lp32‘नटसम्राट’ सिनेमाबाबतच्या उत्सुकतेचं आणखी एक कारण म्हणजे यातले सेट. रेल्वेनजीकचा पूल, उद्ध्वस्त नाटय़गृह असे सेट्स उभारण्याची कमाल आहे एकनाथ कदम या कला दिग्दर्शकाची. या पडद्यामागच्या कलाकाराशी बातचीत.
चित्रपट हे प्रतिमांचे माध्यम. दृश्यांच्या माध्यमातून जास्तीतजास्त सांगायचा प्रयत्न येथे होत असतो. दृश्य जितके जिवंत तितका त्याचा प्रभाव अधिक. दृश्य जिवंत करण्याचं काम अभिनेते करत असले तरी त्याच जोडीला ते ज्या सेटच्या, लोकेशनच्या पाश्र्वभूमीवर उभे असतात त्यालादेखील तेवढेच महत्त्व असते. कारण ती लोकेशन, तो सेट तुम्हाला प्रसंगाच्या थेट जवळ नेत असतो. वातावरण निर्माण करत असतो. त्यामध्ये काही उणीव असेल तर मग केवळ अभिनयावरच असा प्रसंग तुम्हाला भिडेलच याची शक्यता तशी कमीच म्हणावी लागेल. पण सेट म्हटलं की त्यापुढे भव्यदिव्य हेच विशेषण वापरायची आपल्याला सवय झाली आहे. हेच लोकेशनबद्दल म्हणता येईल. पण दिग्दर्शकाला हवी ती पाश्र्वभूमी तयार करून देण्याची गरज प्रत्येकच चित्रपटात असते आणि ती गरज पडद्यामागे असणारी कलादिग्दर्शक नामक व्यक्ती पेलत असते. ‘नटसम्राट’ चित्रपटातदेखील कलादिग्दर्शकाने आपली छाप सोडली आहे. अत्यंत समर्पक अशा सेटमुळे या चित्रपटातील एकूणच प्रसंगाची खोली वाढविण्याचे काम केलं आहे ते कलादिग्दर्शक एकनाथ कदम यांनी.
एखाद्याने आयुष्यात हेच काम करायचं असं ठरवून तसं घडतंच असं नाही. मात्र जे जे काम समोर येतं त्यात तो जीव ओतत, त्यातून काही ना काही शिकण्याची कला जोपासतो. आपोआपच ही अनुभवाची शिदोरी त्याला मार्गदर्शन करते. एकनाथ कदम यांचा आजवरचा प्रवास असाच आहे.
अविष्कारच्या चंद्रशाळेतून त्यांची दृक्श्राव्य माध्यमाची सुरुवात झाली. अविष्कारशी जोडले गेले आणि कलेच्या प्रांतातली शिकवणी सुरू झाली. ‘दुर्गा झाली गौरी’च्या निमित्ताने अभिनयाचे प्रशिक्षण सुलभाताईंकडून मिळालं. त्याच वेळी आवड म्हणून आचार्य पार्वती कुमारांच्याकडे क्लासिकल नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली. अर्थात पोटापाण्यासाठीदेखील काहीतरी करणं गरजेचं होतं तेव्हा प्रदीप मुळ्येंच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर्टीची जबाबदारी पेलली. ‘आधी रात’ ‘बात के’, ‘आधे अधुरे’ अशा नाटकांसाठी प्रॉपर्टी मास्टर म्हणून काम पाहता आलं. चंदर होनावर यांच्याकडून प्रकाशयोजनेचे धडे गिरवणं सुरूच होतं. पडेल ते काम करायचं आणि त्यातून काहीतरी शिकत जायचं हे अविष्कारनं त्यांना पक्क शिकवलं होतं. हाच माझा घडण्याचा काळ होता असे ते आजही आवर्जून सांगतात.
त्यांचा हा आलेख पुढे चढताच राहिला. शाहीर साबळेंच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये नृत्यसंयोजनाचं कामदेखील मिळालं. ‘मंगल गाणी दंगल गाणी’ केली. पण रंगमंचाच्या बंदिस्त अवकाशातून चित्रपटाच्या खुल्या अवकाशात येण्यास कारणीभूत ठरली ती ‘चाणक्य’ ही टीव्ही मालिका. सलीम आरिफ हे या मालिकेच्या वेशभूषेचे काम पाहायचे. त्यांना साहाय्यक म्हणून त्यांनी रंगमंचावरून छोटय़ा पडद्यावर प्रवेश केला. १९९० च्या आसपासचा हा काळ. ‘चाणक्य’नंतर मात्र ते या छोटय़ा पडद्यावर फारसे रमले नाहीत.
एकनाथ कदम सांगतात की त्याच वेळी त्यांना नितीन देसाई यांच्याकडे काम मिळालं. पुढची १४ वर्षे देसाई यांच्याकडे कामाबरोबरच शिकायची प्रचंड संधी मिळाल्याचे ते नमूद करतात. आशुतोष गोवारीकर, जब्बार पटेल, विधू विनोद चोप्रा, गुलजार, केतन मेहता अशा अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटांत त्यांना स्वत:ला अजमावता, घडवता आलं. असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून काम करताना सेटवर थेट दिग्दर्शकांशी चर्चा व्हायची. दिग्दर्शकाला काय हवं आहे हे नेमकं कळू लागलं. त्यातील अडचणी काय आणि कशा असतात याची जाणीव झाली. ‘लगान’, ‘एकलव्य’, ‘हुतुतु’, अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. सुरुवातीला दिवसाला पगार होता साठ रुपये. पण शिकायला भरपूर मिळायचं.
lp33

या सर्वाचा सकारात्मक परिणाम असा झाला की २००५ पासून त्यांनी मराठीत स्वतंत्रपणे कला दिग्दर्शक म्हणून काम करायाला सुरुवात केली. ‘ब्रेकिंग न्यूज’ या चित्रपटाने ही सुरुवात झाली. केवळ सेट एवढीच भूमिका आता नव्हती. त्याचबरोबर लोकेशन, प्रॉपर्टी अशा सर्वच घटकांची गरज पूर्ण करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल. ‘आघात’, ‘आजचा दिवस माझा’, ‘दुसरी गोष्ट’, ‘लाठी’, ‘सुखान्त’, ‘रानभूल’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. राज्य शासनाच्या पुरस्काराने गौरवलेल्या ‘मणीमंगळसूत्र’ या चित्रपटाने त्यांना मानाचं स्थान मिळवून दिलं, असं म्हणावं लागेल. याबद्दल ते सांगतात की, या चित्रपटात १९३५ ते २००७ पर्यंतचा काळ रेखाटला होता. त्यासाठी आम्ही थेट चाळीचा सेटच उभा केला होता. आजवरच्या पिरिअड फिल्मचा अनुभव येथे नेमका कामी आला. पिरिअड फिल्मचा एक फायदा असतो की तुम्हाला स्वत:ला काहीतरी वेगळं उभं करायचं असतं आणि येथेच तुमच्या अनुभवाचा कस लागतो.
त्यानंतर आलेला ‘तुकाराम’ हा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट ही थेट पिरिअड फिल्मच होती. येथे सेट लावायचे नव्हते. पण लोकेशन हा महत्त्वाचा मुद्दा होता. जुना वाडा, गावचा परिसर अशा अनेक गोष्टी होत्या. आणि हे सारं चित्रीकरणाच्या दृष्टीने सोयीचेदेखील असायला हवे होते. महाराष्ट्रातील अनेक गावांत भटकंती केलेल्या एकनाथ कदम यांनी साताऱ्यानजीकच्या रहिमतपूरजवळच्या साप या गावातील वाडा आणि परिसर सुचवला. या एकाच ठिकाणी चित्रपटाला गरजेच्या असणाऱ्या अनेक लोकेशन होत्या.
पीरिअड फिल्मचा पूर्ण फील येण्यासाठीचा सारा सेट-लोकेशन, कपडेपट आणि प्रॉपर्टी असं सारं काही सांभाळावं लागतं. ‘तुकाराम’चे प्रोडक्शन डिझायनर म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. एकनाथ सांगतात की, तुकारामाची वीणा ही त्याच काळातील वाटायला हवी. त्यामुळे पंढरपूरला जाऊन काळानुरूप वीणा तयार करून घेतली. आजच्या काळातील वीणा वापरली असती ती सनमायका लावलेली चकाचक दिसली असती. पिरिअड फिल्मचा हा बाज सांभाळण्याचा अनुभव त्यांना लगानमुळे आला होता, त्याचाच येथे फायदा झाला.
चित्रपटातील एका प्रसंगाने मात्र सर्वाचीच परीक्षा पाहिली, तो म्हणजे दुष्काळाची तीव्रता दाखवणारी भेगाळलेली जमीन. त्यासाठी स्पेशल इफेक्ट करता आले असते. पण कदमांनी महिनाभर अनेक जागा शोधल्या. सोलापूरजवळ धरणाचं पाणी ओसरलेली जमीन सापडली. रहिमतपूरजवळचे संपूर्ण चित्रीकरण झाल्यावर केवळ या जमिनीसाठी एक दिवसाचं वेगळं चित्रीकरण त्या वेळी करण्यात आलं. अर्थात अशासाठी दिग्दर्शकाची मानसिक आणि आर्थिक तयारी असणंदेखील महत्त्वाचं असल्याचं एकनाथ नमूद करतात.
कलादिग्दर्शक, सेट डिझायनर्स म्हणून वाहवा मिळत असली तरी मुळात त्यामागे दिग्दर्शकाची दृष्टी महत्त्वाची असते, असं एकनाथ कदम आवर्जून सांगतात. दिग्दर्शकाच्या डोक्यात प्रसंगाची फ्रेम पक्की बसलेली असते. त्याच्या नजरेतून त्याला काय हवंय हे आम्हाला पाहायचं असतं आणि ते उभं करायचं असतं. हे जर नेमकं ओळखता आलं तर त्याची परिणामकारता वाढते.
‘नटसम्राट’ हे गाजलेलं नाटक असलं तरी ते रंगमंचावर सादर करताना दृश्यरचनेत नाही म्हटलं तरी मर्यादा येतात. तसं चित्रपटाचं नाही. त्यामुळेच चित्रपटातील दोन महत्त्वाच्या प्रसंगी एकनाथ कदम यांना बरेच परिश्रम करावे लागले. एक म्हणजे जळलेलं उद्ध्वस्त झालेलं नाटय़गृह आणि नटसम्राटाचे रेल्वे पुलाखालील वास्तव्य.
नटसम्राटाचं दु:ख मांडण्यासाठी उद्ध्वस्त असं नाटय़गृह वापरण्याची कल्पना दिग्दर्शकाची. त्याला मूर्त स्वरूप देताना एकनाथ यांच्या सेटमुळे एकूणच हा प्रसंग अंगावर येतो. ‘नटसम्राट’मध्ये जसे नाटय़गृह हवे होते तसे नाटय़गृह आता सध्या तरी आपल्याकडे उपलब्ध नाही. दुसरं असं की हे नाटय़गृह जळलेलं दाखवायचं होतं. म्हणजे एकतर असं नाटय़गृह तयार करावं लागणार होतं, आणि ते जाळायचं, मोडतोड करायची होती. खरंतर या चित्रपटासाठी सेट वापरायचे नाहीत असंच ठरलं होतं. रिअल लोकेशन वापरायच्या, असा विचार होता. पण हे नाटय़गृह तयारच करावं लागणार होतं, त्याला पर्याय नव्हता. आणि हे आव्हान एकनाथ कदम यांनी पेललं.
एकनाथ कदमांची सुरुवातच नाटकातून झाली होती. पडद्यामागे आणि रंगमंचावर अशा प्रत्येक ठिकाणी ते वावरले होते. नाटय़गृह त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य़ भिनलेलंच होतं. त्याचाचा फायदा हे नाटय़गृह उभं करताना झाला. रंगमंचाची रचना, त्यातील विंग्ज, प्रकाशयोजना, पडदे, वरच्या बाजूस लावलेल्या परांच्या, रंगमंचाच्या बाजूस असणाऱ्या खोल्यांच्यी रचना, जळक्या विंग्जमधून दिसणारी मेकअप रूम, प्रेक्षागृहातील लाकडी खुच्र्या अशा एकूणएक बारीकसारीक गोष्टी या सेटवर मांडल्या आहेत. अर्थात त्या निव्वळ दिसत नाहीत, तर त्या प्रसंगाची एकूणच व्याप्ती स्पष्ट करतात. नटसम्राटाच्या उतारवयातील विमनस्क अवस्थेत उन्मळून जाण्याच्या प्रसंगाची खोली वाढवण्याचं काम या सेटमुळे होतं. एकनाथ कदम सांगतात की, जळलेलं थिएटर कसं दिसेल याचा फील घ्यावा लागतो.
त्यांचा हा फील या सेटमध्ये उतरला आहे. नटसम्राटाची शोकांतिका या पाश्र्वभूमीवर पुरेपूर उतरली आहे. त्याच्या वेदनेचा धागा त्या नाटय़गृहाने बरोबर पकडला आहे.
रेल्वे स्थानकानजीकचा पूल हा चित्रपटातील दुसरा सेटदेखील असाच भन्नाट जमला आहे. एलफिन्सस्टन, परळ स्टेशनजवळची रचना यात अपेक्षित होती. या ठिकाणी नाना पाटेकर यांना घेऊन दिवसा काय रात्रीदेखील चित्रीकरण शक्य झाले नसते. तेव्हा हा सेट करावा लागला. या सेटच्या जिवंतपणाची पावती थेट दिग्दर्शकानेच दिली आहे.
चित्रीकरण संपल्यानंतर महेश मांजरेकर यांना एके दिवशी हा पुलाचा सेट एका जाहिरातीत वापरला गेला असल्याबद्दल काही लोकांनी सांगितले. जाहिरात व्यवस्थित पाहिल्यावरदेखील तसंच वाटत होतं. चित्रपटातील एकाही सेटचा अन्य कुठेही वापर झालेला नाही याबद्दल सर्वाना खात्री होती. हे कोडं नेमकं सुटत नव्हतं. खातरजमा करताना लक्षात आलं की ती जाहिरात थेट मूळ लोकेशनवरच चित्रित केली होती. अर्थातच हे साधम्र्य हीच एकनाथ कदम यांच्या कामाची पावती म्हणावी लागेल. आणि हेच कोणत्याही कलाकाराचं समाधान असतं.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?