मराठीच्या विविध बोलींपैकी एक असलेली अहिराणी भाषा मुख्यत: खानदेशात म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये बोलली जाते. अहिराणीच्या भाषिक समृद्धीचा आढावा उपलब्ध लोकसाहित्यातून घेता येतो.

उत्तर महाराष्ट्राचे जळगांव, धुळे, नंदूरबार हे जिल्हे खानदेश म्हणून आजही ओळखले जातात. पूर्वी मुंबई इलाख्याचे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश हे दोन भाग होते. पुढे हा भूभाग जळगांव, धुळे आणि नासिक या जिल्ह्यंच्या नावाने ओळखला जाऊ लागला. खानदेश हा परिसर पूर्वेला वाघूर नदी, पश्चिमेला चांदवडचे डोंगर, उत्तरेला सातपुडा पर्वताच्या उंचउंच रांगा आणि दक्षिणेला िवध्याद्री पर्वताच्या रांगा यांनी वेढलेला आणि दळणवळणाच्या दृष्टीने इतर भूभागापासून तुटलेला असा प्रदेश होता. हा भूप्रदेश म्हणजे खानदेश आणि या परिसरात बोलली जाणारी बोली ही खानदेशी. खानदेशी ही या प्रदेशाची बोली जी या प्रदेशातील सर्व जातीजमातींनी दैनंदिन व्यवहारासाठी स्वीकारली आहे. खानदेश म्हणजे अहिर देश – अहिरांचा देश. आणि अहिरांची बोली ती अहिर वाणी किंवा अहिराणी.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

खानदेशी बोली ही मुळात अहिर लोकांची अहिर वाणी म्हणजे अहिराणी बोली. या अहिराणीचा प्रभाव खानदेशभर, आणि म्हणून खानदेशातील बोली ही खानदेशी ह्य प्रादेशिक नावाने ओळखली जाते. अहिराणी ही केवळ अहिरांची बोली न राहता संपूर्ण खानदेशाची बोली झाली आहे, म्हणून अहिर (अहिराणी) या सामाजिक नावाने ती ओळखली जाण्यापेक्षा ती खानदेश (खानदेशी) या प्रदेशाच्या नावाने ओळखली जाते. (अर्थात या खानदेशी बोलीचे अनेक सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद पडतात.) अहिराणी- खानदेशी ही बोली आजही जळगांव, धुळे, नंदूरबार जिह्यत आणि औरंगाबाद व नासिक जिह्यंच्या काही तालुक्यांतून बोलली जाते. मेळघाटातील अमरावती, परतवाडा, चांदूर बाजार परिसरातील सुमारे पन्नास गावांतील गवळी लोक हीच बोली जतन करून आहेत. मात्र त्यांना अहिराणी बोली व खानदेश हा प्रदेश माहीत नाही. त्यांच्या परंपरा, रूढी, लोकसाहित्य हे अहिराणी बोलीतीलच आहे. मात्र ते तिला गवळी बोली म्हणून संबोधतात. आजवर अहिराणी बोलीच्या संशोधकांनाही या बोलीविषयीची कोणतीही कल्पना नव्हती. या अहिराणी व गवळी बोलीतील साधम्र्य वा एकरूपता ग्रिअरसन आणि अलीकडे झालेल्या डॉ. गणेश देवी यांच्या भारतीय भाषा सर्वेक्षणामधूनही सुटलेली आहे. ( या विषयीचा विस्तारित लेख Institute of Knowledge Engineering च्या Critical Enquiry Vol.VI. Issue IV Oct.- Dec 2014 मध्ये प्रकाशित झालेला आहे.)

अहिराणीचा इतिहासच पाहावयाचा तर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांच्या साहित्यातसुद्धा अहिराणी बोलीचे असंख्य शब्द आढळतात. अहिर हे गोपाळ, गुराखी, गुरे राखणारे. अहिरांचा नंद, गोपाळ म्हणून रामायण महाभारतकालापासून उल्लेख आहेच. अहिरांच्या इतिहासाइतकाच अहिराणीचाही इतिहास हा जुना आहे. खानदेश हे नाव कान्ह देश, कान्हाचा देश, कृष्णाचा देश, किंवा महाभारतकालीन ऋषभदेश यावरून पडले आहे. अहिराणीचे लेखी पुरावेही काही शिलालेखातही मिळतात.

इतर बोलीप्रमाणेच अहिराणी ही आपली संस्कृती, गोडवा जतन करून आहे. खानदेशात कानबाई ह्य दैवताची पूजा केली जाते. ‘कानबाईच्या वह्य’ ही परंपरागत लोकगीते गाऊन कानबाईची पूजा केली जाते. कानबाई- रानबाईचा उत्सव खानदेशात साजरा केला जातो. अहिराणी बोलीतील या कानबाईच्या ओव्या इतरत्र कुठेही आढळत नाहीत. खानदेशात प्रत्येक उत्सवाची आणि प्रसंगाची लोकगीते ही स्वतंत्र आहेत. त्यातून खानदेशातील उत्सवांचा, खानदेशी संस्कृतीचा ठेवा मौखिक परंपरेने जतन केला आहे. लोकनाटय़, दंतकथा, – गोठ्डाय़ानी (खेडय़ातून गोष्ट सांगणारे) गोट (गोष्ट), विवाह गीते, मरणाच्या वेळेची रडण्याची पद्धती, मोटेवरची गाणी, कृषिक्रियेच्या वेळी गाणी, झोक्यावरची गाणी, जात्यावरची गाणी, म्हणी यातून खानदेशची संस्कृती अहिराणी बोलीने आपल्या भाषिक वैशिष्टय़ांसह जतन करून ठेवली आहे.

अहिराणी बोलीतून आता चर्चासत्रेही होऊ लागली आहेत. अहिराणीतून अलीकडे अहिराणी बोलीभाषेतून कविता, कथा, कादंबरी, नाटक हे साहित्य प्रकार हाताळले जाऊ लागले आहेत. अलीकडे फेसबुक व व्हाट्स अ‍ॅपमध्ये अहिराणी, खानदेशी, खानदेश, अहिराणी बोली, इ. अहिराणीचे असंख्य असे समुदाय आढळतात. अहिराणीतून चित्रपटनिर्मिती, कथाकथन व काव्य वाचन यामुळे अहिराणी बोलीविषयीचे चित्र पार पालटून गेले आहे. या सर्वामुळे अहिराणीचा गोडवा हा सर्वदूर पोचण्यास मदत होते आहे.

अहिराणी बोलीतील सौंदर्यस्थळे

खानदेशातील प्रत्येक सण-उत्सव हा वैशिष्टय़पूर्ण आहे. खानदेशातील आखाजी हा सण दीपावलीइतकाच महत्त्वाचा मानला जातो. आखाजी म्हणजे अक्षय्य तृतीया. हा सण संपूर्ण स्वातंत्र्याचा आविष्कार असणारा सण. या सणाला मुली आपल्या माहेरी जातात. प्रत्येक मजुराला सुटी असते. या दिवशी तो मजूर कुणाच्याही बंधनात नसतो. सालदाराचे साल याच दिवशी ठरते. मालकांकडून सालदाराला गोडधोड जेवण मिळते. पुरुष या दिवशी जुगार खेळतात. महिला गावाजवळच्या आमराईत झिम्मा फुगडय़ा खेळतात, गाणी गातात, झोका खेळतात. गौराईच्या पाण्याला जाताना ‘मोगल’ सजवितात. आखाजीच्या दुसऱ्या दिवशी गौरी विसर्जनासाठी नदीवर जाऊन तेथे झिम्मा फुगडी्, गाणी, इ. आटोपल्यावर नदीच्या दोन्ही काठावरील दोन गावांच्या स्त्रिया परस्परांना शिव्या देत, परस्परांवर दगड फेकून घराकडे परततात. थोडक्यात ही आखाजी पूर्ण स्वातंत्र्याची, आखाजी शेतमजुरांची, आखाजी जुगार खेळणारांची, आखाजी स्त्रीमुक्तीची, आखाजी गौराईची, आखाजी पितरांची, आखाजी बलुतेदारांची, अशी ही आखाजी असते तिची तयारी एकेक महिना आधीपासून केली जाते. अक्षय्य तृतीयेला गायल्या जाणाऱ्या गीतांमध्ये रामायण, महाभारत, पौराणिक वा इतर उपदेशपर कथा गुंफलेल्या असतात.

खानदेशात बोलली जाणारी अहिराणी बोली हे खरोखरीच गोडवा असलेले मधाचे पोळे आहे. हे प्रत्येक पोळे गोड अशा मधाने काठोकाठ असे भरलेले आहे. यात खानदेशातील सणउत्सवातील, जात्यावरील, विवाह प्रसंगातील, मोटेवरील अशा विविध प्रसंगांतील गीतांचा आणि म्हणी, उखाणे, आहाणे या सर्वाचा विचार करावा लागेल.

मुलगी लग्न होऊन सासरी जाते. वडील मुलीला सासरी पोचवितात. लग्न जमविण्यापासून ते सासरी लेक नांदताना तिला दिल्या जाणाऱ्या नतिक पाठापासून ते तिचे सासू, सासरे यांचा स्वभाव, सासरवास यांचे वर्णन या लोकगीतांतून पाहू या.

लाडकीवं लेक,

तुन्हा लाड आसा कसा!

गगनना चंद्र

तूले धरी देवू कसा?

(या लाडक्या मुलीला तिच्या हट्टापायी आकाशीचा चंद्र तरी कसा पकडून द्यावा?)

 

लाडकीवं लेक,

नांव तुन्ह दुर्गा बाई,

चांद सारकी लेक,

सूर्या सारका जवाई.

(दुर्गा, लाडकी लेक ही चंद्राप्रमाणे तर जावई हा सूर्यासारखा आहे.)

 

आंगनमां झाडू,

झाडू आंगननं पटांगन,

लेकनं मांगनं,

सोयरा घाले लोटांगन.

(मुलगी गुणी, सुंदर असल्याने आणि हा नातेसंबंध योग्य असल्याने या लेकीला मागणीसाठी सोयरा मुलीच्या वडिलांकडे लोटांगण घालतो.)

लाडकी वं लेक,

लाडकोडना जवाई ,

आंदन म्हांगस,

आंबा खालेनी गव्हाई.

(लाडक्या लेकीच्या लग्नात, लाडका जावई आंबा, आंब्याची फळे, बहर लग्नातील भेट-आंदण म्हणून मागतो.)

 

लोकेस्नी दिध्यात लेकी,

दानास्न्या कंग्या देखी,

पिताजीनी दिध्यात लेकी,

या सोयराना वग देखी.

(इतरांनी मुली देताना धनदौलत, वैभव पाहून दिल्या मात्र पित्याने सोयऱ्याचा वर्ग -जात, कूळ, वर्ण पाहून दिल्यात.)

 

भाऊ करु याही,

माले भाऊ याही साजे,

पायमां पजन मन्ह तयघर वाजे.

(भावाला व्याही करण्याचा मानस, तोच योग्य आहे. खानदेशात बहिणीच्या मुलाला भाऊ आपली मुलगी देतो.)

 

पानीनी पाऊस

डोंगर कसाना कयस?

सिताना न्हानीवर

राम शिकार खेयस.

(तहान- भूक, ऊन-वारा- पाऊस, डोंगराचा चढउतार हे कसले काय कळते? राम शुद्ध हरपून सीतेच्या न्हानीजवळ शिकार खेळतो आहे.)

 

बारीक पिटनी भाकर

गई कचेरीले,

आस्तुरी पासीन तेज

चढस पुरुसले.

बारीक पिटना सिदा

गया गोसाईले,

आस्तुरी पासीन महिमा

चढस पुरुसले.

(पत्नीला अस्तुरीची उपमा दिली आहे. पुरुषाची महिमा, वा त्याचे वैभव हे त्याच्या या अस्तुरीसारख्या पत्नीमुळे त्याला प्राप्त होत असते. पत्नीला अस्तुरीप्रमाणे न म्हणता अस्तुरीच म्हटले आहे.)

 

भरतारनं सूक,

कोरा रांजननं पाणी,

कितलं उपसू पानी

माले वरजेना कोन्ही.

(भ्रताराचे सूख नव्या, कोऱ्या रांजणाच्या थंडगार पाण्यासारखे आहे. ते मी कितीही उपसून काढले -ते मी कितीही उपभोगले तरी मला कुणीही मनाई करीत नाही. वरजनं = वज्र्य करणे, मनाई करणे.)

 

सासू करे सासरवास,

नंदा करती झाक झुक,

नादान लेक मन्ही,

भरतारनं सूकं मोठं.

(सासू, नंदा कितीही सासूरवास करीत असल्या तरी माझ्या लेकीला भ्रताराचे- नवऱ्याचे सुख हे खूप मोठे आहे.)

 

सासू आत्याबाई

तुम्हना पदरले ओवा,

मी जास माहेराले,

मन्हा रामले जीव लावा.

(सासू ही आत्याच असते. वडिलांची बहीणच असते. आत्याबाई मी काही दिवस माहेरी चालले, माझ्या रामाला माझ्या माघारी जीव लावा, नीट सांभाळा, प्रेम द्या.)

 

नका म्हनू नार,

भरतार आला हाती!

इच्चू त्या डंख देती,

सांगता लह्यऱ्या येती.

(हे नारी तू – आपला नवरा मुठीत आला अशा भ्रमात राहू नकोस, नवरा हा िवचवासारखा असा डंख देतो की वेदनेने शुद्धच हरपते.)

 

दयन मी दवू जशी हारन पयस,

माय तुन्ह दूद मनगटी खेयस

(मी हरणाच्या वेगाने फिरणाऱ्या जात्यावर दळते , ह्या चपळतेचे कारण माझ्या मनगटात मातेचे दूध खेळते आहे.)

 

सासूना सासरवास,

काय आयकू बारीमास,

बाप कसा म्हणे,

जग दून्याना रहिवास.

(सासूचा सासरवास किती दिवस सहन करायचा? असे मुलीने म्हणताच वडील सल्ला देतात ‘‘ हा तर जग दुनियाचा क्रमच आहे. त्यात वेगळे असे काहीही नाही. तो निमूटपणे सहन करावा.)

 

सासू करी सासूरवास,

नंदा करती कुरापती,

चतुर भरतार,

ग्यानं सांगती राती.

(सासू सासरवास करते, नणंद ही कुरबुर करते. यातून मनशांती लाभावी, एकटेपणाची भावना येऊ नये म्हणून चतुर भ्रतार रात्रीचे वेळी ग्यान सांगतो, ज्ञान देतो, समजूत काढतो.)

 

देरान्या जेठन्या,

आपू एक ऱ्हावू,

रांझनीनं पानी आपू

चाऱ्हीझनी व्हाऊ.

(सर्व देवराण्या – सर्व भावांच्या बायका- एकमताने घरात वागू, कोणत्याही कामाचा भार हा एकीवर पडू न देता चारही मिळून वाटून घेऊ. – देरानी= लहान दिराची राणी, जेठानी = नवऱ्याहून मोठय़ा भावाची बायको.)

 

सासूनी सासरा,

देव्हरा म्हातला देवं,

तेस्ना जेवनमां

कसा करु दुजाभाव.

(सासू आणि सासरे हे देव्हाऱ्यातील देवांसमान आहेत, त्यांच्या जेवनात, आहारात मी कसा भेदभाव करु?)

 

या सासर, वडील, आई, नवरा, यांच्याशी संबंधित ओव्या पाहिल्या. अहिराणी बोलीतील काही ओव्या ह्य मुलीने कसे वागावे ह्यासंबंधी नीतीपाठही देणाऱ्या आहेत. नतिक पाठ देणाऱ्या काही लोकगीतांच्या ओव्या पाहू.

 

हासू नका नारी

तुन्हा हासाना परकार,

आसा उतरना

तुन्हा चतुर भरतार.

(परपुरुषासमोर बायकोने हसू नये. तू हसल्याने तुझा चतुर भ्रताराचा चेहरा लगेच पडला.)

 

बाप कसा म्हणे पोरी,

मरजीले ऱ्हायजो,

पाटपोट झाकी पानी

गिरनांनं व्हायजो.

(बापाने लेकीला सासरी कसे वागावे हा सल्ला दिला आहे. सर्वाची मर्जी सांभाळ, आणि गिरणेचे पाणी वाहून आणतांना पाठ, पोट पदराने व्यवस्थित झाकून रस्त्याने चालत जा.)

 

बोलूनी चालूनी

आगय घालवा मनले,

कोम्हायेल तोंड

दिसू दिवू नई जनले.

(एकलकोंडे न राहता आपल्या आप्तेष्टांशी, मित्रांशी बोलून चालून मनाला आगळ घलावी, मनाला विरंगुळा द्यावा. आपल्या चेहऱ्यावरील दु:ख – आपले कोमेजलेले तोंड- जगाला दिसू देऊ नये.)

 

पाची पकवाननं जेवन,

उल्टं झायं हूई माखीनं

तानीया बाय मन्हा,

वलससंद सोडी दे दासींनं.

(जेवण तर पंचपक्वान्नाचे होते, मग उल्टी- ओकारी – का झाली ? कदाचित आहारात माशी पडल्यानेही झाली असेल. पण लाडक्या मुली तू दासीची संगत सोडून दे. मुलीच्या चारित्र्याविषयी संशयही अशा मोजक्या शब्दांतून मांडला आहे.)

 

 

गरवाना जाब

नको देवू तू गांध्यारी,

थोडा दिननं चांदनं,

बहू दिननी आंध्यारी.

(हे स्त्रिये तू गर्वाने उत्तर देऊ नकोस. गर्व हा जास्तीचा काळ टिकत नसतो. चांदण्या रात्रींचा काळ हा अंधाऱ्या रात्रींच्या काळाहून फार कमी असतो. म्हणून तुझी ही गर्वाने वागण्यासारखी परिस्थिती ही क्षणिकच राहणारी आहे.)

 

गरवं गुमानं

आसू दिवू नई जीवले,

गीऱ्हानं लागसं,

चंदरं सारका देवले.

(कुणीही गर्वाने वागू नये, चद्रांलाही एक दिवस ग्रहण लागतेच ना?)

 

धनं संपत्तीनी वाट,

मन्हंशे बोबडी बोलनी,

दुफारनी छाया

एक घडीमां कलनी.

(श्रीमंतीच्या तोऱ्यात ती बोलताना चेष्टेखोरपणे, बोबडेपणे बोलली. पण ही श्रीमंती दुपारच्या सावलीसारखी आहे. ती क्षणात पुढे सरकते, कलते.)

 

नको म्हणू नार,

मन्हंशे आसं कोन्हं नई,

लंकाना रावनं,

त्यान्हबी निभनं नई.

(हे नारी, माझे वैभव आहे असे कुणाचेही नाही असा तोरा तू बाळगू नकोस, सोन्याची लंका असणारा रावण, त्याचाही निभाव लागलेला नाही. तर तुझे काय?)

 

नका म्हनू नारं,

मन्हशे आसं कोन्हं नई,

चौदा चौकडानी लंका,

एक रातमां बई गयी.

(गर्वाचे घर खाली असते. रावणाची सोन्याची लंकाही एका रात्रीत जळून नष्ट झाली.)

स्त्रीचे आपल्या कुटुंबावरील, नवऱ्यावरील प्रेम काही लोकगीतांच्या ओव्यांमधून प्रतििबबित होते.-

देशी देवराया

धनं संपत्ती थाडी, थाडी,

कडय़ावर बाय अन

भायेर नंदिस्नी जोडी.

(देवा देशील तर दे थोडे वैभव – कडेवर बाळ खेळू दे आणि बाहेर दाराशी एक बलांची जोडी असू दे.)

 

देशीतं देवराया,

तू देशी तं नको देवू,

कपायना कुकू,

याले हात नको लावू.

(देवा तुला वैभव द्यावयाचे तर दे, नाहीतर नको देवूस. मात्र माझ्या कपाळाच्या कुंकवाला हात नको लावूस)

 

बाहेरख्याली पुरुषलाही आणि स्त्रीलाही पुढील ओव्यांनी नीतीपाठ देण्याचा प्रयत्न दिसतो.

 

घरनी आस्तुरी

जशी पुरननी पोयी,

पराई नारसाट

खिसामांनं चूई.

(घरात पुरणाच्या पोळीसारखी गोरी, मऊ अशी अस्तुरी – बायको -असताना, हा बाहेरख्याली पुरुष परस्त्रीसाठी खिशात गुपचूप अशी चोळी, कंचुकी नेतो.)

 

मायीना मयात लाल

दांडीना शेवरा,

चलवादी नारले

हात जोडसं नवरा.

(नवराच केवळ त्रास देणारा असतो असे नाही. तर बायकोही त्रास देणारी असू शकते. अशा बायकांना नवरे हात जोडतात.)

 

खानदेशातील विवाह पद्धतीमध्ये अनेक उपविधी पार पाडले जातात. त्यात वधू संशोधन, साखरपुडा, नारय गोटा, सेलामुंदी, कुकू, बस्ता फाडनं, रासीपूजन, हायद फाडनं, देवदेवतं, मांडो टाकनं, आष्टवर जेवन, बेमाथनी पूजनं, हायद लागनं, काकन बांधनं, फुनकं मिरावनं, तेलन पाडनं, वडले वरननं, सुक्या सेवंती, टाई, झ्ॉल उडावनं, गृहप्रवेश, सोबा गायनं, बिद मिरावनं, मांडोकरन किंवा आहेर बजाडनं, हायद फेडनं, दाहींडा पाडनं, काकन सोडनं, सोपारी जिकनं, मानपान, दातनचिरी, थंडा करनं, पहिलं मूय, दूसरं मूयं, इ. विवाहपूर्व विधी, विवाह विधी आणि विवाहोत्तर विधी पार पाडले जातात. या सर्व विवाह विधी मध्ये विवाहगीते गायली जातात.

खानदेशात आढळणारी विवाह गीते ही खानदेशभर आढळतात. मात्र अशा प्रकारची विवाह गीते इतरत्र आढळत नाहीत. या विवाह गीतातून खानदेशांच्या इतिहासावर, संस्कृतीवर आणि अहिराणी बोलीच्या शब्दसंग्रहांवर प्रकाश टाकता येतो. काही विवाह गीते अशी.

 

गंगा जमना दोन्ही खेते,

तठे काय देव पह्यंना रोपे,

तठे काय सिता माई काते,

तठे काय परभू उखले ताना,

(इस्नू किस्नू कांडय़ा भरे,

राई रुक्मीनी पोयते करे.)

तठलं पोयतं … ले आनं,

…ना बाप घाडे उना,

बािशग मोती झडे उना,.

मातीपये रतं उना,

(राजा गया रतं उना)

 

(गंगा आणि जमुना या दोन नदींच्या काठावर देवपऱ्हाटीची रोपे, त्या रोपांचा कापूस काढून सिता सूत कातते आणि विष्णू व कृष्ण सुताच्या कांडय़ा भरतात. त्या सुताचे पोयते नवरदेवासाठी बनविले जाते.)

 

चुल्हा म्हणे मी चुल्हा देवं,

लाया चंदनन्या खापोटय़ा,

आन शिजे सव्वा खंडी,

या आननी कीर्ती मोठी,

लोकं जेवती लखापती.

 

खाम म्हणू मी खाम देवं

आठे घुसयेवं कोनं,

आठे घुसयेवं राधा,

इन्हा रही खाले डेरा,

इन्हा तांबीयाना लोटा,

इन्ही धरमजं वाटा.

(विवाहप्रसंगी, चूल, खांब, उकिरडा, उंमरट यांचीही पूजा केली जाते. त्या कृतीला पोखनं असे म्हणतात. पोखनं म्हणजे विशिष्ट कृती करून पांखण्याची गाणी गाणे. या गाण्यात विवाह प्रसंगी चूल देवाला पूजले जाते आहे, त्याच्यावर अन्न शिजविले जाते आहे. चंदनाची लाकडे जाळली जात आहेत. त्यामुळे मंगलप्रसंगी सुगंध पसरून आल्हाददायक वातावरण बनले आहे).

दाऱ्हुन म्हने मी दाऱ्हुन देव,

आठे वापरे वं कोनं,

आठे वापरे वं…

(तर दुसऱ्या गीतात खांबाला पुजले आहे. त्या खांबांला गृहिणीने आजवर डेराभर दूध दूभते घुसळले आहे, तूप लोणी तयार केले आहे.)

खांदी टाकल्या कुऱ्हाडी,

गेले डोंगर परवडी,

साग तोडीला निवाडी,

साग गाडय़ात घतीला,

सागं नाडय़ानं गुंफिला,

सागं शेल्यानं झाकीला,

 

टाका सुतारादारी,

सुतार चौकट घडीला,

दाऱ्हून जिनगर मढीला,

लाया तुयबंदी पाटीया,

लाया नवबंदी साकया,

— —

उखल्डा म्हणे मी उखल्डा देवं,

उखल्डें पुंजा कोन टाके,

उखल्डे पुंजा टाके,

 

इन्ही सोनानी डालकी,

इन्ही मोतयानी चेंभय,

इन्हा सोनाना कऱ्हेंटा,

झाडी उनी गाय गोठा,

इन्ही उखल्डा कया मोठा,

 

आया पोकथीन, बाया पाकथीन

पोकथीन माम्या मावशा,

सिमदर सुक्तं, पान मुक्तं,

हायद कुकुले बलावज्या,

 

दिवा म्हणे मी दिवलाया,

दिवा निपजला कोठे,

गांव त्या अजिंठय़ाना पेठे,

या दिव्याचं मोलं काय?

सव्वा लाख टक्का भायं,

या दिव्याला घेतो कांनं,

घेतो नवरदेवाचा बापं

(या ठिकाणी पाच वेळा नवरदेवाचा बाप, पाच वेळा नवरदेवाचा चुलता हे शब्द वापरून गाणे गायले जाते.)

 

विवाहोत्तर विधीतील गाणी

 

कोन गाव पर्नाले

गथा रे मन्हा मानिकडा,

(गावाचे नाव) गाव पर्नाले

गथा रे मन्हा मानिकडा,

तुले कसानी

खुटना पडनी रे मन्हा मानिकडा,

तुल (जे मिळाले नाही त्या वस्तूचे नां) नी खुटना पडनी रे मप्हा मानिकडा,

तु ( येथे सासरा, सासू, साली इ.) ले गहान ठेवता रे मन्हा मानिकड,

ाोो

हाई काय काकन सुटेनारे लाडा,

या काकनले दोन दोन गाठा,

नौरीना बननी (शिवी वजा शब्द) नी बांध,

ाोो

नवरदेव नवरी झुंबड खेये,

नवरदेवना मांडीवर सोनानी िझगी,

नवरदेवना बाप गया वं िनगी,

ाोो

अशा प्रकारे अहिराणी बोली ही मधाची डोली आहे. या लोक गीतातून विविध अशा प्रतिमांचा, शब्दांचा, काव्य कल्पनांचा वापर करण्यात आला आहे. लोक गीतांप्रमाणे अहिराणी बोलीतील म्हणी, वाक्प्रचार, अहिणे, उखाणे ही अवीट असा गोडवा जतन करून आहेत. या म्हणी, वाक्प्रचारामधून खानदेशाच्या लोकसंस्कृतीचे, इतिहासाचे आणि रूढी, परंपरा यांचे आणि बोलीतील सौंदर्यस्थळांचे दर्शन घडते. नमुन्यादाखल काही म्हणी पाहू.

खानदेशात पुजल्या जाणाऱ्या देवदेवतांचा उल्लेख असणाऱ्या म्हणी-

आईबाई नाडनी, कानबाई घडनी.

गवराई सजनी, शंकरले पावनी.

म्हसोबाल न बायको

अन मुऱ्हईले न नवरा.

सांगा सेंदूर तं उखली आना मरोती.

(या म्हणीतून गौराई, कानबाई, शंकर, म्हसोबा मारोती इ. देवतांचा उल्लेख आहे. म्हणींच्या आधारे अहिर लोकांच्या सामाजिक जीवनाचा वा खानदेशातील देवदेवतांचा इतिहास मांडता येतो.)

 

खानदेशातील सन आणि उत्सवांचा उल्लेख असणाऱ्या म्हणी-

दिवाईले कुनबी शाना व्हस.

आसनं तं दिवाइन,

नसनं तं, हूई.

हुईनी बोम तीन रोज.

घरमान हूई अन भायेर दिवाई.

(खानदेशात दिवाळी, होळी साजरी होते हे या म्हणींतील उल्लेखावरून पडताळता येते. दीपावलीला हंगाम आल्यावर शेतकरी म्हणतो आपण या वर्षी याऐवजी हे पेरले असते तर आपला खूप फायदा झाला असता. पण हे शहानपण दिवाळीला येते. असे -)

 

इतिहास, पुराणे यांचा उल्लेखही या म्हणीतून आढळतो. जसे-

गाव जये, हानुमान बोंबी चोये.

घरमांन न दाना, म्हने बाजीराव म्हना.

पल्हे बाजीराव व्हवा, मंग मस्तानी ठेव्वा.

(हनुमान, बाजीराव, मस्तानी ही पात्रेही म्हणीतून उल्लेखलेली आहेत. मस्तानी ठेवायचीच तर आधी बाजीराव हो! असा सल्ला म्हणीतून दिला आहे.)

उना कुनबी दूना राबे, आधला ना जागे पायली लागे,

गाडा बरोबर नयानी जत्रा,

कुचकी वडांगवर कोनहीबी पायदेस.

जो करी बांद बंधनी तो खंडीना धनी.

अशा प्रकारे कृषिक्रियां, वस्त्र, कालगणना, ऋतूचक्र, पशूपक्षी, कीटक इ. यांचा उल्लेख असणाऱ्या म्हणी आढळतात.

अशा प्रकारे खानदेशात बोलली जाणारी अहिराणी बोली ही लोकसाहित्यांचा जिवंत असा झरा आहे. म्हणून म्हणावे लागते,

मन्हा खानदेस मझारं भाषा चालस अहिराणी,

काय इन्ही गोडी सांगू, जसं तूप गावराणी.

प्रा. डॉ. रमेश सूर्यवंशी – response.lokprabha@expressindia.com

(कृष्णधवल रेखाचित्रे – गोपाळ तायवाडे)