कार्यालयीन क्षेत्रात पोहोचवणारे चारपाच बसेसचे बाजूबाजूचे ते दोन थांबे. गांवदेवी मंदिराजवळचे. त्या दोनही थांब्यावर ही भली थोरली शिस्तशीर रांग. नेमलेल्या नित्याच्या वेळी घडय़ाळाच्या कांटय़ाकडे बघत कार्यालयांत वेळेवर पोहोचायची तातडी असलेला जो तो! मीही त्यांतलीच?- रांग वाढत्ये असं वाटलं की मागच्या कुठच्यातरी बोळांतून बाराचौदा वर्षांचा एक मुलगा तर्र्रम् तर्र्रम् करीत यायचा. पहिल्यांदा जरासा दूर उभा राहून रांगेतल्या माणसांवरून डोळे फिरवीत राहायचा- तोंडाने अखंड बडबड – ‘ये आ गया आज का धर्मीदर! वुईऽऽऽ वो आ गयी शबाना- कल का सलमान पधार रहा है- अरे देखो, लीप- स्टीक! ओ टायवाले, तुम्हारी वहिदा किधर गयी चू चू चूक!’ – इस्त्रीदार जगाची टिंगल त्याच्या चेहऱ्यावर वाचायला मिळायची- मग तो रांगेतल्या माणसांना स्पर्श करीत भीक मागायचा- वडापाव खाऊँगा, बिस्कूट चाय के लिये पैसा दो- त्याचा किळसवाणा स्पर्श टाळण्यासाठी जो तो त्याला हटकारायचा- फटकारायचा- करुणा यावी असं त्याचं वागणं नसायचं- फिल्मी जगातली मंडळी त्याच्या जबानवर, आणि सभ्य संभावित जगाची टवाळी करणारे त्याचे ते शेरे- कुणाला वाटेलच कसे- याला काही द्यावे!

मग काहींजण रांगेतले चिडून बोलायला लागायचे- हात मत लगावो, तगडा है- काम करो, कमाओ! फोकट भीख मांगता है! ये क्या हर रोजका तमाशा! मेहनत करो खाओ! सगळा राग त्या शेऱ्या-ताशेऱ्यांतून बाहेर पडायचा- त्यात काही स्त्रियांचे बोलणे- खरंच कसा बघतो ना हा आरपार! बेशरम कुठचा-

तिरस्काराची वाफ, अती झाले की अशी बाहेर पडायची- त्याला मात्र ढिम्म नसायचे. सगळे शेरे अंगावर घेत त्याची टकळी सुरूच- ‘दो काम, आपके घर मे झाडूकटका करू? क्या चकाचक बूट पालीस करू?’ नीडर नजर, आणि ते पैसे मागणं- कंटाळून त्याला पैसे देणारेही कितीक होते- हा समोरचा हटावा म्हणून!- तो इतका ओंगळवाणा दिसायच की केव्हा एकदा हवी ती बस मिळेल आणि इथून सटकू असे प्रत्येकाला वाटे- दया वाटावी असं एकही लक्षण त्याच्या वागण्यांत नव्हतं- बनेल बोलणं आणि ते इथे-तिथे हात लावणं- मध्येच म्हणायचा- गुस्सा मत करो- दान करो-  खाना खायेगा – मकान दो- साफ सुथरा रहेगा, कधी चारपांच सिगारेटची थोटकं ओठांत ठेऊन हवेत धूर सोडायचा.

एकदा नाक्यावर पोलीस दमदाटी करून गेला. पब्लिक विचारीत राहिली- अशांना बेगर्स होममध्ये का नाही टाकत- मग एक आवाज यायचा. अरे, ये हरामी वहाँसे भागते है! – उच्छाद वाढत होता फक्त–

आणि एक दिवस- नेहमीच्या त्रासांत पावसाची भर- दोनही थांब्यावर अशीच विस्तारत जाणारी रांग- आडोशाला न जाता, नेहमीच्या पद्धतीत केसाची झुरपे मागे पुढे करत हा रांगेवरून हात पसरीत, प्रत्येक चेहऱ्याकडे न्याहाळून बघत, पुढे सरकत होता- दुसऱ्या थांब्याच्या पलीकडच्या टोकाकडून एक कोवळा क्षीण आवाज भिकेची याचना करणारा. दान करो, रोटी खायेगा- मेमसाब, भाईसाब – दया करो. मान खाली घालून उलटय़ा दिशेने तो पुढे पुढे येतोय हे जाणल्यावर हा नेहमीचा निगरगट्ट मुलगा धावून त्याच्या अंगावर गेला ‘‘ ये सुवर। तू कहाँसे टपका रे। ये एरिया मेरा है- समझे- तुझे ऐसा पिटूँगा’ – मान खाली घातलेल्या त्या मुलाला  हिसकत – खेकसत तो अद्वातद्वा बोलत होता-

जो तो हव्या असलेल्या बसच्या प्रतीक्षेत आणि समोर हे नाटय़! रांगेतले सभ्य- संभावित दचकून अवाक! – आता हे नसतं प्रकरण लांबायच्या आत आपण इथून सुटू या या विचारांत जो तो!

आणि या निगरगट्ट मुलाने त्या मुलाशी झटापट सुरू केली- साला, नीचे जमीनपर क्या देखता है रे! तेरे बाने क्या गाडा है जमीन के अंदर- आँऽऽऽ आणि – मुंडी उपर करो म्हणत त्याने मुलाची मान गचकन वर केली- या बेरड मुलाची नजर त्याच्या डोळ्याकडे गेली. दृष्टीहीन पांढरी बुबुळे गरगर फिरवित तो बापडा नवा पोर थर थर कापत होता.

आणि- एका क्षणांत-

फाटक्या चड्डीच्या आणि शर्टाच्या खिशांतली सर्व चिल्लर त्या मुलाच्या दोन तळव्यांत कोंबत हा बेरड मुलगा कोणताही वाह्यतपणा न करता मागच्या मागे बोळांत तर्र्रम तर्र्रम करीत पळत सुटला.

नको असलेल्या दररोजच्या नाटय़ाला मिळालेले हे अनपेक्षित वळण!

वेगळीच कलाटणी! काळ्याशार दगडावर असा अचानक अंकुर फुटलेला!

सगळ्यांना वेगळंच हुश्श वाटलं- तितक्यांत मला हवी असलेली बस आली- पावसाच्या चारदोन सरीही कोसळून गेलेल्या.

मी बस पकडली- थेट वरच्या डेकवर गेले. एका खिडकीपाशी जागा मिळाली आणि तिकिटासाठी पर्स उघडली- एक अचानक चांगली सुरुवात झाली होती. वैताग संपला होता. आणि खिडकीतून खाली रस्त्यावर नजर गेली-

पाऊस पडून गेल्यामुळे छोटी छोटी डबकी साठली होती-

आणि प्रत्येक डबक्यांत एक इंद्रधनुष्य साकारलं होतं!
सुमन फडके – response.lokprabha@expressindia.com