रेश्मा भुजबळ

साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दिवाळीचा पाडवा. संस्कृती म्हणा किंवा हौस, परंपरा म्हणा किंवा गुंतवणूक; कितीही महाग झाले तरी अशा शुभ मुहूर्तावर आवर्जून सोनं खरेदी केली जाते. सोने खरेदीची ही परंपरा पिढय़ान्पिढय़ा सुरू आहे.

दिवाळीनंतर तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मुहूर्ताना प्रारंभ होतो. दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणारे लग्न मुहूर्त हे समीकरण लक्षात घेऊन सराफ, मोठमोठी ज्वेलर्सची दुकाने वेगवेगळे ब्रँड आणि प्रकार याच सुमारास बाजारात आणतात. (लाँच करतात.) सध्या ट्रेन्ड आहे तो जुन्या वळणाच्या किंवा एथनिक दागिन्यांचा. आपल्याकडे एखादा चित्रपट, मालिकांमध्ये वापरलेले दागिने लगेच लोकप्रिय होतात. त्यात सध्या ऐतिहासिक चित्रपटांची चलती असल्याने यांत वापरलेले दागिने लोकप्रिय झालेले दिसतात.

सध्या आपल्याला नव्यानेच माहीत झालेले किती तरी पारंपरिक दागिने एके काळी सर्रास वापरले जात. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या, पण अशा काही खास पारंपरिक आणि सध्या ट्रेन्ड झालेल्या दागिन्यांची ओळख..

आपल्याकडे स्त्रियांना अगदी केस, डोक्यापासून ते पायापर्यंत दागिन्यांनी मढवले जाते.

हिंदू धर्मामध्ये कान टोचणे हा एक संस्कार आहे. त्यामुळे स्त्री त्याप्रमाणेच पुरुषांचेही कान टोचण्याची आणि त्यात दागिने घालण्याची प्रथा होती. पुरुष भिकबाळी, खुंटबाळी घालत, तर स्त्रियांसाठी कानात घालण्याचे असंख्य प्रकार आहेत. आता पुरुष एक फॅशन म्हणून एकच कान टोचून भिकबाळी किंवा स्टड, स्टोन घालताना दिसतात.

स्त्रियांसाठी कर्णफुले, गाठा, मोत्यांचे वेल, सध्या लोकप्रिय असलेले झुमके असे अनेक प्रकार आहेत. सध्या अगदी खांद्यापर्यंत लोंबणारे झुमके, िरगा, कुडय़ा यांचा ट्रेन्ड आहे. त्यातही वेगवेगळे खडे, मीनाकाम किंवा सोन्यावरच कलाकुसर केलेले कर्णफुले, झुमके स्त्रियांमध्ये प्रिय आहेत. एथनिक दागिन्यांची लोकप्रियता पाहता अनेक सराफांनी लक्ष्मी, गणपती, राजवाडा, गवाक्ष अशा किती तरी गोष्टी वापरून स्त्रियांचे कानासाठीचे दागिने (टेंपल ज्वेलरी) तयार केले आहेत. त्याचप्रमाणे लवंग हा प्रकारही सध्या लोकप्रिय आहे. मुख्यत: नाक आणि कान यांची भोके बुजून जाऊ नयेत या हेतूने त्या छिद्रांमध्ये लवंगेच्या रूपाकाराची एक सोन्याची अथवा चांदीची काडी घालून ठेवतात तिला ‘लवंग’ असे म्हटले जाते.

कानाला विविध ठिकाणी छिद्रे पाडून त्यामध्ये वेगवेगळे अलंकार घालण्याची प्रथा आपल्याकडे असली तरी नाक टोचून त्यात नथ, चमकी, सुंकले वगैरे दागिने घालणे ही बाब आपल्याकडे तशी अलीकडच्या म्हणजे गेल्या हजारेक वर्षांपासून सुरू झालेली आहे. ही प्रथा अथवा चाल येथे मुसलमानांच्या आक्रमणानंतर आली. असे असले तरी आजची आधुनिक स्त्रीसुद्धा फॅशन म्हणून आवड म्हणून नाकातही आवर्जून दागिने घालताना दिसते. दक्षिण भारतात दोन्ही नाकपुडय़ांमध्ये अलंकार घातले जातात. मात्र इतरत्र एकाच नाकपुडीत अलंकार म्हणजे, मुरकी म्हणजेच मोरणी किंवा चमकी घातली जाते. सध्या नाक न टोचताच चापाची नथ, मुरकी, चमकी घालण्याची पद्धत आहे. बेसर – हा दोन्ही नाकपुडय़ांच्या मधल्या भागात अडकवला जातो. ‘पिअरसिंग’ करणाऱ्यांमध्ये हा सध्या मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. मात्र तोही पारंपरिकच आहे, हे मात्र नव्याने सांगावे लागत आहे.

सध्या ऐतिहासिक चित्रपटांमुळे केसांमध्ये घालण्याच्या दागिन्यांचाही मोठय़ा प्रमाणात वापर होऊ लागला आहे.

‘अग्रफूल’ हे सोन्याचे एक जोडफूल असते. वेणीचा शेपटा घातल्यानंतर केसांची टोके (अग्रे) या जोडफुलाच्या मधल्या पोकळ जागेत खोचून घ्यायची व खालून वर गुंडाळत गुंडाळत शेपटय़ाचे गोल वेढे अगदी वर शेपटय़ाच्या सुरुवातीला आणून तेथे आकडय़ांच्या साहाय्याने पक्के बांधून खोपा तयार केला की हे फूल खोप्याच्या मध्यभागी दोन्ही बाजूंनी दिसत राहते.

कमळ – कमळ म्हणजे फूल. आपल्या अलंकारामध्ये फुलाच्या आकृतीचे अलंकार ‘कमळ’ अथवा ‘फूल’ अशा दोन्ही नावाने ओळखले जातात. असे कमळ आकडय़ाच्या साहाय्याने डोक्यावर मागच्या बाजूच्या अंबाडय़ावर खोवण्याची प्रथा आहे.

जाळी – ओवलेल्या मोत्यांचे सर उभे-आडवे एकमेकांत ठरावीक अंतर सोडून एकत्र गुंफून एक जाळीदार छोटासा मोत्यांचा पट खोप्याला किंवा अंबाडय़ाला गुंडाळला जातो.

बिजवरा आणि भांगसर – बिजवरा म्हणजे चंद्रकोर. ही चंद्रकोर (अलंकार) रत्नजडित असून ती भांगरेषेवर असणाऱ्या मोत्याच्या भांगसराच्या खाली टोकाशी कपाळावर लोंबेल, अशा रीतीने हा अलंकार लावण्यात येतो. आजकालची बिंदी. यापैकी अनेक अलंकार हे ‘बाजीराव मस्तानी’, ‘तानाजी’, ‘मणिकर्णिका’ चित्रपटांमुळे सध्या लोकप्रिय झाले आहेत. ‘बोर’ माथ्यावरून कपाळावर लोंबणारा बोरासारखा गोल टपोरा असणारा हा अलंकार राजस्थान- मारवाडमधून इकडे आला. उत्तर भारतात या दागिन्याला बोर म्हणतात, पण महाराष्ट्रामध्ये बोराप्रमाणेच ‘आवळा’ या नावानेही तो ओळखला जातो. ‘पद्मावत’ या चित्रपटात हा प्रामुख्याने पाहायला मिळाला आणि त्यानंतर तो स्त्रियांमध्ये लोकप्रिय झाला. ‘चोटीफूल’ माथ्यावर अगदी उंच जागी हे सोन्याचे फूल लावले जात असे. टपोरे मोठय़ा आकाराचे हे कमळाकृती फूल बांधण्याची पद्धत होती. हा उत्तर भारतामधला अलंकार आहे.

गळ्यात विवाहित स्त्रियांचा महत्त्वाचा अलंकार म्हणजे मंगळसूत्र. या मंगळसूत्राचेही कित्येक प्रकार पाहायला मिळतात. जळगाव पॅटर्न, पुणेरी, हैदराबादी, कलकत्ती, पेशवाई आणि किती तरी.. ‘जय मल्हार’, ‘संभाजी’ या मालिकेतील मंगळसूत्रांचे अनेक प्रकार लोकप्रिय झाले आहेत. एखादी मालिका मग ती ऐतिहासिक असो, प्रसिद्ध झाली की त्यातील दागिने लोकप्रिय होतात.

याशिवाय गळ्यात घालण्यासाठी ‘एकदाणी’, कारले, गरसळी, गुंजमाळ, गोखरू माळ, गव्हाची माळ, चाफेकळी माळ, चौरसा, जाळीचा मणी, जोंधळी पोत, तांदळी पोत असे अनेक दागिने स्त्रियांच्या गळ्याला साज चढवतात.

चिंचपेटी, पेंडे म्हणजे मोत्यांचे अनेक सर हे पारंपरिक प्रकार आजही तितकेच लोकप्रिय आहेत.

कमरपट्टय़ाची अनेक डिझाइन्स सध्या उपलब्ध असून लग्न समारंभात त्यालाही मोठी मागणी आहे. हातात दंड, त्यानंतर मनगट व शेवटी हाताची बोटे या तीन ठिकाणी अलंकार घालण्याची पद्धत आहे. स्त्रियांच्या बाबतीत या तीनही जागा विविध अलंकार दृष्टीस पडतात. त्या तुलनेत पुरुषांच्या वा मुलांच्या हातावर एवढे दागिन्यांचे ओझे नसते.

स्त्रिया दंडावर वाकी किंवा बाजूबंद घालतात. ताळेबंध, नागोत्र, वेळा हे प्रकारही दंडावर घातले जात. त्याचेच आधुनिक स्वरूप सध्या वापरले जाते. सध्या मनगटावर बांगडय़ांच्या, कडय़ांच्या विविध प्रकारांबरोबरच एकाच हातात घालण्यासाठी ब्रेसलेटचेही पारंपरिक, आधुनिक असे प्रकार पाहायला मिळतात. त्याप्रमाणे पूर्वी असणारे जवे, गजरा हे प्रकारही घातले जात.

आज प्रत्येक स्त्रीच्या बोटांमध्ये वेगवेगळ्या अंगठय़ांचे प्रकार पाहायला मिळतील एवढे वैविध्य आढळते. पुरुषही आवडीने हा अलंकार मिरवात. भोरडी, आरसी, घोडा अंगठी या अंगठय़ांचेही विविध प्रकार नव्याने घडवत सराफांनी त्याला आजचे रूप दिले आहे.

आपल्याकडे पायातही दागिने घालण्याची पद्धत आहे. जोडवी हा सौभाग्य अलंकार वगळता साखळ्या, पैंजण आजही सगळीकडे आवडीने घातले जाते. अँकलेट हा प्रकार आज महाविद्यालयीन मुलींमध्ये फारच प्रिय आहे, तर लहान मुलांसाठी वाळ्याचे अनेक प्रकार आढळून येतात. तोरडय़ा आज घटकेलाही अगदी लहान मुलांपासून मोठय़ा मुली, स्त्रिया यांच्या वापरात आहे.

पायाच्या बोटांमध्ये अनवट (पायाच्या अंगठय़ात चांदीचे जाडजूड व भक्कम कडे बसवलेले असते, त्याला ‘अनवट’ असे नाव आहे. महाराष्ट्रात अनवटप्रमाणेच ‘अनोठ’, ‘आनवटा’, ‘हणवट’ अशी अपभ्रष्ट शब्दरूपेही लोकांच्या बोलण्यात व लिहिण्यात आहेत.), विरोद्या, गेंद (गेंद म्हणजे गुच्छ. त्याशिवाय या गेंद अलंकारालाच ‘विंचू’ ‘बिच्छू’, ‘बिछवे’ असेही म्हणतात.), मासोळ्या आणि जोडवी घातली जातात. पायाच्या मधल्या बोटावर विवाहप्रसंगी वधू जेव्हा गौरीहरा पूजते तेव्हा जोडवी

घातली जातात आणि ती आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.

आजची स्त्री आधुनिक असली तरी तिची नटण्याची आवड कमी झालेली नाही. त्यामुळे दागिन्यांमध्येही सातत्याने नवनवीन प्रकार आणि डिझाइन्स येत असतात. त्यात आधुनिक आणि पारंपरिकचा मेळ घातला जातो. म्हणूनच अनेक सराफ मंगळसूत्र महोत्सव, कर्णफुले, बांगडय़ा, जोडवी, अगदी नथ महोत्सवही करू शकतात ते याच वैविध्यातून.