विजया जांगळे
लोकप्रभा दिवाळी २०२०

स्थलांतराचा मागोवा घेतल्याशिवाय मानवाच्या वाटचालीची संगती लागणं अशक्यच! बाहेरच्यांना स्वीकारण्याच्या या प्रक्रियेत कमी-अधिक प्रमाणात संघर्ष निर्माण झालेला दिसतो. कधी अपरिहार्यतेमुळे तर कधी अधिक काहीतरी साध्य करण्यासाठी स्थलांतरं झाली. कारणं काहीही असली, तरी अनिश्चितता, असुरक्षितता दोन्ही बाजूंना बराच काळ भेडसावत राहिली. या साऱ्या मंथनात काहींना हलाहल पचवावं लागलं, तर काहींना अमृत गवसलं. आपलं गाव-घर-माणसं मागे सोडून आलेल्या या समुदायांनी आपापली संस्कृती मात्र सोबत नेली. स्थानिक संस्कृतीशी झालेल्या त्यांच्या मिलाफाच्या पाऊलखुणा आज आपण इतिहास म्हणून अभ्यासतो. या अभ्यासाचा पैस यापुढेही विस्तारतच जाईल. कारण, ही एक न संपणारी प्रक्रिया आहे..

‘नागालँडमध्ये १६ जमाती आहेत. प्रत्येकाची भाषा-संस्कृती वेगळी. माझे पूर्वज हेड हंटर्स होते. साधारण चार पिढय़ांपूर्वीपर्यंत आमच्याकडे हेड हंटिंग केलं जात होतं. ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी जमातींची व्यवस्था नव्हती. वेगवेगळी गावं होती आणि त्यांच्यात लढाया होत. अशा लढायांत शत्रुपक्षाच्या सैनिकांचा शिरच्छेद केला जात असे आणि त्यांचं शिर एखादा चषक मिरवावा त्याप्रमाणे गावात आणून घराच्या फाटकावर लटकवलं जात असे. ब्रिटिशांनी यावर बंदी घातली. पूर्वी आमच्या भागात कोणताही प्राणी खाणं निषिद्ध नव्हतं. जे मिळेल ते शिजवलं जात असे. आजही अन्यत्र खाल्ले न जाणारे अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक तिथे खाल्ले जातात. हॉर्नबिलची मोठय़ा प्रमाणावर शिकार केली जाते. खाण्यासाठी आणि मुख्य म्हणजे पिसांसाठी. एवढय़ा सुंदर पक्ष्याला मारणं खरं तर खूप क्रूर वाटतं; पण तिथली गरिबी त्याहूनही क्रूर आहे. पैशांसाठी त्यांना ते करणं भाग पडतं..’‘मी मूळचा मणिपूरच्या उखरूल जिल्ह्य़ातला तांगखुल नागा. आमचा जिल्हा देशाच्या अगदी दूरच्या टोकाला- म्यानमार सीमेवर आहे. माझे आई-बाबा शेती करायचे. १९७३च्या सुमारास ओझा (गुरुजी) शंकर काणे महाराष्ट्रातून आमच्या गावात आले. ते आम्हाला मल्लखांब, सूर्यनमस्कार शिकवायचे, मोफत अभ्यास घ्यायचे. त्यामुळे पालकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आदराची भावना निर्माण होऊ लागली. मी साधारण नऊ वर्षांचा होतो, तेव्हा ओझा मला मैसूरमध्ये घेऊन आले. दहावीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. अकरावी- बारावी धारवाडमध्ये पूर्ण केल्यावर मी महाराष्ट्रात आलो. कायमचा स्थायिक झालो. माझ्या राज्यातली राजा मिरची मी आता पुण्यातल्या माझ्या घरी कुंडीत लावली आहे..’

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)