सुनिता कुलकर्णी

अमेरिकेत करोनाने थैमान घातलेले असताना, तिथे मृत्यूचे तांडव सुरू असताना, न्यू जर्सीमधल्या सिल्हिया गोल्डशूल या १०८ वर्षांच्या आजी नुकत्याच करोनामधून बऱ्या होऊन आपल्या घरी सुखरूप परतल्या आहेत. खरंतर अमेरिकेत न्यूयॉर्कच्या खालोखाल न्यूजर्सीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यातही तिथे जेवढे करोनामृत्यू झाले आहेत, त्यातले दहा टक्के वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांचे आहेत, असं असताना वृद्धाश्रमात राहणाऱ्या या १०८ वर्षांच्या आजी करोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत, हे विशेषच आहे.

सिल्व्हिया गोल्डशूल या आजींचा जन्म १९ डिसेंबर १९११चा. त्यांचं कुटुंब पोटापाण्याच्या शोधात रशियामधून निघून अमेरिकेत येऊन स्थिरावलं. १९१८-१९ ची स्पॅनिश फ्ल्यूची महासाथ तेव्हा सात-आठ वर्षांच्या असलेल्या सिल्व्हियांनी पाहिली. दोन्ही महायुद्धांमधूनही त्या बचावल्या आणि त्यांनी ‘द ग्रेट डिप्रेशन’ या नावाने ओळखली जाणारी महामंदीही अनुभवली आहे. स्पॅनिश फ्ल्यूच्या महासाथीनंतर तब्बल १०० वर्षांनी आलेल्या करोनासारख्या महासाथीला तोंड देत त्यांनी या आजाराचाही मुकाबला केला आहे. तेही डोळे आणि कान या दोन्ही अवयवांनी साथ देणं सोडलेलं असताना. त्यामुळे त्या आज अमेरिकेतल्या करोनामुक्त झालेल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. तिथल्या माध्यमांशी बोलताना या आजींनी सांगितलं की, मी या सगळ्यामधून वाचले कारण ते माझं विधिलिखितच होतं. सिल्व्हिया आजींची ही बातमी ‘द संडे एक्स्प्रेस’ने न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्याने दिली आहे.

तर हिल्डा चर्चिल या इंग्लंडमध्ये राहणाऱ्या १०८ वर्षांच्या आजी मात्र तेवढ्या सुदैवी ठरल्या नाहीत. १९१९ मध्ये त्यांनाही स्पॅनिश फ्ल्यूने गाठलं होतं. त्यातून त्या वाचल्या होत्या, पण तब्बल १०० वर्षांनी आलेल्या २०१९ मधल्या करोनाने मात्र त्यांचा बळी घेतला. स्पॅनिश फ्ल्यूची साथ, दोन महायुद्ध यातून वाचलेल्या या आजी करोनाचे निदान झाल्यापासून २४ तासांच्या आत दगावल्या. १९१८-१९ च्या स्पॅनिश फ्ल्यूच्या महासाथीमध्ये जगभरात पाच कोटी लोक मृत्यूमुखी पडले होते. हिल्डा यांची बहिणही दगावली होती. त्या मात्र तो आजार होऊनही वाचल्या आणि मग रोजगाराच्या शोधात त्यांचं कुटुंब इंग्लंडमध्ये इकडून तिकडे फिरत राहिलं तशा त्याही फिरत राहिल्या. ५ एप्रिलला त्यांचा हा प्रवास कायमचा संपला.