– राधिका पार्थ

हिंदी चित्रपटसृष्टीत चाहत्यांच्या यादीत अक्षय कुमार सर्वात वरच्या स्थानावर येतो. मात्र, याच चाहत्यांनी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वरून समाजमाध्यमांमधून नाराजी व्यक्त केलेली दिसून येत आहे. कारण, अक्षय कुमारच्या चित्रपटाचे पोस्टर पाहून चाहत्यांना असे वाटते की, हा चित्रपट सिनेमागृहामध्येच रिलीज व्हावा; परंतु हा चित्रपट ओटीटी प्लॅटफाॅर्म रिलीज होणार अशी चर्चा सुरू झाली अन् चाहत्यांनी समाजमाध्यमांमधून आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

चाहते म्हणताहेत की, ”अक्षय कुमारचे चित्रपट मोठ्या पडद्यावर धमाल करतात आणि सिनेमागृहामध्येच त्याचे चित्रपट पाहण्याचा आनंद निराळा असतो. निर्मात्याकडून लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलीज करण्याचा विचार होत असेल तर कृपा करून त्यांनी हा विचार करू नये. कारण, त्यामुळे या चित्रपटाला म्हणावा असा प्रतिसाद मिळणार नाही. परिणामी, चित्रपट फ्लाॅप ठरण्याची भीती आहे. निर्मात्यांनी थोडा धीर धरावा.”

खरे तर ईदनिमित्ताने लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र, सध्या करोनाची आणि टाळेबंदीची परिस्थिती पाहता चित्रपट रिलीज होण्याची चिन्हे दिसत नाही. या टाळेबंदीच्या काळात ओटीटी प्लॅटफाॅर्म वाढलेले महत्त्व आणि नवनव्या वेबसिरीजला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता निर्मात्यांकडून लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी रिलीज केला जाईल, असा विचार समाजमाध्यमांमधून पसरत असल्यामुळे अक्षय कुमारच्या चाहत्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.

लक्ष्मी बॉम्ब हा टाॅलीवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आणि अभिनेता राघवा लाॅरेन्स याच्या ‘कंचना’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये एक तृतीयपंथी भूताची कथा आहे. एक वेगळाच थरार अक्षय कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील राघवाच करत आहे. अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी यामध्ये दिसणार आहे. यंदा अक्षय कुमारचे सहा चित्रपट रिलीज होणार होते. त्यामध्ये सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बच्चन पांडे, अतरंगी रे आणि बेलबाॅटम अशी या चित्रपटांची नावे आहेत.