18 February 2019

News Flash

प्रा. ढवळीकर : पुरातत्त्वातील अपूर्व

भारतातील व विशेषत: पश्चिम भारतातील पुरातत्त्व संशोधनाच्या स्वातंत्र्योत्तर काळात सांकलिया, देव आणि ढवळीकर अशी तीन पर्वं मानली जातात.

प्रा. मधुकर केशव ढवळीकर

आदरांजली
ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबरच ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननांचे मूल्यमापन, तसंच या संशोधनाला दख्खनमधील सातवाहन ते राष्ट्रकूटकालीन लेणींच्या अभ्यासाची जोड या सगळ्यामुळे पुरातत्त्वाच्या क्षेत्रात प्रा. मधुकर ढवळीकर यांचे योगदान अपूर्व आहे.

प्राध्यापक मधुकर केशव ढवळीकर हे २७ मार्च २०१८ रोजी निवर्तले. भारतातील व विशेषत: पश्चिम भारतातील पुरातत्त्व संशोधनाच्या स्वातंत्र्योत्तर काळात सांकलिया, देव आणि ढवळीकर अशी तीन पर्वं मानली जातात. ढवळीकरांच्या निर्वतण्याने या शेवटच्या पर्वाची समाप्ती झाली असे म्हणावयास हरकत नाही. प्रा. ह. धि. सांकलिया हे गेल्या शतकातील तिसऱ्या दशकात गुजरातच्या पुरातत्त्वावरील आपला शोधप्रबंध लंडन विद्यापीठाला सादर करून भारतात परतले. त्यांना विशेषत: काही प्रश्नांनी भंडावून सोडले होते. उदाहरणार्थ इंडोनेशिया, चीन यांसारख्या आशियातील देशात मानवी सांगाडय़ांचे अवशेष सापडले होते. भारत हा तितकाच प्राचीन देश असूनसुद्धा अशा प्रकारचे अवशेष गवसले नव्हते. फक्त अगदी प्राचीन अशी हत्यारे सापडली होती. सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळालेले होते, परंतु सिंधू संस्कृतीचा आणि वैदिक आर्य संस्कृतीचा नक्की काय संबंध होता याविषयीची अगदी टोकाची मते प्रचलित होती. काही विद्वान ती द्राविड-नागर संस्कृती होती जिचा आर्यानी नि:पात केला असे मानत तर सिंधु संस्कृती ही आर्य संस्कृती होती असे इतर काही विद्वान ठामपणे मांडत. १९३९ साली डेक्कन पोस्ट-ग्रॅज्युएट रीसर्च इन्स्टिटय़ूटच्या रूपाने पुनरुज्जीवित झालेल्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्वाचे प्राध्यापक म्हणून १९३९ साली रुजू झाल्यानंतर प्रा. सांकलियांनी अनेक पुरातत्त्वीय गवेषणांचे (exploration) आणि उत्खननांचे (excavation) कार्यक्रम हाती घेतले. १९३९ ते १९७३ या ३४ वर्षांच्या कालखंडात सांकलियांनी एक उत्तम प्रतीचा पुरातत्त्वीय विभाग प्रस्थापित केला आणि अश्मयुग, नवाश्मयुग, ताम्र-पाषाण युग, पूर्व-इतिहास काळ (Early Historic) या कालखंडांशी संबंधित पुरातत्त्वीय स्थळांचे गवेषण तसेच उत्खनन मुंबई इलाख्यात नंतरच्या द्वैभाषिक मुंबई राज्यात मुख्यत्वे केले. प्रा. सांकलियांनी प्रशिक्षित केलेल्या पी. एच. डी. साठी संशोधन करणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे १९६० पर्यंतच्या कालखंडात अश्मयुग आणि त्यातील तीन मुख्य अवस्था, प्राचीन, मध्य आणि उत्तर या स्पष्ट झाल्या. तसेच आंतर-अश्मयुग (Mesolithic) आणि नवाश्मयुग (Neolithic) या काळातील भारतभरच्या प्रागतिहासिक संस्कृतींचे चित्र बरेचसे स्पष्ट झाले होते. प्री अ‍ॅण्ड प्रोटो हिस्ट्री ऑफ इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान १०६२ (Pre and Proto History of India and Pakistan- 1062) या ग्रंथात सांकलिया यांनी भारतीय उपखंडातील प्रागतिहासिक संस्कृतीच्या घेतलेल्या आढाव्यावरून हे सहज लक्षात येते. इतिहास पूर्व काळाच्या पश्चिम भारतातील संस्कृतीच्या संदर्भात सांकलिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गवेषण-उत्खननामुळे (सुमारे १९५६ ते १९७३) राजस्थान, गुजरात, माळवा आणि महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतींचा लागलेला शोध ही भारतीय पुरातत्त्वाला मिळालेली अपूर्व देणगीच होती. त्याकाळात कर्ब-१४ पद्धतीप्रमाणे निर्धारित केलेल्या काळानुसार इ. स. पूर्व सुमारे १६०० ते १००० या काळात अहार व बनास संस्कृती, माळवा संस्कृती, बहाळ संस्कृती व जोर्वे संस्कृती अशा निरनिरळ्या ताम्र-पाषाण युगातील सांस्कृतिक अवस्थांचा शोध लागलेला होता. या संस्कृतींचा व सिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीचा (मोहेंजोदारो) काय संबंध होता हे नेमके उमगले नव्हते. प्रा. सांकलिया यांच्या मते या संस्कृती महाभारत कालीन असाव्यात व त्यांचा इराणमधील ताम्र-पाषाण युगीन संस्कृतींशी नक्की काय संबंध होता या संदर्भात मागोवा घेतल्याने वैदिक आर्याच्या प्रश्नावरही प्रकाश पडू शकतो. याच सुमारास म्हणजे १९६८ ते १९७३ व नंतर १९८३ पर्यंत प्रा. शां. भा. देव यांनी विदर्भातील बृहदाश्मयुगीन शिळा वर्तुळांची उत्खनने करून महाराष्ट्रातील आद्य लोहयुगीन संस्कृतीवर मोठा प्रकाश टाकला होता.

या सर्व पाश्र्वभूमीवर प्रा. मधुकर ढवळीकर यांनी केलेल्या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीच्या संशोधनाचा आढावा घेणे योग्य ठरेल. ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबरच ढवळीकर यांनी ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननांचेही मूल्यमापन केलेले आहे. पुरातत्त्वीय स्थळांच्या ऐतिहासिक संशोधनाला दख्खनमधील सातवाहन ते राष्ट्रकूटकालीन लेणींच्या अभ्यासाचीही त्यांनी जोड दिलेली होती. या संदर्भात त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे योग्य ठरेल असे वाटते.

ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या संदर्भातील त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने केलेली पुढील उत्खनने महत्त्वाची आहेत. कायथा (१९७५), आपेगाव (१९७९), कवठे (१९९०), कुंतासी (१९९६) आणि इनामगाव (१९८८) ही उत्खनने महत्त्वाची आहेत. फार खोलात न जाता कुंतासी आणि इनामगाव येथील उत्खननाचाच आपण येथे विचार करतो आहोत. कुंतासीच्या उत्खननाच्या रूपाने त्यांनी असा एक नवीन मुद्दा मांडला की कच्छ-काठियावाड येथील प्रगत सिंधूसंस्कृतीच्या काळात हरप्पा नागर संस्कृतीच्या लोकांनी नव्या वसाहती स्थापन करून निर्यातीला योग्य अशा मालाची (उदाहरणार्थ किमती खडय़ांचे मणी व आभूषणे आणि शंखांच्या बांगडय़ा) उत्पादन केंद्रे प्रस्थापित केली व आपल्या निर्यातीला मोठय़ा प्रमाणावर चालना दिली. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरातमधील निरनिराळ्या ताम्रपाषाणयुगीन स्थानिक संस्कृतींचे चित्र बरेचसे स्पष्ट झालेले होते. या निरनिराळ्या संस्कृतींच्या परस्पर संबंधातून ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अवस्थाही स्पष्ट झालेल्या होत्या. महाराष्ट्रातील जोर्वे संस्कृतीची वैशिष्टय़ेसुद्धा चांगल्या रीतीने माहिती झाली होती व तिचा काळही इ. स. पूर्व १५०० ते १००० हा निश्चित झाला होता. इनामगाव येथील सुमारे १२ वष्रे चाललेल्या उत्खननामुळे मात्र या माहितीला एक वेगळेच परिमाण मिळाले. ते नवपुरातत्त्वाच्या तात्त्विक बठकीमुळे व संशोधन पद्धतीमुळे इनामगाव येथील वसाहत सुरुवातीपासून तीन अवस्थांतून गेली असे दिसते. दुसऱ्या अवस्थेत येथील लोकांनी घोडनदीला बांध घालून शेतीला पाणी देण्यासाठी कालव्याची व्यवस्था केली. त्यामुळे दुबार पीक घेता आले. मुख्य पिकाबरोबर जोड पिकेसुद्धा घेतली, आणि मोठी भौतिक समृद्धी साधली होती हे त्या काळच्या गावप्रमुखाच्या वाडय़ासारख्या घरावरून, तिथे असलेल्या धान्याच्या कणग्यांवरून सहज लक्षात येते. ग्रामप्रमुखाच्या रांजणातील दोन दफनांवरून तसेच बाळंतिणीच्या खोलीत सापडलेल्या मातृदेवतेच्या मातीच्या प्रतिमेवरून समकालिन धर्मिक कल्पनांची नव्याने ओळख झाली. या काळातील घराच्या चौकोनी वास्तूपेक्षा नव्याने प्रचलित झालेल्या गोलाकार झोपडय़ांवरून तसेच अगदी कोवळ्या वयातील प्राण्यांच्या हाडांवरून तेथील शेवटच्या अवस्थेतील आíथक दुर्दशेचे चित्र स्पष्ट होते. प्राथमिक अवस्थेतून समृद्धी व पुढे आलेली आíथक दैन्यावस्था याला समकालीन पर्यावरणसुद्धा तितकेच जबाबदार होते असा सिद्धांत ढवळीकरांनी मांडला.

सिंधू संस्कृती आणि वैदिक आर्य संस्कृतीचा संबंध स्पष्ट करतानासुद्धा पर्यावरणीय पुरातत्त्वाचा भाग म्हणून राजस्थानमधील भूगर्भ शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेल्या कालखंडांच्या तक्त्यांचा चौकट म्हणून त्यांनी वापर केला व आपल्या वैदिक आर्यावरील विस्तृत संशोधनामधून उत्तर हडप्पा काळात ऋग्वेदिय आर्याची संस्कृती ही उत्तर हडप्पा काळात (इ. स. पूर्व १८०० च्या सुमारास) कशी प्रतिष्ठत झाली हे मांडले. ‘इंडियन प्रोटोहिस्टरी’ (Indian Protohistory) आणि ‘द आर्यन्स : मिथ अ‍ॅण्ड आर्किऑलॉजी (The Aryans: Myth and Archaeology) या दोन ग्रंथांच्या सहाय्याने हडप्पा संस्कृती, हडप्पोत्तर ताम्रपाषाण संस्कृती, वैदिक आर्य संस्कृती आणि गंगेच्या खोऱ्यातील समकालीन संस्कृती यांच्या परस्पर संबंधांचे चित्र पुराव्यासकट मोठय़ा प्रभावीपणे मांडले.

प्रा. ढवळीकरांनी ‘हिस्टॉरिकल आर्किऑलॉजी ऑफ इंडिया- (१९९९) ’ (Historical Archaeology of India- 1999)  या ग्रंथात गुप्तकाळापर्यंतच्या उत्खनित स्थळांचा आढावा सविस्तरपणे आढावा घेऊन गुप्तोत्तर काळात उत्तरोत्तर निर्नागरीकरण कसे झाले याचे पुराव्यावर आधारित चित्र मांडले आहे. भारतीय उपखंडामध्ये प्रागतिहासिक काळ, इतिहासपूर्व काळ आणि ऐतिहासिक काळ या सर्व कालखंडात मोठय़ा प्रमाणावर झालेल्या अवर्षणाच्या अनेक अवस्था (phases) होत्या आणि त्यामुळेच संस्कृतीच्या उत्कर्षांचे आणि अपकर्षांचे कालखंड ओळखता येतात हा पर्यावणीय पुरातत्त्वाच्या अभ्यासातून पुढे आलेला सिद्धांत त्यांनी हिरिरीने मांडला. (Environment and Culture, A Historical Perspective, 2002) नाइल नदीचे पूर तसेच ती मधून मधून आटत गेली त्या संबंधीचे समकालीन वृत्तान्त अनेक स्रोतांमधून उपलब्ध झालेले आहेत. भारतातील अवर्षणांची माहिती पुरातत्त्वीय स्रोतांमधून तसेच वाङमयीन व आख्यायिका – दंतकथांमधून मिळते. या दोन्ही प्रकारच्या पुराव्यांची जोड घालून चांगली सुगी असलेले व अवर्षणाचे कालखंड मोठय़ा परिश्रमाने डॉ. ढवळीकर यांनी निश्चित केले आणि त्याचा उपयोग ऐतिहासिक कालखंड ठरवताना कसा होतो हे त्यांनी नव्याने मांडले. आणि त्याच्या सहाय्याने ऐतिहासिक कालखंडातील निर्नागरीकरणाच्या सिद्धांताला जोड दिली.

प्रा. ढवळीकर यांनी आपल्या संशोधनात शिल्प आणि चित्रकलेतील चित्रणामधून समकालीन भौतिक संस्कृती कशी रेखाटता येते हे सांची येथील शिल्पे आणि अजिंठा येथील चित्रे यांच्या सहाय्याने दाखवले. त्या बरोबरच त्यांनी कलेतिहासाच्या दृष्टिकोनातून मृत्तिकाशिल्पे, सातवाहनकालीन व राष्ट्रकूटकालिन लेणींचा सखोल अभ्यास केला. ‘लेट हिनयाना केव्ह्ज ऑफ वेस्टर्न इंडिया’ (Late Hinayana Caves of Western India) या शोध प्रबंधातून एरवी दुर्लक्षित असलेल्या परंतु हिनयानापासून महायानापर्यंतच्या स्थित्यंतराच्या कालातील लेणींकडे प्रकर्षांने लक्ष वेधले. लेणी स्थापत्याच्या अभ्यासात त्यांनी केलेले हे योगदान महत्त्वाचे असेच म्हणता येईल. वेरूळ येथील राष्ट्रकूटकालीन गुंफांच्या संदर्भात कैलास लेणीचा सखोल अभ्यास करून त्या लेणींचा कालक्रम ठरवण्यासाठी त्यांनी एक नवीन कोष्टक तयार केले. कलेतिहासातील त्यांची आणखी काही प्रकाशने म्हणजे त्यांनी सातवाहन कलेचा घेतलेला आढावा (२००४) व एलिफंटा, एलोरा आणि सांची यावर लिहिलेल्या हौशी पर्यटकांसाठीच्या पुस्तिकांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. प्रतिमाविज्ञानातील गणेश – द गॉड ऑफ आशिया (Ganesh: The God of Asia) हा त्यांचा ग्रंथही एक महत्त्वाचे योगदान ठरेल. प्रा. ढवळीकर यांच्या जवळजवळ ४० इतक्या ग्रंथसंपदेतील शेवटचे आणि लक्षणीय पुस्तक म्हणजे ‘द कल्चरल हेरिटेज ऑफ मुंबई’ -२०१६ (The Cultural Heritage of Mumbai) याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. या ग्रंथात अगदी पुराश्मयुगापासून ते पोर्तुगीज येईपर्यंतच्या साष्टी बेटातील सांस्कृतिक स्थित्यंतरांचे मोठय़ा आकर्षक भाषेत वर्णन केले आहे. विशेष म्हणजे रवींद्रनाथ टागोरांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासातून हा ग्रंथ साकार झाला. आपले संशोधन जनसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी ८०च्या दशकापासून गेल्या वर्षांपर्यंत मराठी भाषेत, सामान्य वाचकाला समजतील अशा शैलीत आठ ग्रंथ लिहिले. या ग्रंथांना निरनिराळ्या सार्वजनिक संस्था व शासनाचे पुरस्कार मिळाले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुवर्णपदक देऊन, एशियाटिक सोसायटीने सन्माननीय सदस्यत्व देऊन व भारत शासनाने ‘पद्मश्री’ने देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. भारतीय विद्या आणि पुरातत्त्वीय संशोधन यांच्या संदर्भात त्यांच्या निधनाने सांकालिया पर्वातील एक महत्त्वाचा दुवा पडद्याआड गेला असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

प्रो. एम. के. ढवळीकर ग्रंथसंपदा

Sanchi: A Cultural Study
Ajanta A Cultural Study
Masterpieces of Indian Terracottas
Masterpieces of Rashtrakuta Art: The Kailas
Late Hinayana Caves of Western India
The First Farmers of the Deccan
Cultural Imperialism: Indus Civilization in Western India
Indian Protohistory
Historical archaeology of India
Environment and Culture: A Historical Perspective
Environment and Culture: a Historical Perspective
Archaeology of Western India
Ellora
Elephanta
The Aryans: Myth and Archaeology
Satavahana Art
Sanchi
Pre-History of India
Socio-economic Archaeology of India,
Cultural Heritage of Mumbai
Ganesha: The God of Asia

सह-लेखक

Mathura Art in the Baroda Museum, (Madhukar Keshav Dhavalikar -V. L. Devkar)
Studies in Indian Archaeology
(Sankalia H.D., Deo S.B., and Dhavalikar M.K.)
Illustrated Manuscript of PyushanaKalpasutra (Editors: S. L. Bapat, R. M. Poddar)

उत्खनन अहवाल

Paunar excavation, 1967, ShantaramBhalchandra Deo, – Madhukar Keshav Dhavalikar –
Excavations at Kayatha, 1975 (With Z. D. Ansari)
Apegaon Excavations: ( Report of the Excavation at Apegaon: 1976), Shantaram Bhalchandra Deo -Madhukar Keshav Dhavalikar
Excavations at Inamgaon Vol 1, Pt 1 (Dhavalikar M.K., Sankalia H.D., and Ansari Z.D.)
Excavations at Kaothe, Madhukar Keshav Dhavalikar, -Vasant Shinde, -Shubhangana Atre
Kuntasi, a Harappan Emporium on West Coast (Dhavalikar M.K., Raval M.R., and Chitalwala Y.M.)

मराठी ग्रंथसंपदा

पर्यावरण आणि संस्कृती
कोणे एकेकाळी सिंधु संस्कृती
महाराष्ट्राची कुळकथा
आर्याच्या शोधात
भारताची कुळकथा
गणेश
पुरातत्त्वविद्या
प्राचीन भारतीय नाणकशास्त्र

डॉ. अरिवद जामखेडक – response.lokprabha@expressindia.com

First Published on April 6, 2018 1:02 am

Web Title: archaeologies prof madhav dhavalikar