पर्यटन विकासाचं प्रारूप राबवताना आपल्याकडे जो उत्साह असतो, तेवढा उत्साह त्यामुळे होणारे दुष्परिणाम नियंत्रित करताना नसतो. आंबोली परिसरात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्याकडे म्हणूनच धोक्याची घंटा म्हणून पाहावे लागेल.

एखाद्या पर्यटनस्थळाची अथवा धार्मिक क्षेत्राची कशी वाट लावावी याची कला(?) भारतीयांना उपजतच असते की काय असं हल्ली बहुतांश पर्यटनस्थळी भटकताना पदोपदी जाणवते. ना यंत्रणांचा धाक असतो ना नागरी भान असते. कचरा हा कचराकुंडीतच टाकावा इतकीदेखील साधी शिस्त अंगी बाणवली तरी प्लास्टिक प्रदूषण निम्म्याने नियंत्रणात राहू शकते; पण मुळातच आपण ही शिस्त अंगी बाणवली नाही आणि ती बाणवावी अशी रचना आपल्या यंत्रणेने तयार केली नाही. आपल्याकडच्या यंत्रणा केवळ जनजागृतीचे फलक लावण्यावरच समाधान मानतात.  आंबोली हे गिरिस्थान पर्यनटस्थळ आणि नजीकचे हिरण्यकेशी व चौकुळ यांची सद्य:स्थिती याचेच द्योतक आहे.

आंबोली हे कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या सीमेवरचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील नयनरम्य पर्यटनस्थळ. राधानगरी अभयारण्य आणि कर्नाटक-महाराष्ट्र-गोवा सीमेवरील तिलारी अभयारण्याच्यामध्ये आंबोलीचे भौगोलिक स्थान आहे. आंबोली जरी प्रतिबंधित अभयारण्य क्षेत्र नसले तरी गर्द जंगलांने वेढलेले आहे. कोल्हापुरातून कोकणात उतरणाऱ्या घाटांपैकी गोव्याकडे जाण्यासाठी सर्वाधिक वापरात असलेला रस्ता आंबोलीतून जात असल्यामुळे येथे सहजगत्या पोहोचता येते. आंबोलीच्या जवळच चार-पाच किलोमीटरवर असलेले हिरण्यकेशी हे तीर्थक्षेत्रदेखील विकसित होऊ लागले आहे. डोंगरकपारीत वसलेले हिरण्यकेशी नदीचे हे उगमस्थान. थेट डांबरी सडकेने जोडलेले. मात्र अर्निबध पर्यटनाने गेल्या काही वर्षांत येथे प्लास्टिकचा कर्करोग पसरायला सुरुवात झाली आहे. ते पाहता भविष्यात हिरण्यकेशीची अवस्था तर बिकट होणारच आहे, पण आंबोलीच्या परिसरातील जंगलातदेखील बेसुमार प्लास्टिक वाढले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

12-lp-nature

इथल्या प्लास्टिक प्रदूषणाची चुणूक आजरा-आंबोली रस्त्यावरच दिसू लागते. आजरा ते आंबोली हे अंतर साधारण ३० किलोमीटरचे आहे. संपूर्ण रस्ताच जंगलाने वेढलेला. जसजसे आपण आंबोलीच्या जवळ पोहोचू लागतो तसे जंगलाची घनता वाढू लागते आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिकचे साम्राज्यदेखील. शीतपेयांच्या बाटल्या, बीअरचे कॅन, पाण्याच्या बाटल्या यांचा अगदी बेसुमार सडा रस्त्याकडेला झाडीत अडकून पडलेला पावलोपावली दिसू लागतो. सर्रासपणे गाडीतून फेकलेल्या या वस्तू बराच काळ तशाच पडून राहतात. अगदी गाडी जाऊन पार चेपलेला बीअरचा कॅनदेखील त्याच झाडीत अडकलेला हमखास सापडतो. एखादी मोकळी जागा असेल तर तेथे हमखास दारूच्या बाटल्यांचे तुकडे दिसणारच. मग जोडीला प्लास्टिकचे ग्लास, थर्माकोलच्या थाळ्या हे आलेच. मोकळी जागा दिसली की दारूचा अड्डा जमवणारे पर्यटक हे चित्र आपल्याकडे गेल्या काही वर्षांत हमखास दिसते. परवाना असणाऱ्या ठिकाणीच मद्यपान करता येते; पण पावसाळी पर्यटनात मूळ पर्यटन स्थळापासून काहीसे दूरवर असे अड्डे जमवणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही. आंबोलीच्या वाटेवर हे चित्र हमखास दिसते. महत्त्वाचे म्हणजे या परिसराच्या स्वच्छतेसाठी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे येथे पडलेले प्लास्टिक व तत्सम कचरा वाऱ्याने जंगलात उडून जातो तर काही झाडीझुडपात अडकून पडतो. आंबोली एसटी स्थानकाच्या भोवती स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या फलकांची रेलचेल आहे; पण एसटी स्टॅण्डच्या बाजूलाच अगदी उघडय़ावर प्लास्टिकचे ढीग पडलेले दिसतात.

हिरण्यकेशी हे तसे अगदी आटोपशीर देवालय. देवस्थानाचे अवडंबर येथे दिसत नाही; पण येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये मात्र कसलीही जाणीव नसल्याचे मात्र सतत दिसत राहते. रस्ता संपतो तेथे हिरण्यकेशीच्या प्रवाहावर एक छोटासा पूल बांधला आहे. येथे प्रवाहाची रुंदी जेमतेम पंधरा-वीस फूट आहे. तेथेच तुमचे स्वागत खंडीभर पसरलेल्या प्लास्टिकच्या चहाच्या ग्लासांनी होते. पुढे मंदिरापर्यंत साधारण एक १००-१५० फरसबंदी आहे. मात्र या फरसबंदीच्या दुतर्फा असणाऱ्या चरांमध्ये प्लास्टिकचा खचच पडलेला दिसतो, तर मंदिराच्या अलीकडे एक पायवाट धनगरवाडय़ाकडे जाते. या वाटेवरील झुडपांमध्ये हीच स्थिती दिसून येते. अत्यंत केविलवाण्या अवस्थेतील तुटलेल्या फलकावर काही सूचना खरडल्या आहेत; पण त्या वाचतादेखील येणार नाहीत अशा अवस्थेत आहेत. इतकेच काय, पण येथे नावालादेखील एखादी तुटकी मोडकी का होईना कचराकुंडी नाही.

हिरण्यकेशी मंदिराचा परिसर तुलनेने स्वच्छ आहे; पण गोमुखातून पडणारे पाणी कुंडातून जेथे डोंगरातून प्रवाहित होते अगदी त्या मुखावरच आणखीन एक आक्रीत दिसून येते. ते म्हणजे अस्थिविसर्जनासाठी येथे असलेली सोय. हिरण्यकेशी येथे अस्थिविसर्जनाबद्दल लोकांमध्ये एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. परिणामी येथे अगदी सर्रासपणे अस्थिविसर्जन होत असते. नदीच्या उगमातच प्रदूषण करण्याची ही वृत्ती अत्यंत धोकादायक अशीच म्हणावी लागेल. सध्या तरी येथील गर्दी तुलनेने मर्यादित आहे; पण येथे झालेला रस्ता आणि आंबोलीतील पर्यटकांची वाढती गर्दी पाहता भविष्यात भीमाशंकरसारखी परिस्थिती येथे उद्भवली नाही तर नवलच म्हणावे लागेल.

आंबोलीपासून सहा सात किलोमीटरवरील चौकुळ हे एकदम टिपिकल असे घाटमाथ्यावरील गाव. आठ-दहा वाडय़ांमध्ये विखुरलेले. आंबोलीच्या पर्यटन विकासात चौकुळलादेखील जोडण्यात आले आहे. गावकऱ्यांना होम स्टेसाठी प्रोत्साहन देऊन तशा सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. काहीसं पठारावर असल्यामुळे चौकुळ हे अत्यंत रमणीय असे ठिकाण आहे. आंबोलीतील पर्यटनामध्ये एक पाहायचे ठिकाण म्हणून येथे बरीच गर्दी होत असते. त्या गर्दीबरोबरच येथेदेखील रस्त्याच्या कडेने प्लास्टिकचे अस्तित्व हळूहळू जोर पकडू लागले आहे. चौकुळ गावाच्या जवळून एक नदी वाहते; पण हा प्रवाह गावातून येताना प्लास्टिकचे जंजाळ घेऊन येतो. चौकुळ हे अगदीच छोटे गाव आहे. आंबोलीसारखी हॉटेलांची गर्दी येथे नाही. त्यामुळे तसा महसूल मर्यादितच. अशा गावांमध्ये जेव्हा पर्यटनाचा जोर वाढतो तेव्हा त्यासाठीच्या इतर यंत्रणा निर्माण करण्याची ताकद या गावांमध्ये नसते. चौकुळातदेखील आज वाटेवर एकही कचरापेटी दिसत नाही.

एखादं निसर्गरम्य ठिकाण जेव्हा पर्यटन म्हणून विकसित होऊ लागते तेव्हा त्याबरोबर अनेक यंत्रणादेखील निर्माण होणे गरजेचे असते; पण आपल्याकडे अशी सम्यक विकास करण्याची वृत्तीच नाही. गावाला रोजगाराचे एक अधिक साधन उपलब्ध झाले याचेच डिंडिम इतक्या जोरात वाजवले जातात की, अशा वेळी तुम्ही जर इतर नियंत्रण यंत्रणांबद्दल प्रश्न उपस्थित केलेच तर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते आणि पुढे पुढे पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलाच्या ओघात हे प्रश्न वाहून जातात; पण आंबोली आणि परिसरातील प्लास्टिक हे असे वाहून जाणार नाही, तर ते तेथेच अडकून राहणार. नवीन बीजांकुरासाठी ते धोकादायक आणि पर्यावरणाला थेट घातक असणार आहे.

11-lp-natureवन्यजीवांना धोका

आंबोलीच्या पर्यटनामध्ये जसे चिलआऊट होण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण बरेच आहे, तसेच येथे वन्यजीव सहली येण्याचे प्रमाणदेखील प्रचंड आहे. आंबोलीच्या जंगलात मुख्यत: सरीसृपवर्गीय जीवांचे अधिवास आहेत. असे सरपटणारे प्राणी, कीटक दगडांखाली दडलेले असतात. वन्यजीवप्रेमींमध्ये सध्या वाढलेल्या छायाचित्रणाच्या चढाओढीमुळे आज आंबोली परिसरात असंख्य दगड उचकटलेले दिसतात. या वर्षी काही प्रमाणात त्यावर बंधने येतील असे नियम स्थानिकांच्या मदतीने वन खात्याने तयार केले आहेत; पण अर्निबध पर्यटकांबरोबरच या तथाकथित वन्यजीवप्रेमींच्या सहलींमुळेदेखील या जंगलास धोका निर्माण झाला आहे. त्यातच वाढत्या वाहतुकींमुळे आंबोलीच्या रस्त्यांच्या कडेला मृत झालेले सापदेखील हमखास सापडतात, त्यांची नोंद तर कुठेच होत नाही.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com