‘शिकतो’ डोंबारी गं..!

अनंत झेंडे यांचे वय आहे अवघे ३३. शिक्षण, दहावीला गटांगळ्या खाऊन अकरावीपर्यंतच.

‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद लाभला

अनंत झेंडे यांचे वय आहे अवघे ३३. शिक्षण, दहावीला गटांगळ्या खाऊन अकरावीपर्यंतच. सध्या स्थानिक ज्ञानदीप ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कौठा माध्यमिक विद्यालयात शिपायाची नोकरी. ही नोकरी सांभाळून त्यांनी श्रीगोंदे येथे सन २००८ मध्ये स्थापन केलेल्या महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचा सात-आठ वर्षांतच मोठा विस्तार झाला आला आहे. गरीब मुलांसाठी विद्यार्थी सहायक समिती स्थापून सुरू केलेल्या या संस्थेचे कार्य आता एकलव्य प्रकल्प, साधना बालभवन, आरंभ बालनिकेतन प्रकल्प अशा शाखांनी विस्तारले आहे.

श्री गोंदे तालुक्यातील (जिल्हा नगर) चिखली हे छोटेसे गाव. चोर, दरोडेखोरांचे लपण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून हा परिसर ओळखला जातो, याला कारण या परिसराची भौगोलिक रचना. नगर-श्रीगोंदे रस्त्यावरील या डोंगराळ भागात येथील छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ा, जंगल हे बऱ्याच गुन्हेगारांचे आश्रयस्थान. अर्थात महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेच्या स्थापनेशी या गोष्टींचा संबंध नाही. मात्र ही भौगोलिक पाश्र्वभूमी असलेल्या या छोटय़ाशा गावातील अनंत झेंडे या तरुणाने वेडय़ा ध्येयातून सुरू केलेल्या सामाजिक कामामुळे आता चोऱ्या, दरोडेखोरी, उपजीविकेसाठी शारीरिक कसरती अशी पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबातील मुलांना प्रगतीचे नवे पंख लाभले आहेत. पिढय़ान्पिढय़ा ज्यांचा शिक्षण, संस्कार, शाश्वत घरकुलाचा निवारा अशा कुठल्याच गोष्टींशी संबंध आला नाही, अशा घरातील मुले या आगळ्या गुरुकुलात प्रगतीची स्वप्ने पाहू लागली आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात ते सामील होऊ लागले आहेत.
नगर जिल्हय़ातील श्रीगोंदे हा असा तालुका आहे की, एकीकडे पाटपाण्याची सुबत्ता आणि दुसरीकडे फासेपारधी, डोंबारी अशा भटक्या समाजाची संख्याही मोठी आहे. राज्यातील सर्वाधिक म्हणजे ७३ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असलेला हा तालुका, मात्र दुसरीकडे टोकाची तफावत. यातील फासेपारधी समाजावर ब्रिटिशांनीच चोर-दरोडेखोर असा शिक्का मारलेला. जन्माला येतानाच हा शिक्का त्यांच्या माथी चिकटलेला असतो. मुलाला समजत्या वयातच या गोष्टीचे बाळकडू मिळते. त्या काळी ब्रिटिशांनी कायदेच असे काही केले की, पुढे हा समाज यात गुंतत गेला. दुसरा डोंबारी समाज. मूल स्वत:च्या पायावर उभे राहू लागले की, लगेचच त्याच्या अंगाचे मुटकुळे करून शारीरिक कसरतीची सवय लावली जाते. या कसरतीच्या प्रदर्शनातूनच या समाजाची उपजीविका, भटकंती दररोजचीच. या अशा जीवनवैशिष्टय़ांमुळेच या दोन्ही समाजांची अवस्था अतिशय दयनीय आहे.
अनंत झेंडे यांनी २००८ मध्ये स्थापन केलेल्या महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचा सात-आठ वर्षांतच मोठा विस्तार झाला आला आहे. गरीब मुलांसाठी विद्यार्थी सहायक समिती स्थापून सुरू केलेल्या या संस्थेचे कार्य आता एकलव्य प्रकल्प, साधना बालभवन, आरंभ बालनिकेतन प्रकल्प अशा शाखांनी विस्तारला आहे. एकलव्य प्रकल्पात फासेपारधी समाजातील ४२ मुले, साधना बालभवनात झोपडपट्टीतील ८० मुले आणि आरंभ बालनिकेतनात भटक्या डोंबारी समाजातील ५६ मुले सध्या संस्थेच्या आश्रयाला आहेत. या सर्वाचा निवास, भोजन आणि मुख्यत्वे शिक्षण अशी तब्बल १७८ मुलांची जबाबदारी संस्थेने उचलली आहे. महामानव बाबा आमटे व्याख्यानमाला, ग्रंथालय हे उपक्रमही आता सुरू करण्यात आले आहेत.
जीवनात काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला असतानाच अनंत झेंडे नगरमधील स्नेहालय संस्थेच्या संपर्कात आले. येथे रुळतानाच त्यांनी आमटेंच्या आनंदवन परिवारात सोमनाथ शिबिरातील श्रम संस्कार छावणीत सहभाग घेतला आणि जीवनातील ध्येय सापडले. सुरुवातीला विद्यार्थी साहाय्य समिती आणि आता महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था, ही या ध्येयाच्या दिशेनेच सुरू केलेली वाटचाल आहे, असे अनंत झेंडे यांनी सांगितले. नगरचाच ‘स्नेहालय’ परिवार हे अनंत झेंडे यांचे प्रेरणास्थान आणि भक्कम आधार. स्नेहालयाचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी हे त्यांचे मार्गदर्शक. आर्थिक स्रोत, पाठबळ म्हणाल तर काहीच नाही. मात्र आमटेंचा आनंदवन परिवार, आमटे कुटुंबीय, वरिष्ठ पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर, विश्वास नांगरे- पाटील, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, विश्वंभर चौधरी, गिरीश प्रभुणे असे एक ना अनेक दिग्गज संस्थेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडले गेले ते या आडवाटेच्या कार्याने. संस्थेला बाबा आमटे यांचे नाव दिले, ते आमटे कुटुंबीयांच्या परवानगीनेच.
आनंदवनातील शिबिरातून परतल्यानंतर जीवनाची दिशा ठरली होती, मात्र मार्ग सापडत नव्हता. मुख्य अडचण जागेची होती. काहीही करायचे तर, जागा गरजेची होती. अनपेक्षितपणेच ही अडचणही दूर झाली. स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या माध्यमातून मुंबईतील नीळकंठ कुलकर्णी यांच्याशी संपर्क झाला. ते मूळचे श्रीगोंद्याचे, मात्र कधी काळी मुंबईत गेले. त्यांचा मुलगा गिरीश अनिवासी भारतीय. रिकामा पडलेला श्रीगोंद्यातील वडिलोपार्जित वाडा सामाजिक कामासाठी देण्याचा त्यांचा मानस होता. त्यांनी हा दोनचौकी वाडा स्नेहालयाला देऊ केला. डॉ. कुलकर्णी यांनी तो अनंत झेंडे यांच्या स्वाधीन केला. कुलकर्णी कुटुंबाने केवळ वाडाच दिला नाही, तर या वाडय़ाचे सर्व कर भरले. याच वाडय़ात आता संस्था विस्तारते आहे.
संस्थेत सुरुवातीला गरीब मुलेच होती. मात्र कार्य विस्तारताना विविध उपेक्षित वर्गातील १७८ मुले आता संस्थेत दाखल झाली आहेत. श्रीगोंदे तालुक्यात फासेपारधी हा समाज मोठा आहे. अशा काही वस्तींवरील मुले गोळा करून त्यांना संस्थेत आणण्यात आले. राहुल कोरडे नावाचा मुलगा अशा काही मुलांना त्याच्या परीने सांभाळत होता. मात्र मदतीअभावी तोही जेरीला आला होता. स्नेहालयाच्याच माध्यमातून ही मुले झेंडे यांच्या संपर्कात आली, त्यांना संस्थेत आणले. मात्र सर्वात मोठा प्रश्न होता तो या मुलांच्या दाखल्यांचा! यांच्या जन्माची कोणतीच नोंद नाही, वयसुद्धा अंदाजानेच ठरवायचे. यातील बहुसंख्य मुलांचे वडील चोऱ्या-दरोडेखोरीच्या आरोपाखाली एक तर तुरुंगात किंवा फरारी, बेपत्ता. त्यांना शोधणार तरी कुठे? या मुलांच्या नावांची समस्या तर आणखीन वेगळी. सत्तुऱ्या, धत्तुऱ्या, कैदी, डेंग्या, वकिल्या, भोज्या अशी या मुलांची नावे. या नावांनी मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा म्हटले तरी अडचणी. फासेपारध्यांची मुले आली म्हटल्यावर संस्थेतील अन्य मुले त्यांची संगत नको म्हणून निघून गेली. त्यामुळे या मुलांना शिक्षणसंस्था तरी प्रवेश देतील की नाही, अशी शंका निर्माण झाली. झालेही तसेच. मात्र अनंत झेंडे याने खचून जाणारे नव्हते. या सगळ्या अडचणींवर त्यांनी मात केली.
झेंडे यांनी सुरुवातीला या मुलांची नावे बदलली. ‘सत्तुऱ्या’चा झाला अर्जुन. ‘कैद्या’चा रणवीर आणि ‘डेंग्या’चा राघव.. सन २०१२ साली संस्थेत दाखल झालेल्या या ३२ मुलांचे असे ‘बारसे’ केल्यानंतर झेंडे यांनी या मुलांच्या शाळाप्रवेशासाठी कायदेशीर लढाई केली. या सर्व मुलांचे पालकत्व कायदेशीर पातळीवर त्यांनी स्वीकारले. त्यासाठी ‘लाल फिती’चा सगळा सोपस्कार पार पाडला. सरकारदरबारी तसे गॅझेट केले. त्याच आधारावर दाखले तयार करून या मुलांना शाळेत प्रवेश मिळवण्यातही यश आले. ही मुलेही आता शाळेत रमली आहेत. यातील अर्जुन दुसरीला सेमी इंग्रजीत तालुक्यात पहिला आला. काही मुले आता इंग्रजीही बोलू लागली आहेत. या मुलांना नागरी जीवनात आणि मुख्यत्वे शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणे, ही साधी गोष्ट नव्हती. फासेपारधी समाजातही पुढच्या पिढीत आता बदल होतो आहे. बायाबापडय़ांना मुले शिकावी, असे वाटू लागले आहे. एकेक बाई आता चार-पाच मुले घेऊन येते. मात्र त्यामुळे पुन्हा जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुलकर्णी वाडा आता अपुरा पडू लागला आहे, शिवाय आर्थिक स्रोत नसताना एवढी मुले सांभाळायची कशी, हाही प्रश्न आहेच. निवारा, जेवण व अन्य असा एका मुलाचा महिन्याचा खर्च १ हजार २०० रुपये आहे, शैक्षणिक खर्च वेगळा. संस्थेत सध्या १७८ मुले आहेत, दुसरीकडे शाश्वत उत्पन्न काहीच नाही. त्यामुळे संस्थेच्या विस्तारासही मर्यादा आहेत. लोकसहभाग एवढा एकच आधार संस्थेला आहे. तो सढळ हाताने लाभला तरच या उपेक्षितांचा हा प्रपंच चालेल, बहरेल..
ल्ल महेंद्र कुलकर्णी

संस्थेपर्यंत कसे जाल?

नगर व पुण्याहून रस्त्याने ८० किलोमीटर अंतरावर ही संस्था आहे. तर दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर नगर व दौंडहून साधारण एवढय़ाच अंतरावर संस्थेचे कार्यालय आहे.

महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था, श्रीगोंदे (नगर)
डोंबारी या भटक्या समाजातील ५२ मुले सध्या संस्थेत शिकत आहेत. या मुलांसाठीही आता आरंभ बालनिकेतन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिढय़ान्पिढय़ा शारीरिक कसरती करत नाचणारी ही मुले आता शिकून सवरून मोठी होऊ लागली आहेत. निदान ते तरी या पारंपरिक व्यवसायातून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

‘मला, सिंधुताई सपकाळ व्हायचंय’

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ एकदा संस्थेत आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी एका मुलीला ‘तू मोठेपणी काय होणार’, असा सराईत प्रश्न विचारला. फासेपारधी समाजातील या मुलीला बाहेरच्या जगाची फारशी माहिती नव्हती, मात्र तिचे उत्तर होते, ‘सिंधुताई सपकाळ’.. संस्थेतील मुलांमधील या बदलाने खुद्द सिंधुताईसुद्धा भारावल्या!

धनादेश या नावाने काढावेत

महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था
(Mahamanav Baba Amte Vikas Seva Sanstha)
(कलम ८०जी नुसार देणग्या
करसवलतीस पात्र आहेत) संस्थांकडे धनादेश नोव्हेंबर महिन्यात सुपूर्द केले जातील.

अशी सर्जनशील साहसे हवी, जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील, असे बाबा आमटे म्हणत. बाबांचे हे विचार अनंताने (अनंत झेंडे) दुर्दम्य आशावादाच्या बळावर प्रत्यक्षात आणले आहेत. बाबांच्या विचारांचा आदर्श कृतीत ठेवून त्याची आणि संस्थेची वाटताल सुरू आहे. या वाटचालीस शुभेच्छा!
-कौस्तुभ विकास आमटे, आनंदवन

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, (०२२-६७४४०५३६)

महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट
नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० (०२२-२७६३९९००)

ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. (०२२-२५३९९६०७)

पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे
रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. (०२५३-२३१०४४४)

नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, (०७१२ – २७०६९२३)

औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
१०३, गोमटेश मार्केट, औषधी भवनजवळ, नवा गुलमंडी रस्ता, औरंगाबाद. (०२४०-२३४८३०३)

नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
१६६, अंबर प्लाझा, पहिला मजला, स्टेशन रोड, अहमदनगर. (०२४१-२४५१५४४/२४५१९०७)

दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१ / बी,
सेक्टर- १० नोएडा (गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) – २०१३०१
(०१२०- ६६५१५००)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tribes going to school