वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात ‘ती’च्या लढय़ाला घरच्यांचे, मित्रांचे, सहकाऱ्यांचे आणि समाजाचेही भरभक्कम पाठबळ मिळाले तर ते लढण्यासाठी प्रेरणा देते आणि मनोबल उंचावते, असा सूर लोकसत्ता ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमातील एक ‘तिचा’ लढा या सत्रात व्यक्त करण्यात आला.

महिला काझीहोणार

मुस्लीम समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा कोणी नेता झाला नाही. ही नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आणि मुस्लीम समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाची स्थापना केली. आज संघटनेचे १३ राज्यात ७० हजारांहून अधिक सदस्य आहेत. भारतीय राज्यघटना आणि कुराण या दोघांनाही सोबत घेऊनच वाटचाल केली पाहिजे हा विचार मुस्लीम समाजात रुजविण्याचे काम आम्ही सुरू केले. तोंडी तलाक पद्धत, हलाल पद्धत या जाचक आणि महिलांवर अन्याय करणाऱ्याच आहेत. मुस्लीम समाजाच्या इतिहासात आगळी नोंद होईल, असा एक प्रयत्न आम्ही करत आहोत. मुस्लीम समाजातील काही महिलांना आम्ही धार्मिक शिक्षण देऊन ‘काझी’ म्हणून तयार करत आहोत.

नूरजहॉं साफिया निहाज, भारतीय मुस्लीम महिला

आंदोलनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमिंधेपण नको होतं

आयुष्याच्या प्रवासात मोहनच्या जाण्यानंतर नव्याने करिअर करण्याचे वय नव्हते. मात्र मुलीसाठी अर्थार्जन करणे अत्यावश्यक होते. माहेर, सासर दोन्हीकडून तसेच सहकाऱ्यांकडून पाठबळ मिळाले. आतापर्यंतच्या अनुभवात नेहमीच महाराष्ट्रात जन्मल्याचा आनंद आहे. इथे सभ्य, सुसंस्कृत पुरुषवर्ग होता. त्यांच्या सहकार्यामुळेच वाटचाल सुसह्य़ झाली. ही वाटचाल करताना मला मिंधेपण नको होते. म्हणूनच काम करताना कुठेही मोहनचे नाव वापरले नाही. मोहनची  पत्नी म्हणून सगळे जण ओळखत होते.  काम मिळवताना आणि करताना  मुलीची आई आणि केवळ ‘मी’ होते. तीच ओळख मला जपायची होती. माझ्या या भूमिकेमुळे मी कदाचित माझे नुकसानही करून घेतले असेल, पण आजपर्यंतची वाटचाल ही स्वाभिमानाने केली असल्याचा आनंदही आहे.

शुभांगी संगवई-गोखले, अभिनेत्री

पालकांची साथ महत्त्वाची 

माझ्या प्रत्येक निर्णयात पालकांची भूमिका महत्त्वाची होती. करिअर, लग्न, लग्नानंतरच्या दु:खद घटना आणि पुन्हा करिअर. पालकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही आयुष्यातील प्रत्येक चांगल्या आणि वाईट प्रसंगांना तोंड देऊ शकता. चांगल्या प्रसंगात याच्यासाठी की मॉडेलिंगच्या क्षेत्रात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्ती आहेत. तुम्ही तुमचे संस्कार, तत्त्व आणि मूल्यांशी प्रामाणिक राहिलात तर तुम्ही वाहावत जात नाही. माझ्या पालकांचा विश्वास, त्यांनी दिलेला पाठिंबा यामुळे या क्षेत्रात असूनही वाहवत गेले नाही तर प्रगतीच करू शकले. त्यांची साथ होती म्हणूनच मला माझ्याबरोबर झालेल्या दु:खद घटनांना मागे टाकता आले. माझ्या मुलासह नव्याने सुरुवात करता आली.  म्हणूनच सांगेन की ज्या प्रमाणे आपले पालक आपल्याला वेळ, आनंद, पाठिंबा देतात, त्याचप्रमाणे आपणही आपली जबाबदारी ओळखून त्यांना त्याच गोष्टी दिल्या पाहिजेत.

आलिशिया राऊत, सुपर मॉडेल