-सुनिता कुलकर्णी

गेले काही दिवस ट्विटरवर ‘बॉयकॉट नेटफ्लिक्स’ हा हॅशटॅग ट्रेंण्डिंग आहे. संबंधित वाद निर्माण झाला आहे तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शत झालेल्या ‘कृष्णा अ‍ॅण्ड हिज लीला’ या तेलगु सिनेमामुळे. या सिनेमामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्सवर बंदी आणा असं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

‘सिनेमात हिरो हिरोइनची नावं धर्माच्या आधारे ठेवून धर्माच्या आधारे द्वेष पसरवण्याचा उद्योग केला जात आहे’, ‘आमच्या देवाचा असा अपमान नेहमी का?’, ‘इतकं सगळं लैंगिक चित्रण आमची नैतिक मूल्य पायदळी तुडवत आहे’, असं म्हणत काही लोकांनी नेटफ्लिक्स तसंच सिनेमाच्या निर्मात्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्याची मागणी केली आहे.हा सिनेमा सुरेश प्रॉडक्शन, वायकॉम १८ ची निर्मिती असून राणा दुगबत्ती, संजय रेड्डी त्याचे निर्माते आहेत. रविकांत पेरेप्पू त्याचे दिग्दर्शक असून सिद्धू जोनालगड्डा, श्रद्धा श्रीनाथ आणि शालिनी वादनिकट्टी प्रमुख भूमिकेत आहेत.

ट्विटरवर सिनेमाला विरोध व्हायला सुरूवात झाल्यावर दुसरीकडे काही जणांनी सिनेमाबद्दलचे गमतीशीर मीम टाकायला सुरूवात केली. तर सिनेमावर खरंच बंदी आली तर आपल्याला तो बघायला मिळणार नाही आणि त्यात काय होतं ते कळणार नाही म्हणून पटापट सिनेमा बघून घेतला. पण त्यानंतर आपण आपले दोन तास आणि एका सिनेमाचा नेटपॅक वाया घालवला म्हणून कपाळावर हात मारून घेतला.

असं काय आहे या सिनेमात?
कृष्णा नावाचा चांगला शिकला सवरलेला, बऱ्या घरातला, पण ऐंदी तरूण. त्यात मुली हा महाशयांचा विक पॉईंट आहे. त्याचं सत्याबरोबर प्रेमप्रकरण सुरू आहे. बंगलोरला नोकरी मिळाल्यावर त्याला कंटाळलेली त्याची गर्लफ्रेण्ड सत्या ब्रेकअप करून निघून जाते. मग थोडे दिवस देवदास होऊन घालवल्यावर त्याच्या आयुष्यात राधा येते. मग हे नवं प्रेमप्रकरण रंगतं. मग कृष्णाला बंगळुरूला नोकरी लागते. मग तो तिकडे जातो. तिथे त्याला सत्या पुन्हा भेटते. मग त्याचा सत्या आणि राधा असा प्रेमाचा खेळ सुरू होतो. आपलं या दोघींवरही प्रेम आहे आणि दोघीही आपल्याला आपल्या आयुष्यात हव्यात असं त्याचं म्हणणं आहे. पण शेवटी त्याचा भांडाफोड होतो आणि त्या दोघींपैकी कुणीही त्याच्याशी लग्न करत नाही, आपापल्या मार्गाने निघून जातात, पण त्यांची तिघांची चांगली मैत्री टिकते. हे सगळं कमी म्हणून की काय मग दिग्दर्शक चेतन भगत स्टाइलमध्ये कृष्णाला त्याची ही लव्ह स्टोरी लिहायला लावतो. तिथे त्याला तिसरी मैत्रीण भेटते.

निव्वळ तरूणाईला डोळ्यासमोर ठेवून काढलेला हा सिनेमा आहे. त्यात प्रेम, भांडणं, ब्रेकअप, मधे पडणारे मित्रमैत्रिणी, दोनचार इंटिमेट सीन असा सगळा नेहमीचा मालमसाला आहे. प्रेक्षक जरासुद्धा खेचले जाऊ नयेत, अशा दर्जाचे अभिनेते आहेत. मुळात हा सिनेमा प्रेक्षक का बघतील? असा प्रश्न पडावा इतका तो थोर आहे.  त्यामुळे खरंतर त्याच्यावर बंदी घाला असं म्हणून विरोधकांनी सिनेमाला मदतच केली आहे. एरवी जो कुणी बघितला नसता असा सिनेमा लोक वाद निर्माण होतो आहे म्हणून बघून टाकत आहेत. त्यामुळे मग प्रश्न पडतो की लोकांनी सिनेमा बघावा यासाठी तर हा वाद निर्माण केला नसेल ना ? आपल्याकडे तसंही भावना दुखवून घ्यायला कुणीही तयारच असतं. त्यांनीही विचार करायला हवा की एवढ्या तेवढ्याने दुखावल्या जाव्यात इतक्या आपल्या भावना स्वस्त कशा?