lp48‘बोलणाऱ्याची मातीदेखील विकली जाते, पण न बोलणाऱ्याचं सोनंही विकली जात नाही’, ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. तुमच्याकडे असलेल्या एखाद्या वस्तू किंवा उत्पादनाचे महत्त्व आणि वैशिष्टय़ तुम्ही लोकांना अर्थात् ग्राहकांना किती कौशल्याने आणि चातुर्याने पटवून देता आणि त्या योगे उत्पादनाचा खप कसा आणि किती वाढवता यासाठी एक क्षेत्र अक्षरश: दिवसरात्र खपत असतं. तुम्हाला लक्षात आलंच असेल ते क्षेत्र म्हणजे अर्थातच जाहिरातविश्व. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या कामाच्या जगात जितके वावरतो ना तितकेच कळत-नकळतपणे आपण या जाहिरातविश्वात वावरत असतो. कधी ग्राहक म्हणून तर कधी प्रेक्षक/श्रोता म्हणून. लोकांना आकर्षित करणारं किंवा त्यांना गुंगवून ठेवणारं, कधीकधी विचार करायला लावणारं जाहिरातीचं जग खरंच ‘क्रिएटिव्ह!’ नळातून जसं धो धो पाणी वाहतं ना तशा या जाहिराती ‘वाहत’ असतात, खरं तर कोसळतच असतात. तेही एकाच माध्यमातून नाही. आजच्या जगात माध्यमांचेच प्रकार इतके वाढलेत की त्यानुसार जाहिरातींचं रूपही बदलत असणार हे कळायला आपणही जाहिराती बघून बघून तेवढे सूज्ञ झालेलो आहोत. वर्तमानपत्रं, मासिकं यांतील छापील जाहिराती आणि टी. व्ही., इंटरनेटच्या माध्यमांतून दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती यांचं या सगळ्यामध्ये केवढी विविधता आहे. एक प्रेक्षक आणि ग्राहक म्हणून दृक्श्राव्य जाहिराती आपली मती गुंग करतात. कधी कधी अक्षरश: भुरळ पाडतात किंवा कधी कधी असं काही दाखवून जातात ज्यामुळे आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो.

जाहिरात म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचं बऱ्यापैकी उत्तर आता सगळ्यांना ठाऊक असतंच. तरीही जाहिरात म्हणजे एखाद्या औद्योगिक उत्पादन सेवेच्या प्रचार- प्रसारार्थ विपणनाच्या दृष्टिकोनातून केलेला संवाद. पुढचा आपोआप येणारा मुद्दा म्हणजे हा संवाद नेमका कोणामध्ये? तर अर्थात्च उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये. एखाद्या उत्पादनाचे महत्त्व ठासून सांगण्यासाठी, तेच उत्पादन कसे ‘द बेस्ट’ आहे, हे ग्राहकराजाच्या मनावर बिंबवण्यासाठी अनेकविध माध्यमांद्वारे कल्पक आणि आकर्षक पद्धतीने ही मांडणी होत असते. ती मांडणी चकचकीत होण्यासाठी विशेषत: दृक्श्राव्य माध्यमातील जाहिरातीत मॉडेल्सचा अभिनय, उत्पादनाचं महत्त्व सांगणाऱ्या जिंगल्स, कॅची टॅगलाइन्स, जे काही सांगायचं आहे ते सांगण्यासाठी वापरली गेलेली पद्धत असे अनेक घटक परिणामकारक ठरतात. बरं हा सगळा प्रपंच नेटका करायचा असतो तेही अगदी तोकडय़ा वेळेत. तोकडा म्हणजे केवढा तर जेमतेम काही सेकंदांचाच अवधी. त्या वेळात ते विशिष्ट उत्पादन, त्याचे महत्त्व आणि ते परिणामकारक होण्यासाठी वापरणाऱ्या प्रत्येक घटकांचं प्रेझेंटेशन इतकं अचूक आणि मनाची पकड घेणारं असावं लागतं की प्रेक्षकाने पुढच्या क्षणी उठून त्या उत्पादनाचा ग्राहक म्हणून बाजारात जावं. जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाबाबत सांगणं इतकं परिणामकारक होत असतं की त्यामुळेच तर साधारणपणे  ३० सेकंदांच्या त्या जाहिरातींसाठी उत्पादक कंपन्या कोटय़वधी रुपये खर्च करायला तयारच असतात. त्यामुळेच जाहिरातींचं अर्थशास्त्र प्रचंड मोठं आणि सखोल असतं. या गोष्टींमुळेच टी.व्ही वरील जाहिरातींचं अर्थकारण हे इतर माध्यमांतील जाहिरातींच्या अर्थकारणापेक्षा जास्त मोठं असतं.

वृत्तपत्रे, रेडिओ यांद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातींपेक्षा टी.व्ही वरच्या जाहिराती आपलं लक्ष वेधून घेतात, इतकंच नव्हे तर त्या दीर्घकाळ स्मृतीत रेंगाळतात. कित्येकांना लहानपणी पाहिलेल्या जाहिरातींची जिंगल्स अजूनही तोंडपाठ असतील किंवा त्यांच्या टॅगलाइन्स लक्षात असतील. ग्राहकांची मानसिकता ओळखून त्याला एखादं उत्पादन ‘आपलंसं’ वाटेल यासाठी जाहिरातविश्वातील ‘कल्पक डोकी’ काय शक्कल लढवतील याचा खरंच नेम नाही. एखादं गाणं, चित्रपट जसा दीर्घकाळ स्मृती कोषात बंदिस्त होतो तशाच काही जाहिरातीदेखील त्यांचं नशीब काढून जन्माला येतात, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

जाहिरातींची माध्यमं जितकी वेगळी तितकेच प्रकारही. प्रॉडक्ट प्लेसमेंट किंवा कोव्हर्ट अ‍ॅडव्हर्टायझिंग हा एक प्रकार आहे. शक्यतो चित्रपटांतील वेगवेगळ्या दृश्यांतून, संवादांतून विशिष्ट प्रॉडक्टची (ब्रँडची) एकतर एखाद्-दोन वाक्यांत माहिती तरी सांगितली जाते किंवा तिचा वापर दाखवला जातो. उदा. ‘ताल’ या चित्रपटात केलेली एका शीतपेयाची जाहिरात ज्यात अक्षय खन्ना-ऐश्वर्या ते शीतपेय कुठल्या कंपनीचे आहे हे ठळक दिसेल अशा पद्धतीने ते पीत असल्याचे दृश्य आहे. किंवा मुन्नीच्या गाण्यातील ‘झंडू बाम’ किंवा करिनाच्या गाण्यातील ‘फेव्हिकोल’ यांच्या जोडीला एरियल अ‍ॅडव्हर्टाझिंग हा प्रकारही एकदम ‘इन’ आहे. ज्यात विमान, फुगे यांच्या माध्यमातून, साहसी हवाई खेळाच्या माध्यमातून जाहिरात केली जाते. सेलिब्रिटी ब्रँडिंग हादेखील एक रूढ प्रकार आहे. एखाद्या सेलिब्रिटीच्या लोकप्रियतेमुळे, त्याचा जनमानसावर असलेला प्रभाव पाहता एखाद्या ब्रँडच्या प्रचारासाठी कंपन्या कोटय़वधी खर्चून ‘बँड्र व्हॅल्यू’ वाढवण्याचा आणि ती विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न त्या सेलिब्रिटीच्या माध्यमातून करत असतात.

जाहिरात ही जितकी वाटते तितकी सोपी कला नक्कीच नाही. कल्पकतेव्यतिरिक्त समाज, संस्कृती, मूल्य-परंपरा, मानसिकता या सगळयांचं भान जाहिरातकर्त्यांला असणं नुसतंच अपेक्षित नाही तर अत्यावश्यक आहे. अभिनय, भाषा, संगीत, निर्मितीतंत्र या कलाकौशल्याच्या बळावर तरुणाईला या क्षेत्रात संधीचं आकाशच खुलं आहे. तर मग डोकावूया या जाहिरातींच्या जगात दर पंधरा दिवसांनी.
ओंकार पिंपळे – response.lokprabha@expressindia.com