांचीही दखल घेतली जाते ही गोष्ट मला विशेष वाटते. मी शेतकरी कुटुंबातील आहे. संगणक शास्त्राात घेतलेले शिक्षण आणि शेती यांचा मेळ घालण्याचा विचार मी केला. तो यशस्वी करण्यात माझ्या गुरूंचे मार्गदर्शन लाभले. हा क्षण माझ्यासाठी  अविस्मरणीय आहे.  – रुपाली सुरासे

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन केल्याबद्दल मला गौरविण्यात आले याचा आनंद आहे. नवजात शिशू आणि त्यांच्या मेंदूची वाढ यावर मी अभ्यास केला. आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या कमी व्हावी, बालके सुदृढ व्हावे यासाठी मी संशोधन केले. उपचार पद्धतीत बदल घडवण्याचा माझा मानस आहे. लोकसत्ताने हा पुरस्कार देऊन माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढवली आहे.    – डॉ. तुषार जावरे

 

माझ्या कार्याचा गौरव केला त्याबद्दल मी लोकसत्ताची आभारी आहे. मी इथपर्यंत पोहचू शकले त्यामध्ये कुटुंबीयांसह ग्रामपंचायतीतील सर्व सहकाऱ्यांचा सहभाग आहे. पुढील वाटचालीत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी हा पुरस्कार मला ऊर्जा देत राहील.  – ताई पवार

 

लोकसत्ता तरुण तेजांकित या मंचावर नवउद्यमी म्हणून मला गौरविण्यात आले. ऑडिओ बुक, पॉडकास्टच्या माध्यमातून ग्लोबल व्यासपीठ निर्माण करण्याचे ध्येय मी बाळगले आहे. या कामाला लोकसत्ताने दिलेले पाठबळ मोठे आहे.   – समीर धामणगावकर

 

निवड प्रक्रियेत असलेल्या तज्ज्ञांनी पुरस्कारासाठी मला निडवले हे मी माझे भाग्य समजतो. गडचिरोलीसारख्या भागात काम करताना अनेक आव्हाने येत राहतात, त्या आव्हानांना पेलण्याचे बळ आम्हाला अशा पुरस्कारातून मिळते. हा केवळ माझा नाही तर माझ्या सर्व गडचिरोली पोलिसांचा सन्मान आहे.  – शैलेश बलकवडे

 

हा सन्मान माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि घरच्यांना अर्पण करतो. कारण गोधडी आणि घोंगडीसारखे प्रकार पुनरुज्जीवित करताना त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या माध्यमातून आज साडेतीनशे लोकांना रोजगार मिळाला. आज आम्ही तयार केलेली गोधडी भारतातच नव्हे तर एकोणीस देशात जाते. या कार्याची दखल घेतल्याबद्दल लोकसत्ताचे आभार.   – नीरज बोराटे

 

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतो आहे. मी तयार केलेले वॉटर प्रेशर व्हेसल्स आजही मोठ्या प्रमाणात परदेशातून मागवावे लागतात. त्याची निर्मिती भारतात व्हावी यासाठी माझे प्रयत्न आहेत. आपल्या देशातल्या काही मूलभूत गोष्टी बाहेरून आयात करण्यापेक्षा त्या इथे तयार करण्यावर माझा भर आहे.– पराग पाटील

 

किसान अ‍ॅग्रो नावाने पशुखाद्य निर्मितीचा व्यवसाय मी सुरू केला. आपल्या जनावरांना आपण चांगल्या प्रतीचे खाद्य देऊ शकलो तर अधिक सकस दुग्ध उत्पादन घेता येईल. तसेच जनावरांचे आरोग्य सुधारेल. हा पुरस्कार माझ्या कामाला अधिक चालना देणारा आहे.   – श्रीपाद जगताप

 

निर्भीड आयुष्य जगण्यासाठी आम्हाला पुरस्कार दिला जातो तेव्हा स्वत:चा अभिमान वाटतो. आमच्या समलिंगी समाजाला लोकांनी कायमच दूषणे दिली आहेत. नाना विशेषण देऊन लोक हिणवतात. पण जेव्हा इतके मोठे माध्यम आमची दखल घेते तेव्हा माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळते. – नक्षत्र बागवे

 

स्नेहालयच्या आजवरच्या कार्यामध्ये समाज सुधारकांची प्रेरणा आहे. त्यामुळे स्नेहालय ही कुणा एकाची जबाबदारी नाही तर आम्हा सगळ्यांचे हे ध्येय आहे. महिला, बालके, पीडित यांच्यासाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे, तर समाजात वैचारिक बदल घडवणे हे कर्तव्य आहे. लोकसत्तामुळे ते अधिक वाढीस लागेल यात शंका नाही.        – अनिल गावडे

 

‘पाणवठा’ नावाचे अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम मी चालवतो. २००५ मध्ये आलेल्या पुरापासून आम्ही हे काम करत आहोत. त्यावेळी ६७ प्राणी वाचवले. तो प्रवास आजही सुरू आहे. आज १०० अपंग प्राणी माझ्याकडे आहेत. हा पुरस्कार माझ्या पिल्लांचा आहे, कारण त्यांनी सहकार्य केले म्हणून हे घडले. जागतिक चिमणीदिनी हा पुरस्कार मला मिळणे ही भाग्याची गोष्ट समजतो.    – गणराज जैन

 

थुंकण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी तयार केलेले ईझी स्पिट हा तंत्रज्ञानातील एक प्रयोग आहे. त्या प्रयोगाची नोंद लोकसत्ताने घेतल्याने मला अधिक आनंद झाला आहे. तरुण उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी अशा गौरवाची गरज आहे.  – रितू मल्होत्रा

 

लहानपणापासूनच बुद्धिबळ खेळण्याची आवड होती. याच आवडीला करिअर म्हणून स्वीकारून खेळाच्या माध्यमातून देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घरच्यांनी दिली. आज जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना जबाबदारीची जाणीव कायम असतेच. या पुरस्काराने ती अधिक दुणावली. आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण लोकसत्ताचा हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे.  – भक्ती कुलकर्णी

 

नेमबाज तेजस्विनी सावंत सध्या दिल्लीत खेळत आहे, म्हणून मी पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार तिला खूप प्रोत्साहन देणारा आहे. हा केवळ पुरस्कार नसून तरुणांना दिलेले हक्काचे व्यासपीठ आहे.  – सुनीता सावंत, तेजस्विनी सावंत यांची आई

 

जेव्हा एखाद्या कामाला पुरस्कार मिळतो तेव्हा आनंद होतो, पण एकूण प्रवासाला पुरस्कार मिळतो तेव्हा समाधान वाटते. हा तो समाधानाचा क्षण आहे. लोकसत्तासारखे नि:पक्षपाती आणि निर्भीड माध्यम आपल्या कार्याचा गौरव करते तेव्हा जबाबदारी वाढते. – क्षितिज पटवर्धन

 

लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. सोहळ्यात तयार केलेल्या दीड मिनिटांच्या चित्रफितीत माझ्या आयुष्याचा प्रवास पाहताना भरून आले. माझ्या कामाचा गौरव हा माझ्या आई वडिलांचा आहे, कारण त्यांच्या पाठिंब्याने हे शक्य झाले. ज्या लोकांबरोबर मला पुरस्कार मिळला ती बाब मला महत्त्वाची वाटते. असामान्य काम करणाऱ्या लोकांच्या पंगतीत मला बसवले हे सुखावणारे आहे.   – सिद्धार्थ जाधव

 

रंगभूमीवर आजवर केलेल्या कामाची ही पावती आहे. लोकसत्ताने गौरवणे ही कुणासाठीही मोठी गोष्ट आहे. आपल्या कामावर लोकसत्ताचे लक्ष असणे म्हणजे आईचे मुलावर लक्ष असणे. त्यामुळे नव्या कामासाठी अधिक जोमाने आणि जबाबदारीने तयारीला लागावे लागेल. – प्राजक्त देशमुख

 

चित्रकार म्हणून काम करताना जेव्हा पुरस्कार दिले जातात तेव्हा आनंद होतो. कारण हे उपेक्षित असलेले क्षेत्र आहे. लोकसत्ताने चित्रकार म्हणून माझी निवड करणे, हा माझ्या चित्रांचा सन्मान आहे. ज्या वृत्तपत्राचे वाचन लहानपणापासून करत आलो आहे तेथे माझा गौरव होणे ही स्मरणीय गोष्ट आहे. – पराग बोरसे

 

मला ‘तेजांकित’ आणि ‘तरुण’ मानल्याबद्दल लोकसत्ताचे मनापासून आभार. सन्मानित केलेल्या इतर दिग्गजांचे काम पाहून आपण अजून खूप करायला हवे अशी भावना निर्माण झाली. ज्या अभिव्यक्तीने नाटकांतून मी विषय मांडते त्या अभिव्यक्तीचा हा गौरव आहे. असे सन्मान होत राहिले तर अभिव्यक्ती अधिक बळकट होईल     – रसिका आगाशे

 

चंद्रपूरसारख्या भागात राहून, बांबूपासून कलाकृती घडवण्याचे काम मी करते. माझ्या कामाला कला म्हणून लोकसत्ताने हेरले ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. हे काम अधिक वेगात आणि नावीन्यपूर्ण करण्याची ताकद लोकसत्ता तरुण तेजांकितने दिली.      – मीनाक्षी वाळके

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The happy moment of tejankita akp

ताज्या बातम्या