14 October 2019

News Flash

दसरा विशेष : तुझ्या गळा, माझ्या गळा..

प्रत्येक समाजातील अलंकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यातही स्त्रिया, पुरुष व मुलांचे अलंकार भिन्न भिन्न प्रकारचे असतात.

(संग्रहित छायाचित्र)

राधिका कुंटे

आपल्याकडील दागिन्यांच्या परंपरेत प्रचंड वैविध्य आहे. उदाहरण म्हणून फक्त गळ्यातले दागिने घेतल्यास त्यांची ठुशी, वजट्रिका, चिंचपेटी, लफ्फा, तन्मणी, पुतळीहार, मोहनमाळ वगरे भली मोठ्ठी यादी तयार होते. जाणून घेऊ या, त्यापैकी काही दागिन्यांविषयी.

प्रत्येक समाजातील अलंकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यातही स्त्रिया, पुरुष व मुलांचे अलंकार भिन्न भिन्न प्रकारचे असतात. सौंदर्यदृष्टी बदलते, तशी अलंकारांची जडणघडणही बदलते. भारतीयांची अलंकारप्रियता ग्रीक इतिहासकारांनी वर्णिली आहे. भारतातील प्राचीन काळची सोने, मोती, रत्ने यांची समृद्धी लक्षात घेता भारतीयांच्या दागिन्यांच्या हौसेचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. वेदांमध्ये विविध अलंकारांचा उल्लेख आलेला आहे. मोहेंजोदडो आणि हडाप्पा येथील स्त्री-पुरुषांना अलंकारांची हौस दिसते. त्या काळच्या स्त्रिया गळ्यात ताईत बांधत व हारही घालत. शिवाय कंबर, बोटं, पायांत इतर अलंकार घालत. तत्कालीन श्रीमंतांचे दागिने सोने, चांदी व मण्यांचे तर गरिबांचे दागिने तांबे, हाडे व शिंपले यांचे असत.

कंठी वगरे अलंकारांना पुराणकालात ग्रैवेयक असं नाव होतं. नाभीपर्यंत लोंबणाऱ्या सोन्याच्या माळेला प्रालंविका असं म्हणत आणि ती मोत्याची असल्यास तिला उरसूत्रिका म्हणत. हांसळी सोन्याची किंवा चांदीची असून ती लहान मुलांच्याच गळ्यात घालतात, पूर्वी मोठी माणसंही हांसळी वापरत. शिवाय संस्कृत साहित्यात देवच्छंद, गुच्छ, अर्धहार, माणवक, एकावली, नक्षत्रमाला, भ्रामर, नीललवनिका, वर्णसर अशी हारातल्या सरांच्या संख्येवरून पडलेली विविध नावं होती.

गळ्यातले दागिने म्हटल्यावर काही पारंपरिक दागिने आजही डोळ्यांसमोर येतात. त्यापैकी काहींची ही वैशिष्टय़े –

* एकदाणी : सोन्याच्या टपोऱ्या आकाराचे मणी एका सरात गुंफून केलेली माळ. एकदाणीखेरीज एकलड, एकसर, एकावळी या नावांनीही ओळख.

* अंबरमाळ : अंबर या खनिजाचा रंग पिवळा-नारिंगी, किंचित तपकिरी असतो. त्याचे मणी करून ती माळ गळ्यात घातली जाते. तिला अंबरसा किंवा आमरसा असंही म्हटलं जाई.

* कारले : कारल्याच्या आकाराचा म्हणजे मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूंच्या टोकांकडे निमुळता होत गेलेला सोन्याचा ठसठशीत लांबट मणी कारले या नावानं ओळखला जातो. असा मणी एखाद्या माळेच्या मध्यभागी जडवून ती माळ गळ्यात घातली जाते.

* काशीताळी : महाराष्ट्रामधील शैवपंथीय सारस्वतांमध्ये हे मंगळसूत्र ‘काशीताळी’ या नावानं ओळखलं जातं. यात सोनं व पोवळ्याचे मणी ओवलेले असून माळेच्या केंद्रभागी चौकोनी आकाराचं मुख्य पदक असतं व ते ‘ताळी’ या नावानं ओळखलं जातं.

* गळसरी : मूळ शब्द ‘गळेसर’ (गळ्यात घालावयाची माळ) असा असावा, परंतु या शब्दाची गळसरी, गळेसर, गरसळी, गरसुळी, गरसोळ अशी अनेक अपभ्रष्ट रूपं वापरात आहेत. सोन्याच्या कोणत्याही माळेला ‘गळसरी’, ‘गरसळी’ या नावानं ओळखलं जातं.

* गाठले : मंगळसूत्रालाच ‘गाठले’ असा शब्द ग्रामीण भागात रूढ आहे. ‘गाठले’, ‘डोरले’, ‘गंठण’ असेही शब्द या अलंकारासाठी ग्रामीण समाजात रूढ आहेत.

* गुंजमाळ : सोन्याच्या तारेत गुंजांची गुंफण करून अशुभ निवारणासाठी हा दागिना गळय़ात घातला जातो.

* गोखरू माळ : गोखरू या काटेदार फळाच्या आकाराचे काटेदार सोन्याचे मणी करून त्यांची बनविलेली माळ.

* गव्हाची माळ : गव्हासारख्या आकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची तयार केलेली माळ.

* चाफेकळी माळ : चाफ्याच्या कळीसारखे सोन्याचे लांबट मणी तयार करून त्यांची बनविलेली माळ.

* चित्तांग : हा मूळचा कर्नाटकातील दागिना आहे. महाराष्ट्रात ‘चिंताक’ या मूळ शब्दाऐवजी ‘चित्तांग’ या नावानं तो ओळखला जात असे. लहान मुलांच्या मनगटामधल्या ‘बिंदल्या’प्रमाणंच परंतु मोठय़ा आकाराचा असा हा गळय़ात घालण्याचा दागिना होता.

* चौसरा : ‘चौसरा’ म्हणजे सोन्याच्या बारीक कडय़ांचे गुंफलेले चार पदर असणारा हार. हजार वर्षांपूर्वीपासून तो महाराष्ट्रात सर्वत्र दिसत असे. परंतु पुढंपुढं त्याचा वापर कमीकमी होत गेला. आता तो सुवर्णरूपात कुठं दिसत नाही, परंतु आदिवासी जमातीमध्ये मात्र आजही तो ‘चौसरा’ या नावानंच परंतु हलक्या धातूच्या स्वरूपात वापरात आहे.

* जवमाळ : जव म्हणजे ‘सातू’ या दाण्याच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांची माळ.

* जोंधळी पोत : जोंधळय़ाच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ.

* तांदळी पोत : तांदळाच्या रूपाकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची केलेली माळ.

* तिलडी : एकलड म्हणजे मण्यांच्या एक सराची माळ. त्यावरूनच दोन सरांच्या माळेला दुलडी, तिलडी म्हणजे तीन सरांची माळ, चार सरांच्या माळेला चौसरा आणि पाच सरांच्या माळेला पंचलड अशी नावं आहेत.

* नळ्याची पोत : अगदी बारीक केवळ सुती वा रेशमी दोरा आत जाईल एवढय़ा व्यासाच्या पोकळ सुवर्णाच्या नळ्यांचे लहानलहान तुकडे पाडून ते दोऱ्यात ओवून केलेली माळ.

* चिंचपेटी : छोटय़ा चौकोनी पेटीसारख्या सोन्याच्या कोंदणात मोती आणि माणिक बसवून तयार केलेला अलंकार आजच्या घडीलाही लोकप्रिय आहे. ग्रामीण भागात ‘चीचपाटी’ या नावानंही तो ओळखला जातो. चिंचपेटय़ा या अलंकाराला ‘पेटय़ा’ या नावानंही ओळखलं जातं.

* पेंडे : ‘पेंडे’ हा शब्द जुडगा या अर्थाने वापरला जातो. मोत्यांचे अनेक सर असणाऱ्या माळेला ‘पेंडे’ असं म्हटलं जातं.

* वज्रावळ : दृष्ट निवारण्यासाठी एका विशिष्ट वेलीच्या बियांच्या रूपाकारासारखे मणी तयार करून त्यांची माळ गळय़ात घातली जाते. तिला ‘वज्रावळ’ असं नाव आहे.

* ठुशी : ठुशी म्हणजे ठासून भरलेल्या गोल मण्यांची माळ.

* पुतळ्या : गोल चपटय़ा नाण्यांप्रमाणं असणाऱ्या चकत्या एकत्र गुंफून पुतळी माळ करतात. त्यावर लक्ष्मीचं चित्रही पाहायला मिळतं.

* लफ्फा : लफ्फ्यावर मुसलमानी कारागिरीचा प्रभाव दिसतो. त्यात हाराच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून मागच्या बाजूला रेशमी गादी लावलेली असते.

* मोहनमाळ : मुशीत घडवलेल्या मण्यांची माळ. या माळेच्या जुन्या नमुन्यांमध्ये नक्षीदार मणीही सापडतात.

* रायआवळे हार : रायआवळ्याच्याच रूपाकाराची सोन्याच्या मण्यांची माळ. या माळेला ‘हरपर रेवडी हार’ असा शब्दही प्रचारात होता.

* चोकर : लांब मंगळसूत्रासोबत मण्यांचे, अर्धचंद्रकोर, बेलपान वगरे डिझाइनचे चोकर घालतात.

* चंद्रहार : एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. चंद्रहारात एकात एक अडकवलेल्या चपटय़ा वळ्यांचे अनेक सर असतात.

* वजट्रिक : सोन्याच्या मण्यांच्या तीन रांगा बसवलेली कापडी पट्टी.

* कोल्हापुरी साज : या साजात मासा, कारले, कमळ, शंख, नाग, कासव आदी शुभ आकारांचे सोन्याच्या पत्र्याचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक असे मणी ओवलेले असतात.

* तन्मणी : मोत्याच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा किंवा अनेक खडय़ांचे आणि कच्च्या (पलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे खोड (पेण्डण्ट).

याखेरीज गोफ, साखळी, पोत, दूड, कंठी, राणीहार, बकुळहार, चपलाहार, बोरमाळ, लक्ष्मीहार, पोहेहार, मयूरहार, कुयरीहार, गदाहार, लिंबोणी मणीमाळ आदी अनेक प्रकारचे हार व माळा घातल्या जातात.

इतिहास आणि भूतकाळाच्या संदर्भातून बाहेर डोकावून पाहिलं तर या दागिन्यांपैकी अनेक दागिने नव्या जमान्यात थोडंथोडं नवं रूप धारण करून आलेले दिसतात. त्यामागं असतो त्यांच्या डिझायनर्स, कारागीर आणि सराफांचा अभ्यास. अर्थकारणाची धोरणं आणि व्यावसायिक गणितंदेखील. दागिन्यांच्या विविध प्रकारांना पसंती वय, प्रत्येकाची वैयक्तिक आवडनिवड आणि कोणत्या समारंभाला जायचं आहे आदी अनेक मुद्दे विचारांत घेऊन दिली जाते. सध्या विविध प्रकारच्या पारंपरिक आणि टेम्पल ज्वेलरीचा ट्रेण्ड आहे. एरवी सणासुदीच्या निमित्तानं सोन्याची खरेदी केली जातेच. पण सध्या हिऱ्याच्या दागिन्यांच्या खरेदीतही वाढ झालेली आहे. मोठय़ा आणि भपकेबाज नेकपीससह इयिरग्जचा ट्रेण्ड आहे. पोल्की आणि कुंदनच्या सेटना अधिक मागणी असून त्यांचा वापर दिवाळीत अधिक होईल असा अंदाज आहे. शिवाय लांब नेकलेसना जास्त पसंती आहे. मोठी मंगळसूत्रं, मोठय़ा मोहनमाळा, चंद्रहार आदी दागिन्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. ढोलकीमणीच्या माळेचं विशेष हे की, कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त ठसठशीत, टिकाऊ दागिना मिळतो. पूर्वी या माळेला एकदाणी किंवा लिंबोळीमणी माळही म्हटलं जाई. दोन-तीन सरांच्या माळांसह बीडेड माळांना जास्त मागणी आहे.

‘टकले बंधू सराफ’चे संचालक गिरीश टकले सांगतात की, ‘सणावाराच्या निमित्तानं सगळ्याच प्रकारच्या दागिन्यांना मागणी आहे. मराठी पारंपरिक दागिन्यांमध्ये मोहनमाळ, कोल्हापुरी साज, लक्ष्मीटिकली माळ यांची बदलती डिझाइन्स लोकांना आवडत आहेत. मण्यांचे वेगवेगळे प्रकार आणि पॅटर्न वापरले जातात. पूर्वीचे चपलाहार, पोहेहार यांची नवीन डिझाइन्स तयार केली आहेत. बकुळहाराचे वेगळे पॅटर्न्‍स येत आहेत. वजट्रिकेमध्ये विविध प्रकार आलेत. एकंदर पारंपरिक दागिने घेण्याकडं लोकांचा कल वाढतो आहे असं दिसतं.’ तर ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ सांगतात की, ‘पीएनजीतर्फे ‘स्वराज्य कलेक्शन’ लॉन्च होत असून त्यात महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेचा ठेवा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात वजट्रिक, ठुशी, राणीहार, पुतळीहार आणि अन्य आभूषणांचा समावेश करण्यात आला आहे.’

तरुणाईला आजकाल दागिन्यांमध्ये फारसा रस नाही. साधारणपणे प्रौढ वयोगट सोन्याला अधिक महत्त्व देतो. हे लोक सणासुदीला सोनंच खरेदी करतात. तर तरुणाई लाइटवेट ज्वेलरी, फॅन्सी व इंडोवेस्टर्न ज्वेलरीला प्राधान्य देताना दिसते. तरुणाईला कमी वजनाचे आणि नाजूक दागिने आवडतात. कॉलेजला जाणारी मुलं फारसं गळ्यात घालत नाही. घातलंच तर ते एकदम फॅन्सी नि ट्रेण्डी घालतात. तर नोकरी करणारी तरुणाई काही ना काही कारणानिमित्तानंच गळ्यात दागिने घालते. ‘लागू बंधू ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप लागू म्हणतात की, ‘कमी वजनाचे आणि नाजूक दागिने घेण्याकडं कल वाढतो आहे. त्यामुळं पूर्वी लफ्फे किंवा तन्मणी तयार करताना खूप मोती लागायचे, त्याऐवजी सोन्यामध्ये सेटिंग केलेल्या एकदम बारीक टाइपच्या मोत्यांचे नाजूक दागिने तयार केले जातात. दुसरं म्हणजे रोख व्यवहार किंवा मंदीसारख्या गोष्टींमुळं छोटय़ा वस्तू घेण्याकडं जास्त कल दिसतो.’

‘व्ही. एम. मुसळूणकर अ‍ॅण्ड सन्स’चे सागर मुसळूणकर यांनी सांगितलं की, दागिने खरेदी ही प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा एक भाग असते. तरुणाई केवळ लग्नासारख्या विशेष प्रसंगीच मोठे आणि भपकेबाज दागिने वापरते. एरवी कमी वजनाच्या दागिन्यांची खरेदी करण्याकडे तरुणाईचा कल असतो. तर प्रौढ दोन्ही प्रकारचे दागिने वापरतात.’

एके काळी सराफांच्या पिढय़ा या व्यवसायात होत्या. मात्र गेल्या काही वर्षांत दागिने घडवण्याचं विशेष प्रशिक्षण घेऊन किंवा दागिन्यांच्या विश्वाचा अभ्यास करत स्वतच्या छंदाचं व्यवसायात रूपांतर करण्याचा कल वाढलेला दिसतो. तरुणाईच्या पसंतीस उतरणाऱ्या आणि प्रौढांचंही लक्ष वेधून घेणाऱ्या ज्वेलरी डिझाइनर्सचे ब्रॅण्ड लोकप्रिय होताना दिसत आहेत. केवळ सोनंच नव्हे तर चांदीसह प्रेशिअस स्टोनचा वापर या दागिन्यांमध्ये केला जातो. हे दागिने घडवताना अनेकदा एकेक थीम घेऊन त्यानुसार दागिने घडवले जातात. दागिन्यांच्या गुणवैशिष्टय़ांमुळं त्यांचं वेगळेपण जपलं जातं. त्यातले मोटिफ्स जुन्या संदर्भावरून, तत्कालीन सौंदर्यशास्त्राचा, इतिहासाचा अभ्यास करून घडवले जातात. नव्या-जुन्याचा संगम असलेले हे दागिने आज वापरण्याजोगे घडवले जातात.

‘विश्वास वैद्य गाडगीळ सराफ’चे विश्वास वैद्य म्हणतात की, ‘आजच्या घडीला अनेकांना दागिने नकोसे झालेले आहेत. सोन्याकडचा पूर्वीचा कल कमी झाला आहे. तरीही घ्यायचेच झाले तर कमी वजनाच्या दागिन्यांना प्राधान्य दिलं जातं. एकुणातच दागिन्यांकडे पूर्वीसारखा कल राहिलेला नाही. एखादी बारीक माळ, एकपदरी पोहेहार, फॅन्सी दागिने घेतले जातात. काहीतरी वेगळं डिझाइन घडवून घेण्याकडे कल दिसतो. अलीकडे होणाऱ्या आर्थिक घडामोडींचाही दागिने खरेदीवर हळू हळू परिणाम होतो आहे.’

‘मोहा’च्या गीतांजली गोंधळे म्हणतात की, ‘आपल्याकडं कोल्हापूरहून खूप दागिने येतात. त्यातले बरेच दागिने जुन्या काळातल्या महाराष्ट्रीय दागिन्यांवरून बेतलेल्या असतात. काही दागिने तसेच किंवा काही थोडं आधुनिक रूप घेऊन पुढं आलेले आहेत. त्यात काशीताळी, वजट्रिकचे प्रकार, ठुशी वगरेंचा समावेश असतो. जयपूरच्याही आधीपासून कोल्हापूर हे चांदीचं मोठं व्यापारकेंद्र होतं. आता पुन्हा कोल्हापूरच्या बाजारपेठेनं पुन्हा एकदा उठाव घेतलेला दिसतो आहे.’

तर ‘आद्या ज्वेलरी’च्या सायली मराठे सांगतात की, ‘पूर्वी चोकर्सचा ट्रेण्ड होता. चिंचपेटय़ा, तन्मणी हे दागिने अगदी गळ्याशी असायचे. मग तो ट्रेण्ड एकदम गेला. तो आता पुन्हा आला आहे. लोकांना पूर्वी चेन आणि पेण्डण्ट या प्रकाराची खूप सवय होती. संपूर्ण नक्षी असलेला नेकलेस घालण्याची पद्धत महाराष्ट्रात फारशी नव्हती. तर मोहनमाळ, चपलाहार अशा माळांच्या काही सरांची फॅशन होती. आता सगळ्या प्रकारचे मोठाले भपकेदार नेकलेस लोकांना आवडत आहेत. प्रेशिअस स्टोनचा दागिन्यांतला वापर वाढला आहे. सध्या मंगळसूत्राच्या डिझाइन्समध्ये बरेच प्रयोग होत आहेत. मधला एक काळ ते न घालण्याचाच ट्रेण्ड होता. एके काळी सोन्याचं परवडत नाही म्हणून चांदीचं मंगळसूत्र घेतलं जायचं. पण आता आवर्जून चांदीचं मंगळसूत्र विकत घेतलं जातं. ऑफिसमधल्या फॉर्मल लुकवरही चांदीचं मंगळसूत्र वापरतात.’

आपण चांगलं दिसावं, ही काही शतकांपासूनची मानवी मनाची इच्छा विविध धातूंच्या माध्यमांतून त्यांना मनाजोगं आकारत आजतायगात पूर्ण होताना दिसते आहे. एके काळी संरक्षणासाठी म्हणून अलंकारांचा केलेला वापर सध्या सौंदर्यासाठी पूरक म्हणून केला जातो आहे. तो तसा होत राहील, तोपर्यंत ‘तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा’ हे गीत प्रत्यक्षातही कायम राहील असं दिसतं.

(संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, आपले मराठी अलंकार- डॉ. म. वि. सोवनी, भारद्वाज प्रकाशन, पुणे)

(छायाचित्रे सौजन्य : लागू बंधू मोतीवाले, पीएनजी ज्वेलर्स, टकले बंधू सराफ, आद्या ज्वेलरी, मोहा ज्वेलरी.)

response.lokprabha@expressindia.com

First Published on October 12, 2018 1:10 am

Web Title: article about special necklace