scorecardresearch

खलनायकीचा प्राण

नायक ते खलनायक आणि पुढे चरित्र अभिनेता अशा प्रदीर्घ कारकिर्दीतील अभिनयाने हिंदी चित्रपटांवर ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते ‘प्राण’ यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला. चित्रपटसृष्टीत सत्तरहून अधिक वर्षे घालवलेल्या व सुमारे ४०० चित्रपटांमध्ये विविधरंगी भूमिका करणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याच्या वाटचालीचा आढावा..

खलनायकीचा प्राण

नायक ते खलनायक आणि पुढे चरित्र अभिनेता अशा प्रदीर्घ कारकिर्दीतील अभिनयाने हिंदी चित्रपटांवर ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते ‘प्राण’ यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला. चित्रपटसृष्टीत सत्तरहून अधिक वर्षे घालवलेल्या व सुमारे ४०० चित्रपटांमध्ये विविधरंगी भूमिका करणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याच्या वाटचालीचा आढावा..
महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारतीय केंद्र यांचे संबंध सलोख्याचे आहेत की दुराव्याचे, ठरवणं कठीण आहे. पण एका गोष्टीत केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचं अनुकरण करतं, असं खात्रीनं म्हणता येईल. दिल्लीत चित्रपटाच्या पद्म पुरस्कारांची आणि फाळके अ‍ॅवॉर्ड्सची निवड महाराष्ट्र राज्य लॉटरी पद्धतीनं होते याबद्दल शंका नाही. दिलीपकुमारला भारतरत्न न मिळण्याचं आणि प्राणसारख्या सर्वथैव योग्य अभिनेत्याला ९३ व्या वर्षी फाळके अ‍ॅवॉर्ड मिळण्याचं दुसरं कारण सापडत नाही. सलमान खानला भारतरत्न आणि अक्षयकुमारला फाळके अ‍ॅवॉर्ड मिळाल्याबद्दलचे लेख लवकरच लिहावे लागणार, अशी अपेक्षा असताना निदान प्राणला, उशिरा का होईना, न्याय मिळाला हे बरं झालं. देर आए (हमेशा की तरह!) दुरुस्त आए!
मनापासून आनंद वाटावा अशी खास गोष्ट म्हणजे स्वत: प्राणसाहेबांना या सन्मानाचा खूप आनंदी झाला असेल, अशी खात्री आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरी त्यांच्या दीर्घ मुलाखतीचा योग आला होता. त्यांच्या आलिशान, चारमजली बंगल्याचा दिवाणखाना निरनिराळ्या पुरस्कारांच्या आणि चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवांच्या ट्रॉफीजनी गच्च भरून ओसंडतो आहे. त्यांची मोजदाद करण्याचा प्रयत्न माझ्या गणितातल्या प्रावीण्यामुळे सोडून द्यावा लागला! माझा खटाटोप कौतुकानं वघणाऱ्या प्राणसाहेबांनी अभिमान लपवण्याचा आणि विनय दाखवण्याचा प्रयत्न करत म्हटलं, ‘आणखी एवढय़ाच (ट्रॉफीज) वरच्या मजल्यावर आहेत!’
पुरस्कारांचं आणि त्यापेक्षाही जास्त सिल्व्हर ज्युबिली ट्रॉफिजचं आपल्याला महत्त्व का वाटतं याचा प्राणसाहेबांनी केलेला खुलासा वेधक होता. भारत-पाकिस्तानची फाळणी, सिनेमा आणि पत्नी यांनी मला जीवन म्हणजे काय, जबाबदारी म्हणजे काय हे शिकवलं! मी सुधारलो, मार्गी लागलो याची खात्री या ट्रॉफीज मला पटवतात. म्हणूनच मला आजही प्रत्येक पुरस्कार, प्रत्येक चित्रपटाचं यश मोलाचं वाटतं.’
‘म्हणजे? तुम्ही राजीखुषीनं सिनेमात आला नाहीत ?’
‘मुळीच नाही!’ प्राणसाहेबांनी आश्चर्याचा दुसरा धक्का दिला आणि दुसरी सुरस गोष्ट ऐकवली. चि. प्राणनाथ किशननाथ सिकंद, जन्म १२ फेब्रुवारी १९२०, स्थळ दिल्ली, ढ मुळीच नव्हता, पण शाळा आणि अभ्यास यात त्याचं मन कधीच रमलं नाही. वडिलांच्या ठेकेदारीमुळे बारा गावचं पाणी पिऊन चिरंजीव रामपूर येथे मॅट्रिक ‘पार पडले!’  (शब्दप्रयोग प्राणजींचाच!) होय होय., तेच ते ‘प्रसिद्ध’ रामपुरी चाकूंचं माहेरघर. दिल्लीतल्या एका फोटोग्राफीच्या दुकानात उमेदवारीसाठी दाखल होऊन प्राणसाहेबांनी शिक्षणाला रामराम ठोकला. (दिल्लीत कनॉट प्लेसजवळ कालपरवापर्यंत हे दुकान – दास फोटोग्राफी स्टुडिओ – उभं होतं.) दाससाहेबांनी दुकानाची लाहोरमध्ये शाखा काढायचं ठरवलं. आणि प्राणला तिकडे रवाना केलं. दुकानातलं काम संपलं की एका ठराविक हॉटेलमध्ये प्राणसाहेबांची संध्याकाळ मित्रांच्या मैफिलीत रंगायची. अशाच एका दिवशी हा संध्याक्रम साजरा होत असताना एक गृहस्थ प्राणच्या टेबलाजवळ आला आणि विचारता झाला, ‘‘आप का नाम क्या है?’’
‘‘आप को काम क्या है?’’ प्राणनं रुबाबात प्रतिप्रश्न केला.
‘‘मी तुला सिनेमात काम देतो. या पत्त्यावर मला उद्या भेट.’’ कार्ड देऊन तो गृहस्थ निघून गेला, पण प्राणची निवड पक्की करून! प्रश्नाचं उत्तर प्रश्नानंच देण्याची प्राणची अदा त्याला बेहद पसंद पडली. तो गृहस्थ कुणी असा तसा नव्हता. त्या वेळच्या फिल्म इंडस्ट्रीतला तो नामी स्टोरी रायटर होता. – वलीसाहेब! मुमताज शांती या त्या जमान्यातल्या आघाडीच्या नायिकेचा पती, दलसुख पांचोली या बडय़ा निर्मात्याचा हुकमी लेखक.
प्राणला मात्र ही वल्ली मुळीच महत्त्वाची वाटली नाही. तो वलींना भेटायला गेलाच नाही. सिनेमाबद्दल त्याला मुळीच आकर्षण नव्हतं. नोकरीत मिळणारे दोनशे रुपये त्याला रग्गड वाटत होते. अखेर आठ दिवसांनी वलीसाहेब त्याचा पत्ता शोधून दुकानात आले. आपल्याला येणाऱ्या सर्व शिव्यांची बरसात करून झाल्यावर त्यांनी हताशपणे विचारलं, ‘‘अरे पण शहाण्या, तू आला का नाहीस?’’
‘‘मला काय ठाऊक, तुम्ही सीरियसली बोलताय!’’ प्राण निर्विकार चेहऱ्यानं उत्तरला, ‘‘मी समजलो.. जाऊ द्या. आता भर दुपारची वेळ आहे. आपण दोघे शुद्धीत आहोत. तुम्ही खरं बोलताय, याची आता मला खात्री आहे. मी उद्या भेटतो तुम्हाला.’’ या वेळी त्यानं शब्द पाळला. दुसऱ्या दिवशी वलीसाहेबांनी प्राणला पांचालीसमोर उभं केलं. फुटबॉल क्रिक्रेटच्या मैदानातली मेहनत आणि उत्तम खाण्यापिण्यावर पोसलेली समोरची मर्दानी सौंदर्याची मूर्ती पांचालींच्या अनुभवी नजरेला पसंत पडली नसती तरच नवल! ‘जट यमला’ या नव्या चित्रपटासाठी त्यांनी प्राणला तिथल्या तिथे ‘साइन’ केलं. मोबदल्याचा आकडा बघून प्राण चाट पडला. पन्नास रुपये! दुकानात दर महा दोनशे रुपये घेणाऱ्या प्राणचा हात क्षणभर मागे झाला. पण त्याच्या धमन्यांतल्या तरुण रक्ताला साहसाची भूल पडली. ‘काय आहे तरी काय हे सिनेमा नावाचं प्रकरण’ या कुतूहलापोटी प्राण सिनेमात काम करायला तयार झाला.
कसा वाटला अभिनयाचा पहिला अनुभव?
‘‘कपाळाचा अभिनय! अभिनय कसा करू नये हे कुणाला शिकायचं असंल, तर त्यानं माझे ‘यमला जट’ आणि ‘खानदान’ हे चित्रपट बघावेत!’’ प्राणसाहेबांनी प्रांजळपणाची कमालच केली.
‘‘मग दुकानाकडे का परत गेला नाहीत?’’
‘‘बाप रे! मला तोंड होतं का परत जायला? आता मागे पाऊल घेता येणार नाही एवढंच मला कळत होतं. ती जबाबदारीची पहिली जाणीव होती!’’ प्राण दिलखुलासपणे बोलत होते. ‘‘पाण्यात पडलेल्या पानासारखी स्थिती होती माझी! पाणी नेईल तिकडे मी चाललो होतो. इथून हलायचं नाही, एवढंच मला कळत होतं. गंमत म्हणजे, मला कामं मिळत राहिली. काही दिवसांनी लोक मला चक्क ओळखू लागले. मला एका सिनेमाचे पाच हजार रुपये मिळू लागले. पाचाचे नऊ झाले आणि मला स्वर्गाला हात टेकल्यासारखं वाटलं. पण पतंग उंच गेला, की काटला जातो ना, तसंच झालं! भारत-पाकिस्तानची फाळणी झाली. आणि सारं काही सोडून मला रातोरात मुंबई गाठावी लागली. लाहोर सोडताना मी राजा होतो, मुंबईत आलो तो रंक म्हणून! घरदार, पैसा, मित्र, सारं सारं सोडून यावं लागलं!’’
फाळणीचे हे निखारे प्राणजींच्या काळजात आजही धुमसत असावेत. फाळणीच्या वणव्यात सापडलेल्या कोणत्याही पंजाबी माणसांप्रमाणे प्राणसाहेबांच्या मनात काँग्रेसबद्दल राग आहे. इतर कलाकारांप्रमाणे ते राजकारणात कधीच पडले नाहीत. मात्र आणीबाणीविरुद्ध चित्रपट कलाकारांचा पक्ष काढण्यात त्यांनी देव आनंद आणि विजय बंधूंना कडवी साथ दिली. तो पक्ष निघण्याआधीच विसर्जित झाला ही गोष्ट वेगळी. असो. फाळणीनंतरच्या मुंबईतल्या दिवसांनी प्राणसाहेबांचा अंतर्बाह्य़ कायापालट केला.
तीनशे दिवसांच्या पायपिटीनंतर प्राणसाहेबांना ‘जिद्दी’ हा चित्रपट मिळाला. (‘तीनशे’ हा त्यांनीच सांगितलेला आकडा!) देव आनंद त्या चित्रपटाचा हिरो होता. पाचशे रुपये मोबदला आणि त्यापैकी शंभर रुपयांचा अ‍ॅडव्हान्स, ‘जिद्दी’चं (अप) मानधन प्राणनं चडफडत स्वीकारलं. त्या दिवशी त्यांनी साक्षात परमेश्वराशीच झगडा केला. ‘‘आत्ता म्हणून हे पैसे घेतोय, इथून पुढे भरपूर काम अन् भरपूर पैसा मिळाला नाही, तर माझ्याशी गाठ आहे’’ असा सज्जड दमच त्यांनी दिला. हिंदी सिनेमाच्या भावी खलनायकोत्तमाचा तो उग्रावतार बघून सर्वशक्तिमान अवताराचीही घाबरगुंडी उडाली असावी. ‘जिद्दी’ नंतर प्राणसाहेबांकडे चित्रपटांची रांग लागली! ‘अपराधी’ (नायिका : मधुबाला), ‘गृहस्थी’, ‘खानदान’.. आणि ‘बडी बहन’ नं प्राणना हात दिला. ‘बहार’पासून प्राणसाहेबांची हिंदीच्या पडद्यावर दादागिरी सुरू झाली.
याच काळात दिलीपकुमार, राज कपूर, अशोक कुमार, बलराज साहनी यांच्याबरोबर काम करताना त्यांच्यातला कलाकार जागा झाला, आणि गंभीरपणे आपल्या कामाकडे बघू लागला. या नटांप्रमाणे आपलं वाचन नाही, आपल्याला स्टेजचा अभिनय नाही, यांच्याबरोबर टिकून रहायचं तर खूप मेहनत घेतली पाहिजे, आपलं वेगळेपण दाखवलं पाहिजे आणि सातत्य दाखवलं पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग ते दिग्दर्शकांशी, लेखकांशी आपल्या व्यक्तिरेखांची चर्चा करू लागले. भूमिकांना वैशिष्टय़ देणारे तपशील शोधू लागले आणि त्यातून रंग भरू लागले. निरनिराळे गेटअप आणि लकबी यांनी भूमिका सजवू लागले. ‘जिस देश में गंगा बहती है’ मधल्या दरोडेखोर राकाच्या भूमिकेसाठी त्यांनी गळ्याभोवती हाताचा फास टाकण्याची लकब शोधली. राकाच्या मनातली फाशीची भीती मार्मिकपणे व्यक्त करणारी ती लकब राज कपूरला एकदम आवडली.
हिंदी चित्रपटातला खलनायकीचा इतिहास नायकगिरी इतकाच दीर्घ व सुरस आहे. याकुब, कन्हय्यालाल या खंद्या नटांपासून परेश रावल आणि अमरीश पुरी या अष्टपैलू नटांनी तो समृद्ध केला आहे. हे नवेजुने चारही नट सूक्ष्मता, सहजता, सखोलता आणि वैविध्यात पुढे आहेत. मात्र प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटातल्या व्हिलनला ‘स्टार’ बनवलं, हिरोच्या बरोबरीला नेलं आणि व्हिलनसाठी मोठा चाहतावर्ग निर्माण केला ही त्यांची कामगिरी असामान्य आहे. त्यांचा व्हिलन रोमॅन्टिक होता. प्राणसाहेबांचं व्यक्तिमत्त्व होतंच तसं दमदार! त्यांच्या आवाजातली जरब; तिच्यातला हेटाळणीचा सूर; नजरेतला दरारा आणि गालाला पडणारी उपरोधिक घडी.. खलनायकीचं रेडिमेड मटेरिअल म्हणजे प्राण! पण त्याचबरोबर ग्रीक देवतांशी तुलना होणारी त्यांची पीळदार पण सडपातळ आणि तरीही मर्दानी रुबाबाची देहयष्टी या संपदेमुळे ते रोमॅन्टिक वाटायचे. दिलीप कुमार, देव आनंदपासून शम्मी कपूर, विश्वजितपर्यंत सगळ्या हिरोंना त्यांनी नायिकेच्या प्राप्तीसाठी टक्कर दिली.
कालमानानुसार, वयोमानानुसार, प्राणसाहेबांनी सांधा बदलला, आणि मनोजकुमारच्या ‘उपकार’मधून ते चरित्रनायक बनले. अमिताभच्या जमान्यापर्यंत ते दिमाखानं वावरले. ‘जंजीर’ आणि ‘मजबूर’ या चित्रपटात अभिताभच्या बरोबरीनं त्यांनी टाळी मिळवली. सहा दशकांमधल्या सुपर स्टार्सबरोबर ते बरोबरीनं वावरले. साठी उलटल्यानंतर अशोककुमार ‘व्हिक्टोरिया ३०२’ मध्ये जोडी जमवून त्यांनी प्रौढ नायकांच्या चित्रपटांची लाट आणली. ‘बॉबी’, ‘शराबी’  आणि ‘परिचय’ या चित्रपटांमधून त्यांनी अशोक कुमारच्या वर्गातल्या संयत अभिनय करून, उच्च वर्गातल्या ‘पॉलिश्ड’ व्यक्तिरेखा साकारल्या. बेशिस्त नातवंडांना माणसांत आणण्याचा भगीरथ प्रयत्न वाया जातो. म्हणून हळहळणारा आजोबा त्यांनी दाखवला, आणि आपलं न ऐकणाऱ्या कलाकार मुलानं घराबाहेर काढणाऱ्या बापाचा पीळदेखील! आणि या सगळ्यातून वेळ काढत, ‘गोड खाण्याची तोंडाला मिठी बसली’ असं म्हणत (चित्रपट : दुनिया) ते पुन्हा एकदा दिलीप कुमारला आडवे गेले!
एकदा अभिनयाचा सूर सापडल्यावर प्राणसाहेबांनी त्या कलेचे सगळे रंग अनुभवले. स्वत:च्या शर्तीनुसार, स्वत:च्या सोयीनं! एकदा मोठेपणा मिळाल्यावर त्यांनी त्याचा आब कायम राखला. राजेश खन्नासारख्या सुपर स्टारबरोबर त्याच्या बेशिस्तपणामुळे काम करणार नाही अशी प्रतिज्ञा करण्याची आणि ती पाळण्याची जिगर प्राणसाहेबांकडे होती. खलनायकाची अस्मिता त्यांनी जपली व जोपासली. नायक नायिकांनंतर खलनायकांचं नाव श्रेयनामावलीत येणं त्यांना मान्य नव्हतं. सर्व कलाकारांची नावं येऊन गेल्यावर ‘.. आणि प्राण’ (अँड प्राण!) असं आपलं नाव झळकवण्याचा आग्रह त्यांनी धरला. हिरोच्या बरोबरीनं मानधन आणि तसाच चाहतावर्ग असलेल्या प्राणसाहेबांची ही अटदेखील निर्मात्यांनी तत्काळ मान्य केली.
खलनायकाभोवती असं वलय निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले प्राण हे पहिले व शेवटचे खलनायक! त्यांच्या समोरच प्रेम चोप्रा, शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर ही खलनायकांची पुढची पिढी उभी राहिली. शत्रूघ्न सिन्हा खलनायकीवर आपलं नाव कोरणार, अशी शक्यता निर्माण झाली. पण दमदार आवाजाच्या बळावर खलनायकीत स्वत:ची जहागिरदारी निर्माण करणारा शत्रूघ्न अखेर बोलघेवडा बोलबच्चन ठरला. हिरो बनण्याची नसती हौस आणि राजकारण प्रवेश यांनी खलनायकीच्या प्रांताचं अनभिषिक्त सम्राटपद प्राणसाहेबांकडेच अबाधित राहिलं. ही त्यांची पुण्याई नाही. कमाई आहे.
अभिनयात त्यांनी कुणाची नक्कल केली. उठसूट विदेशी नटांचं गुणगान करून त्यांच्या भूमिकांच्या नकला करणं प्राणसाहेबांना मुळीच मान्य नव्हतं. ते कधी इंग्रजी चित्रपट पहातच नसत. ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन’ हा त्यांनी पाहिलेला एकमेव इंग्रजी चित्रपट आणि तो देखील मुलांच्या हट्टाखातर पाहिलेला! पुढे प्राणजींचा एक मुलगा इंग्रजीचा प्रोफेसर झाला आणि इंग्लंडमध्ये शिकवू लागला, हा विरोधाभास मात्र प्राणसाहेब रंगवून सांगतात. विरोधाभासांनीच आयुष्यात रंगत येते, हे त्यांना ठाऊक आहे आणि ती ते ‘एंजॉय’ करतात. ते पुस्तकं वाचत नाहीत. क्रिकेटच्या कॉमेंटरीखेरीज रेडिओ ऐकत नाहीत. टीव्ही आल्यावर त्यांची क्रिकेट पाहण्याची हौस भागली, तेव्हाही ‘पहा, मी म्हणतो ना, रेडिओची गरजच नाही.’ हे मिस्किलपणे बोलून दाखवायला त्यांना आवडतं.
त्या मुलाखतीत शेवटी मी नेहमीचा प्रश्न विचारला होता, ‘‘तुम्हाला आवडणाऱ्या तुमच्या भूमिका कोणत्या?’’
‘‘प्रेक्षकांना आवडलेल्या सगळ्या भूमिकाच मला आवडतात.’’ प्राणसाहेब मनापासून बोलत होते, ‘मजबूर’ आणि ‘शहीद’ या भूमिका मला खास करून आवडतात. ‘शहीद’मध्ये मला सातआठ सीन्स होते. ‘मजबूर’ मध्ये माझं काम तेराव्या रिळानंतर सुरू होतं. ‘जंजीर’मध्येही मी खूप उशिरा पडद्यावर दिसतो. पण त्या भूमिका इतक्या नेमक्या लिहिल्या होत्या, की त्यांनी मला पूर्ण न्याय दिला. मला त्यांनी खूप दाद मिळवून दिली. खूप आनंद दिला. उत्तम काम करण्यासाठी दोन तास पडद्यावर दिसणं आवश्यक नसतं, हे शिकवलं. ‘अपराधी’ मध्ये मला क्रांतिकारकाची भूमिका होती. तिचं कौतुक करताना बाबूराव पटेल यांच्यासारख्या खाष्ट, फटकळ समीक्षकानं म्हटलं होतं, ‘प्राणच्या या भूमिकेत जयप्रकाश नारायण आणि अच्युतराव पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्त्वांची झाक दिसली!’ त्या महान माणसांचं ऋण अभिनयातून फेडण्याचा मी प्रयत्न केला होता. तो पटेलांच्या लक्षात आला म्हणजे मला जमला होता तर! ‘अपराधी’ ठार कोसळला. पण ती दाद आयुष्यभर माझ्या सोबत असेल!’’
गेली वीस वर्ष तरी प्राणना पडद्यावर पाहिल्याचं आठवत नाही. प्रकृतीनं त्यांच्यावर सक्तीची निवृत्ती लादली आहे.
आज फाळके पुरस्कारामुळे लक्षात आलं, त्यांच्याकडे कलाकार म्हणून आठवावं आणि दाद द्यावं असं खूप काही आहे. ते पडद्यावर दिसोत न दिसोत, उपमा कालिदासाची, तशी खलनायकी प्राणसाहेबांचीच, असं प्रेक्षकांच्या चार पिढय़ा नक्की म्हणतील. ही खरी कमाई.. ‘हंड्रेड क्लब’ किंवा चित्रपटामागे ४० कोटी घेणाऱ्यांच्या कमाईपेक्षा मोठी!

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-04-2013 at 11:30 IST

संबंधित बातम्या