‘मान्सून डायरी’च्या यावर्षीच्या लेखमालेमध्ये अंदमानच्या मान्सूनची दखल घेतली गेली. नितांतसुंदर, निसर्गरम्य अशी अंदमान- निकोबार बेटे सामान्य भारतीयांसाठी उत्तम पर्यटनस्थळ म्हणून परिचित असली तरी समाजशास्त्र, मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ती महत्त्वाची आहेत ती तिथे

हजारो वर्षे वास्तव्य करून असलेल्या आदिवासींसाठी. मानवी इतिहासाचा महत्त्वाचा दुवा असलेल्या या आदिवासींविषयी आपल्यांलाही माहीत

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…

असलेच पाहिजे.

भारताच्या आग्नेयेस बंगालच्या उपसागराच्या सीमावर्ती भागात चंद्रकोरीच्या आकारात उत्तरपूर्व ते दक्षिणपूर्व दिशांमध्ये अंदमान आणि निकोबार हा सुमारे ५२६ लहानमोठय़ा बेटांचा समूह असून या द्वीपसमूहातील केवळ २६ बेटांवर मानवी वस्ती आहे. या सर्व बेटांचे क्षेत्रफळ सुमारे आठ हजार २४९ चौ.किमी. असून लोकसंख्या तीन लाख ७९ हजार ९४४ (२०११ च्या जनगणनेनुसार) होती. या द्वीपसमूहाचे दोन प्रमुख जिल्ह्य़ांत अंदमान व निकोबार असे विभाजन केले आहे. अंदमानचे पुन्हा उत्तर, मध्य आणि दक्षिण असे पोटविभाग आहेत. दक्षिण अंदमानला ग्रेट अंदमान म्हणतात. निकोबार जिल्ह्य़ाचे कारनिकोबार, नानकौरी आणि ग्रेट निकोबार असे पोटविभाग आहेत.

या बेटांवरील ८५ टक्के जमीन जंगलाने व्यापलेली असून ब्रिटिशांच्या वसाहतीकरणापूर्वी काही हजार वर्षे अंदमान-निकोबार हा द्वीपसमूह प्रामुख्याने पारध व कंदमुळे गोळा करणाऱ्या नेग्रिटोवंशीय आदिम समाजाच्या वसाहतींचा प्रदेश होता. त्या वेळी त्या द्वीपसमूहात प्रामुख्याने आदिम समाजाची वस्ती होती. त्यांपैकी अंदमानी, ओंगी, जरावा आणि सेंटिनेली या चार नेग्रिटो वंशाच्या आदिम जमाती अद्यापि शिल्लक असून आफ्रिकेतील निग्रोंशी त्यांचे साधम्र्य आढळते. या जमातींपैकी आता फक्त १२ टक्के मूळ रहिवासी आढळतात; शिवाय निकोबारी व शाँपेन या दोन मंगोलॉइड वंशाच्या जमाती आहेत. या सहाही आदिम जमाती लहान एकाकी समूह करून राहतात. सुरुवातीस त्यांना अग्नी निर्माण करण्याची कलाही माहीत नव्हती. शिकार, मच्छीमारी आणि कंदमुळे, मध, फळे गोळा करणे हे त्यांचे प्रमुख उदरनिर्वाहाचे उद्योग असून धनुष्यबाण, भाले, बरची ही त्यांची हत्यारे होती. समुद्रातील अन्नावर विशेषत: भिन्न प्रकारची मच्छी, कालवे, समुद्री कासवे यांवर त्यांची गुजराण होत होती. मच्छीमारीसाठी ते होडीचा उलंडी मचवा (डोंगी नावा) वापरतात; त्या पूर्णत: लाकडाच्या व त्याला जोडलेल्या लांब फळीमुळे सुरक्षित असतात. ते गळ व जाळ्यांचा मासे पकडण्यासाठी सर्रास उपयोग करीत. शिवाय भाल्याने मोठे मासे मारीत. स्त्रिया उथळ समुद्रात जाळ्याने मासे पकडीत असत. जंगलातील रानडुक्कराचे मांस हेही त्यांचे आवडते खाद्य आहे. अंगामी, जरावा, सेंटिनेलीज या जमातींच्या परकीयांना ठार मारण्याच्या प्रवृत्तीमुळे या जमातींच्या सांस्कृतिक वा प्राकृतिक वैशिष्टय़ांकडे मानवशास्त्रज्ञांचे एकूण दुर्लक्ष झाले. इ.स. २००४ मधील भूकंप आणि त्सुनामी यांमुळे त्यांची लोकसंख्या घटली असून या द्वीपसमूहातील अनेक छोटय़ा जमाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. फेब्रुवारी २०१० मध्ये बो जमातीतील शेवटची व्यक्ती मरण पावली; तथापि काही आदिम जमाती अस्तित्वात आहेत.

अंदमानी जमातींच्या लोकसंख्यमध्ये सद्यस्थितीत घट होत आहे. ब्रिटिश वसाहतवाद्यांनी १८५७ नंतर या भागात प्रथम रीतसर वसाहत केली. तेव्हा त्यांची लोकसंख्या ७०० होती; वसाहतवाल्यांशी त्यांची मैत्री झाली, पण वसाहतवाल्यांशी संपर्क आल्यानंतर काही साथीचे रोग या जमातीत प्रविष्ट झाले. १८७१ मधील गोवर, उपदंश आणि इन्फ्लुएंझा यांच्या साथीत ती लक्षणीयरीत्या घटली. त्यानंतर त्यांनी लहानशा स्ट्रेट बेटावर स्थलांतर केले. सेंटिनेली ही अंदमान-निकोबार द्वीपकल्पातील एक अलग जमात आहे. ते पोर्टब्लेअरच्या पश्चिमेला ६४ किमीवर असलेल्या नॉर्थ सेंटिनेल बेटावर वस्ती करून राहतात. त्यावरून त्यांना हे नाव मिळाले आहे. त्यांचा अन्य लोकांशी अजिबात संपर्क नाही. ओंगी या बेटाचा उल्लेख चांकुटे असा करतात. त्यांची लोकसंख्या १०० (२०११) असून इतर नेग्रिटी वंशाच्या लोकांप्रमाणेच ते इतिहासपूर्व काळात येथे येऊन स्थायिक झाले असावेत. ते स्वत:ची सेंटिनेलिज बोलीभाषा बोलतात. या जमातीतले पुरुष एक वैशिष्टय़पूर्ण सालीचा कमरपट्टा वापरतात. ते कृष्णवर्णीय, मध्यम उंचीचे व नेग्रिटो वंशीय बांध्याचे आहेत. ही जंगलातील कंदमुळे गोळा करणारी शिकारी निमभटकी जमात असून ते रानडुक्कर, समुद्री कासव, मासे इत्यादींची शिकार धनुष्यबाण तसंच भाल्याने करतात. मच्छीमारीसाठी आणि समुदी्र कासव पकडण्यासाठी ते होडीचा उलंडी मचवा (डोंगी होडय़ा) वापर करतात. त्यांचे अन्न म्हणजे डुकराचे मांस, समुद्र कासवे, भिन्न प्रकारची मच्छी, फळे, कंदमुळे इत्यादी होय. त्यांचे जीवन व चरितार्थ मुख्यत्वे ओंगी आणि जरावा यांपेक्षा जास्त प्रमाणात समुद्रातून मिळणाऱ्या घटकांवर असून ते सामूहिक पद्धतीने जगतात. त्यांच्या झोपडय़ांमध्ये अग्नीसाठी विशेष जागा असते. ते टोळी करून शिकारीला जातात. पुरुष शिकार व मासेमारी करतात, तर स्त्रिया जंगलातून फळे, कंदमुळे, मध इत्यादी गोळा करतात. याशिवाय उथळ पाण्यात जाळी टाकून मच्छीमारीही करतात. दोघेही टोपल्या, चटया विणतात. बाण, भाले, धनुष्य वापरतात. झाडांच्या सालीपासून पट्टे तयार करतात. शिवाय शिंपल्यांच्या माळा, हेडबॅण्ड्ज वगैरे बनवितात. पांढऱ्या मातीने शरीर रंगवितात. त्यांचा १८५८ मध्ये ब्रिटिश वसाहतवाल्यांशी संघर्ष झाला. अखेर त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ब्रिटिशांनी या प्रदेशातून काढता पाय घेतला. परकीयांविषयी तिरस्कार असून त्यांना ते ठार मारत असत. स्थानिक प्रशासनाने तसंच काही मानवशास्त्रज्ञांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही बराच काळ त्यात यश आलेले नाही; मात्र १९९१ मध्ये अंदमान-निकोबार प्रशासन आणि अँथ्रॉपॉलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामार्फत त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यात यश मिळाले आहे. त्यांनी नॉर्थ सेंटिनेल बेटावर ४ जानेवारी आणि २२ फेब्रुवारी १९९१ अशी दोनदा संयुक्त मोहीम आखली होती. संशोधकांनी आपल्या लाइफ बोटीतून काही केळी व नारळ देऊ केले. तेव्हा त्यांच्यातील काही पुरुष संशोधकांच्या लाइफ बोटीत उतरले. नंतर त्यात मुले व स्त्रियाही आल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आणखी काही वस्तूही या जमातीतील लोकांनी घेतल्या, तसेच आणखी काही वस्तूंची मागणीही केली. एवढेच नव्हे तर काही महिलांनी आपल्याला काहीच मिळाले नाही, म्हणून खेदही व्यक्त केला. १९७४ पासून या जमातीसोबत मर्त्ैाी व्हामी यासाठी चाललेल्या प्रयत्नांना अखेर यश आले.

38-lp-andaman

जरावा हे दक्षिण व मध्य, अंदमान बेटांवर संरक्षित अशा ७६५ चौ.किमी. क्षेत्रात वास्तव्यास आहेत. त्यांची स्वतची बोली भाषा आहे. त्यांची वस्ती मुख्यत्वे दक्षिण व मध्य अंदमानच्या पश्चिम किनाऱ्यावर असून त्यांच्या ३०० लोकसंख्येने (२०११) ८०२ चौ.किमी. प्रदेश व्यापला आहे. या जमातीतील स्त्री-पुरुष दोघेही नग्न असतात. शरीर सजवण्यासाठी झाडांच्या सालीच्या माळा किंवा दागिने वापरतात. पुरुष एका वैशिष्टय़पूर्ण झाडाच्या सालीचे शरीरस्त्राण वापरतात. शारीरिकदृष्टय़ा हे बुटके, काळे व कुरळ्या केसांचे  असतात. ही शिकार व कंदमुळे गोळा करणारी भटकी जमात असून रानडुक्करांचे मांस, समुद्री कासवे, अंडी, मासे, कंदमुळे, मध आणि मॉलस्क प्राणी (मृदुकाय कालव) खातात. अलीकडे ते शिजवलेला भात, केळी, नारळ खाऊ लागले आहेत; पण दारू ते पीत नाहीत. वयात आलेल्या समवयस्क मुलामुलींचे विवाह होतात. त्यांच्यात एकपत्नित्व पद्धती रूढ असून कुटुंबात पतिपत्नी व त्यांची मुले असतात. शिकार, मच्छीमारी आणि जंगलातून मध गोळा करण्याचे काम पुरुष करतात. त्यासाठी फक्त धनुष्यबाण व भाला किंवा बर्ची वापरतात. स्त्रिया जाळ्याच्या साहाय्याने किरकोळ मासेमारी करतात आणि पुरुषांना कंदमुळे गोळा करण्यास मदत करतात. ते त्रिस्तरीय सालीचे आवरण छाती-पोटावर बांधतात. त्यात बाण, चाकू-सुऱ्या ठेवतात व प्रामुख्याने छातीच्या संरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारचे संरक्षण आवरण स्त्रिया वा अन्य नेग्रिटो जमात वापरत नाही. या जमातीच्या आर्थिक व्यवहारात स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असतो. त्या पुरुषांबरोबरच जवळजवळ समान हक्काने वावरत असतात. मृतांविषयीच्या वा धर्माविषयीच्या त्यांच्या कल्पना फारशा स्पष्ट नाहीत. या जमातीतले लोक मृत व्यक्तीची हाडे गोळा करून त्यांपैकी एखादे हाड गळ्यात वा कमरेला बांधतात. ते शरीरावर मातीच्या लेपनाच्या सहाय्याने आकृत्या काढतात. त्यांच्या लाकडी बादल्या, छातीवरील आवरणे, धनुष्य  सममिती आकृतिबंधांने चितारलेल्या असतात. स्त्री-पुरुष तांबडय़ा-पांढऱ्या मातीने शरीर रंगवितात व त्यांवर भौमितिक आकृत्याही काढतात. ही त्याची लोककला होय. जरावा टोपल्या व चटया विणतात आणि शिंपल्यांचे दागिने व लोखंडाची हत्यारे बनवितात. समुद्र, आकाश व जगातील चित्शक्तीवर त्यांचा विश्वास आहे.

जरावा अन्य लोकांच्या संपर्कापासून अद्यापि अलिप्त आहेत. त्यामुळे कोणी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष उद्भवतो. त्यांची स्वछंदी आदिम संस्कृती टिकावी व ही जमात नष्ट होऊ नये म्हणून शासन प्रयत्नशील आहे.

39-lp-andaman

ओंगी हीसुद्धा या बेटांवरील एक लक्षणीय जमात आहे. ओंगी या संज्ञेचा अर्थ माणूस असा असून हे  लोक नेग्रिटो वंशसमूहांतील आहेत. हे लोक लिटल अंदमान बेटावरील दुगाँग क्रीक आणि साऊथ बे या दोन ठिकाणी वसती करून आहेत. त्यांची लोकसंख्या १०० (२०११) आहे. ते अंदमानी भाषा समूहातील बोली भाषा बोलतात. तिला लिपी नाही; तथापि त्यांच्यातील काही जण स्थानिक हिंदीचा वापर करताना दिसतात. शरीराने ते बुटके, गोल डोक्याचे, रुंद व बसक्या नाकाचे असतात. त्यांचे  केस, ओठ, रंग आफ्रिकन वंशांतील लोकांप्रमाणे आहे. ते मासे, रानडुकराचे मांस, समुद्री कासवे,  कंदमुळे, मध व फळे खातात. नागरी जीवनाशी परिचय झाल्यामुळे अलीकडे गव्हाची रोटी आणि भात हे त्यांचे मुख्य अन्न झाले आहे. तसेच ते चहाही ते पिऊ लागले आहे. ते तीन प्रादेशिक समूहांत विभागलेले असून त्यांना अनुक्रमे गिरेमेका- गोबेऊले, एंगक्वाले आणि गिरेरा- गाबेऊले म्हणत. यांच्यातील प्रमुख समूह पितृसत्ताक (बेराई) असून या बेराईमध्ये पाच ते सातपर्यंत बीजकुटुंबे असून ती पैतृक वंशानुक्रमाने जोडलेली असत. भिन्न बेराईमध्ये विवाह होत. ते एक- पत्निकत्व मानणारे आहेत. विवाहानंतर विवाहित पतिपत्नी पितृगृहातून नूतनगृही वास्तव्यास जातात. वधुमूल्य वा हुंडा देण्याची पद्धत या जमातीत नाही. लग्न एकमेकांच्या विचाराने, परस्परांच्या व वरिष्ठांच्या संमतीने ठरविले जाते. पारंपरिक पद्धतीनुसार मुलगी मुलाच्या मांडीवर बसते आणि त्याला आलिंगन देते. हा लग्नातील महत्त्वाचा विधी असतो. त्यानंतर जेवणावळ होते. त्यांच्यात घटस्फोटास सामाजिक मान्यता नाही; पण वेगळे होण्यास मुभा आहे. विधवा स्त्री व विदुर पुरुष पुनर्विवाह करू शकतात. जंगलातील कंदमुळे, मध, फळे आणि जळण गोळा करणे हे स्त्रियांचे काम आहे. ओंगी महिलांना त्यांच्या समाजात मान व आदर असून त्यांचा प्रभाव जाणवतो.

ओंगी समाजामध्ये मुलांच्या दीक्षाविधीस आणि मुलीच्या तारुण्यगम (ऋ तुप्राप्ती) विधीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांना अनुक्रमे तानागिरू आणि होरांगबेय म्हणतात; मात्र अपत्याचा जन्म आणि विवाह साधेपणाने संपन्न होतात. मुलांच्या जन्मानंतर जिथे मुलाचा जन्म झाला तिथेच त्याची वार पुरण्याची पद्धत त्यांच्यात आहे. मृत व्यक्तीलाही झोपडीत ती जिथे मरण पावली, तिथेच पुरण्याची यांची पद्धत आहे. काही दिवसांनी त्या प्रेताचा जबडा बाहेर काढला जातो. त्याला इन्नीबिरांगेय पद्धत म्हणतात.

पूर्वी ओंगी हे पूर्णत: त्यांच्या चरितार्थासाठी शिकार, मासेमारी आणि कंदमुळे- फळे गोळा करणे यांवर अवलंबून होते. अलीकडे त्यांच्यापैकी काहीजण त्यांच्या वास्तव्याच्या जवळ तयार केलेल्या मळ्यामध्ये मोलमजुरी करू लागले आहेत. त्यांना शासनातर्फे थोडेफार धान्यही दिले जाते. त्यांच्यापैकी काहीजण नोकरी करू लागले आहेत. जमातीतील ज्येष्ठ स्त्री-पुरुषांकडून त्यांच्या जमातीचे सामाजिक-आर्थिक व्यवहार सांभाळले जातात.

ओंगी उत्कृष्ट टोपल्या, चटया विणतात. मध गोळा करण्याकरिता लाकडाची भांडी तयार करतात. तसेच एकसंध झाडाच्या बुंध्यापासून मचवा कोरून काढून त्याला दोर लावतात. ते वेताच्या टोपल्या बनवितात. त्यात शिजलेले मांस, कंदमुळे ठेवतात. स्त्री-पुरुष दोघेही त्या विणतात. एका विशिष्ट झाडाच्या सालीपासून स्त्रिया  माळा तयार करतात. त्या दररोज शरीराला पांढरी माती लावतात. त्यामुळे भुताखेतांपासून रक्षण होते अशी त्यांची भावना आहे. सकाळच्या वेळी हे लोक धनुष्यबाण घेऊन शिकारीस बाहेर पडतात. त्यांचे मधाचे कुंभ क्वाल्लालू वृक्षापासून बनविलेले असून ते वेताच्या नक्षीने सजवितात. ओंगी काही मर्यादेपर्यंत बंगाली, निकोबारी, तमिळ, तेलुगू आदी भाषा बोलतात. ते अन्य लोकांबरोबर संबंध प्रस्थापित करू लागले आहेत. बंगालीवर त्यांचा अधिक भर असून विवेकानंदपुरम येथील छावण्यांना ते भेट देतात. तिथून तंबाखू व चहापूड आणतात. त्याबदल्यात आपल्याकडील कलावस्तू विकतात. एका मोठय़ा झोपडीत चार-पाच कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाला झोपण्यासाठी वेताचा कट्टा असतो. ओंगी पुरुष लंगोटी, तर स्त्रिया नारळाच्या किंवा खजुरीच्या पानांनी आपली लज्जा झाकतात; मात्र दोघांचा कमरेवरील भाग अनावृत असतो. यांचे साधारणत: दहा कुटुंबांचे एक खेडे असून शिकारीच्या हद्दी ठरलेल्या असतात. ते त्यांच्या गावाच्या मध्य भागातील अंगणात अन्न शिजवतात आणि नृत्यही करतात.

शाँपेन ही आदिम जमात ग्रेट निकोबर बेटावरील १ हजार ४५ चौ.कि मी. क्षेत्रात प्रामुख्याने घनदाट, जंगल, नदीकाठ आणि तेथील डोंगरउतारावर वास्तव्य करून आहे. त्यांची लोकसंख्या २२९(२०११) होती. ती हळूहळू घटत आहे. ते नदी खोऱ्यात वा दाट जंगलात पाच-दहा कुटुंबांच्या समूहाने तात्पुरते पाल (लहान झोपडय़ा) उभारून राहतात. भटके जीवन त्यांना आवडते. शिकार व मच्छीमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून त्याबरोबरच ते जंगलातील कंदमुळे, मध, फळे इत्यादी गोळा करतात. विशिष्ट जातीचे मासे, समुद्री कासव, रानडुक्कर व कुत्रा यांचे मांस ते खातात. ते भाल्याने डुकराची शिकार करतात. काही मानवशास्त्रज्ञांच्या मते ही नवाश्वमयुगीन जमातींपैकी एक जमात असून ते मंगोलॉइड वंशाचे बुटके, मध्यम उंचीचे व कृष्णवर्णीय लोक आहेत. या जमातीतले बहुतेक स्त्री-पुरुष विवस्त्र असतात. त्यांची बोलीभाषा ऑस्ट्रो-आशियाई भाषा समूहातील असून निकोबारी भाषेपेक्षाही वेगळी आहे. या जमातीत वयात आलेल्या मुलामुलींची लग्ने होतात. त्यांच्यात एकपत्नित्व रूढ असून या जमातीतील पुरुषांना क्वचितच दोन बायका आढळतात. जंगलातील मध, कंदमुळे, पोफळी इत्यादी वस्तू निकोबारी लोकांना देऊन त्याबदल्यात ते साखर तसंच कपडे घेतात. ते जडप्राणवादी असून संकटनिवारणार्थ एका विशिष्ट वृक्षाची पूजा करतात. भूतपिशाच व जादूटोणा यांवर त्यांचा विश्वास आहे. जंगलाच्या अंतर्भागातील शाँपेनांचा उल्लेख निकोबारी लोक गॅलॅथिएल शाँपेन असा करतात. शाँपेनांच्या विकासासाठी शासनाचे कसून प्रयत्न चालू आहेत. मात्र ते स्वभावाने बुजरे असल्यामुळे अद्यापि मुख्य प्रवाहात सामील झालेले नाहीत. गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत (एप्रिल २०१४) त्यांच्यापैकी ६० शाँपेननी मतदान केले.

अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील निकोबारी ही लोकसंख्येने सर्वात मोठी असलेली जमात असून त्यांची लोकसंख्या ३० हजार (२०११) होती. ते प्रामुख्याने कारनिकोबार बेटावर व दक्षिण ग्रामीण भागात राहतात. या जमातीतले लोक मध्यम उंचीचे (किंचित बुटके) असून त्यांचे कपाळ रुंद असते. ते पीतवर्णी असून एकमेकांशी ते निकोबारी ऑस्ट्रो-आशियाई भाषाकुलातील निकोबारी भाषा बोलतात; मात्र बाहेरच्या लोकांशी ते हिंदीत बोलतात, भात हे त्यांचे मुख्य अन्न असून रानडुकराचे मांस त्यांना आवडते. स्त्री-पुरुष दोघेही मद्यपान करतात, ताडी पितात. तसेच पान-तंबाखू खातात. त्यांच्यातील बहुतेकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून काहींनी इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. ते वराहपालन व उद्यान शेती करतात. परंपरागत नारळ, केळी, सुपारी, आंबे, फणस, इत्यादी उत्पादने घेतात. शिवाय भातशेती करतात. ते अंदमानात स्थिरावलेल्या भारतीय लोकांत सर्वार्थाने मिसळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील मुलेमुली शिकू लागली आहेत.

आपल्याला पर्यटनदृष्टय़ा माहीत असलेल्या अंदमान निकोबार बेटांवरचे हे मूळ निवासी. आजही त्यांना कोणत्याही नागरी संस्कृतीचा फारसा स्पर्श झालेला नाही. त्यामुळे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने या जमाती, त्यांचे राहणीमान, त्यांच्या प्रथापरंपरा, त्यांची भाषा या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण तो आदिम काळापासूनचे जनजीवन समजून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे.

(लेखातील सर्व छायाचित्रे अंदमान येथील संग्रहालयातील आहेत.)
डॉ. सुरेश रघुनाथ देशपांडे – response.lokprabha@expressindia.com