डॉ. गजानन रत्नपारखी

झोपेची तक्रार आणि हृदयविकार यांचे अगदी जवळचे नाते दिसून येते. म्हणूनच पुरेशी आणि व्यवस्थित झोप नियमित घेतली गेली पाहिजे.

सध्याच्या स्पर्धात्मक जगात एकूणच आपली जीवनशैली बदलली आहे. अर्थातच आचार, विचार, आहार आणि विहार यामध्ये प्रचंड अनियमितता आणि प्रतिकूल बदल होत गेले. या सर्वामुळे ज्या विकारांना आपण जवळ केले त्यामध्ये हृदयविकार हा एक महत्त्वाचा विकार आहे. हृदयविकाराच्या रुग्णांची वाढती संख्या पाहताना आणि त्यामागील कारण तपासताना काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. त्यामध्ये झोप न येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळेच झोप आणि हृदयविकार यामधील संबंध समजून घेणे गरजेचे आहे.

अनेक लोकांना झोपेत श्वास थांबण्याचा त्रास होतो. सर्दी, पडसे किंवा नाकाचा पडदा हा एका बाजूला प्रमाणाच्या बाहेर सरकण्याने हा त्रास होतो असा समज बऱ्याच लोकांचा असतो. अनेकांच्या झोपेत दहा ते वीस सेकंद त्यांचा श्वास थांबतो. आणि अनेक रात्री हा प्रकार सुरू असतो. या आजारास वैद्यकीय भाषेत स्लीप अ‍ॅप्निया असे म्हणतात.

अती लठ्ठ लोकांच्या श्वसननलिकेत आणि घशाच्या मागील बाजूस अतिरिक्त पेशींची वाढ होते. त्या पेशी श्वसनमार्गात अडथळा निर्माण करतात. झोपेत फुप्फुसाकडे जाणारा हवेचा प्रवाह कमी झालेल्या श्वसननलिकेतून जाताना एक प्रकारचा आवाज करतो. तेच घोरणे. श्वसननलिकेचे संकुचित होणे हे अति चरबीमुळे किंवा अति रिलॅक्सेशनमुळे होते. पुष्कळदा हवा फुप्फुसापर्यंत जाऊ शकत नाही. काही काळ श्वास थांबतो. त्याला अ‍ॅप्निया असे म्हणतात.

अ‍ॅप्नियाची साधारण लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. रात्रीच्या अस्वस्थ झोपेमुळे दिवसा झोप येणे, अति झोप येणे, गुंगी येणे, एकाग्रता कमी होणे, सकाळी डोके दुखणे, ताजेतवाने न वाटणे. स्मरणशक्ती कमी होणे. नराश्याची भावना वाढणे. चिडचीड होणे. दिवसा आणि रात्रीदेखील घोरणे.

मग झोप कमी झाल्यामुळे अनेक विकार जडण्याची शक्यता असते. स्लीप अ‍ॅप्नियाच्या रुग्णांमध्ये सतत वजन वाढणे, मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात होण्याची शक्यता अधिक असते.

अ‍ॅप्नियाच्या घटनेमध्ये शरीरातील सिंपथेटिक सिस्टम कार्यरत होतात. त्यामुळे हृदयाची गती वाढते. रक्तातले ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तदाब व हृदयाची गती वाढते.

ऑबस्ट्रॅक्टिव स्लीप अ‍ॅप्नियामुळे (ओएसए)  अर्थातच हृदयविकाराला आमंत्रणच मिळते. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या आधारे काही आकडेवारी येथे सुरुवातीलाच मांडावी लागेल.

सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रकारच्या हृदयरोगाचे रुग्णाच्या तपासणीनंतर लक्षात येते की यापैकी ३० टक्के लोकांना ओएसए आहे. हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये ५० टक्के रुग्णांना ऑबस्ट्रॅक्टिव स्लीप अ‍ॅप्नियाचा आजार असतो. तर रक्तदाबाच्या तक्रारीमध्ये ३०-३५ टक्के लोक हे या  आजाराशी निगडित असतात. ज्यांना प्रतिरोधक उच्च रक्तदाबाचा (म्हणजे तीन प्रकारच्या गोळ्या घेऊन देखील रक्तदाब नियंत्रणात येत नाही) त्रास आहे अशांपैकी ८५ टक्के लोक हे ऑबस्ट्रॅक्टिव स्लीप अ‍ॅप्नियाचे बळी असतात.

उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन)

एखाद्या रुग्णाचा अ‍ॅप्निया आणि हायपो अ‍ॅप्निया इंडेक्स जास्त असेल तर उच्च रक्तदाबाचा विकार होण्याची शक्यता अधिक असते. शरीरातील सिंपथेटिक सिस्टिम कार्यरत होणे हे उच्च रक्तदाबाचे कारण आहे. ही यंत्रणा कार्यरत झाल्यानंतर शरीरातील अ‍ॅड्रिनलिन आणि नॉन अ‍ॅड्रिनलिन नावाचे हार्मोन्स रक्तदाब वाढवतात. त्याव्यतिरिक्त इतरही हार्मोन्स असतात. ओएसएची समस्या असेल तर रक्तदाब हा झोपेत वाढतो. त्याला वैद्यकीय भाषेत नॉक्चरनल  हायपर टेन्शन (रात्रीच्या वेळी वाढणारा रक्तदाब) असे म्हणतो. श्वास कमी होतो त्यामुळे अड्रिनलिन सिस्टिम कार्यरत होते. ३० टक्के उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये ओएसएची समस्या हमखास सापडते. कंटिन्यअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर मशीनचा वापर करून अड्रिनलिन सिस्टिम कार्यरत करण्याचा त्रास कमी करता येतो.

पक्षाघात

स्लीप अ‍ॅप्निया आहे अशा लोकांना स्ट्रोक येणाचे प्रमाण हे दुप्पट असते. अशा लोकांना उच्च रक्तदाब असतो, रक्त थोडे घट्ट असते गुठळी तयार होण्याची शक्यता अधिक असते. अ‍ॅप्नियामुळे जेव्हा श्वास रोखला जातो तेव्हा मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो. अशा व्यक्तींमध्ये पक्षाघाताचे प्रमाण अधिक असते.

कोरोनरी हार्ट डिजिस

स्लीप अ‍ॅप्नियाच्या रुग्णांसाठी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमधील अडथळे येणे हे सर्वाधिक धोक्याचा घटक म्हणता येईल. हे प्रमाण स्लीप अ‍ॅप्निया नसलेल्या रुग्णांपेक्षा जवळपास दीड ते दोन पटीने अधिक आहे. अशा रुग्णांचा ईसीजी काढला तर त्यात खूप मोठे बदल आढळून येतात. वेदना समजत नाहीत त्यामुळे झोपेतच मृत्यू येण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे.

हार्ट फेल्युअर

स्लीप अ‍ॅप्निया असणाऱ्यांमध्ये हार्ट फेल्युअरचे प्रमाण इतरांपेक्षा तीन ते चार पटीने अधिक आहे. हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये ४० टक्के लोकांना ऑब्स्ट्रॅकक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया असल्याचे आढळून येते. झोपेच्या विकारांमुळे रक्तपुरवठा नियमित होत नाही. रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी आणि सॉल्टचे प्रमाण वाढते. पाणी जमा होते. परिणामी हार्ट फेल्युअर होते. स्लीप अ‍ॅप्निया असणाऱ्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. (साधारण साठ वर्षांनंतर हे प्रमाण समान होते.) लठ्ठ व्यक्ती ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा ३५ पेक्षा अधिक आहे आणि स्लीप अ‍ॅप्नियादेखील आहे त्या रुग्णांमध्ये हार्ट फेल्युअरचे प्रमाण तीन ते चार पटीने अधिक असल्याचे दिसते.

हृदयाची गती अनियमित होणे

स्लीप अ‍ॅप्नियामध्ये हृदयाची गती अनियमित होण्याचे प्रमाण खूप अधिक असते. हे दोन्ही विकार असलेल्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण दुप्पट असते. स्लीप अ‍ॅप्निया असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयाची गती अनियमित होण्याचे प्रमाण वीस टक्के आहे आणि स्लीप अ‍ॅप्निया जर खूपच तीव्र असेल तर (वीस सेंकदांपर्यंत श्वास रोखला जाणे) ३०-४० टक्के लोकांना हृदयाची गती अनियमित होण्याच्या आजाराला तोंड द्यावे लागते.  अशा रुग्णांमध्ये स्लीप अ‍ॅप्नियाचे रुग्ण हे ५० टक्के असतातच.  थोडक्यात झोपेची तक्रार आणि हृदयविकार यांचे अगदी जवळचे नाते दिसून येते. त्यामुळे झोप व्यवस्थित झाली तर नक्कीच पुढील आजाराकडचा प्रवास थांबवता येऊ शकतो.

काय कराल?

* धूम्रपान, मद्यपान टाळावे.

* लठ्ठ पणा कमी करा, नियमित व्यायाम करा.

* झोपेच्या गोळ्या घेणे टाळावे.

* झोपण्यापूर्वी मांसाहारी जेवण टाळावे.

* जेवण आणि झोपेमध्ये तीन तास अंतर ठेवावे.

* झोपचे तास नियमित ठेवावे.

*  झोपण्यापूर्वी उत्तेजके घेऊ नयेत.

(शब्दांकन : सुहास जोशी)