-सुनिता कुलकर्णी

करोनाला घालवण्यासाठी दिवे लावून झाले, टाळ्या-थाळ्या वाजवून झाल्या, यज्ञ करून झाले. या सगळ्या उपायांनी तो हटत नाही हे बघितल्यावर जगभरातले संशोधक-शास्त्रज्ञ लस तयार करण्याच्या कामाला लागले. अजूनही त्यांच्या हाताला यश येत नाही हे बघितल्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार अर्जुन राम मेघवाल यांनी आता एक करोनाला हटवण्याचा जालीम उपाय सांगितला आहे, तो म्हणजे ‘भाभीजी पापड’.

‘देशाला आत्मनिर्भर करण्याचा भाग म्हणून एक पापड निर्माते ‘भाभीजी पापड’ हे कुरकुरीत पापड घेऊन आले आहेत. हे पापड खाणाऱ्याच्या शरीरात करोना विषाणूशी लढण्यासाठी प्रतिपिंडं तयार होतील. आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अभिनव उत्पादनाची निर्मिती केल्याबद्दल मी या पापडनिर्मात्यांचं अभिनंदन करतो’ असं भाषण देत या मंत्रिमहोदयांनी या ब्रॅण्डचं उद्घाटन करताच समाजमाध्यमांवर विनोदी मीम्सचा अक्षरश पूर आला.

-सकाळी मी गोमूत्र पितो, दुपारच्या जेवणार पतंजलीचं कोरोनॉइल घेतो, संध्याकाळी ‘गो करोना गो’ चा जप करतो आणि रात्रीच्या जेवणात भाभीजी पापड खातो, आता मला करोनाला पळवायला लसीची गरज नाही, चीनवाल्यांनो बघा, आमच्या भाभीजींच्या पापडाने आम्ही तुमचा व्हायरस पळवून लावू शकतो, असं म्हणत नेटिझन्सनी मंत्र्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

– एक मीम म्हणतं की पोलीस सांगतात की करोनापासून वाचायचं तर सॅनिटायझर वापरा, पण माझ्याकडे तर भाभीजी पापड आहे.

– एक मीम म्हणतं, भाभीजी पापडाचा उपाय समजल्यावर करोना विषाणू म्हणतो माझी यापेक्षा आणखी बदनामी काय होऊ शकते?

-तर जागतिक आरोग्य संघटना विचारते की पापड करोनाचा विषाणू पळवून लावणार असेल तर मी काय विनोद आहे का?

– एक मीम म्हणतं, कच्चा पापड पक्का पापड म्हणता म्हणता पापडच करोनावरची लस आहे हे समजलंच नाही.

अर्थात असा विनोद करणारे मेघवाल हे पहिलेच नेते नाहीत. यापूर्वी आसाममधल्या सुमन हरीप्रिया या भाजप खासदारांनी गोमूत्र शिंपडून करोनाला नष्ट करता येईल असा दावा केला होता तर स्वामी चक्रपाणी या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मांसाहार करणाऱ्यांना शिक्षा म्हणून करोनाचा विषाणू आला असल्याचं सांगून देवपूजा करणाऱ्यांना, गोरक्षा करणाऱ्यांना या विषाणूपासून धोका नसल्याचं प्रशस्तीपत्रक देऊन टाकलं होतं. रवीचंद्र गिट्टी या बंगलोरमधल्या काँग्रेस नेत्याने हाफ फ्राईड आमलेट आणि रम यांच्या सेवनामुळे करोना विषाणूशी यशस्वी मुकाबला करता येतो असा दावा केला होता.

खरं तर सध्याच्या परिस्थितीत सगळे लाफ्टर शो बंद असताना, स्टॅण्ड अप कॉमेडियन मुकाट घरात बसले असताना लोकांना हसवून त्यांच्या मनावरचा ताण कमी करायला मदत केल्याबद्दल या सगळ्या नेतेमंडळींचे आभारच मानले पाहिजेत.