बनारस हे भुरळ पाडणारं शहर आहे. धार्मिक क्रिर्याकर्माबरोबर या बहुरंगी, बहुढंगी शहरात छायाचित्रणाला एवढा वाव आहे की तुम्ही शहराच्या प्रेमातच पडता.

काही वर्षांपूर्वी सत्येंद्र व्यास यांचे  ‘बनारस टॉकिज’ हे पुस्तक वाचलेले. तेव्हापासून इच्छा होती एकदा तरी जगाला भुरळ पाडणारे, शेकडो वर्ष जुनं शहर पाहायला जायचे. ती संधी आली कॅमेऱ्यामुळे. २०१५ आणि २०१६ अशी सलग दोन वर्षे जाऊन आलो.

बनारस, काशी, वाराणसी किती नावे आहेत आणि किती गोष्टी. पण मला नेहमी बनारस हेच नाव आवडते. या नावातच अनेक स्टोरीज आहेत. इथले घाट आणि त्या घाटांबद्दलच्या हजारो वर्षांच्या कथा- दंतकथा. माझ्यासारखे देवाचे अवडंबर सार्वजनिकरित्या न करणारे असाल तरीही एकदा बनारसला जायलाच हवे. इथल्या वाटा जेवढय़ा वाकडय़ातिकडय़ा आहेत, तेवढेच येथील लोक भन्नाट आहेत. आणि त्यांच्या एकेकतऱ्हा. हिंदूू धर्म किंवा विदेशात जुन्या भारताची ओळख म्हणून फोटाग्राफीमध्ये तर कुंभनंतर सर्वात जास्त फोटो या शहराचे आणि इथल्या घाटांचेच दिसतील. त्यासोबत आणखीन प्रकर्षांने पाहायला मिळतात ते विदेशी पर्यटक आणि रस्त्यावर फिरणाऱ्या गायी. ते पाहिलं की विदेशी चित्रपटात भारत म्हटलं की ताज महाल, साधू, माकडं आणि रस्त्यावरवरील गायी का दाखवल्या जातात ते कळतं आणि त्याचा राग येणं कमी होतं. कारण आजही या शहराचे चित्र असेच आहे. त्यात कसलाही बदल नाही.

बनारस आहे गंगा नदीच्या शेजारी. याचा एक किस्सा सांगतो, एका भैयाशी गप्पा मारत होतो. त्याला म्हटलं, ‘अरे आप तो कानपूर के हो ना, गंगा नदी है ना वहा भी?’

‘अरे भाई गंगा नही, गंगाजी बोलो’

एवढं प्रेम आणि घट्ट नातं आहे उत्तरेत या नदीशी.

पण आईला आपण गृहीत धरतो तसेच काहीसे या नदीचे झाले आहे. सगळा कचरा आणि घाण याच नदीत येते आणि आता तर गंगा धोक्याच्या पातळीच्याही पलीकडे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे याचे पाणी वगैरे पिण्याच्या भानगडीत पडूच नका, नाही तर हमखास आजारी पडाल. गंगामाईच्या किनारी किमान ८७ घाट आहेत. पण मोठे आणि ज्यांना इतिहास आहे असे २० घाट महत्त्वाचे. यातले निम्मे तुम्हाला माझ्या फोटोत दिसतीलच, पण दोन घाट मी टाळले आहेत. तेथे गेलो नाही आणि फोटोही काढले नाहीत. एक म्हणजे हरिश्चंद्र घाट जेथे राजा हरिश्चंद्र स्मशानात काम करत असत आणि दुसरा मणिकर्णिका. खरं तर मणिकर्णिका घाट म्हणजे घाटांचा राजाच. सर्वात जुना आणि हजारो वर्ष न थांबता जेथे अग्निदाह दिला जातो तो घाट. डोम राजाने हा घाट बांधलेला. भारतभरातून लोक इथे येत असतात. असं म्हणतात ‘बनारस के दो ही राजा, एक काशी नरेश और दुजा डोम राजा.’  मी इथे न जाण्याचे कारण सतत जळणाऱ्या चिता पाहून उगीच निराशा येते.

मणिकर्णिकानंतर प्रसिद्ध घाट आहे दशाश्वमेध घाट. इथे सकाळी आणि सायंकाळी सहा वाजता गंगा आरती होते, ती पाहण्यास सायंकाळी दररोज किमान पाच-सात हजार लोक येत असतात. सुट्टीच्या दिवशी तर दहा-वीस हजार लोक येतात. एवढी गर्दी होते की घाटावर जागा न मिळाल्याने बोटीत जाऊन बसावे लागते. हा एक मोठा इव्हेंटच असतो. २०-२५ मिनिटं आरती चालते, पण सोहळा कॅमेऱ्यात आणि मनात टिपण्याजोगा असतो. फोटोग्राफीच्या दृष्टीनेही खूपच अप्रतिम फोटो मिळतात. इथे सकाळी आणि सायंकाळी सहा वाजता दररोज आरती होते. सकाळची आरती छोटी असते आणि गर्दीही फार नसते. आरती सुरू होते आणि सूर्य एकदम समोरून उगवत असतो, त्यामुळे फोटोसाठीही हीच वेळ छान आहे. गर्दी कमी असल्याने फोटोग्राफीला चांगलाच वाव मिळतो. सायंकाळची आरती म्हणजे गर्दीच गर्दी असते. ही आरती आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा विचार असेल तर सायंकाळी किमान चार-साडेचारला तुम्ही तिथे पोहोचायला हवे. त्यावेळी ऊन कमी झाल्याने वर्दळ वाढलेली असते आणि जगभरातून आलेले विविध लोक आणि त्यांचे हावभाव टिपण्यास बराचसा वेळ मिळतो. तुम्हीही त्या वातावरणात मिसळून जातात. इथेही आता स्पर्धा सुरू झाल्याने दोन वेगवेगळे ग्रूप आरती करतात, तेदेखील एकाच वेळी. त्यामुळे जत्राच सुरू असल्याचा भास होतो. तुम्हाला या ‘व्यावसायिक’ आरतीपलीकडे जाऊन वेगळे फोटो हवे असतील तर या दोन्हीच्या अलीकडे व पलीकडे अजून दोघे जण आरती करतात. एक ४०-४५ वर्षांचे गृहस्थ व एक १२-१४ वर्षांचा छोटा मुलगा. इथे गर्दी काहीच नसते पण छायाचित्रणाला फार वाव आहे.

यानंतर जर पुढे गेलात तर तुम्हाला कमाल वाटेल इतके दक्षिण भारतीय लोक केदारनाथ घाटावर दिसतील. ते येताना त्यांच्या प्रथा आणि पंरपरा घेऊन येतात. काही क्षण का होईना आपण दक्षिणेत तर आलो नाही ना असेच वाटत राहते. इथेसुद्धा वेगवेगळे साधू दिसतात. घाटावरचे सुंदर मंदिर, मठ हे पाहण्याजोगे आहे. त्यापुढे अहिल्याबाई घाट, जैन घाट, राजा घाट असे वेगवेगळे घाट आहेत प्रत्येकाचं वेगळं वैशिष्टय़ आणि कथा आहे. एकेक पाहत ऐकत जावे असे.

बनारस हिंदूंचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ असले तरी इथे राज्य होते मुघलांचे. इथे हिंदूू संस्कृती विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे तेवढीच मुस्लीमसुद्धा. खवय्ये असाल तर काही खास जुनी मांसाहारी हॉटेले आहेत तिथे नक्की जा. इथूनच जवळ १० किमीवर जगप्रसिद्ध सारनाथ आहे. प्राचीन हिंदू-मुस्लीम-बौद्ध संस्कृती असं खूप काही या शहराच्या आजूबाजूस पाहायला मिळतं.

या दशाश्वमेध घाटानंतर एक छोटी गल्ली आहे तिथे बंगाली मिठाई खूप खास मिळते. आवर्जून पाहावे असे हे ठिकाण. एकदा का हे शहर आवडलं की, मग दरवेळी नवीन काही ना काही मिळत जातं आणि आपण येत राहतो..