आसाराम लोमटे

‘‘जे सांगायचं ते कधी संपत नसतं. छापल्यानंतर असं वाटतं की आपली सुटका झालीय. पण तसं होत नाही. पुन्हा लिहायची इच्छा होते. कोणताच लेखक त्याच्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ असं लेखन करीत नाही. सतत लिहिण्याचं तेच तर कारण असतं. आपण आतापर्यंत जे लिहिलंय ते चांगलं नाही असं समजूनच चाललं पाहिजे. आपण लिहिलेलं वगळून सर्वश्रेष्ठ असं लिहिण्याची जबाबदारी ही येणाऱ्या पिढय़ांची आहे असं मानलं पाहिजे..’’

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

प्रसिद्ध लेखक विनोदकुमार शुक्ल सांगत असतात. त्यांची वयाची ऐंशी वष्रे उलटलेली आहेत. एखाद्या ओझ्याने दबून गेल्यासारखे जरा झुकलेले खांदे, जाड िभगाच्या चष्म्यातूनही लकाकणारे त्यांचे निरागस डोळे.. हे सांगणं रूक्ष किंवा जड वाटावं असंही नाही. विनोदजी जेव्हा बोलत असतात तेव्हाही ते जणू त्यांच्या पुस्तकांतील शैलीसारखंच प्रवाही, अकृत्रिम आणि सहज असतं, याचा जिवंत प्रत्यय येत राहतो. िहदीतले ते आजचे सर्वात महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांच्या कविता-कादंबऱ्यांची भाषांतरं केवळ भारतीय भाषांमध्येच नाही, तर इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन अशा जगभरातल्या भाषांमध्ये झाली आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांना आणि कवितांनाही पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शकांनी केलंय. त्यांच्या निर्मितीबद्दल प्रचंड कुतूहल असतं. त्यांच्या अनोख्या शैलीचे चाहते देशभर आहेत. या साऱ्या लौकिकाचा वारा विनोदजींना जराही स्पर्श करीत नाही. ते स्वत:ला ‘राष्ट्रीय’ समजून बोलतही नाहीत. संवादाची पद्धत तर अगदी एखाद्या बुजुर्ग माणसाने आपल्या आयुष्याची गुपितं कोणताही खळखळाट न करता उकलून दाखवावीत, अशी. अष्टौप्रहर जणू आपल्याला कॅमेऱ्यासमोरच बोलायचं अशा थाटात सध्या सगळीकडेच स्वत:च्या निर्मितीसंबंधी कृतक विधानं करण्याच्या जमान्यात विनोदजींचं हे बोलणं अत्यंत नितळ, पारदर्शी वाटू लागतं. त्यांच्यातल्या माणूसपणाचा आरपार प्रत्यय येत राहतो.

अर्थात हे सारं त्यांना भेटल्यानंतर! त्याआधी भेटीची अधीरता आणि कुतूहल अक्षरश: शिगोशिग दाटून आलेलं. याच वर्षी २३ व २४ फेब्रुवारीला गजानन माधव मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दीनिमित्त छत्तीसगडमधल्या राजनांदगाव इथं एक चर्चासत्र होतं. विनोदजी राहतात ते रायपूर तिथून ७० ते ८० किलोमीटर अंतरावर. खरं तर मधल्या काही काळात वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय िहदी विद्यापीठातही अतिथी लेखक म्हणून त्यांचं वास्तव्य होतं. त्याचवेळी त्यांना भेटण्याचं अनेकदा ठरवूनही जमलं नव्हतं. यावेळी मात्र त्यांना भेटायचंच असा चंग बांधला. कवीमित्र प्रफुल्ल शिलेदार यांनी त्यांच्याशी राजनांदगावमधूनच संपर्क साधला. आम्ही भेटू इच्छितो असं सांगितलं. त्यांचा होकार आल्यानंतर रायपूरच्या दिशेनं आम्ही निघालो.

..रायपुरात शिरल्यानंतर विनोदजींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जरा पत्त्याची शोधाशोध करावी लागते. खुद्द विनोदजीही फोनवरून खाणाखुणा सांगत असतात. कटोरा तालाब, बुढी माता मंदिर अशी काही ठळक ठिकाणं सांगितली जातात. ते जिथे राहतात त्या शैलेंद्र नगरात पोहोचायला जरा वेळ लागतो. पत्त्याच्या खाणाखुणा पार करत त्यांच्या कॉलनीत आम्ही शिरलो तेव्हा साक्षात् ते घरापुढे उभे होते. कुठल्याही मध्यमवर्गीय माणसासारखं साधं घर. समोरच्या छोटय़ा हॉलमध्ये िभतीवर लावलेली काही अमूर्त शैलीतली चित्रं. एका खुर्चीत विनोदजी बसतात. आम्ही त्यांच्या समोर. अत्यंत आवडता लेखक समजून घेण्याचं अधीरपण कितीतरी प्रश्नांच्या रूपाने बाहेर पडण्यासाठी धडपडत असतं.

‘सध्या काय लिहिताय?’ या प्रश्नावरचं त्यांचं उत्तर आधी त्यांना खूप मागे घेऊन जातं. शांतपणे मग ते भूतकाळातल्या काही तुकडय़ांची जुळवाजुळव करू लागतात. पुन्हा हे तुकडे वर्तमानाशी जोडू पाहतात.

‘‘वध्र्यात होतो तेव्हा अनेक कादंबऱ्या अपुऱ्या राहिल्या. असं वाटतं, जी पात्रं आपण गोळा केली आहेत, ज्यांचा ‘नाकनक्शा’ आपण निश्चित केलाय, ते काय करतील, कसं करतील हे ठरवलंय. पण ती पात्रं पुन्हा परततील याची शक्यता कमी वाटते. होतं काय- की जेव्हा तुम्ही लिहिणं सुरू करता तेव्हा न लिहिण्याचं जे एकटेपण असतं ते घालवण्यासाठी बराच काळ जातो. घरात जसं कुणी आल्यानंतर आपलं एकटेपण दूर होतं, तसं. लिहिण्याच्या आरंभी तर हे एकटेपण पात्रांचं असतं. मग आपण विचार करतो. काही पात्रं नजरेत येतात. त्यातून  कथेचं सूत्र मिळतं. लेखक सुरुवातीला ती पात्रं सोबत घेऊनच चालू लागतो. चल बाबा, तू चल माझ्यासोबत. नंतर पात्रं स्वतंत्र होतात. मग पात्रांमागे लेखक चालू लागतो. पात्र सांगतं की, मी आता हे करू पाहतोय. मग लेखक तसं लिहीत जातो. आता कोणाचा रेटा असेल तर लिहितो. नसतो तेव्हा मग स्वत:ला इथं तिथं हरवून बसतो.’’

सुरुवातीला विनोदकुमार शुक्ल यांची ‘दीवार में एक खिडकी रहती थी’ ही कादंबरी वाचली होती. त्याचा एक अमीट असा परिणाम मनावर उमटला होता. जे वाचलं ते सारंच अद्भुत होतं. तसं आपण वाचतो शब्दांच्याच माध्यमातून; पण इथं केवळ शब्द नव्हते. शब्दांच्या रूपाने चित्र होतं, संगीत होतं, दृश्य होतं. एवढी जादू खरोखर शब्दांमध्ये असते, असा स्वत:लाच चमकून प्रश्न पडावा अशा असंख्य जागा त्या कादंबरीत होत्या.

गोष्ट साधी होती, पण कथानकाच्या रूढ चौकटीला मोडणारी होती. या कादंबरीत ना मोठी उलथापालथ, ना वेगवान घटना, ना धक्का देणारं काही. तरीही कादंबरीने मनाचा ठाव घेतला होता. आपल्याच भोवतीची दुनिया जणू एका जादूत परावर्तित झाली आहे. कविता, कथा, नाटय़ असं सारं काही या कादंबरीत सामावलंय असं वाटलं. रघुवरप्रसाद आणि सोनसी या नवविवाहित जोडप्याची ही गोष्ट. रघुवरप्रसाद एका छोटय़ा शहरात प्राध्यापक आहेत. एका छोटय़ा खोलीत या दोघांचा संसार सजलेला आहे. कधी गावाकडून आई-वडीलही येतात. पोराचा संसार पाहून त्यांना बरं वाटतं. या संसारात अभावही आहेत, पण त्याबद्दल कोणाचीच तक्रार नसते. हे जगणं त्यांनी आनंदाने स्वीकारलंय. याच खोलीच्या एका िभतीत छोटी खिडकी आहे. जिच्यातून उडी मारून रघुवरप्रसाद आणि सोनसी बाहेर पडतात. त्या खिडकीच्या पलीकडे असलेलं जग जणू सुंदर स्वप्नासारखं आहे. या जगात पहाड आहेत, नदी आहे, पक्ष्यांचा कलरव आहे, तलाव आहे, त्यात विलसित झालेली कमळं आहेत. आल्हाददायी हवा आहे. एकांतातले कितीतरी क्षण दोघंही या ठिकाणी घालवतात. तलावात मनसोक्त डुंबतात, न्हातात. तिथंच एका ‘बुढी अम्मा’चा चहाचा ठेला आहे. पण ही केवळ विवाहित जोडप्याची प्रेमकथा नाही. अतिशय साध्या साध्या तपशिलांत सौंदर्याच्या अनेक जागा इथं भरलेल्या दिसतात.

रघुवरप्रसाद महाविद्यालयात शिकवायला जातात, तेव्हा एके दिवशी त्यांना जायला टेम्पो मिळत नाही. पण त्यांना एक हत्ती दिसतो. हत्तीवर बसलेला साधू त्यांना बोलावतो आणि हत्तीवर बसवून महाविद्यालयात सोडतो. पुढे जणू हाच रघुवरप्रसाद यांचा दिनक्रम बनतो. हे त्यांचं बाहेरचं जग आणि घराच्या खिडकीतून उडी मारून ज्यात कधीही प्रवेश करता येईल असं स्वप्नवत जग या दोन जगांची अजोड अशी सरमिसळ या कादंबरीत आहे. विनोदकुमारांच्या भाषेच्या छटा अक्षरश: मोहित करतात. यात अनेक गमतीच्या जागा आहेत. म्हणजे रघुवरप्रसाद आणि सोनसी मनाच्या भाषेत बोलू पाहतात. सोनसी एक सांगते, रघुवरप्रसाद वेगळंच ऐकतात. ते जे बोलतात त्यापेक्षा सोनसी वेगळंच ऐकते. दोघेही असं ऐकतात, जे ओठावर आलेल्यापेक्षा कितीतरी वेगळं आहे.

‘नोकर की कमीज’ ही त्यांची पहिली कादंबरी १९७९ साली प्रसिद्ध झाली. हा संवाद सुरू झाल्यानंतर या कादंबरीची जन्मकथा विनोदजी सांगतात- ‘‘या कादंबरीच्या निर्मितीमागचं कारणही मोठं मजेशीर आहे. तेव्हा मला मुक्तिबोध फेलोशिप मिळाली होती. एक वर्षांची सुट्टी घेऊन ही कादंबरी लिहायची होती. त्यावेळी दरमहा एक हजार रुपये मिळणार होते. हे पसे खूप होते. त्याकाळी मी एवढय़ा पशात सहा एकर जमीन घेऊ शकलो असतो, एवढं त्याचं मूल्य होतं. म्हटलं, बरेच लोक टायिपग मशीनवरच लिहितात, आपणही टायिपग शिकावं. त्यात सहा महिने गेले. एकही ओळ लिहून झाली नव्हती. मग त्यावेळचे सांस्कृतिक सचिव अशोक वाजपेयी यांना कळवलं, की मी सहा महिन्यांत काहीच लिहिलं नाही. हे सहा हजार रुपये मी परत करू इच्छितो. काही दिवस गेल्यानंतर वाजपेयींनी लिहून कळवलं, की तुम्ही लिहा किंवा लिहू नका, आम्ही तुम्हाला ही फेलोशिप दिलीय. मग मी विचार केला- अजूनही सहा महिने उरले आहेत. ते माझ्यावर एवढा विश्वास टाकतायत तर लिहू.. आणि लिहून झालं.’’

कादंबरी जेव्हा लिहून पूर्ण झाली त्यानंतरचा किस्सा विनोदजींनी ऐकवला. निर्धारित कालावधीत हे काम संपवून एखादा प्रबंध सादर करण्यासाठी जावं तसं ते भोपाळला गेले. १३ फेब्रुवारीच्या आत मुदत संपत होती. विनोदजी ११ फेब्रुवारीला वाजपेयी यांच्या कार्यालयात पोहोचले. पण त्या दिवशी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा मृत्यू झाला होता. दुखवटा पाळला गेल्यानं कार्यालयात शुकशुकाट होता. आता काय करावं, असा प्रश्न त्यांना पडला. मग  दुसऱ्या दिवशी पत्ता हुडकून ते अशोक वाजपेयी यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. वाजपेयींनी त्यांना आत बोलावून घेतलं. चहा वगरे झाला. ‘नोकर की कमीज’ ही कादंबरी त्यांनी चाळली आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या भोपाळमधल्या सर्व मित्रांना त्यांनी घरी बोलावून घेतलं. त्याच ठिकाणी कादंबरीचं वाचन करण्यात आलं.

‘नोकर की कमीज’चं कथानक वेगळं, पण विनोदकुमार यांच्या खास आस्थेचं आणि अनुभवविश्वातलंच. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबाचीच ही गोष्ट. या कादंबरीतही तशी कोणतीच विशेष अशी घटना नाही. खूप छोटे छोटे प्रसंग आहेत. पण त्यांना साखळीसारखं गुंफून एक सृष्टी उभी राहते. संतुबाबू हे सरकारी कार्यालयातले लिपिक. घर आणि कार्यालय अशा दोन टोकांवर ताणलेल्या तारेवर चालतानाचा हा त्यांचा प्रवास. तोल सावरणं हेच या कसरतीचं वैशिष्टय़ आणि ध्येयसुद्धा! कार्यालयाला जेव्हा सुट्टी असते तेव्हा संतुबाबू बेचन असतात. या सुटीची सवय त्यांना काही केल्या अंगवळणी पडत नाही. सुटीचा दिवस बेकारीची आठवण करून देतो. जणू नोकरीपासून आपल्याला वेगळं केलंय असं त्यांना वाटत राहतं. सुटीच्या दिवशीही ते कार्यालयात पोहोचतात. आपली नोकरी सुरक्षित असल्याची जणू खातरजमा करतात. कार्यालयाला तर कुलूप असतं. ते कामकाज करू शकत नाहीत. बाहेरच्या काचेवर खटखट वाजवतात. सरकारी फायलींवरच्या उंदरांना हुसकावून लावतात. त्यांना वाटतं, हेही सरकारी कामच आहे. आपल्या कार्यालयीन कामाचा भागच आहे. संतुबाबू इमानदार आहेत. पण त्यांचं इमानदार असणंच त्यांना अप्रस्तुत ठरवू पाहतं. आपण एकटे ही व्यवस्था तोडू शकत नाही. ती मजबूत आणि जटिल आहे. व्यवस्थेशी एकटय़ाने भिडणं शक्य नाही हे ते जाणतात. आपल्या नोकरशाहीचं आतून कुरतडलेलं जग या कादंबरीत दिसतं. व्यवस्थेशी विद्रोह करता येत नाही. पण आपल्या छोटय़ा वर्तुळात संतुबाबूंचा संघर्ष चाललेला असतो. जे अभावग्रस्त आहेत, त्यांच्यात विद्रोहाची साधी ठिणगीही पेटणार नाही याची दक्षता घेत आपला वर्तनव्यवहार ठरवणारे धनिक या कादंबरीत येतात. आपण जे खातो त्या अन्नाची चवसुद्धा या लोकांच्या जिभेवर कधी जाता कामा नये. कारण हा स्वाद घेतल्यानंतर ते संघर्षांचा पवित्रा घेतील, इतपत ही खबरदारी घेतली जाते. थोडक्यात काय, तर ‘व्यवस्था’ आणि ‘आम आदमी’ यांच्यात चाललेल्या एका झटापटीचं चित्रण ‘नोकर की कमीज’ या कादंबरीत येतं. नोकरशाहीवरचं तिरकस भाष्य, कल्पना आणि वास्तव यांच्या सरमिसळीतून साकारणाऱ्या कुरूप व्यवस्थेवरचा एक झगझगीत कटाक्ष यामुळे ही कादंबरी लक्षात राहते. शब्दांतलं वास्तव जणू एखाद्या अर्कचित्राप्रमाणे आपल्यासमोर रेषेतल्या फटकाऱ्यानिशी उभं राहतं. बाकी याही कादंबरीत विनोदकुमार शुक्ल यांच्या भाषेची जादू आहेच. कादंबरीची सुरुवातच अशी होते.. ‘कितना सुख था की हर बार घर लौटकर आने के लिए मं बार बार घर से बाहर निकलूंगा.’

‘दीवार में एक खिडकी रहती थी’ आणि ‘खिलेगा तो देखेंगे’ या दोन्ही कादंबऱ्या विनोदजींनी एकाच वर्षांत लिहिल्या आहेत. भोपाळच्या भारत भवनमधल्या ‘निराला सृजनपीठ’मधील कालावधीत त्या पूर्ण झाल्या.

विनोदजींच्या दोन कादंबऱ्या ‘भिंतीत एक खिडकी असायची’, ‘नोकराचा सदरा’ या नावाने मराठीत निशिकांत ठकार यांनी अनुवादित केल्या आहेत. ‘पेड पर कमरा’ या त्यांच्या कथासंग्रहाचा अनुवाद रमेश राऊत यांनी ‘झाडावर खोली’ असा केलाय. तर प्रफुल्ल शिलेदार यांनी विनोदजींच्या ‘अतिरिक्त नही’ चा अनुवाद ‘जास्तीचे नाही’ या नावाने केलाय. अर्थात विनोदजींचा वेधक परिचय मराठी वाचकांना पहिल्यांदा  करून दिला तो चंद्रकांत पाटील यांनी.. ‘चौकटीबाहेरचे चेहरे’या पुस्तकात त्यांनी विनोदजींचं नेमकं व्यक्तीचित्र साकारलंय.

.. बोलता बोलता विनोदजींची छान तंद्री लागली होती. मधेच काहीतरी आठवल्यासारखं ते म्हणाले, ‘चाय बनवाउँ, आधा-आधा कप?’ चहा येतोही. पण मग या चहावरून त्यांना थेट गजानन माधव मुक्तिबोध यांची आठवण होते. ‘‘मुक्तिबोध आधी कप चाय को सिंगल कहते थे,’’ असं सांगून त्यांनी थेट त्यांची चहा पिण्याची पद्धत ऐकवली-

‘‘मोठय़ा चकचकीत हॉटेलात चहा पिणं मुक्तिबोध यांना आवडत नसे. रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर ते जात आणि  तिथं गेल्यानंतर ते अगदी आरामात बसत. असं बसणं त्यांना खूप प्रशस्त वाटायचं. मुक्तिबोध स्वत:ला जास्तीत जास्त लपवत असत. यासाठी, की अधिकाधिक एकांत मिळावा. टपरीवर बसल्यानंतर ते म्हणायचे, ‘एक-एक सिंगल गरम लाना और साथ मे ठंडा पानी लाना.’ आधी थंड पाणी प्यायचे. त्यानंतर गरम चहा.’’

स्वत: विद्यार्थी असल्यापासून विनोदजी मुक्तिबोध यांना ओळखायचे. अगदी १९५८ झाली ते राजनांदगावला कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते तेव्हापासून. विनोदजींचे मोठे भाऊ मुक्तिबोध यांचे विद्यार्थी होते. एकदा त्यांनीच मुक्तिबोध यांना सांगितलं, की माझा एक छोटा भाऊही लिहितो. कविता वगरे करतो. तेव्हा मुक्तिबोध फारसे परिचित नव्हते. लोक ‘अज्ञेय’, भवानीप्रसाद मिश्र यांना ओळखायचे. मुक्तिबोधांशी असलेल्या परिचयाचे धागे विनोदजी उलगडत होते..

‘‘मी आठ-दहा वर्षांचा असतानाच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. छोटय़ा काकांनी आम्हाला सांभाळलं. घरात लिहिण्या-वाचण्याचं वातावरण होतं. ‘चांद’, ‘माधुरी’, ‘सरस्वती’ यांसारख्या पत्रिका त्यावेळी घरी येत असत. मुक्तिबोधांशी संबंध असण्याचं आणखी एक कारण होतं, माझे मोठे चुलत बंधू वैकुंठनाथ शुक्ल हे त्यावेळी नागपुरात राहायचे. वैकुंठपूर या भागात त्यांचं वास्तव्य होतं. मुक्तिबोधांशी त्यांचे थेट संबंध होते.

‘‘मी साहित्याचा विद्यार्थी कधीच नव्हतो. िहदीत तर नेहमी नापास व्हायचो. कधीच चांगल्या मार्काने पास झालो नाही. गुरुजी तर नेहमीच रागावत. तू चांगल्या पद्धतीने िहदीसुद्धा लिहू शकत नाहीस. पुढे कृषीशास्त्रात अभ्यास करताना तिथे काही िहदी नव्हती. तेव्हा मात्र चांगल्या मार्काने पास होत राहिलो.’’

मुक्तिबोधांचे विद्यार्थी असलेल्या भावाने विनोदजींबद्दल सांगितलं होतंच. मग एके दिवशी स्वत:च्या कविता घेऊन ते मुक्तिबोधांच्या घरी पोहोचले. हा प्रसंग विनोदजी एखादं चित्र आपल्यासमोर चितारावं तशा शब्दांत सांगतात. बोलतानाची ही त्यांची शैली भुरळ पाडणारी आहे. अनलंकृत, तरीही कमालीची आकर्षक, आवाहक अशी त्यांची भाषा आहे. तेव्हा हा प्रसंग खुद्द विनोदजींच्या भाषेत अनुभवायला हवा. तिथे अनुवादाचा अडसर कशाला?

‘‘संध्या का समय था। ठिक गोधुली का समय। अंधेरा थोडासा ज्यादा था। उजाला कम था। तो मुक्तिबोधजी आए, कंदील लेकर आए थे अंदरसे, तो उजाला पहले आ रहा था.. मुक्तिबोध उजाले को साथ ले आए. उनकी हाफवाली बंडी बन्याईन थी.. यहाँ से टुंट गई थी। (हे सांगताना विनोदजी एका खांद्याकडे निर्देश करतात.) तो उसको गांठ लगी हुई थी। वे पजामा पहने हुए चटई पे बठे।’’

ही विनोदजींनी सांगितलेली मुक्तिबोधांची पहिली भेट. त्यांनी दिलेल्या कविता मुक्तिबोधांनी पाहिल्या. कवितेबद्दल ते काहीच म्हणाले नाहीत. जाता जाता विनोदजींना म्हणाले, ‘‘देखो भाई, तुम अच्छे से पढाई- लिखाई कर लो. कविता तो होती रहती ह. कमाने लग जाओगे तो कविता कर लेना. अभी कविता मत लिखो.’’

या बोलण्यानंतर विनोदजींना वाटलं, कदाचित आपल्या कविता त्यांना आवडल्या नसाव्यात. मग सुटीत ते यायचे, पण मुक्तिबोधांना भेटायचे नाहीत. एकदा मोठय़ा भावानेच सांगितलं, ‘अरे, मुक्तिबोधजी तुझ्याबद्दल विचारतायत, तर तू त्यांना भेटत का नाही?’ मग पुन्हा विनोदजींनी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. कधी त्यांच्या कविता ऐकायच्या, तर कधी आपल्या कविता त्यांना वाचून दाखवायच्या.. असं सारं चाललेलं होतं.

‘‘मग एकदा माझ्या आठ कविता त्यांनी श्रीकांत वर्मा काढत असलेल्या ‘कृती’ या नियतकालिकासाठी पाठवून दिल्या. त्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी आपल्या पत्नी शांताजींना सांगितलं की, ‘अगं, याचं तोंड गोड कर. याचा संग्रह निघालाय.’ आता गेल्या काही दिवसांत मी त्याचा अंदाज लावतोय. माझ्या आठ कविता छापून येण्याला ते संग्रह का म्हणाले असतील. मुक्तिबोध स्वत: दीर्घकविता लिहायचे. बऱ्याचदा त्या केवळ दीर्घ असल्याने छापल्या जात नसत. त्यांना ते बरं वाटत नसे. ते छोटी कविता लिहायचाही प्रयत्न करायचे. पण ते लिहू शकत नसत. त्यांना सांगायचं खूप असे आणि कमी शब्दांत ते सामावणं कठीण होतं. जेव्हा ते अगदी मरणाच्या दारात होते तेव्हा त्यांचा पहिला कवितासंग्रह छापून आला. तो ते धड पाहूही शकले नाहीत. त्यांना ते माहीतही झालं नाही.’’

मृत्यूच्या दाढेत असलेल्या मुक्तिबोधांचा तो काळ जणू विनोदजी वाचत आहेत, इतक्या बारकाईने सारे तपशील ते सांगत होते. सुरुवातीला त्यांना भोपाळला नेण्यात आलं. श्रीकांत वर्मा तेव्हा काँग्रेसचे महासचिव होते. एक पत्रकार म्हणूनही त्यांची पहुंच होती. मुक्तिबोधांना मग दिल्लीला नेण्यात आलं. अशोक वाजपेयीही होते त्या प्रक्रियेत. रोज सकाळी आकाशवाणीवर मुक्तिबोधांच्या प्रकृतीविषयी ‘बुलेटिन’ दिलं जायचं. असं याआधी कधी कोणाबाबत घडलं नव्हतं. विनोदजींच्या बोलण्यातून मुक्तिबोधांचं हे मोठेपण वारंवार प्रतीत होत होतं. त्यांच्या एका विधानातून याची सार्थकता आणखी पटेल.

‘‘मं तो कहता हूँ,अपने बाएँ हाथ को जैसे बिते हुए समय में पचास साल तक कहीं ले जाऊँ और अपने दाएने हाथ को आनेवाले पचास साल में बढाऊँ, तो सौ साल मुझे मुक्तिबोध जैसा कोई दिखता नहीं..’’ असं विनोदजी सांगू लागतात तेव्हा पुन्हा त्यांच्या शब्दांत एखादं शिल्प साकारण्याच्या कलेचा साक्षात्कार होतो.

मुक्तिबोधांच्या कवितेची एकामागोमाग एक वैशिष्टय़ं ते सांगू लागतात. ती भाषा समीक्षकाची नसते. एका सर्जकाने दुसऱ्या उत्तुंग लेखकाबद्दल जाणवलेलं मोठेपण सहृदयतेनं सांगणं असतं. मुक्तिबोधांच्या कवितेची समीक्षा अनेकांनी केलीय. त्यांच्या कवितेची सार्वकालिकताही काळाच्या प्रत्येक टप्प्यावर अधोरेखित करण्यात आलीय. विनोदजींना मुक्तिबोधांची कविता मौल्यवान वाटते, हे त्यांच्या शब्दा-शब्दांतून जाणवत होतं.

‘‘मला असं सांगा, एका ओळीनंतर दुसरी ओळ त्याच ताकदीने येते. तप्त लोखंडासारखे वितळवलेले शब्द.. एका-एका शब्दावर ते ध्यान द्यायचे. तत्सम, तद्भव शब्द कवितेत यायचे तेव्हा त्यांच्यामागे गंभीर असा विचार असायचा. एखादा शब्द आपण का आणतोय, यामागे त्यांचं स्वत:चं तत्त्वज्ञान असायचं. ऐसी गहरी सोच रचना में मंने कभी देखी नहीं. त्यांची कविता वाचून मला वाटलं, मी बदलतोय. माझ्या दृष्टीत एक पारदर्शीता आलीय. मी लोकांना आरपार पाहू शकतो. त्यांची कविता ऐकल्यानंतर एक ‘अजीबसा सन्नाटा’ मी अनुभवलाय. अशावेळी दुसरं काही ऐकायलाच यायचं नाही. दीर्घकाळ ती कविता मनात झंकारत असायची. खोलवर ती हृदयात उतरत जायची. त्यांच्या कवितेत एक लय असायची, ताल असायचा. त्यांच्या आवाजात जोश होता. मी त्यांना म्हणायचो, ‘तुमची कविता मी समजू शकत नाही, तुम्ही समजून सांगा.’ ते म्हणायचे, कविता ही समजून सांगण्याची गोष्ट नाही. ती समजून घेण्याची गोष्ट आहे.’’ हे सांगताना विनोदजी जरा थबकतात. म्हणतात, ‘‘मला ही समज मुक्तिबोधांमुळे आली. खरंचंय, कविता कुठं समजून सांगण्याची गोष्ट असते का? एखादं झाड कुठं आपली ओळख सांगतं का.. मी कोण आहे? ते सगळ्यांना दिसतं. पण प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगळाय. ना एखादा पहाड सांगतो, ना नदी सांगते, ना सूर्य सांगतो, ना आकाश सांगतं.’’ विनोदजींच्या तोंडून हे सारं ऐकताना अवघा जीव कानात गोळा होऊ लागतो.

रायपुरातच वास्तव्याला असलेल्या विनोदजींचा जन्म राजनांदगावचा. तिथल्या कृष्णा टॉकीजसमोरच त्यांचं घर होतं. आई त्यांना सांगायची, ज्या दिवशी कृष्णा टॉकीजचं उद्घाटन झालं, त्याच दिवशी तुझा जन्म झाला. आईला त्यांच्या भावविश्वात खूप जागा आहे. त्यांच्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी हे याआधीही सांगितलंय. आमच्या या गप्पांमध्येही त्यांनी आपल्या आईचा एक संदर्भ सांगितला.

‘‘पूर्वी जन्माची तिथी, तारीख कुणी काळजीपूर्वक लिहून ठेवायचं नाही. कुठल्यातरी नसर्गिक घटनेशी वा एखाद्या ठळक प्रसंगाशी ते जोडलेलं असायचं. आमची आई हळद लावलेल्या धाग्यात एक बारीकसा हळदीचा तुकडा बांधायची. तीच ‘वर्षगाठ.’ पुढे बोलाचालीत तेच ‘बसगठ’ असं झालं. आम्हा तिघा भावांचेही हे धागे वेगवेगळे होते. प्रत्येक वाढदिवसाला या धाग्यात एक बारीकसा हळकुंडाचा तुकडा बांधला जायचा. आई थकत चालली तेव्हा तिच्या लक्षात यायचं नाही. जन्मदिवस माझा असायचा आणि गाठ माझ्या भावाच्या धाग्यात बांधली जायची.’’ विनोदजी मंदसं हसतात.

विषय पुन्हा साहित्यावर येतो. ‘आता ज्या अर्धवट कादंबऱ्या आहेत, त्या पूर्ण होण्याची काही शक्यता वाटते का?’ असं विचारल्यानंतर विनोदजी जरा वेळ थबकतात. पुन्हा सावरून बोलू लागतात- ‘‘नाही. आता इच्छा होत नाही. आता लिहिण्यात जास्त वेळ मन लागत नाही. लवकर थकतो. झोपता झोपता थकतो. बसता बसता थकतो. बरोबर झोप येत नाही. रात्रीही जागाच असतो..’’ स्वत:बद्दलचं हे सांगून झाल्यानंतर काही क्षण मधे तसेच जातात. मग पुन्हा विनोदजी बोलू लागतात.

‘‘अर्धवट राहिलेल्या ज्या कादंबऱ्या होत्या, त्यातलं कथेच्या रूपात बरंच आलंय. कादंबरीचं कसं असतं, की दीर्घकाळ तुम्ही एखाद्या कथानकाशी जोडलेले असता. त्याची साथ न सोडता. ते तुमची साथ सोडणार आहे असं वाटलं तरीही ती सुटू न देणं, एका अतूट बंधनात राहण्याचा प्रयत्न करणं.. तेव्हा कुठं ती कादंबरी होते. कादंबरीला काही सूत्र तर नक्कीच असतं. कथा खूप कमी काळ तुमच्यासोबत असते. याउलट, कवितेचं आहे. लिहायची म्हणून कविता लिहिणं खूप अवघड आहे. गद्य लिहिता लिहिता कविता सुचू शकते असा माझा अनुभव आहे. ‘गद्य एक बहाना है कविता लिखने का..’ गद्य लिहिणं जवळजवळ ओबडधोबड रस्त्यावर चालण्यासारखं आहे. कवितेत मात्र अचानक ‘गहराई’ येते. कमी शब्दांत तुम्ही स्वत:ला जास्तीत जास्त अभिव्यक्त करू शकता. कविता लिहिणं जवळपास लपाछपीचा खेळ आहे. गद्याचं तसं नाही. कधी कधी तर कविता एखाद्या न बोलावलेल्या पाहुण्यासारखी येते. असं वाटतं, की कोण आलंय? आणि दरवाजा उघडल्यानंतर असं दिसतं की, अरे, ही तर कविता आहे! समजा, एखादी कविता मला लिहायचीय आणि ती मी आता लिहिली नाही, नंतर कधीतरी ती लिहिली, तर ती दुसरी कविता होईल.’’

विनोदजींच्या कादंबऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी कविता आढळतात. गद्याची भाषा अचानक मितव्ययी रूप धारण करते. हा संक्षेप अर्थपूर्ण असतो. तसेच त्यांच्या कवितेतही कथ्य आढळते. या कविता दुबरेध नसतात. शब्दांचा अतिरेकी सोसही त्यांच्या कवितेला नाही. ती वाटते सहज, सोपी, साधी. पण जेव्हा आपण ती वाचून पूर्ण करतो तेव्हा तिने आपल्या अंतरंगाला भेदलेय याची जाणीव होते. भाषेतली जादुगिरी इथेही आहेच. माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या आकांक्षांचा वेध ते कवितेतही घेतात. त्यांच्या कवितेत आदिवासींचं जग येतं. बिनचेहऱ्याची असंख्य सामान्य माणसं येतात. निसर्ग येतो, तो मानवी संवेदनेच्या तरलस्पर्शी भावनेतून. एका कवितेत ते म्हणतात, ‘जे माझ्या घरी आजवर कधीच आले नाहीत, त्यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या जवळ जाईन. एक उधाणलेली नदी कधीच येणार नाही माझ्या घरी. नदीसारख्या लोकांना भेटण्यासाठी मी नदीकिनारी जाईन.’  मग त्यांना ज्यांना ज्यांना भेटण्याची असोशी आहे, त्यांत पर्वत, तलाव, असंख्य झाडं, शेत असं सारं काही येतं. या सर्वाना मी एखाद्या जरूरी कामासारखं भेटेन, असं ते या कवितेत म्हणतात. ‘इसे मं अकेली आखिरी इच्छा की तरह सबसे पहिली इच्छा रखना चाहूँगा.’ इथे त्यांच्या भाषेतली कारागिरी आपल्याला मोहून टाकते. किंवा ‘आजकल उठने के लिए मं सिर्फ नींद पर भरोसा करता हूँ’ हे विधान आपल्याला चकीत करून टाकतं. कितीतरी अमूर्त अशा गोष्टी विनोदजींच्या कवितेत मूर्तरूप धारण करतात. मानवी संवेदनेला बधीर करणाऱ्या बाजारविश्वाचे चित्रण त्यांच्या कवितेत अनेकदा येते. मानवी संबंधांतला कोरडेपणा जाऊन जगण्यातली ओल टिकून राहावी याचं सदैव भान त्यांच्या कवितेत जाणवत राहतं. ‘हताशा से एक व्यक्ती बठ गया था’ ही तर त्यांची प्रसिद्ध कविता आहे. ‘निराशेनं ग्रासलेल्या त्या व्यक्तीला मी ओळखत नव्हतो, पण त्याच्या निराशेला ओळखत होतो. म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. मी हात पुढे केला. माझा हात धरून तो उभा राहिला. मला तो ओळखत नव्हता. पण माझ्या हात पुढे करण्याला तो ओळखत होता. आम्ही दोघे सोबत निघालो. दोघं एक-दुसऱ्याला ओळखत नव्हतो, पण सोबत चालणं ओळखत होतो.’ अशी ही कविता सोबतीची ऊब आणि सकारात्मकता थेट आपल्यापर्यंत पोहोचवते, हे विनोदजींच्या कवितेचं वैशिष्टय. एखाद्या वस्तूने आपली चमक  दाखवून अदृश्य व्हावं, मात्र ती अनुभूती आपण कायम जवळ बाळगावी अशी.. असं त्यांच्या कविता वाचताना कायम जाणवतं.

त्यांच्या कवितेत गरीब, दुर्बल, आवाज नसलेली माणसं येत राहतात. विनोदजी मात्र आपल्या कवितेत त्यांचं हे दौर्बल्य घालवून टाकतात. त्यांना एक ठसठशीत ओळख प्राप्त करून देतात. त्यांच्या जगण्यातल्या अभावांनाही सुंदर करून टाकतात. माणसाचं जगणं गुदमरवून टाकणारं, त्याची घुसमट वाढवणारं पर्यावरणही विनोदजींच्या कवितेत येतं. पण ते त्यांच्या खास शैलीत! ‘सबकी तरफ से वह बोलेगा, वही तो! कुछ बात नहीं की जिसने मुझ से, चाय पीते हम दोनों सडक पर खडे रहे चुपचाप वही!!’

आणि मग त्यानंतर कवितेच्या शेवटी या दोन ओळी येतात- ज्या कवितेला असाधारण अशा स्थानी घेऊन जातात..

‘जब की पिछले दिनों

कुछ गुंडों ने उसकी जुबान काट दी’

अर्थात, हे जीभ छाटणं प्रतीकात्मकही असू शकतं. कादंबरीकार म्हणून असलेलं त्यांचं स्थान मोठंच आहे; पण त्यांच्या कवितेचाही स्वत:चा चेहरा आहे. ‘लगभग जय िहद’ (१९७१) या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहानंतर ‘सब कुछ होना बचा रहेगा’, ‘अतिरिक्त नहीं’, ‘कभी के बाद अभी’ हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. यात ‘वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह’ यासारख्या लांबलचक शीर्षकाचा कवितासंग्रहही आहे. याशिवाय निवडक कवितांची काही संकलनेही आहेत.

‘‘अलीकडे त्यांनी लहान मुलांसाठीही खूप लिहिलंय. आधी ‘चकमक’ या बालसाहित्यविषयक नियतकालिकात लिहायचो. आता ‘साईकील’ म्हणून एक चांगलं नियतकालिक आहे बालसाहित्यासाठी; त्यात लिहितोय,’’ अशी माहितीही विनोदजी देतात.

लेखकाला स्वत:चा शोध आधी घेता आला पाहिजे. त्याची वाट त्याने एकटय़ानेच निश्चित केली पाहिजे असं आपण नेहमीच म्हणतो. साहित्याचं प्राणतत्त्व काय असावं, याबद्दल विनोदजींना विचारलं असता ते नेमक्या शब्दांत सांगतात-

‘‘पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिहिण्याला मौलिकता प्राप्त कशी करून देता येईल, ही आहे. आणि ते अवघड आहे. प्रभाव तर कोणाचा ना कोणाचा तरी पडतच असतो. कोणीच असं म्हणू शकत नाही, की आमच्यावर कोणाचा प्रभाव नाही. पण तुम्ही जे लिहिता आणि जी गोष्ट सांगता, ती मात्र तुमचीच असायला हवी. त्यासाठी जी चाळणी लागणार आहे ती कुठून आणणार?’’

बोलता बोलता विषय अनुवादावर येतो. अनुवादाला दुसरी निर्मिती म्हणायला हवं. आणि कवितेचा अनुवाद दुसरा चांगला कवीच करू शकतो असंही विनोदजीना वाटतं. विनोदजींच्या साहित्यकृतीची माध्यमांतरं झाली आहेत. आजही कुणी कुणी येतं, भेटून जातं. त्यांच्या कवितांचं अभिवाचन आपल्या आवाजात ‘युटय़ुब’वर वगरे टाकतं. कुणी एखादा कथेवर लघुपट करतो. नाटय़रूपांतरं चाललेली असतात. या साऱ्या नव्या पिढीच्या धडपडीत त्यांना मणि कौल यांची आठवण होते. एक हळुवार आठवण ते सांगू लागतात..

‘‘मणि कौल यांनी माझ्या ‘बोज’, ‘पेड पर कमरा’ या कथांवर लघुपटांची निर्मिती केली. ‘नोकर की कमीज’वर तर त्यांनी चित्रपट केला. पण ‘दीवार में एक खिडकी रहती थी’ या कादंबरीवरही त्यांना चित्रपट करायचा होता. त्यांनी इंग्रजी पटकथा लिहिली. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा मला फोन आला. म्हणाले, मी आता तुमच्याकडे येऊ शकणार नाही आणि हा चित्रपटही आता बनवू शकणार नाही. मला वाटलं, चित्रपटासाठी काही आर्थिक अडचण असेल. मी म्हटलं, तुम्हाला जेव्हा चित्रपट करायचा तेव्हा करा. तर म्हणाले, नाही. आता मी करू शकणार नाही. माझी पटकथा सांभाळून ठेवा. कोणाला देऊ नका, दाखवू नका. मला कॅन्सर झालाय. आता मी तुमच्याशी बोलतोय. आताही मला बोलताना खूप त्रास होतोय. मी फोनवर त्यांना असं म्हणत राहिलो, नाही.. नाही. तसं काही होणार नाही. आपण बरे व्हाल. पण ते मात्र जास्त बोलू शकत नव्हते..’’  या सांगण्यानंतर काही क्षण एक पोकळी जाणवते. कोणीच काही बोलत नाही. त्यानंतर विनोदजींचा शब्द उमटतो-

‘‘त्यांची मुलगी शांभवी अमेरिकेतल्या एका विद्यापीठात असते. कालांतराने मग मी ती स्क्रिप्ट तिच्याकडे देऊन टाकली. मी म्हटलं, यावर माझा कोणताही हक्क नाही. त्या स्क्रिप्टची झेरॉक्स प्रत माझ्याकडे आहे. पण ती असून नसल्यासारखी. मी ती कोणालाही दाखवत नाही. आता ते दाखवण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. पण मणी कौल यांनी जी स्क्रिप्ट तयार केली होती ती अप्रतिम होती. वाचताना असं वाटतं की तुम्ही सिनेमा पाहताय. मणि कौल खरं तर सिनेमा कसा पाहायला हवा याचा एक दर्शकवर्ग तयार करू लागले होते. पण त्यांचं काम दृष्टिपथात येत असतानाच ते निघून गेले.’’ एका दिग्दर्शकाला दिलेला शब्द, त्यातून जाणवणारा निग्रह आणि शब्दांशी पक्कं राहण्याचा नेकपणा त्यांच्या बोलण्यातून दिसतो.

मधेच विष्णू खरे यांचा विषय निघतो. त्यांच्या आठवणी विनोदजी काढतात. ‘बढिया आदमी थे’ असं त्यांच्याविषयी बोलतात. ‘‘एकदा एका मुलाखतीत मला एकाने असं विचारलं की, अशोक वाजपेयी तुमचे चांगले मित्र आहेत. मी म्हणालो, या दुनियेत माझा कोणी दोस्त नाही. पण मी आयुष्यभर असा प्रयत्न केला, की कोणी माझा दुश्मन बनू नये. तेव्हा विष्णू खरे म्हणाले होते, ‘ऐसी अदा पे कौन ना मर जाये..’’

..वेळ बराच झालेला असतो. रायपुरात विनोदजींच्या घरी प्रवेश केला तेव्हा सूर्य अगदी माथ्यावर होता. आता तो बराच कलला आहे. ऊन उतरलंय. या वयात त्यांनी इतका वेळ दिला. कदाचित ही त्यांची विश्रांतीचीही वेळ असू शकते असा अपराधभावही क्षणभर मनात डोकावून गेला. निरोपाची वेळ येते तेव्हा विनोदजी उठतात. म्हणतात, ‘आपण जेवण करू या. तुम्ही एवढय़ा दूरवरून आलात.’ त्यांना त्रास देणं नको वाटतं. ‘यहाँ पर छत्तीसगडी खाना अच्छा मिलता है. और पास हैं, कही दूर नहीं. आप दोनो खाओगे तो मुझे अच्छा  लगेगा..’ असा त्यांचा प्रेमळ आग्रह असतो. मग रायपुरातल्या महिला बचत गटाने चालवलेल्या एका भोजनालयात ते घेऊन जातात. तिथलं ‘छत्तीसगडी व्यंजन’, लाकडावर केलेलं ‘बस्तर’च्या शैलीतलं कोरीवकाम हे सारंच कायम लक्षात राहण्याजोगं असतं.

रायपूरहून परतीच्या वाटेवर लागल्यानंतरही विनोदजींच्या शांत, संयत, तरीही ठाम शब्दांतला ध्वनी एखाद्या अनाहत नादासारखा मनात घुमत राहतो. त्या शब्दांच्या उच्चारामागचे गहिरे भाव आपल्यापर्यंत पोहोचल्याची भावना निर्माण होऊ लागते. शब्दांत सांगता येणार नाही असं काहीतरी गवसलंय असं वाटू लागतं. एक सर्जनशील लेखक स्वत:च्या निर्मितीप्रक्रियेबद्दल, धारणांबद्दल, साठवलेल्या स्मृतींबद्दल बोलू लागतो तेव्हा विनोदजींच्याच एका कवितासंग्रहाचं शीर्षक आठवतं-

‘आकाश धरती को खटखटाता हैं’!