गेल्या काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशी संबंधित वृत्त सर्वच प्रसारमाध्यमांतून ठळकपणे दिसत होते. बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपीला देहदंडाची शिक्षा झाली ही बातमी जनतेला लगेचच कळणे गरजेचे असले तरीसुद्धा बुधवारी रात्रीपासून या संदर्भातील घडामोडी ज्या नाटय़मय पद्धतीने लोकांसमोर मांडल्या गेल्या ती पद्धत मात्र नक्कीच काळजी वाटण्याजोगी आहे.
‘ब्रेकिंग न्यूज’च्या हव्यासापायी आणि आमच्याकडे काहीतरी खास दाखविण्यासारखे आहे या चढाओढीत काही अपवादवगळता बहुसंख्य वृत्तवाहिन्या सामील झाल्या. याकूबचा दिवस कसा सुरू झाला, त्याला कोणत्या रंगाचे कपडे घालावयास दिले, त्याने काय खाल्ले, त्याला कोणती पुस्तके वाचायला दिली, तो कसा भावूक झाला होता, त्याची शेवटची इच्छा काय होती या सर्व घडामोडी रंगवून सांगितल्या जात होत्या. कारागृहाच्या िभतीच्या आत काय घडतंय हे कारागृहाबाहेर लांब उभे राहून प्रत्यक्षदर्शी असल्याप्रमाणे क्रिकेट सामन्याच्या समालोचनासारखे सांगितले जात होते.
त्याचवेळी दुसरीकडे कारागृहाबाहेरील परिस्थिती दाखवली जात होती. याकूबचे नातेवाईक हॉटेलमधून बाहेर पडून, जेलकडे जाईपर्यंत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी धडपड चालली होती. नागपूरमधला पोलीस बंदोबस्त, मृतदेहाचा जेलपासून विमानतळापर्यंतचा प्रवास दाखवताना या दोन ठिकाणांमधील अंतर आणि ते पार करण्यास लागलेला वेळ याचे गणितही मांडले जात होते. इकडे मुंबईत, माहीममधील त्याच्या घराजवळची परिस्थिती, पोलीस बंदोबस्त या सगळ्या गोष्टी दाखवीत होते.
हा सगळा खेळ बराच वेळ सुरू होता. नेमक्या याच वेळी रामेश्वरममध्ये भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा अंत्यविधी सुरू झाला होता. लाखोंचा जनसमुदाय त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमला होता, पण दुर्दैवाने या वृत्ताला दुय्यम स्थान देऊन याकूबच्या फाशीची अतिरंजित कहाणी दाखवून सनसनाटी निर्माण केली गेली.
बरे, असा प्रकार पहिल्यांदाच घडतोय असेही नाही. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेल आणि नरिमन हाऊस येथील धुमश्चक्री आणि कमांडोंच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण ज्या पद्धतीने दाखविले गेले, त्याचा दहशतवाद्यांच्या सूत्रधारांनी फायदा घेतला, पण सुरक्षा यंत्रणांचं मात्र नुकसानच झालं.
काल परवाच गुरदासपूर येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळीसुद्धा अशाच प्रकारचे थेट प्रक्षेपण वाहिन्यांवर सुरू होते. पोलिसांची कारवाई कशा पद्धतीने चालू आहे हे बिनदिक्कतपणे दाखवले जात होते.
याच्या अगदी उलट, ९/११ला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस तेथील वृत्तवाहिन्यांनी काय दाखवावे, काय दाखवू नये याचे भान राखल्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईतील गोपनीयता सांभाळली गेलीच, पण त्याचबरोबर दुर्घटनेची विदारक दृश्ये पाहिल्यामुळे जनसामान्यांना बसणारा धक्का व त्यामुळे होणारे दुष्परिणाम बऱ्याच अंशी टळले.
याकूबच्या फाशीचा घटनाक्रम अशा पद्धतीने दाखविण्याची खरंच गरज होती का, असा प्रश्न माझ्याप्रमाणे अनेकांना नक्कीच पडला असेल. या सर्व घटना ज्या पद्धतीने दाखविल्या जात होत्या त्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहीमच नव्हे, तर इतर संवेदनशील विभागात कधीही काहीही घडू शकेल अशी भीती लोकांच्या मनात दाटून आली होती. म्हणूनच की काय मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेमधील गर्दीसुद्धा कमी होती आणि रस्तेही बऱ्यापकी ओस पडले होते.
या तणावातून जर एखाद्या व्यक्तीच्या हातून काही आततायी कृत्य घडलं असतं तर त्याची प्रतिक्रिया मुंबईसह देशभरात कुठेही उमटली असती आणि मग जे घडलं असतं त्याची कल्पनासुद्धा न केलेली बरी. सनसनाटीपूर्ण वृत्तांकन करणाऱ्यांनी याचे भान ठेवायला नको का?
लोकशाहीत कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये हे जरी सत्य असले तरी त्याच वेळी आपल्या वर्तणुकीमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, समाजात तेढ, घबराट निर्माण होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनीच घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य उपभोगताना सर्वानीच संयम (रएछा – फएरळफअकठ) बाळगला नाही तर नकळतपणे आपण अराजकाच्या दिशेने ढकलले जाऊ शकतो. म्हणूनच स्वत:ला लोकशाहीचे स्तंभ म्हणवणाऱ्यांकडून अधिक परिपक्वतेची अपेक्षा आहे.
लेखक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार व पक्षाचे सरचिटणीस आहेत.

याकूबला फाशी दिल्यानंतर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी ज्या सनसनाटी पद्धतीने वृत्तांकन केले ते उबग आणणारे होतेच, पण असे प्रकार वारंवार होत असल्याने ते चिंताजनकही आहे. या उलट ९/११ घडले तेव्हा अमेरिकेतील माध्यमांनी परिस्थितीचे भान ठेवले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना सर्वानीच संयम बाळगला नाही तर नकळतपणे आपण अराजकाच्या दिशेने ढकलले जाऊ शकतो..