मोहन अटाळकर

महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांखालील लागवडीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे. मागील वर्षी या दोन्ही पिकांना चांगला दर मिळाल्याने ही वाढ झालेली दिसत आहे. मात्र यंदा सोयाबीन आणि कापूस दोन्हींच्याही दरात सतत चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सोयाबीन, कापसाचे अर्थकारण कोलमडणार की काय असे सध्याचे चित्र आहे.

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
subsidized urea of agricultural sector Use for industry stock seized of 38 lakhs
कृषीचा क्षेत्राचा अनुदानित युरिया उद्योगासाठी, ३८ लाखाचा साठा जप्त

मागील वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाला, एकवेळ तर प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत कापसाचे भाव पोहोचले होते. त्यामुळे यंदाही कापसाला तसेच भाव कायम राहतील, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. काही भागात आता नवीन कापूस आला असून, काही शेतकरी विक्री करत आहेत. पण सध्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ५ ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कापसाला साडेअकरा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. मात्र, आता झपाटय़ाने दर कमी झाले आहेत. दुसरीकडे, सोयाबीनचा हंगाम आता सुरू झाला आहे. केंद्राने यंदा सोयाबीनला ४ हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या सोयाबीनला हमीभावाच्या दरम्यान दर मिळत आहे. सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर दर सुधारू शकतात. तर दुसरीकडे सध्या जुन्या सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये दर मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत विचार करता सोयाबीनचा बाजारभाव कमी आहे. यंदा सोयाबीन उत्पादन जास्त राहण्याची शक्यता सोयाबीन प्रक्रिया उद्योगांनी व्यक्त केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मते नुकसान वाढले आहे.

यंदा महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांखालील लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ४६.०१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. यंदा त्यात तब्बल २ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा राज्यात सोयाबीन पिकाखालील एकूण क्षेत्र ४८.७६ लाख हेक्टर एवढे आहे. गेल्या वर्षी ३९.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा त्यात ३ लाख हेक्टरने वाढ झाली असून सद्यस्थितीत कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्र ४२ लाख २९ हजार हेक्टर एवढे आहे.

बाजारात सोयाबीनचे दर घसरणीला लागल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक भागात सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू आहे, सोयाबीनचे दर प्रति क्विंटल साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. गेल्या वर्षी याच काळात सोयाबीनला सरासरी ८ हजार २६४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.

विविध देशांमधील सोयाबीनचे उत्पादन, चीनसारख्या मोठय़ा खरेदीदार देशाकडून होणारी आयात, सोयाबीनची उत्पादकता, सोयाबीन पेंडीची (डीओसी) मागणी अशा अनेक घटकांवर सोयाबीनचे दर ठरत असतात. बाजारात सोयाबीन दरात काहीशी चढ-उतार सुरू आहे. चीन आणि इतर देशांची मागणी वाढल्यास सोयाबीनला आधार मिळेल. त्यामुळे सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार नाही, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

गेल्यावर्षी खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारने पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयात शुल्कात मोठी कपात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खाद्यतेलाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ३० ते ४५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे देशात सोयाबीनसह पामतेलाची आयात वाढत आहे. परिणामी देशातील खाद्यतेल दरांवर परिणाम झाला आहे. केंद्राने खाद्यतेल आयातीवरील हे शुल्क मार्च २०२३ पर्यंत कायम ठेवले आहे. सरकारने दोन वर्षांमध्ये तब्बल ४० लाख टन सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. म्हणजेच यंदा २० लाख टन तेल आयातीवर कोणतेही शुल्क नसेल. या दोन निर्णयांचा बाजारावर सध्या परिणाम जाणवत आहे. देशातील खाद्यतेल उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारने आयातीवर ३० टक्क्यांपासून ते ४५ टक्क्यांपर्यंत शुल्क लागू केले होते. मात्र हे शुल्क आता खूप कमी झाले आहे. याचा प्रभाव बाजारात दिसून येत आहे. गेल्या हंगामात खाद्यतेलामध्ये तेजी होती म्हणून सोयापेंडला उठाव नसतानाही सोयाबीनचे दर वाढले होते. मात्र आता खाद्यतेल आयात वाढल्याने आणि स्वस्त खाद्यतेल आयात होतच राहील, या शक्यतेने सोयाबीन बाजारात मंदीचे सावट आहे.

सध्या बाजारात सोयाबीन पिकांची स्थिती आणि उत्पादनाबाबत वेगवेगळय़ा चर्चा सुरू आहेत. प्रक्रिया उद्योगांच्या मते पिकांची स्थिती चांगली आहे, तर दुसरीकडे, अतिपावसामुळे यंदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतीतज्ज्ञांनी वर्तवली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस होत आहे, त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता असते. जाणकारांच्या मते पुढील महिनाभर सोयाबीनला किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो.

कापूस बाजारावरही परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे भाव कमी झाल्यामुळे, तसेच सध्या कापसात असलेली आद्र्रता या प्रमुख कारणांनी कापसाचे दर कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

सध्या विक्रीसाठी असलेल्या कापसात प्रचंड ओलावा (आद्र्रता) आहे. कापसातील ही आद्र्रतासुद्धा क्विंटलमागे सरासरी एक ते दीड हजार रुपये भाव कमी होण्यास कारणीभूत ठरली आहे. मागील वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाल्यामुळे यंदा कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली. यंदा जुलै महिन्यापासून पावसाने सुरू केलेली रिपरिप अजूनही थांबली नाही. त्यामुळे अनेक भागात कपाशीची अपेक्षित वाढ झाली नाही. मात्र, ज्या भागात पाऊस कमी झाला व कपाशीची पेरणी लवकर झाली होती, त्या भागात शेतकऱ्यांकडे कापूस आला आहे.

यातही ज्या शेतकऱ्यांना आर्थिक निकड आहे, अशा शेतकऱ्यांनी कापसाची विक्री सुरू केली आहे. सध्या ग्रामीण भागात व्यापारी शेतकऱ्याच्या घरातून प्रतिक्विंटल ६ ते ८ हजार रुपये दरापर्यंत कापूस खरेदी करत आहे. कारण सध्या कापसात आद्र्रता मोठय़ा प्रमाणात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. काही ठिकाणी तर अक्षरश: ४० टक्क्यांपर्यंत आद्र्रता असलेला कापूस विक्रीसाठी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. इतकी आद्र्रता असल्यास कापूस ५ ते ६ हजार रुपये क्विंटल प्रमाणेच खरेदी केला जात आहे.

यंदा देशातील कापूस लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ७ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र देशातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली. सध्या अमेरिकेच्या कापूस बाजारातील १ पाऊंड रुईचा भाव हा १ डॉलर १२ सेंटपर्यंत घसरला आहे. पण, हा भाव जरी स्थिर राहिला, तरी प्रारंभी ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाचे भाव राहण्याची शक्यता आहे.

कापूस खंडीचे दर १ लाख रुपयांवरून आता ९३ हजारांवर आले आहेत. असे असले तरी ऑक्टोबरमधील पाऊस आणि वातावरण तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा राहतो, यावर कापसाचा बाजार अवलंबून राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

mohan.atalkar@expressindia.com