अकोला : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेतून व महात्मा गांधी यांच्या तत्त्वातून देशाभिमानी विद्यार्थी घडवणारी अमरावती जिल्ह्यातील खामगाव येथील टिळक राष्ट्रीय शाळा केवळ वर्‍हाडाचा नव्हे तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, वैभवशाली परंपरेचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यलढ्यात ही शाळा चळवळीचे प्रमुख केंद्र राहिली. १०५ वर्षांपासून संस्थेत ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्‍या या राष्ट्रीय शाळेला आता अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व स्वराज्याचे विचार रुजवण्याचे कार्य टिळक राष्ट्रीय शाळेत झाले. ब्रिटिशांविरोधातील लढ्याला टिळक राष्ट्रीय शाळेतून बळ मिळाले. अनेक स्वातंत्र्यसैनिक शाळेत आश्रयाला येत असत. कलाचार्य मुकुंद श्रीकृष्ण पंधे गुरुजी यांनी आपले जीवन शाळेसाठी समर्पित केले. बौद्धिक विकास, व्यावसायिक कौशल्य, ललित कलांची जाण, नैतिक जीवनातून समाजसेवेच्या आदर्शाचे बाळकडू घेत येथून हजारो विद्यार्थी घडले. मात्र थोर क्रांतिकारकांचा हा वारसा जपण्यासाठी समाजातून दात्यांचा हातभार लागण्याची गरज निर्माण झाली आहे.

संस्थेच्या शिल्पकला महाविद्यालयातून कलेच्या क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी कलावंत म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त केली. तळागाळातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वसतिगृहाचा आधार मिळाला. बदलता काळ, शासकीय बंधने, आर्थिक अडचण, मनुष्यबळाचा अभाव यासह विविध कारणांमुळे शाळा व संस्थेवर अवकळा आली. अनेक उपक्रम कायमचे बंद झाले. तुटपुंज्या उत्पन्नातून संस्थेच्या कार्याचा व्याप सांभाळण्याची कसरत विश्वस्तांना करावी लागते. याही कठीण परिस्थितीत चिकाटी, निष्ठा व समर्पण भावनेने विश्वस्त संस्थेची परंपरा जपण्यासाठी झटत आहेत.

संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवून तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शाळेत मूलभूत सुविधा, क्रीडांगण, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कृषी संशोधन केंद्र, गोशाळा आदी सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा संस्थेचे अध्यक्ष सुधाकर अजबे यांच्या नेतृत्वात ११ विश्वस्तांनी व्यक्त केली. या माध्यमातून थोरांचा वारसा जपला जाईल. मात्र, त्यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे येण्याची आवश्यकता राहील.