दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

सततच्या अवकाळीने तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेले द्राक्ष पीक यंदा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. बदलत्या हवामानामुळे उडद्या, लष्करी अळी, थ्रिप्स या किटकांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. या साऱ्याला तोंड कसे द्यावे या विषयी..

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

थंडीच्या हंगामातही अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेले द्राक्ष पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कधी बंगालच्या उपसागरात, तर कधी अंदमान बेटावर, तर कधी अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत असलेला पाऊस द्राक्ष पिकांवर रोगराई, कीड यांचे आक्रमण वाढवणारा ठरत आहे. याचा फटका द्राक्ष लागवडीला तर बसला आहेच, पण लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही हाती काहीच पडणार नसेल तर अन्य पिके बरी, या निष्कर्षांप्रत उत्पादक आले आहेत.

जिल्हयात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. वातावरणातील बदलाचा अनिष्ट परिणाम या पिकावर सातत्याने होत आहे. कधी अवकाळी, कधी गारपीट, तर कधी अवर्षण या संकटातून बाहेर पडलेले द्राक्ष पीक कधी दलालाच्या कचाट्यात अडकते, तर कधी पडलेल्या बाजाराचा फटका बसतो. यातच गेली दोन वर्षे करोना संकटामुळे उद्ध्वस्त झालेली बाजारपेठ द्राक्ष हंगामाच्या मुळावर उठली. तरीही काही जिद्दी शेतकऱ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर विदेशी बाजारपेठेत आपला ठसा उमटवला असून त्यापासून परकीय चलनही चांगले मिळत आहे. मात्र, एकंदरीत बेभरवशाचा जसा निसर्ग झाला आहे तसाच बाजारही बेभरवशाचा झाला असल्याने लाखो रूपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांच्या या अस्वस्थेला कारण ठरत आहे. या अनियमित निसर्गाला वैतागून काही शेतकऱ्यांनी बागांवर कुऱ्हाडीही घातल्या, मात्र, निसर्ग आणि बाजार कोणाच्याच हाती नसल्याने नाविलाज झालेला शेतकरी पर्यायाच्या शोधात आहे हेही तितकेच खरे.

द्राक्ष हे नगदी पीक, उसापेक्षा चार पैसे गाठीला जादा येत असल्याने जलसिंचन सुविधा असलेले शेतकरी गेल्या चार दशकापासून द्राक्ष शेतीकडे वळले. विकास सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी आवश्यक साथ मिळत गेल्याने क्षेत्रही वाढत गेले. मुळातच सततच्या अवर्षण स्थितीमुळे हतबलतेतून प्रयोगशीलता अंगी आल्याने द्राक्ष शेतीत नवनवे प्रयोग करीत आज या पिकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रॅण्डनेम तयार झाले. द्राक्षाच्या गोडीबरोबरच तासगावच्या बेदाण्याची ख्याती सातासमुद्रापार पोचली. भौगोलिक नामांकनही मिळाले. याला कष्टाची, जिद्दीची जोड मिळाल्याने सांगलीला हे यश मिळाले आहे, यात शंका  नाही. 

एकदम हलक्या, मुरमाड जमिनीत दुसरे कोणतेही पीक तग धरणार नाही अशा जमिनी द्राक्ष पिकाला वरदान ठरतात. उलट कसदार, काळी, निचरा  न होणारी जमीन द्राक्ष पिकाला अनिष्टच. यामुळे मिरज पूर्व भाग, तासगाव, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, पलूस या तालुक्यात द्राक्षपीक वाढण्यास पोषक स्थिती आहे.

सप्टेंबरअखेर पावसाचा हंगाम परतीच्या वाटेवर असतो. ऑक्टोबरमध्ये असलेली उष्णता  फळछाटणीस उपयुक्त ठरते.  यामुळे द्राक्षाच्या फळ छाटणीला ऑक्टोबर छाटणी असेही म्हटले जाते. या कालावधीत छाटणीनंतर येणारे फुटवे फळधारण करूनच येत असतात. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस मोठा नसला तरी पावसाची रिपरिप कायम राहिली. ढगाळ हवामान असल्याने अनेकांनी फळछाटण्या पाऊस थांबल्यानंतर घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकाचवेळी छाटण्याही झाल्या. तथापि, दिवाळीत थंडीचा हंगाम सुरू होणे अपेक्षित असताना यंदा थंडीच गायब झाली आहे. थंडीच्या दिवसात कधी कडक ऊन, तर कधी आभ्राच्छादित आकाश, तर कधी हलका ते मध्यम पाऊस असे वातावरण गेला एक महिना आहे. विलंबाने फळछाटण्या झालेल्या ६५ हजार एकरवरील द्राक्ष पीक सध्या अडचणीत सापडले आहे. या कचाटय़ातून द्राक्ष पीक बाहेर काढण्यासाठी लाखो रुपयांची औषध फवारणी तर करावीच लागत आहे, एवढे करूनही पीक हाती लागेलच याची खात्रीही बदलत्या हवामानामुळे देता येत नाही.

भांडवली गुंतवणूक केल्यानंतर दरवर्षी हंगाम पूर्ण घेण्यासाठी एकरी एक लाखाहून अधिक खर्च येतो. यावर्षी या खर्चात महागडय़ा औषधांमुळे किमान २५ टक्के वाढ झाली आहे.  छाटणी, पेस्ट लावणे आणि वांझफूट काढणे यासाठी एका वेलीला सुमारे १४ ते १५ रुपये केवळ मजुरीपोटी द्यावे लागत आहेत. बिहारी कामगार करोना संकटात गावी परतल्याने स्थानिक पातळीवर मजूरही मिळणे कठीण होत आहे. वेळेत काम झाले तरच त्याचा लाभ मिळू शकतो, अन्यथा सगळेच मुसळ केरात जाण्याचा धोका अधिक आहे.

छाटणीवेळी  ‘डॉर्मिक्स’ ही ‘हायड्रोजन सायनामाईड’सारखी जहाल विषारी औषधाची पेस्ट काडीला लावणे गरजेचे असते. यामुळे वेलीला येणारे फळाचे फुटवे एकाचवेळी येण्यास मदत होते. ही पेस्ट लावणारे मजूर कुशल असणेही तितकेच गरजेचे असते. अन्यथा याचा वाईट परिणाम होतो. मानवी शरीराशी संपर्क आला तर जखमा होण्याबरोबरच अन्य आजारांना सामोरे जावे लागते. त्यात जर मद्याचा आहारी गेला असेल तर हे विष रुग्णालयाची वाट धरायला लावते. छाटणीनंतर साठ दिवसांचा अवधी द्राक्षासाठी अत्यंत मोलाचा असतो. याच काळात करपा, झंतुमानस, दावण्या, बुरशी या रोगाचा जोर वाढण्याचा धोका अधिक असतो. याचबरोबर यंदा बदलत्या हवामानामुळे उडद्या, लष्करी अळी,  थ्रिप्स या किटकांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाना आणि किटकांना अटकाव करण्यासाठी महागडी औषधेच मोलाची ठरत असली तरी विविध कंपन्यांची औषधे रोग नियंत्रणास कितपत अटकाव ठरू शकतील याचा अंदाज वापरानंतर आणि हवा कोरडी असेल तरच लक्षात येतो. बदलत्या हवामानामुळे एकरी रोजचा ५ हजार रुपयांचा खर्च केवळ औषधावर करावा लागत आहे.  औषध फवारणी झाल्यानंतर किमान तीन तास पाऊस नसेल तरच त्याचा उपयोग होतो. जर त्या दरम्यान हलका पाऊस झाला तर पुन्हा तेवढाच औषधाचा खर्च करावा लागतो. यंदा दिवसातून दोन दोन वेळा औषध फवारणी करावी लागत आहे.

हलका पाऊस, दव यामुळे घडकुज, मणीकुज या समस्यांचा सामना सध्या करावा लागत आहे. नाजूक अवस्थेतील घडाचा विकास करण्यासाठी ‘जिबेलिक एॅर्सडि’ची फवारणी करण्यात येते. यामुळे पानांची वाढ होऊन होणारा कोंदटपणा घडात साचलेले पाणी दूर करण्यात अडथळा ठरू शकतो. यासाठी वांझ व अनावश्यक फूट काढून हवा खेळती ठेवली तर घड वाढीसाठी आवश्यक सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होते. वांझ फूट काढल्यानंतर वेलीची वाढ नियंत्रित करण्यासाठी शेंडा खुडणे महत्त्वाचे ठरते. वेलीची वाढ नियंत्रित करण्यासाठी पालाश २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारणी करावी. याचबरोबर नत्र युक्त खतांचा वापर कमी करावा. आंतरप्रवाही बुरशीनाशकाऐवजी स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करावा, रोगनियंत्रणासाठी ‘मांजरी वाईनगार्ड’ २ मिली प्रतिलिटर पाणी किंवा ‘मांजरी ट्रायकोशक्ती’ १० ग्रॅम प्रतिएकर वापरावे. ‘सुडोमोनास’ किंवा ‘बॅसिलस’ ५ मिली प्रतिलिटर या प्रमाणात वापरावे अशी तज्ज्ञांकडून शिफारस करण्यात आली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक मनोज वेताळ यांनी सांगितले.

बदलत्या हवामानामुळे औषधांचा खर्च वाढला तर आहेच, जे उपाय सुचविले जात आहेत ते स्थानिक पातळीवर खर्चिक तर आहेतच, पण पीक वाढीसाठीही आडकाठी ठरू शकतात. संपूर्ण बागेला प्लॅस्टिक आच्छादन करण्याची सूचना तज्ज्ञांकडून केली जात असली तरी त्यासाठी एकरी एक लाख रुपये खर्च करूनही मिळणारे उत्पन्न त्या तुलनेत कमीच असल्याने एवढा मोठा एकरकमी खर्च करणे परवडणारे नाही. याऐवजी बदलत्या हवामानाला तोंड देणारे, रोगराईला अंगभूत विरोध करणारे संशोधन होण्याची गरज आहे.

यंदा अवकाळी पावसाने द्राक्ष हंगाम अडचणीत आला असून फुलोऱ्यातील बागांना याचा जबर फटका बसला आहे.औषधे, खते आणि मजुरी यांच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी बाजारात त्या तुलनेत दरवाढ मिळेलच याची खात्री नाही. यामुळे उत्पादन खर्चाशी निगडित उत्पन्न हे द्राक्ष पिकासाठी येणाऱ्या काळात दिवास्वप्नच ठरणार आहे. 

– प्रवीण पाटील, बोलवाड.