News Flash

सफरनामा : झुक झुक हेरिटेज गाडी..

आज हेरिटेज रेल्वेचा मान मिरवणाऱ्या या रेल्वेने प्रवास करायला परदेशी पर्यटकही आवर्जून येतात.       

मकरंद जोशी response.lokprabha@expressindia.com

कोणत्याही सहलीला, प्रवासाला निघाल्यावर जिकडे जायचे, ज्या ठिकाणाला भेट द्यायची त्या ठिकाणाबद्दल नेहमीच मनात आकर्षण असते. तिथे काय काय पाहायचे, तिथल्या निसर्गसौंदर्याबाबत, पर्यटन आकर्षणांबद्दल मनात उत्सुकता, ओढ आणि काही अपेक्षा असतात; पण ज्या पर्यटन स्थळाला भेट द्यायची आहे, त्या स्थळापेक्षा तिथवरचा प्रवासच जास्त उत्कठांवर्धक, रोमांचक असेल तर? नाही तरी म्हटले आहेच ना की- ‘द जर्नी इज द डेस्टिनेशन!’ मग चला, जिथे प्रवास हेच पर्यटनस्थळ ते अशा अनोख्या प्रवासाला. आपल्या भारतातील काही ठिकाणांकडे जाण्याचा प्रवास म्हणजे प्रवासाचे साधनच इतके अफलातून आहे की, खरोखरच त्याचा अनुभव घेतल्यानंतर ‘तो प्रवास सुंदर होता’ म्हणावेसे वाटते. हा अनुभव आपल्याला घेता येतो, कारण स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश राज्यकर्त्यांना या देशाच्या उष्ण हवेनं असा काही चटका दिला की, उन्हाळ्याच्या काळात जिवाला थंडावा मिळावा म्हणून गोऱ्या साहेबाने भारतातील पहाडांचा आश्रय घ्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच हिल स्टेशन्स अर्थात गिरिस्थानांची निर्मिती झाली. या डोंगरमाथ्यावरील उन्हाळी आश्रयस्थानांकडे जायला म्हणून इंग्रजांनी भारतातील रेल गाडीला पहाडावर चढवली आणि खेळण्यातली वाटावी अशी छोटी, पण दमदार झुक झुक गाडी धुरांच्या रेषा हवेत काढत कधी शिमल्याची, तर कधी दार्जिलिंगची वाट चालू लागली. गोरा साहेब गेला, पण त्याने सुरू केलेली ‘टॉय ट्रेन’ आजही भारतीय पर्यटनाला अनोखे परिमाण देत डोंगरातून धावत आहे. आज हेरिटेज रेल्वेचा मान मिरवणाऱ्या या रेल्वेने प्रवास करायला परदेशी पर्यटकही आवर्जून येतात.

पश्चिम बंगालमधील लोकप्रिय हिल स्टेशन असलेले दार्जिलिंग आज ओळखले जाते ते इथल्या चहाच्या मळ्यांसाठी; पण १८३५ मध्ये तेव्हाच्या ईस्ट इंडिया कंपनीने सिक्किमपासून स्वतंत्र केलेले दार्जिलिंग निवडले होते ते कंपनीच्या अपंग सैनिकांसाठी आरोग्यधाम म्हणून. पुढे १८३९ साली उन्हाळ्यातील विश्रांतीचे ठिकाण म्हणून दार्जिलिंगचे नियोजन करून वस्ती वाढवण्यात आली. सिलिगुडी ते दार्जिलिंग हा रस्ताही तेव्हाच तयार करण्यात आला. नंतरच्या काळात दार्जिलिंगमधला चहा निर्यात करण्यासाठी आणि दार्जिलिंगला रास्त भावाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा म्हणून रेल्वे मार्गाची निकड भासू लागली. १८८१ साली दार्जिलिंग हिमालयन रेल्वे कंपनी नावाने कंपनी स्थापन करण्यात आली आणि याच कंपनीने सिलिगुडी ते दार्जिलिंग ही टॉय ट्रेन सुरू केली. पहिल्याच वर्षी या रेल्वेने आठ हजार प्रवाशांनी प्रवास केला आणि ३८० टन मालाची वाहतूक केली. या रेल्वे मार्गाचे वैशिष्टय़ म्हणजे खडी चढण चढणे रेल्वे इंजिनाला सोपे जावे म्हणून या मार्गावर लूप्स आणि इंग्रजी झेड आकाराचे रिव्हर्स बांधण्यात आले आहेत. यातला सगळ्यात प्रसिद्ध आहे ‘बतासिया लूप’, हे चक्राकार वळण दार्जिलिंग शहराच्या आधी पाच किमीवर आहे. याच ठिकाणी भारतीय सैन्यातील गोरखा रेजिमेंटच्या शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. त्याभोवती सुंदर, आखीवरेखीव उद्यान साकारण्यात आले आहे. या ठिकाणाहून अवतीभवती पसरलेल्या दार्जिलिंगचे मोहक दृश्य जसे दिसते, त्याचप्रमाणे उंचीच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘कांचनजंगा’ शिखराचे दर्शनही घडते. दार्जिलिंगच्या हेरिटेज रेल्वेचे वैशिष्टय़ म्हणजे या रेल्वेमार्गाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५५ धावतो. ‘आराधना’मधल्या ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ या लोकप्रिय गाण्यामुळे दार्जिलिंगची टॉय ट्रेन एकदम प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘राजू बन गया जंटलमन’, परिणीता’, ‘बर्फी’ या सिनेमांमधूनही ही झुक झुक गाडी दिसली. या टॉय ट्रेनसाठी बागडोगरा विमानतळावरून दीड तासात जलपायगुडी गाठता येते तसेच कोलकात्याहून रेल्वेने यायचा पर्यायही उपलब्ध आहे.

दार्जिलिंग हे तसे सिक्किमचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कॅलिम्पॉन्ग, गॅन्गटोक, लाचुंग, पेलिंग, नामची या स्थानांसाठी तुम्हाला दार्जिलिंग गाठावेच लागते, मात्र अलीकडे दार्जिलिंग शहर पर्यटकांच्या वाढत्या लोंढय़ामुळे ऐन मोसमात जरा जास्तच गजबजलेले असते. त्यामुळे दार्जिलिंगपेक्षा त्याच्या जवळच्या ‘मिरीक’मध्ये मुक्काम करावा. दार्जिलिंगपासून फक्त ५० किमीवर असलेल्या मिरीकचे मुख्य आकर्षण म्हणजे इथले रमणीय सरोवर. समुद्रसपाटीपासून पाच हजार फुटांवर असलेल्या मिरीकमध्ये संत्र्यांच्या बागा, वेलचीची लागवड केलेली पाहायला मिळते. मिरीकचा सगळा जीव एकवटलेला आहे तो ‘सुमेंदू लेक’ या सरोवरामध्ये. सुमारे साडेतीन किमीचा विस्तार लाभलेल्या या सरोवरात नौकाविहार करता येतो तसेच तट्टूवर बसून या तळ्याला फेरीही मारता येते. हवामान स्वच्छ असते तेव्हा या सरोवराच्या पाण्यात कांचनजंगाच्या हिमशिखराचे अप्रतिम प्रतिबिंब पाहायला मिळते. पूर्वी आजूबाजूच्या गावांतील आणि चहाच्या मळ्यातील लोकांचे बाजाराचे ठिकाण म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या मिरीकमधला बाजार पर्यटकांनाही आकर्षित करतो. त्याबरोबरच मिरीकजवळच नेपाळच्या सीमेला लागून असलेले ‘पशुपती मार्केट’देखील भेट देण्यासारखे आहे. तिंगलिंग व्ह्य़ू पॉइंट, सनराइज पॉइंट, बोकर मॉनेस्ट्री अशा ठिकाणांमुळे मिरीकची भेट रंगतदार होते.

भारताच्या पूर्व कोपऱ्यातील पहाडावर झुक झुक गाडी चढवल्यानंतर ब्रिटिश सरकारने आपले लक्ष केंद्रित केले ते दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतरांगेकडे. हिरव्याकंच जंगलाने आच्छादलेल्या या पर्वतरांगेत कुन्नूर आणि उदकमंडलम (अर्थात ऊटी) सारखी हिल स्टेशन्स आहेत. मात्र १८५४ साली प्रस्तावित झालेला हा रेल्वेमार्ग तब्बल ४५ वर्षांनी प्रत्यक्षात आला. १८९९ साली या माऊंटन रेल्वेचा प्रवास सुरू झाला तेव्हा ती मेट्टुपलायम ते कुन्नूर इतकीच धावत असे. नंतर १९०८ सालापासून ती उदकमंडलमपर्यंत धावायला लागली. मेट्टूपलायम ते उदकमंडलम या २६ किलोमीटरच्या मार्गात ही झुक झुक गाडी १६ बोगदे पार करते आणि २५० पूल ओलांडते. स्वातंत्र्यपूर्व काळात ती मद्रास रेल्वेकडून चालवण्यात येत असे तेव्हा त्यासाठी वापरली जाणारी वाफेची इंजिन्स स्वित्र्झलडच्या कंपनीकडून तयार करवून घेण्यात येत असत. या रेल्वेचा प्रवास सुरू होतो तो दुतर्फा पसरलेल्या केळीच्या आणि सुपारीच्या बागांमधून- कल्लार या पहिल्या स्थानकापासून. नावाला शोभेसा डोंगरदऱ्यांमधला प्रवास सुरू होतो आणि बाहेर दिसणाऱ्या निसर्गदृश्याने आपले डोळे सुखावतात. कुन्नूपर्यंत वाफेचे इंजिन आणि पुढे डिझेलचे इंजिन अशी विभागणी आहे. कुन्नूरला इंजिन बदलले जात असताना चटकदार ओनियन सामोसे, गरमागरम परुप्पू वडाइ (डाळ वडे) आणि मसाला चहाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. निलगिरीचे निसर्गसौंदर्य दाखवणारी ही रेल्वे प्रसिद्धीच्या झोतात आली ती ‘दिल से’मधल्या ‘छैया छैया’ गाण्यामुळे. मेट्टूपलायम रेल्वे स्थानकातील संग्रहालयाला भेट द्यायला विसरू नका. या संग्रहालयात जुन्या छायाचित्रांमधून, मॉडेल्समधून निलगिरी माऊंटन रेल्वेचा इतिहास जतन केलेला आहे. मेट्टूपलायमसाठी जवळचा विमानतळ आणि मोठे शहर कोइम्बतुर आहे.

निलगिरी माऊंटन रेल्वे उदकमंडलम् म्हणजे ऊटीपर्यंत जात असली तरी अतिशय व्यापारीकरण झालेल्या ऊटीपेक्षा त्या आधीचे कुन्नूर हे सुट्टीचा आनंद घ्यायला खऱ्या अर्थाने उत्तम ठिकाण आहे. सहा हजार फुटांवर वसलेले कुन्नूर चहाच्या मळ्यांसाठी ओळखले जाते. मुळात स्थानिक तोडा जमातीची लहानशी वस्ती असलेले कुन्नूर ईस्ट इंडिया कंपनीच्या जॉन सुलिवनमुळे ब्रिटिशांच्या नजरेत भरले आणि त्यांनी थंड हवेचे ठिकाण म्हणून ते विकसित केले. अपर आणि लोअर अशा दोन स्तरांमध्ये विभागलेल्या कुन्नूरमध्ये शांत, निवांत निवासासाठी अपर विभागाचा रस्ता धरावा. कुन्नूरचे हिरवे आकर्षण म्हणजे ‘सिम्स पार्क’ हे बोटॅनिकल गार्डन सुमारे ३० एकर जमिनीवर पसरलेले आहे. रुद्राक्षापासून ते दालचिनीपर्यंत नाना प्रकारची झाडे इथे पाहायला मिळतात. दरवर्षी मे महिन्यात सिम्स पार्कमध्ये आयोजित करण्यात येणारा फळे आणि भाज्यांचा महोत्सव प्रसिद्ध आहे. कुन्नूरच्या जवळच ऐतिहासिक ‘द्रुगचा किल्ला’ आहे. टिपू सुलतानाने इथे टेहळणीसाठी ठाणे उभारले होते. आता त्यातील फक्त घडय़ाळाचा मनोरा शिल्लक आहे. स्थानिक पुराणकथेनुसार महाभारतातील बकासुर इथेच राहात होता, त्यामुळे या जागेला ‘बकासुर मलाइ’ असेही म्हणतात.

कुन्नूरजवळ (१२ किमीवर) असलेला डॉल्फिन्स नोज व्ह्य़ू पॉइंट पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. या पहाडावरून कुन्नूर परिसराच्या विहंगम दृश्याचा आनंद घेता येतो. याच ठिकाणाहून ‘कॅथरिन फॉल्स’ या धबधब्याचेही दर्शन होते. अर्थात असं दुरून दर्शन घेऊन मन भरत नाही. मग धबधब्याला भेट देणे क्रमप्राप्तच असते. कोट्टागिरीमध्ये कॉफीची लागवड सुरू करणाऱ्या एम.डी. कॉकबर्न याच्या पत्नीचे कॅथरिनचे नाव या धबधब्याला दिले आहे. कुन्नूरला राहून तुम्ही ऊटीला भेट देऊ शकता, त्यामुळे ऊटीची गर्दी टाळून तिथले स्थलदर्शन करण्याचा आनंद घेता येतो.

निलगिरी माऊंटनमध्ये पहाडी रेल्वे सुरू केल्यानंतर ब्रिटिशांनी आपला मोहरा वळवला तो त्यांच्या लाडक्या शिमल्याकडे. १८१६ मध्ये झालेल्या करारामुळे शिमला नेपाळकडून ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आले होते. त्यानंतर १८६४ सालापासून ‘समर कॅपिटल’चा दर्जा देऊन दिल्लीचे साहेबाचे सरकार दर उन्हाळ्यात शिमल्यात तळ ठोकू लागले. त्यामुळे या उन्हाळी राजधानीपर्यंत थेट रेल्वे सेवा असणे गरजेची बाब झाली होती. १८९१ सालीच दिल्ली ते कालका ब्रॉडगेज रेल्वे मार्ग सुरू झाला होता. त्यानंतर पुढच्या रेल्वे मार्गाची सर्वेक्षणे करण्यात आली आणि नंतर काम सुरू झाले. ९ नोव्हेंबर १९०३ रोजी कालका-शिमला रेल्वे मार्गाचे उद्घाटन तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या हस्ते करण्यात आले. गेली ११८ वर्षे ही पहाडातली रेल्वे छोटय़ा रुळांवरून धावत हिमाचलच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवत आहे. या रेल्वेमार्गावर मुळात १०७ बोगदे होते, त्यातले १०२ आज वापरात आहेत. त्यातला सर्वात मोठा (३ हजार ७५२ फूट) आहे ‘बारोग बोगदा’. याची एक लोककथा सांगितली जाते. हा बोगदा खोदणारे अभियंते कर्नल बारोग यांनी हा बोगदा एकाचवेळी दोन्ही बाजूंनी खोदायला घेतला, मात्र काही तरी चुकले आणि दोन्ही टोके मिळालीच नाहीत. त्याबद्दल त्यांना प्रतीकात्मक एक रुपया दंड आकारण्यात आला, पण त्यामुळे निराश झालेल्या कर्नल बारोगने त्याच अर्धवट बोगद्यात आत्महत्या केली. पुढे मुख्य अभियंता हर्लिग्टनने भाल्कू नावाच्या साधूच्या मदतीने हा बोगदा पूर्ण केला. शिमल्याकडे जाताना या रेल्वेचा प्रवास २ हजार १५२ फुटांवर सुरू होतो आणि ६ हजार ११८ फुटांवर येऊन थांबतो. या रेल्वेमार्गावर एकूण ८६४ पूल आहेत, त्यातील २२६ आणि ५४१ क्रमांकाचे पूल त्यांच्या बहुस्तरीय रचनेमुळे लक्षवेधी ठरतात.

ही भारतातील अशी एकमेव हेरिटेज रेल्वे आहे जी हिवाळ्यातील बर्फवृष्टीतही धावत असते. भोवताली पसरलेली हिमाची पांढरीशुभ्र चादर आणि इंजिनसमोर बांधलेल्या स्नो कटरने बर्फाचा चुरा करत धावणारी ट्रेन असे अनोखे दृश्य तेव्हा पाहायला मिळते. १९३० साली महात्मा गांधीजींनी लॉर्ड आयर्विनला भेटायला जाताना या रेल्वेने प्रवास केला होता. दिल्ली किंवा चंडीगडहून कालका येथे येऊन या रेल्वेचा प्रवास सुरू करता येतो.

कालका-शिमला रेल्वेचा प्रवास करून शिमल्याला जायचे, पण एके काळच्या या उन्हाळी राजधानीत राहाण्यापेक्षा आसपासच्या जरा शांत-निवांत ठिकाणांचा आश्रय घ्यायचा. शिमल्यापासून ६० किमीवर ‘नारकंडा’ आहे. अवतीभोवती हिरवाईने मढलेले डोंगर घेऊन हे शहर निवांतपणे पसरलेले आहे. ८ हजार ५९९ फुटांवर वसलेल्या नारकंडाच्या परिसरात सत्यानंद स्टोक्स यांनी सफरचंदाची लागवड सुरू केली आणि आज याच लागवडीतून या परिसरातील लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या वर्षांला सुमारे तीन हजार कोटींचे उत्पन्न मिळते. कोनिफर, ओक, मेपल, पोपलर अशा सूचिपर्णी वृक्षांच्या घनदाट अरण्याने नारकंडा वेढलेले आहे. हिवाळ्यात स्किइंगसाठी आणि उन्हाळ्यात ट्रेकिंगसाठी नारकंडाकडे साहसी पर्यटकांची पावले हमखास वळतात. नारकंडाजवळच ११ हजार १५२ फूट उंचीचे हटू पीक आहे. या शिखरावर हटू मातेचे मंदिर आहे. सुमारे आठ किलोमीटरचा ट्रेक करूनच मंदिर गाठता येते. कालीमातेचे हे मंदिर लाकडात बांधलेले आहे आणि या मंदिराच्या आवारात एक दगडाची चूल आहे. स्थानिकांमध्ये समजूत आहे की, याच चुलीवर पांडवांनी अज्ञातवासात असताना स्वयंपाक केला होता. याशिवाय शिमल्याच्या आसपास चैल, कसौली, मशोब्रा अशी काही स्थाने आहेत जिथे राहून पहाडांचे नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता मनमुराद अनुभवता येते.

दार्जिलिंग, उदकमंडलम आणि शिमला या तिन्ही ठिकाणांकडे नेणाऱ्या टॉय ट्रेन्सचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत झाला आहे; पण याच माळेतली असूनही अजूनही या यादीत स्थान न मिळवलेली रेल्वे म्हणजे नेरळ-माथेरान टॉय ट्रेन. १८५० मध्ये ठाण्याचे कलेक्टर मॅलेट साहेबांना माथेरानचा शोध लागला. मुंबईच्या इतक्या जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन यांनी हे स्थान विकसित करायला परवानगी दिली. मात्र या गिरिस्थानाकडे नेणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम केले आदमजी पिरभॉय यांनी. सन १९०४ ते ०७ या काळात १६ लाख रुपये खर्चून त्यांनी हा रेल्वेमार्ग तयार करून घेतला. मुंबईतील उपनगरी रेल्वेने कर्जतच्या आधी असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकावर उतरल्यावर माथेरानकडे जाणाऱ्या टॉय ट्रेनचे डबे दिसू लागतात. त्यामुळे रस्त्याचा पर्याय उपलब्ध असला तरीही पावले या ट्रेनचे तिकीट काढायलाच वळतात. नेरळहून माथेरानपर्यंतचे २० किमीचे अंतर कापताना ही रेल्वे जुम्मापट्टी, वॉटरपाइप, अमन लॉज या स्थानकांवर थांबे घेते. या सगळ्या प्रवासात पावसाळ्यात सह्य़ाद्रीच्या माथ्यावरून कोसळणाऱ्या जलधारा, तर हिवाळ्यात दरीतून उठणारे धुक्याचे लोट आपली सोबत करतात. मात्र या रेल्वेची प्रकृती अलीकडे जरा जास्तच वेळा बिघडू लागली आहे. त्यामुळे अनेकदा फक्त अमन लॉज ते माथेरान अशा छोटय़ाशा प्रवासावर भागवावे लागते. भारतातल्या आकाराने चिमुकल्या असणाऱ्या हिल स्टेशन्सपैकी एक असलेले माथेरान समुद्रसपाटीपासून २ हजार ६२५ फुटांवर वसलेले आहे. नावाला जागून डोंगरमाथ्यावरचे हिरवकंच रान, त्यातून वळत गेलेल्या लाल मातीच्या वाटा आणि या वाटा संपतात तिथे तोंड वासून बसलेल्या दऱ्या, यामुळे आजही माथेरानमध्ये फिरताना टाइम मशीनमध्ये बसून भूतकाळात गेल्याचा भास होतो. पॅनोरमा, लुईसा, मंकी, वन ट्री हील, हार्ट पॉइंट असे एकूण ३८ पॉइंट इथे आहेत. माथेरानला गेल्यावर घोडय़ावर बसणे जसे अनिवार्य आहे तसेच इथून परत येताना येथली सुप्रसिद्ध चिक्की खरेदी करणेही अनिवार्यच आहे. माथेरानच्या जंगलात भेकर, कोल्हा, वानर, रानडुक्कर, शेकरू असे प्राणी आणि स्वर्गीय नर्तक, कोकीळ, तुरेधारी सर्प गरुड, सुभग, कोतवाल, शमा, शिंजीर, खंडय़ा, ऑरेंज हेडेड थ्रश असे शेकडो प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे माथेरान म्हणजे पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण आहे.

तर मग या वर्षीचा पर्यटन बेत आखताना भारतातील चार हेरिटेज रेल्वेंपैकी किमान एका तरी रेल्वेने प्रवास करण्याचा संकल्प अवश्य करा. या टॉय ट्रेनमध्ये बसून प्रवास करताना आपोआप तुम्ही ‘झुक झुक झुक हेरिटेज गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी’ हे गाणे गुणगुणायला कधी लागाल कळणारही नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 1:05 am

Web Title: article about heritage train heritage railway zws 70
Next Stories
1 तंत्रज्ञान : वायफाय कसं निवडावं, कसं वापरावं?
2 निमित्त : गूगल बदलतंय..
3 तंत्रज्ञान : टिक् टिक् झाली स्मार्ट..
Just Now!
X