‘दिल दोस्ती दुनियादारी’नंतर प्रचंड लोकप्रिय झालेले सुजय, रेशमा, कैवल्य, अ‍ॅना परत कुठल्यातरी नाटकात एकत्र येतायत ही त्यांच्या चाहत्यांसाठी असलेली मेजवानी. तिची उत्सुकता त्यांनी #amarphotostudio नावाने सोशल नेटवर्किंग साइट्सवर ताणून ठेवली होती. आता ती नाटय़गृहात अवतरली आहे.

नाटक सुरू झालं तेच एका अविवाहित, लग्न करावं का नाही करावं या गुंत्यात अडकलेल्या जोडप्याच्या  (सुव्रत जोशी आणि सखी गोखले) भांडणाने. पडदा उघडल्या उघडल्या पहिल्याच वाक्याला जी काय ‘एनर्जी’ लागली होती तीच प्रेक्षागृह हसण्याच्या, टाळ्यांच्या आवाजाने दणाणून सोडत होती. दुसऱ्या ब्लॅकआउटनंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ नावाचा एक स्टुडिओ आकार घेऊ लागला आणि नाटकातलं थ्रिल इथपासून सुरू झालं.

फोटो स्टुडिओचा सर्वेसर्वा अमेय वाघ. त्याच्याही अभिनयाच्या अनेक छटा या नाटकात पाहायला मिळतात. तो एक वयोवृद्ध म्हणून ‘कुठल्याही नात्याच्या मध्ये काळ आणि भीती नावाच्या िभती असतात आणि त्या सतत नात्यात अडथळा बनत असतात. आपण सतत भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करत जगत असतो’ या मथितार्थाचं मोठं भाषण त्या दोघांना देतो. गंमत म्हणजे ते एवढं तत्त्वज्ञान क्षणभरही कंटाळवाणं वाटत नाही. उलट हवंहवंसं वाटतं. अपू आणि तनू दोघंही त्या स्टुडिओत फोटो काढतात आणि तिथून नाटकाचं गूढपर्व सुरू होतं.

अर्थात, नाटकाच्या शेवटी या गूढतेची उकल होते; पण तोपर्यंत पुढे काय होईल पुढे काय होईल याची हुरहुर प्रत्येकाच्या मनाला लागून राहते. नाटकात बरेच प्रयोग एकत्र केलेले होते. डबल रोल स्टेजवर दाखवण्याचा प्रयत्न, बरेच ‘काळ’ एकत्र आणण्याचा प्रयत्न, नाटकाचा फॉर्म बदलण्याचा प्रयत्न. तरुणाईच्या ‘एनर्जी’ने ओतप्रोत भरलेलं हे नाटक बघताना एक क्षणभरही आपल्या घडाळ्याला आपलं लक्ष जात नाही. नाटकाला प्रत्येक कलाकार आपली एक छटा प्रेक्षकांच्या मनावर िबबवतो.

पूजा ठोंबरे हिचीसुद्धा भूमिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’पेक्षा पुष्कळ वेगळी आहे आणि ती तिने उत्तम रीतीने हाताळलेली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधली पंजाबी ड्रेसमधली, मंगळसूत्र, टिकली, जेवणामध्ये रमलेली रेशमा नाटकात मात्र एक बोल्ड, सडेतोड, स्वत:चे निर्णय स्वत: घेणाऱ्या एका प्रेयसीची भूमिका करते आहे. अमेय वाघ एकाच वेळी बऱ्याच भूमिका करताना दिसतो; पण करत असलेल्या प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण त्याने चलाखीने सांभाळलं आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आलेला नवा चेहरा सिद्धेश पूरकरसुद्धा आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांना आपलंसं करून घेतो. त्याने साकारलेला एक प्रसंग प्रकाशयोजना आणि त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अक्षरश: अंगावर येतो आणि प्रेक्षकांच्या भरघोस टाळ्या मिळवून जातो.

नाटकाच्या दिग्दर्शनाचं वेगळेपण नाटक पाहिल्यावर जाणवतं. निपुण धर्माधिकारीसारखा एक जाणकार आणि अतिशय शांत दिग्दर्शकच हे करू शकतो हे नाटक पाहिल्यावरच कळतं. लेखिका मनस्विनी हिच्या लेखणीतून उतरलेल्या या लेखनप्रकाराला दाद द्यावी तितकी थोडीच आहे. नाटकाचं नेपथ्य अगदी साधं आहे, पण अतिशय कौशल्याने हाताळलेलं आहे. बरेच काळ एकाच वेळेला स्टेजवर आणण्याची जोखीम प्रदीप मुळ्ये यांनी समर्थपणे पेलली आहे. त्याला प्रकाशझोतात आणणारे प्रकाशयोजनाकार (शीतल तळपदे) पात्रांना जिवंत करणारे वेशभूषाकार (कल्याणी कुलकर्णी-गुगळे), रंगभूषाकार (संतोष गिलबिले), नेपथ्यकार, संगीतकार (गंधार) या सगळ्यांचा एकत्रित संगम म्हणजे हे नाटक आहे. नाटकाचं संगीत प्रत्येक प्रेक्षकाला बसल्या जागी नाचायला लावतं, नाटय़गृहातून बाहेर पडल्यावरही गुणगुणायला लावतं. पात्रांची वेशभूषा अगदी साधी पण सूचक आहे. प्रत्येक काळात प्रेक्षकांना घेऊन जाण्यात वेशभूषेचाही तितकाच हातभार आहे. सुव्रत जोशीच्या डबल रोलच्या वेळी त्याच्यासाठी डिझाइन केलेली वेशभूषा वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या एका वेशभूषेत दोन काळ आणि दोन वेगळे रोल एकाच वेळी एकत्र आणण्याचा आगळावेगळा प्रयत्न कल्याणीने केला आहे.

आठवणीचा हा स्टुडिओ प्रत्येकाला आपापल्या आठवणीत घेऊन जातो आणि पुन्हा आपापल्या काळात नेऊन सोडतो. आपण आपल्याच भूतकाळात आणि भविष्यात इतके गुरफटून गेलोय की वर्तमान जगायचेच विसरत चाललोय. आपल्याला लाभलेलं नातं जगायचं सोडून त्या नात्यातल्या त्रुटी शोधात बसलोय आणि ‘बहुतेक तुझ्या बाबांकडून किंवा आईकडूनच आलं असणार हे सगळं’ असं म्हणत एकमेकांच्या भूतकाळात समोरच्याच्या वागण्याची पाळंमुळं शोधतो आहोत. आठवणी या साठवून ठेवाव्यात त्या त्याच्या अलगद स्पर्शासाठी, दुसऱ्याला टोमणे मारता यावेत यासाठी नाही. आपल्या सगळ्या आठवणी जपून ठेवतो हा अमर फोटो स्टुडिओ आणि वर्तमानकाळात आपल्याला जगायला शिकवतो. हसतखेळत जगायचं असेल तर अमर फोटो स्टुडिओला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com