12 December 2019

News Flash

अॅप्रिकॉट ब्लॉसमची स्वर्गीय अनुभूती

लडाख म्हणजे निसर्ग देवतेने आपल्या फुरसतीच्या वेळात निर्माण केलेला आविष्कार.

डोळ्यात आणि कॅमेऱ्यातसुद्धा न मावणारे लडाख एकदा बघून पोट भरत नाही.

ऋतू पर्यटन
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com

लडाख म्हणजे जगाला शांततेची शिकवण देणाऱ्या बुद्धाची भूमी, लडाख म्हणजे उघडय़ाबोडक्या डोंगरांवर निसर्गाने केलेले रंगकाम, लडाख म्हणजे अथांग विविधरंगी तळी, लडाख म्हणजे जगातील सर्वात उंचीवरील रस्ते, कोणतेही प्रदूषण नसलेले ठिकाण म्हणजे लडाख, आकाशगंगा पाहण्यासाठी जगातील उत्तम जागा म्हणजे लडाख, लडाख म्हणजे निसर्ग देवतेने आपल्या फुरसतीच्या वेळात निर्माण केलेला आविष्कार. डोळ्यात आणि कॅमेऱ्यातसुद्धा न मावणारे लडाख एकदा बघून पोट भरत नाही. त्यामुळे अनेकदा लडाखला जायची इच्छा होत असते. मग काहीतरी वेगळे पाहायला हवे, काही वेगळे अनुभवायला हवे, तर एकदा एप्रिलमध्ये जायला हवे जर्दाळूचा बहर बघायला.

लडाख तसा रखरखाटी प्रदेश आहे. विलो, पॉपलर, लेह बेरी, थोडय़ा फार प्रमाणात सफरचंद आणि जर्दाळू (अ‍ॅप्रिकॉट) अशी चार-पाच प्रकारचीच वृक्षसंपदा तेथे आढळते. त्यातदेखील विलो आणि पॉपलर यांना फळे येत नाहीत. मात्र, ऋतूनुसार बदलणारी त्यांची मनमोहक रूपे पाहण्यासारखी असतात. नोव्हेंबरपासून विलोचे विलोभनीय रंग सृष्टिसौंदर्य वाढवू लागतात. फेब्रुवारीमध्ये लालचुटूक शेंडा पूर्ण बहरात येतो. सरत्या हिवाळ्यात पिवळा धमक शेंडय़ांनी विलो बहरलेला असतो. विलो तसा सर्वत्रच दिसतो. जर्दाळू हे मात्र तेथे जाणीवपूर्वक लावले जाणारे झाड आहे. खास लागवडच केलेली असते. लडाखी घरांच्या अंगणात तर हे झाड हमखास सापडते. कधी रस्त्याच्या कडेने अगदी व्यवस्थित लावलेली ही झाडे पाहून वेगळाच अनुभव येतो. या जर्दाळूला बहर येतो तो एप्रिलमध्ये.

जपान हा आयुष्यात एकदा तरी पाहावाच असा देश आहे. याच देशात जपानी मंडळींनी चेरीब्लॉसम हा सिजन जगप्रसिद्ध केला. त्यातूनच हा विचार आला की, जर जपान त्यांचा चेरीब्लॉसम जगासमोर आणते आणि पर्यटकांना आकर्षति करते, तर आपली जबाबदारी नाही का, आपल्या लडाखमधील अ‍ॅप्रिकॉट ब्लॉसम जगासमोर आणण्याची? लडाखी लोक पर्यटनाच्या माध्यमातून केवळ सहा महिने काम करतात आणि उरलेले सहा महिने कामाशिवाय जीवन जगतात. त्यामुळे या विशेष सिजनच्या माध्यमातून लडाखच्या जनतेला ऑफ सिजनमध्येसुद्धा रोजगार उपलब्ध करून देणे ही सामाजिक जाणीव आणि प्रेरणा या प्रयत्नामागे आहे. हिवाळा संपत असताना आणि तसेच वसंत ऋूतला सुरुवात होताना अ‍ॅप्रिकॉट ब्लॉसमची (जर्दाळूचा बहर) सुरुवात होते. यावेळी लडाखमधील गारठलेले जीवन पुन्हा नवोन्मेशाने बहरण्याच्या तयारीत असते. वृक्षवल्लरींना नवी पालवी फुटण्याचे आणि जमिनीवर हिरवा गालिचा पांघरण्याचे हे दिवस असतात. लडाखचे जनजीवन हळूहळू सुसह्य़ होत असतानाच जर्दाळूंच्या झाडांना फुलायची घाई झालेली असते. लडाखच्या अल्पशा उन्हाळ्यात फुलणे, फळणे सगळे साधायचे असते. तिकडे शिखर माथ्यावरची बर्फाची धवल वस्त्रे आवरती घेत असताना त्याची उणीव भासू नये म्हणूनच की काय, या जर्दाळूंच्या झाडांना पांढऱ्या- गुलाबी रंगाचा झगा ल्यावासा वाटतो जणू. इवल्याशा हिरव्या पानांना झाकोळून टाकणारी, मध्ये गडद लाल रंगाचा ठिपका असलेली ही फुले जर्दाळूच्या संपूर्ण झाडाला व्यापून टाकतात. कारगिलच्या आजूबाजूच्या गावात, रस्त्याच्या दुतर्फा आणि सखल भागात पसरलेले जर्दाळूच्या फुलांचे ताटवे पाहताना या पूर्ण भागावर फुलांची चादर पसरली आहे असाच भास होतो. जणू हिवाळ्यातला पांढरा बर्फ वितळत जातो आणि या गुलाबी बर्फाची मिरास सुरू होते. कारगिल, द्रास आणि बटालिक जवळची हरदस, स्कित्चेन, दाह, नू, बिमा ही गुलाबी कापसाने जणू भरून जातात. या गावातल्या जर्दाळूच्या झाडांखालून फेरफटका मारताना, फुलांच्या मंडपाखालून गेल्यासारखा स्वर्गीय आनंद मिळतो. एप्रिल महिन्याच्या मध्यावरचा हा ‘अ‍ॅप्रिकॉट ब्लॉसम’ म्हणजे वसंत ऋतूला पडलेले गोड स्वप्नच म्हणावे लागेल.

निसर्गाच्या या अद्भुत नजाऱ्यासोबत एक विशेष गोष्ट केवळ डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत पाहायला मिळते. लडाख म्हणजे अति उंचीवरचे हिमालयातील वाळवंट. त्यामुळे तिथे बर्फवृष्टी फारच कमी होते. स्थानिक लोकांना उंच पर्वतावरील ग्लेशिअर्सच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. अलीकडे जगभरात जी जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावत आहे, त्याचा फटका लडाखलाही बसला आहे. त्यामुळे ऑगस्टनंतर लडाखमधील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवू लागते. या समस्येवर तोडगा म्हणून सोनम वांगचूक यांनी नावीन्यपूर्ण संशोधनाला धार्मिक जोड दिली आणि आईस स्तुपाचा जन्म झाला. हिवाळ्यात पडलेल्या बर्फापासून स्तूप बनवले जातात आणि ते उन्हाळ्यात वितळू लागले की जवळच असलेल्या तळ्यामध्ये हे पाणी साठवून वापरले जाते. या आईस स्तुपाच्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी सोनम वांगचूक यांना रोलेक्स तसेच मॅगसेसे या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

असे हे अद्भुत पाहायचे असेल, अध्यात्माची अनुभूती घ्यायची असेल, आदरातिथ्य अनुभवायचे असेल, सर्वोत्तम छायाचित्रकार व्हायचे असेल, भारतीय सन्याला जवळून जाणून घ्यायचे असेल तर लडाखला एकदाच नाही तर अनेकदा जाण्यावाचून पर्याय नाही. हे माझ्यासारखा गेल्या २३ वर्षांत १३० वेळा लडाखला जाऊन आलेला ‘लडाखवेडा’ सांगतो आहे. चला, तर मग पुढील वर्षी ‘अ‍ॅप्रिकॉट ब्लॉसम’ पाहायला!

First Published on July 19, 2019 1:02 am

Web Title: apricot blossom
Just Now!
X