14 October 2019

News Flash

मधुमेद आणि झोप

भारतात ज्या लोकांना मधुमेद असतो, त्यात बहुतेकांना ‘टाइप टू’ या स्वरूपाचा मधुमेद असतो.

डॉ. नितीन पाटणकर

मधुमेद व्हायला नको असेल तर योग्य आहार, व्यायाम यांच्या बरोबरीने सात ते आठ तासांची नियमित झोपदेखील अतिशय गरजेची असते.

मधुमेद आणि झोप यांचं नातं हे ‘तुझं नि माझं जमेना, तुझ्याविना करमेना’ असं असतं. मधुमेद आणि झोप या दोन शब्दांचा संबंध खूप पूर्वी, म्हणजे शाळेत असताना लक्षात आला होता. तेव्हा रक्त तपासणाऱ्या लॅब खूपच कमी असायच्या. गावाकडे तर नव्हत्याच. त्यामुळे माणसं मुंबईत रक्ततपासणीसाठी यायची. कुणा नातेवाईकांकडे वस्तीला राहायची, सकाळी रक्त तपासणीस देऊन मग गावाला जायची. रिपोर्ट आले की ते घेऊन मग ते पोस्टाने पाठवले जायचे. त्यानंतर मग गावातील डॉक्टर ते बघून इलाज करायचे. तेव्हा रोगसुद्धा बहुतेक संथ असावेत, कारण रक्ताच्या एखाद्या आठवडय़ापूर्वीच्या रिपोर्टवर डॉक्टर औषध द्यायचे आणि रोग तरीही बरा व्हायचा किंवा मधुमेद नियंत्रणात राहायचा. तर अशाच एका पाहुण्याचा साखरेचा रिपोर्ट आणायला मला लॅबमध्ये पिटाळण्यात आलं होतं. हे पाहुणे आमच्या घरी होते तेव्हा बसल्या बसल्या झोपत होते. मला ते पाहून जाम मजा येत होती. रात्री भयंकर घोरायचे आणि दिवसा झोपायचे बोलता बोलता. ते गेले गावाला निघून आणि मी रिपोर्ट आणायला लॅबमध्ये. मी रिपोर्ट घेतला. काही कारण नसताना, संबंध नसताना बालसुलभ आगाऊपणे डॉक्टरांसमोर गेलो. विचारलं, ‘कसे आहेत रिपोर्ट’. कारण घरी गेल्यानंतर आईने नक्की विचारले असते, आणि वर ‘चौकस बुद्धी हवी, विचारावं, बिरबल आणि बादशहाचा जावई’ अशा अनेक गोष्टी ऐकवल्या असत्या. डॉक्टर पेपर वाचीत बसले होते. त्यांनी पेपरातून डोकं वर काढून, ‘काय हवंय रे’ असं प्रेमळपणे खेकसून विचारलं.

‘रिपोर्ट कसे आहेत?’ मी

‘तू औषध देणार आहेस?’ डॉक्टर

‘नाही, आई विचारेल, डॉक्टरना विचारायचंस तरी, म्हणून विचारतो’ मी

मग डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले, बहुतेक साखर खूप जास्त असावी. ते एकदम ताठ झाले आणि म्हणाले, ‘अरे पेशंट आहे की साखरेची गोण? इतके दिवस काय झोपा काढतोय काय हा?’

या प्रश्नाला मी मोठय़ाने ‘हो सारखा झोपत असतो, पण झोपा हे झोपेचं अनेकवचन नाही’ असं सांगितलं. आता यात काय चुकलं कुणास ठाऊक, डॉक्टरांनी हातात रिपोर्ट कोंबले, एक सणसणीत रट्टा दिला आणि लॅबच्या बाहेर काढले. तेव्हापासून झोप आणि मधुमेद यांचा काहीतरी संबंध असतो हे लक्षात होतं.

जायफळ घालून श्रीखंड खाल्ल्यावर जसं अंगावर येतं, गुंगी येते तसं; मधुमेद असेल तर जरा कुठे जास्त खाणं झालं की अंगावर येतं, झोप येते. झोपेत मात्र बरेचदा विचित्र स्वप्नं पडतात, रात्री घाईची लघवीला जाण्याची भावना होऊन, झोपमोड होत राहते.

रात्रीच्या जागरणांची सवय लागली तर, उत्तररात्री आणि दुसऱ्या दिवशी गोड आणि तळलेल्या पदार्थावरील वासना वाढते, त्यातून स्थूलता आणि मधुमेद होण्याची शक्यतादेखील वाढते. अमेरिकेमधील २३ शहरांमध्ये मिळून एक सर्वे केला गेला ज्यात तीन हजारपेक्षा जास्त लोकांचा अंतर्भाव होता. या चाचणीचा अहवाल, ‘असोसिएटेड प्रोफेशनल स्लीप सोसायटी’ या संस्थेने प्रसिद्ध केला, ज्यात नमूद करण्यात आलं आहे की जंक फूड खायला मिळालं नाही तर जे अस्वस्थ होतात, (क्रेविंग असते जंक फूडचे ) त्यांच्यामध्ये झोप न घेतल्यास मधुमेद होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं.

‘बी.एम्.सी. पब्लिक हेल्थ’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका कोरिअन चाचणीत, एक लाखाहून जास्त लोकांची निरीक्षणं नोंदवली गेली, त्यांच्यामध्ये एक मजेशीर बाब पुढे आली आहे. सहा तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांच्यात मधुमेदाचं प्रमाण वाढतंच पण दहा तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांच्यात पेण मधुमेदाचं प्रमाण तितकंच वाढलेलं दिसतं.

भारतात ज्या लोकांना मधुमेद असतो, त्यात बहुतेकांना ‘टाइप टू’ या स्वरूपाचा मधुमेद असतो. ज्यामधे ‘इन्सुलिन रेसिस्टन्स’ म्हणजे इन्सुलिन जास्त पाझरूनदेखील त्याचा प्रभाव कमी असतो. हे घडण्यामागे अनेक कारणे असतात, त्यातील एक कारण, ‘रात्री झोपताना, दिवा किंवा टय़ूूब चालू ठेवून झोपणे’ हे असतं. ‘मालवून टाक दीप’ हे गाणं खरं तर मधुमेद असलेल्या व्यक्तींनी सतत ऐकवायला हवं इतरांना.

मधुमेद आणि घोरणं यांचा संबंध तर वेगळाच. या घोरण्यात पण दोन मुख्य घराणी आहेत. आवाजी आणि अवाजवी. आवाजी घोरणाऱ्यांना स्वत:ला त्रास नसतो, पण सोबत असणाऱ्यांना सराव होईपर्यंत त्रास असतो. अवाजवी घोरणाऱ्यांना मात्र झोपेत प्राणवायू कमी पडतो. त्याला ओएस्ए (ऑबस्ट्रक्टिव स्लीप अ‍ॅपनिया) म्हणतात. यांच्यामध्ये रक्तदाब, स्थूलता आणि मधुमेद होण्याची शक्यता खूप जास्त असते. या लोकांना नुसती साखर नॉर्मल असून चालत नाही तर वजनावर नियंत्रण राखणं हे अत्यंत गरजेचं असतं. यातही कहानीमे ट्विस्ट आहेच. ज्या लोकांना इन्सुलिन घ्यावेच लागते, त्यांच्यामध्ये घोररोग चालू होऊ शकतो.

म्हणून मधुमेद होऊ नये किंवा झाला असल्यास वाढू नये म्हणून आहार, व्यायाम, औषधे यांच्या बरोबरीने सात ते आठ तास बिनघोर झोप, तीसुद्धा ‘मालवून टाक दीप’ हे गाणं ऐकत आणि ऐकवत घ्यायला हवी. आता हे गाणं ऐकून झोप उडणार असेल तर मात्र इलाज नाही.

response.lokprabha@expressindia.com

First Published on September 28, 2018 1:03 am

Web Title: article about diabetes and sleep