महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय ‘गोवंश हत्याबंदी कायदा’ राज्यात लागू करण्याचा आहे. गोवंश हत्याबंदी कायदा माझ्या दृष्टीने सर्वार्थाने मुस्लिमांच्या हिताचाच असल्यामुळे मुसलमानांनी माझ्या मते या कायद्याचे स्वागतच करायला हवे, कारण गोवंश हत्याबंदी कायदा हा मुस्लीमविरोधी आहे, हा तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी पसरविलेला (गोड) गैरसमज दूर करण्याची मुसलमानांना संधी आहे. वास्तविक पाहता ज्यांना शुद्ध शाकाहारी म्हटले जाते ते फक्त भारतातच आहेत. जगात अन्यत्र कोठेही नाहीत. भारतातदेखील त्यांची संख्या खूपच सढळपणे मोजल्यास एकूण लोकसंख्येच्या ७-८ टक्क्यांपेक्षा जास्त भरणार नाही. जे मांसाहारी आहेत त्यांच्यापैकी जवळपास ७०-७५ टक्केगोवर्गीय आणि म्हैसवर्गीय मांस अर्थात ‘बीफ’ खाणारे आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये मुसलमानांचे प्रमाण १०-१२ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यांच्यापैकी फक्त ४-५ टक्केच बीफ खाणारे आहेत.
    महाराष्ट्रामध्ये दलितांची संख्या मुसलमानांपेक्षा जास्त आहे, हे आकडेवारी देऊन सिद्ध करण्याची गरज नाही. त्यातील बहुसंख्य, किंबहुना सर्वच बीफ खाणारे आहेत. सर्वच आदिवासी बीफ खाणारे आहेत. सर्वच ख्रिस्तीधर्मीय बीफ खाणारे आहेत. अन्य मांसाहारी जातीचे हिंदू मटण आणि बीफ यांपासून तयार केलेल्या व्यंजनांमध्ये फरक करण्याएवढे तज्ज्ञ नसतात, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. त्यात परत बिर्याणी ही गोमांसाचीच जास्त चवदार लागते म्हणून आग्रह करून मागून खाणाऱ्यांची संख्या कमी नाही.
महाराष्ट्रातील मुसलमानांचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील शहरी भागातील ५०-६० टक्के आणि ग्रामीण भागातील ९०-९५ टक्के मुसलमान बीफ अजिबात खात नाहीत. काही वेळा गोमांस खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसून जेवण  करण्याचेसुद्धा टाळतात. थोडय़ाफार फरकाने हीच स्थिती खान्देशी आणि वैदर्भीय मुसलमानांचीदेखील आहे. मात्र मराठवाडय़ात बहुसंख्य मुसलमान बीफ खाणे पसंत करतात; परंतु ग्रामीण मराठवाडय़ातदेखील बीफ खाणाऱ्यांचे प्रमाण शहरी भागापेक्षा कमी आहे.
याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, तथाकथित हिंदुत्ववादी ज्यांना ज्यांना हिंदू मानतात, बीफ खाणाऱ्यांमध्ये त्यांचे प्रमाण मुसलमानांपेक्षा किती तरी पटीने जास्त आहे आणि जे स्वत:ला शुद्ध शाकाहारी म्हणवून घेतात, त्यात देशस्थ ब्राह्मण, जैन आणि वीरशैवधर्मीय (लिंगायत) हे हिंदूंमध्ये अत्यल्पसंख्य आहेत. यांच्यातदेखील १०० टक्के शाकाहारी नसतात, हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जर हा कायदा मांसाहारींसाठी काही समस्या निर्माण करणार असेल, तर तो मुसलमानांपेक्षा मांसाहारी हिंदूंसाठी जास्त समस्या निर्माण करेल; कारण दलित, आदिवासींमध्ये दारिद्रय़रेषेखालील लोकांच्या आहारातील प्रथिनाचे (प्रोटीन) विपुल भांडार असलेला आणि स्वस्तात मिळणारा जर कोणता घटक असेल, तर तो फक्त बीफ हाच आहे. सर्वच जाणतात की, आदिवासींमध्ये कुपोषितांची संख्या काळजी करण्याएवढी आहे. त्यांच्या आहारातून बीफ काढून घेतल्यास ही संख्या अधिक वाढू शकते; परंतु तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे त्यांच्याशी काही देणेघेणे असण्याचे कारण नाही.
मुसलमान जसजसा आर्थिकदृष्टय़ा संपन्न होत जातो, तसतसा त्याचा कल बीफ खाण्याकडे कमी आणि मटण खाण्याकडे जास्त वाढत जातो, कारण मटण खाणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते आणि आमच्याकडे बडय़ाचे मांस (बीफ) चालत नाही, असे फुशारकीने पाहुणेरावळ्यांसमोर म्हटले जाते. शिवाय महाराष्ट्रासह देशभर कुक्कुटपालन आणि मत्स्यशेती मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे आणि आज तरी चिकन आणि मासे बीफपेक्षा स्वस्त असल्यामुळे चिकन आणि मासे खाण्याकडे मांसाहारींचा कल वाढत आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेदेखील ते हितकर आहेच, कारण लाल मांसा (बीफ) पेक्षा पांढऱ्या मांसामध्ये (चिकन, मासे) चरबीचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे डॉक्टरसुद्धा पांढरे मांस खाण्याचाच सल्ला देतात. त्यामुळे चरबीमुळे उद्भवणारे अनेक गंभीर आजार टाळले जातात. या दृष्टीनेसुद्धा हा कायदा मुसलमानांच्या हिताचाच आहे. आणखीन एक गैरसमज मुसलमानांबद्दल असा आहे की, ते बीफ खातात म्हणून मठ्ठ आणि मंदबुद्धी असतात. हा गैरसमजदेखील दूर करण्याची संधी आहे. शिवाय ज्यांना बीफच खायचे आहे त्यांच्यासाठी म्हैसवर्गीय जनावरांचे मांस उपलब्धच राहणार आहे, कारण तूर्त तरी म्हशीचा समावेश गोवंशात करण्यात आलेला नाही. हा कायदा फक्त काही व्यावसायिकांसाठी रोजगाराची समस्या निर्माण करू शकतो. त्यापैकी गोवंशीय जनावरांची कटाई आणि मांसविक्री करणारा एक घटक मुसलमान खाटीक (कुरेशी) समाज आहे. हा समाज जास्त करून शहरी भागात राहतो आणि व्यवसाय करतो. या समाजातील जे संपन्न आणि धनिक लोक आहेत, ते स्वत: कुठलेही काम न करता गरीब खाटिकांना अल्पमजुरीवर राबवून घेतात.
 देशी गाईमध्ये देवांचा अधिवास आहे आणि त्या माता आहेत हे समजू शकते, परंतु ज्या परदेशी गायी (जर्सी, होल्स्टन आदी) आयात करून भारतात आणल्या आहेत किंवा परदेशी वळूच्या द्वारे फलित करून संकरित गाईची पैदास करण्यात आली आहे, कृत्रिम रेतनाद्वारे जन्माला घातलेल्या संकरित गाईसुद्धा माता आहेत का? त्यांच्याही शरीरात देवाचा अधिवास आहे का?