News Flash

कथा : ओंजळभर बकुळ फुलं…

काही पावलांच्या अंतरावर एक गोरागोमटा तरुण मिस्कील हसत उभा होता.

‘‘परी.. ए परी, उठतेस ना?’’ आजीची हाक परीच्या कानावर पडली. पण मस्त थंडीतल्या साखरझोपेतून डोळे उघडण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती.

‘‘परी, बघ, थोडय़ाच वेळात चांगलं उजाडेल. मग म्हणू नकोस हं, लवकर का उठवलं नाहीस म्हणून..’’ आजीने अस्त्र बाहेर काढलं. त्यासरशी तोंडावरचं पांघरूण भिरकावून परी टुणकन अंथरुणातून बाहेर आली. पाहते तर खरंच की, सूर्याची सोनेरी किरणं सांडायला केव्हाच सुरुवात झाली होती. दोन्ही तळव्यांनी डोळे चोळले, खळाळून चूळ भरली आणि तशाच अवतारात धावत बकुळीच्या झाडाखाली येऊनच ती थांबली. बकुळीच्या फुलांचा स्वच्छ सडा पडला होता. त्या मोती रंगाच्या, चांदण्यासारख्या फुलांचा मंद सुगंध परिसरात भरून गेला होता. परीने तो ताजा सुगंध डोळे बंद करून नाकपुडय़ा फुगवून हुंगून घेतला.. मग डोळे उघडून फुलांचा पडलेला सडा नजरेनेच गोळा करत म्हणाली, ‘‘सग्गळी फुलं माझी..’’

घाईघाईत येताना परडी आणायला विसरली ती. तिने लगेच ओढणी खाली पसरली आणि नाजूक हातांनी अलगद हिरवळीवर पडलेल्या चांदण्या टिपू लागली.

‘‘नाही हं, सगळी फुलं नाहीत तुझी.’’

पुरुषी आवाजानं परी दचकलीच. बसल्याबसल्याच तिने मान गर्रकन मागे वळवली.

काही पावलांच्या अंतरावर एक गोरागोमटा तरुण मिस्कील हसत उभा होता. त्याच्या ओंजळीतही बकुळीची ताजी फुलं होती. एवढय़ा पहाटे हा कोण इथे फुलं गोळा करायला आलाय? कपडय़ांवरून आणि बोलण्यावरून तर हा शहरातला दिसतोय.. पण माझी बकुळीची फुलं हा का वेचतोय, असा प्रश्न चेहऱ्यावर उमटल्याने तिचा चेहरा बावरून गेला. पहाटेच्या मंद वाऱ्याने तिच्या विस्कटलेल्या केसांच्या बटा चेहऱ्यावर रुंजी घालत होत्या. एका हाताने केसांना मागे सारून समोरच्या तरुणाचा नजरेनेच अंदाज ती घेत होती.

हिरवळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे टवटवीत, सुकुमार, कावरेबावरे सौंदर्य नितीन अगदी भारावल्यासारखा पाहतच राहिला.

‘‘नाही. म्हटलं ही फुलं तुझी एकटीची नाहीत. कारण झाड राणे काकूंचं झाड आहे आणि राणे काकू माझ्याही आहेत. त्यामुळे मी फुलं घेतली तर त्यांची काही हरकत असणार नाही. तुझी हरकत आहे का?’’ नितीन खोडकरपणे म्हणाला.

‘‘माझी काय हरकत असणार? पण रोज इथली फुलं मी एकटीच नेते हं..’’ स्वत:ला सावरत परीने नाइलाजाने त्याला फुलं गोळा करण्याची सवलत देऊन टाकली आणि पुन्हा खाली पडलेली फुलं पटापट वेचू लागली..

दुसऱ्या दिवशी परी पहाटे फुलं वेचायला आली. तेव्हा तोही फुलं वेचत होता.. त्याला पाहताच परीचा पारा चढलाच. पण त्याच्याकडे पूर्णपणे कानाडोळा करून ती दुसऱ्या बाजूने फुलं वेचू लागली. परी फुले वेचू लागताच नितीन फुलं वेचायचं थांबवून तिला न्याहाळत राहिला.

आठवडाभर फुलं वेचण्याचा हाच कार्यक्रम सुरू होता. आपल्या फुलातला वाटेकरी परीला अजिबात सहन होत नव्हता. पण ती काहीही करू शकत नव्हती. कारण तो अतिशय सालस आणि सुसंस्कृतपणे वागत होता. त्याचं व्यक्तिमत्त्वही हसरं, देखणं आणि रुबाबदार होतं.

आज परीने परडीभर बकुळीची फुलं गोळा केली. परडी नाकाजवळ नेली आणि सुगंध हुंगून घेतला. नितीन झाडाआडून तिला पाहत होता. तिची केतकी कांती उगवत्या सूर्याच्या कोवळ्या सोनेरी किरणांनी अधिकच तेजस्वी दिसत होती. मानेपर्यंत कापलेले करडय़ा चमकदार रंगाचे केस, टपोरे, डोळे, छोटंसं अपरं नाक, नाजूक जिवणी.. आणि परडीभर बकुळ फुलं.. नितीन स्वत:ला विसरून गेला.

अरे, ही तर निघाली.. धडपडतच तो झाडाआडून बाहेर आला खरा. पण हिला थांबवायचं कसं? आज हिच्याशी दोन शब्द तरी बोलायचं, तिला जवळून पाहायचं असं त्याने रात्रभर जागून ठरवलं होतं.

‘‘हॅलो.. बकुळ फुला..!’’ नकळत त्याने साद घातली.

‘‘बकुळ फुला..?’’ तिला हसायलाच आलं. ‘हा बकुळ फुलाला हाक मारतोय? वेडाच्च आहे.’ त्याचा ‘वेडा’ चेहरा पाहण्यासाठी तिने मान वेळावली..

‘‘जरा दोन मिनिटं थांबतेस का? प्लीज.’’ नितीन एका श्वासात म्हणाला.

हा आपल्यालाच बकुळ फुला म्हणतोय हे लक्षात आल्यावर मात्र परीचा केतकी वर्ण चांगलाच लाल झाला. त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत गर्रकन मान फिरवून आणि नाक मुरडून ती आपल्या वाटेने चालू लागली. दोन-चार पावलांतच नितीनने परीला गाठलं. बकुळ फुलांनी भरलेली ओंजळ तिच्यापुढे केली.

‘‘ही घे बकुळ फुलं.’’

‘‘नको मला. मी गोळा केली आहेत.’’ फणकाऱ्याने आपलं अपरं नाक उडवत परी कुरकुरली.

‘‘तुझ्यासाठीच गोळा केलीत ही.’’

‘‘माझ्यासाठी? का?’’

‘‘अशीच. घे ना.’’

‘‘मग तर नकोच.’’

‘‘प्लीज, घे ना. मलासुद्धा बकुळीची फुलं खूप आवडतात. इकडे आलो की मी ओंजळभर फुलं गोळा करून दिवसभर माझ्यासोबत ठेवतो. दिवसभर यांचा मंद गंध माझ्या सोबतीला असतो. मी मुंबईला राहतो. आज मी परत जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून इथली सर्व फुलं तुझीच आहेत. गेले काही दिवस आपण या बकुळीच्या झाडाखाली भेटलो खरे, पण आपली ओळख झाली नाही. म्हणून विचार केला की, आजची सर्व फुलं तुला भेट द्यावी. बाय द वे, माझं नाव नितीन. तुझं नाव परी ना? खूप गोड नाव आहे आणि अगदी नावासारखीच तू आहेस. मी इंजिनीअर आहे. मुंबईला आईवडिलांसह राहतो. तिथे आमचा बिझनेस आहे. तुझ्या राणे काकू ही माझी मावशी. मुंबईपेक्षा मला गावाची ओढ जास्त आहे. त्यामुळे मी इकडे  मन तृप्त होईपर्यंत राहतो आणि पुन्हा शहरात सिमेंटच्या जगात जातो..’’

नितीनचं बोलणं परी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिली. पण लगेच भानावर येत म्हणाली,

‘‘मला का सांगता हे सगळं?’’

‘‘कारण काहीच नाही. पण तुझ्याशी मैत्री करायला आवडेल मला.’’

‘‘मला नाही करायची तुमच्याशी मैत्रीबित्री..’’ परी फणकारली आणि ताडताड चालू लागली.

नितीन तिच्या याही रूपाकडे अनिमिष नजरेने पाहत राहिला. सॉल्लीड फणकारा आहे हिचा. ओंजळीतल्या फुलांकडे पाहून गालातच हसला आणि तोही निघाला.

परी वाऱ्यासारखी घरात शिरली तेव्हा झोपाळ्यावर बसलेल्या आजीने विचारलं, ‘‘काय  गं, काय झालं? धावत आलीस की काय?’’

ती आजीच्या बाजूला जाऊन बसली. तिने बकुळीच्या झाडाखालचा सर्व प्रकार आजीला सांगितला.

परी चार वर्षांची असताना रेल्वे अपघातामध्ये तिचे आई-वडील वारले. तेव्हापासून आजीने म्हणजे वडिलांच्या आईने तिचा सांभाळ केला. घरची परिस्थिती बेताची होती. आजी चार घरच्या पोळ्या करायची. शिवाय लोणची, पापड, सांडगे करून विकायची. परीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं तिने. परी कॉलेजमध्ये शिकत होती. आजीवर अपार प्रेम होतं. दोघी छान मैत्रिणी होत्या एकमेकींच्या.

परीने सांगितलेला वृत्तान्त ऐकून आजी गालातल्या गालात का हसली हे परीला समजलंच नाही. त्यानंतर आजीला मदत करणं, वाचन, मैत्रिणींशी गप्पा, टेकडीवर फिरायला जाणं, जाता-येता कैऱ्या, पेरू पाडणं या सर्व उद्व्यापामध्ये परी ‘नितीन’ प्रकरण पूर्ण विसरून गेली.

नितीनची मात्र झोप उडाली. अवखळ, नाजूक , सुंदर परीने त्याच्या मन- मेंदूचा पूर्ण ताबा घेतला होता. तिच्या गोबऱ्या चेहऱ्यावर बागडणाऱ्या केसांच्या बटा, तिचं बोलणं, चालणं, धावणं, तिचा फणकार आणि फडफडणाऱ्या पापण्यांतले टपोरे डोळे.. त्याचं कामात, खाण्या-पिण्यात कशातच लक्ष नव्हतं. रात्रभर टक्क डोळे उघडे ठेवून तो परीला पाहात होता. जागरणाने लाल झालेले डोळे पाहून ममाने शेवटी विचारलंच, ‘‘नितीन, बेटा, तुझी तब्बेत बरी नाही का? काही होतंय का तुला? तुझं खाण्यापिण्यात, आमच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाही. डोळेसुद्धा लाल झालेत, चेहरा उतरला आहे. काही प्रॉब्लेम आहे का? तुला मी किती वेळा सांगितलं आहे, तू गावाला जात जाऊ नकोस. मावशीला भेटावंसं वाटलं तर आपणच तिला बोलावून घेऊ नं. तिथे काही सुविधा नाहीत. कसलंही पाणी पितोस, एसीशिवाय झोपतोस, धूळ, ऊन या सगळ्याचा तुला त्रास होतो. तरीही तू ऐकत नाहीस.’’

‘‘अगं, ममा, मला काहीही झालेलं नाही. अगदी ठणठणीत आहे हं. जागरणानेच डोळे लाल झाले आहेत, बाकी काही नाही.. आणि ममा, मला गाव आवडतो हे तुला माहीतच आहे ना? गावाच्या मातीची ओढ वाटते. मोकळी स्वच्छ हवा, फुला-फळांनी बहरलेले रान-माळ, त्यांचा दरवळणारा सुगंध, मनसोक्त बागडणारे पशू-पक्षी, डोंगर, खळाळणारी नदी, सूर्याच्या वेगवेगळ्या छटा, चंद्राच्या कला आणि चांदण्याची चमचम आणि तिथली भोळीभाबडी माणसं.. हे सगळं किती सुंदर आहे. शहरातले हे यांत्रिक पद्धतीचं जगणं नाही आवडत मला. सगळं कृत्रिम आणि नाटकी वाटतं.. अगदी माणसंसुद्धा. खळाळून हसण्यासाठी सुद्धा मॅनर्सची दक्षता घ्यावी लागते.. नाही मन रमत इथे. म्हणून मावशीकडे जातो ना गं..’’

उच्चभ्रू सोसायटीतल्या मैत्रिणींबरोबर पाटर्य़ा, पिकनिक यामध्ये आनंदाचे, हसण्याचे मुखवटे घालून वावरणाऱ्या आणि श्रीमंतीची नशा असलेल्या नितीनच्या ममाला नितीनचं यापूर्वीही कधी पटलं नव्हतं आणि पुढे कधीही पटणारं नव्हतं.. शेवटी वाद होऊन ममा तावातावाने निघून गेली. आपला एकुलता एक चिरंजीव बिघडला यावर तिने पुन्हा शिक्कामोर्तब केलं.

गावाहून येऊन दोन आठवडे होऊनही परी जशीच्या तशी नितीनच्या डोळ्यासमोर होती. घरातल्या अशा भावनाशून्य वातावरणात आपण परीची स्वप्न पाहणं योग्य आहे का, दोन्ही घरचं वातावरण, आर्थिक विषमता, शहरी आणि खेडय़ामधली सांस्कृतिक तफावत याचा विचार केला तर परीला या वातावरणामध्ये आणून आपण तिच्यावर अन्याय तर करणार नाही ना, या परिस्थितीशी परी जुळवून घेईल का याचा विचार करून करून त्याचा मेंदू शिणला होता. मुळात परीने आपल्याशी मैत्रीलासुद्धा नकार दिला आहे. मग कशाच्या आधारावर आपलं मन असं बेचैन होऊन तिच्याकडे धाव घेतंय? परीने आपल्याशी का करावी मैत्री? त्या आजी-नातीमध्ये प्रचंड प्रेम आणि जिव्हाळा आहे. आपल्या घरातल्या शब्दकोशात हे शब्दच नाहीत. छे.. तिचा विचार मनातून काढून टाकणं हेच योग्य आहे, असं मनाला वारंवार समजावूनही काही उपयोग होत नव्हता. हतबल झाला होता नितीन..! परी हेच त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय झालं होतं. आता गावाला जाऊ त्या वेळी परीचं मन जिंकून घेण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा निर्धारच केला त्याने.

सहा महिन्यांनंतर नितीन मावशीकडे निघाला होता. संपूर्ण रस्ता त्याला जास्तच सुंदर वाटत होता. आजूबाजूचं सृष्टिसौंदर्य नव्यानेच पाहत असल्यासारखं त्याला वाटत होतं.. आणि दुतर्फा असलेली वनराई नितीनच्या आनंदात सामील होऊनच डोलत होती. उद्या पहाटे लवकर जाऊन छान, ताजी टवटवीत बकुळीची फुलं गोळा करायची.. परीसाठी..! तिच्याशी बोलायचं. तिला बोलतं करायचं आहे. नितीन मनाची तयारी करीत होता. कसं आणि काय बोलायचं याची उजळणी करीत होता.. पण रस्ता संपता संपत नव्हता.

मावशीच्या घरी पोहोचेपर्यंत अंधार दाटून आला होता. मावशी नितीनची वाटच पाहात होती. घरी पोहोचताच मावशीने सर्वाची ख्यालीखुशाली विचारली..

‘‘मावशी, सगळेच मजेत आहेत. तू नको काळजी करू गं. मला सपाटून भूक लागली आहे, तुझ्या हातचं गरमागरम जेवण वाढ बघू पटकन. बाकी सगळं नंतर बोलू.’’ नितीन फ्रेश व्हायला न्हाणीघराकडे पळाला. मावशीला भाच्याचं अगदी कौतुक होतं. तिने नितीनला गरमागरम जेवण वाढलं. तृप्त होऊन नितीन पहाट होण्याची वाट पाहत पलंगावर आडवा झाला. उशिरा कधी तरी त्याचा डोळा लागला.

पाखरांच्या किलबिलाटाने नितीनला पहाटे जाग आली. ताजातवाना होऊन बकुळीच्या झाडाखाली धावतच गेला. झाडाखाली सुकलेल्या बकुळ फुलांचा थर पाहून आश्चर्यच वाटलं त्याला. परी तर न चुकता रोजच फुलं गोळा करते.. तरीही एवढी फुलं शिल्लक कशी राहिली? की परीने फुलं वेचलीच नाहीत? का वेचली नसतील?.. असंख्य प्रश्न मनात घेऊन तो बकुळीची ताजी फुलं गोळा करू लागला. लक्ष मात्र परीच्या येण्याकडे लागलं होतं. ओंजळभर फुलं गोळा झाली होती आणि आजूबाजूचा परिसरही हळूहळू उजेडाकडे झुकू लागला होता आणि पशूपक्ष्यांसहित चराचर आपापल्या नित्यकर्माला लागला होता.

नितीनची मात्र घोर निराशा झाली. ती का नाही आली? कुठे बाहेरगावी गेली का? आजारी आहे का? तिला उठायला उशीर झाला असेल का? जड पावलांनी तो घरात आला. आंघोळ करून मावशीने तयार केलेला नाष्टा संपवून तो टेकडीवरच्या शंकराच्या मंदिराकडे जायला निघाला. गावाला आल्यानंतर हा त्याचा नेहमीचा शिरस्ता होता. टेकडी छोटीशीच होती. त्यावर शिव मंदिर.. तिथे नितीनला खूप प्रसन्न आणि शांत वाटायचं.

मंदिराच्या वाटेवर त्याला महिन्यापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाच्या आणि वादळाच्या खुणा दिसत होत्या. झाडं उन्मळून पडली होती. घरांवरची छपरं उडाली होती, काही घरांची पडझड झाली होती. हे सारं पाहून नितीन हळहळला..

नितीन दुसऱ्या दिवशी त्याच ओढीने पुन्हा पहाटे बकुळीच्या झाडाखाली गेला. पण कालचीच पुनरावृत्ती झाली. परी फुलं वेचायला आलीच नाही. आता मात्र नितीनचा संयम संपला. फुलांना हात न लावताच तो लगोलग घरी परतला.

‘‘मावशी, बकुळीच्या फुलांचा सडा पडला आहे बागेत. कोणी नेत नाही का फुलं?’’ आडवळणाने नितीन चौकशी करीत होता.

‘‘नाही रे बाबा, कोण नेणार फुलं? परीला बकुळीची फुलं खूप आवडायची. ती न्यायची रोज. पण..’’

‘‘पण काय मावशी? ती कुठे बाहेरगावी गेली आहे का?’’

‘‘खूप गोड पोरगी. लाघवी आणि जीव लावणारी होती. फुलांसारखं तीसुद्धा एक फूल होती. फुलासारखी अल्पजीवी..!’’ मावशीच्या गळ्यात हुंदका दाटून आला.

‘‘म्हणजे?’’ नितीन थरारला.

‘‘अरे, महिन्यापूर्वी आलेल्या वादळ आणि अवकाळी पावसाने तिच्या घरावर माड मोडून पडला. घर कोसळलं आणि त्यातच परी आणि तिच्या आजीचा मृत्यू झाला. परी म्हणजे खरोखरच पऱ्यांच्या जगातून चुकून आलेली एक परीच होती. पृथ्वीवरचं तिचं वास्तव्य इतकंच होतं.’’ मावशीचे पुढचे शब्द नितीनच्या मेंदूपर्यंत पोहोचलेच नाहीत. तो बधिर झाला होता.. ऐकण्यासारखं, बोलण्यासारखं काहीच नव्हतं आता..

भानावर येताच नितीन उठला आणि तडक बकुळीच्या झाडाखाली गेला. ओंजळभर फुलं गोळा करून झाडाच्या बंध्याला टेकून बसला. मोठा हुंदका दाटून आला. अश्रूंना त्याने वाट मुक्त करून दिली. ओंजळीतल्या फुलांना छातीशी कवटाळून रडला.. आभाळाकडे टक लावून बसला.. याच निळ्याशार आभाळात परी गेली आहे. तिथून ती मला पाहत असेल. मी फुलं घेतली म्हणून तिला रागही आला असेल किंवा ती म्हणत असेल, ‘घे, ही सर्वच फुलं तू घे’.. परी, मला तू हवी होतीस. मी तुला या फुलासारखं सांभाळलं असतं, जपलं असतं. तू इतकी का रागावलीस माझ्यावर? ओंजळभर फुलंच तर घेतली होती. माझी मैत्रीसुद्धा नाकारलीस. मी तर तुला भरभरून प्रेम आणि प्रेमच देणार होतो. पण ते प्रेम फुलण्याआधीच तू अवचित का निघून गेलीस? तुझ्या रूपानं माझ्या रखरखीत वाळवंटासारख्या आयुष्यात एक सुंदर, नितळ, चैतन्याचा झरा गवसल्याच्या आनंदात मी होतो. पण ते मृगजळच निघालं.

विच्छिन्न, मनाने नितीन मुंबईला पोहोचला. घरी पोहोचताच ममा उत्साहाने स्वागत करताना म्हणाली, ‘‘बेटा, मुंबईतले मोठे उद्योगपती परांजपे आहेत ना, त्यांची एकुलती एक मुलगी स्वानंदीचं स्थळ तुला सांगून आलंय. त्यांनी तुला पाहिलं, तू पसंत आहेस त्यांना. तू कोणाच्या प्रेमात पडलेला नाहीस हे मला माहिती आहे. त्यामुळे मुलगी आणि घराणं  उत्तम असल्याने आम्ही त्यांना आमची पसंती कळवली आहे. स्वानंदी म्हणजे लक्ष्मी आहे. उद्याच येणार आहेत ते बोलणी करायला..’’

नितीन न बोलता रूममध्ये निघून गेला. आणलेली ओंजळभर बकुळीची फुलं छातीशी धरून खूप रडला. मग उठून बकुळीची फुलं एका छानशा कुपीमध्ये बंद करून कपाटामध्ये ठेवली.. आणि आत्माविरहित देहाला जगवण्यासाठी जगरहाटीमध्ये सामील झाला.. परीविना..

बंद कुपीतल्या ओंजळभर बकुळ फुलांच्या साक्षीनं..!
शरयू गीते – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:18 am

Web Title: a story bakul flowers
टॅग : Story
Next Stories
1 स्वागत : कबीरांचा वसंत
2 प्रासंगिक : विद्यापीठांतील राजकारण
3 जमीनसुधार नव्याने हवा
Just Now!
X