News Flash

सफरनामा : वेगळ्या वाटा..

भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील अशाच काही हटके, जरा वेगळ्या पर्यटनस्थळांची ओळख करून घेऊया..

मकरंद जोशी response.lokprabha@expressindia.com

सहल, मग ती मित्र-मैत्रिणींबरोबर असो वा कुटुंबाबरोबर; ती ठरवताना ‘कुठे जायचं?’ या प्रश्नावर हटकून येणाऱ्या प्रतिक्रिया – ‘एखादं वेगळं ठिकाण शोधा रे’, ‘डेस्टिनेशन एकदम हटके पाहिजे’, ‘त्याच त्याच ठिकाणांचा कंटाळा आलाय, जागा एकदम ऑफबीट हवी’ पण अनेकदा भरपूर चर्चा आणि शोधाशोध करून मंडळी शेवटी ‘येरे माझ्या मागल्या’च्या धर्तीवर एकतर जुन्याच ठिकाणाची निवड करतात किंवा अनेकांच्या शिफारसीवरून प्रसिद्ध पर्यटनस्थळालाच प्राधान्य देतात. वेगळ्या वाटांचे कितीही आकर्षण वाटले तरी त्याबद्दल अनेक प्रश्न, शंका मनात असतात त्यामुळे रोजच्या रामरगाडय़ातून पर्यटनाला जायचे तर अगदी अपरिचित, जिथे फार कोणी गेलेले नाही, जिथे सगळ्या सुविधा मिळतील की नाही हे माहिती नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिकडे जाऊन नेमके काय पाहायचे, काय करायचे हे माहीत नाही अशा ठिकाणांची निवड अर्थातच केली जात नाही. खरेतर आपण सहलीला, पर्यटनाला का जातो? नेहमीच्या धकाधकीच्या चक्रातून सुटका करून घ्यायला, नेहमीपेक्षा वेगळे काही पाहायला-अनुभवायला पण फारशा माहीत नसलेल्या, लोकप्रिय नसलेल्या जरा वेगळ्या वाटेवरच्या पर्यटनस्थळांचा विचार मात्र पटकन केला जात नाही. अनेकदा लोकप्रिय आणि त्यामुळेच गर्दी खेचणाऱ्या पर्यटनस्थळांजवळच अशीही ठिकाणे असतात जी प्रसिद्धीच्या परिघाबाहेर असतात पण त्यांचे स्वत:चे असे खास काही वैशिष्टय़ असते. वेगळेपण असते त्यासाठी तरी या ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील अशाच काही हटके, जरा वेगळ्या पर्यटनस्थळांची ओळख करून घेऊया..

मध्य प्रदेश हे राज्य खऱ्या अर्थाने भारताचे हृदयस्थान आहे, यात शंका नाही कारण ऐतिहासिक वास्तुंपासून ते नैसर्गिक वैविध्यापर्यंत आणि चटकदार खाद्यपरंपरेपासून ते मनभावन कलापरंपरेपर्यंत भारताचे अनेक विशेष इथे एकवटलेले पाहायला मिळतात. मध्य प्रदेशच्या याच खजिन्यातील काहीसे दुर्लक्षित पण चमकदार रत्न म्हणजे घुघवा जीवाश्म पार्क. ‘बाघों की भूमी’ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील कान्हा आणि बांधवगड ही दोन राष्ट्रीय उद्याने जगभरातील निसर्गप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत. हमखास होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या राष्ट्रीय उद्यानांना भेट देताता मात्र त्यातील अनेकांना घुघवा माहीतच नसतं. बांधवगडपासून सुमारे पावणेदोन तासांच्या अंतरावर घुघवा फॉसिल्स पार्क आहे. फॉसिल्स म्हणजेच जीवाश्म हा शब्द ऐकला की सर्वात आधी आठवतात ते महाकाय डायनॉसॉर्स. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेल्या डायनॉसॉर्सचा इतिहास आपल्याला जीवाश्मांमधूनच तर कळला. मात्र जीवाश्म फक्त डायनॉसॉर्सचेच नसतात, तर कीटक, जलचर, शंख-शिंपले इतकंच काय वृक्ष-वनस्पतीचेही जीवाश्म तयार होतात. मध्य प्रदेशातील ऊमरिया आणि घुघवा या गावांच्यामध्ये पसरलेल्या माळरानांवर असेच साधारणत: सहा कोटी वर्षांपूर्वीचे झाडांचे जीवाश्म आढळतात. आजच्या काळात या प्रदेशात १४०० मि.मी. पाऊस पडतो पण तेव्हा म्हणजे सहा कोटी वर्षांपूर्वी इथे दोन हजार मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडत असे. त्यामुळे आजच्या या कोरडय़ा, रखरखीत प्रदेशात तेव्हा सदाहरित वृक्षांचे घनदाट अरण्य होते. या अरण्याचेच अवशेष इथल्या जीवाश्मांमधून पाहायला मिळतात. घुघवा पार्कमध्ये ज्या काळातील वनस्पतींचे दर्शन जीवाश्मच्या रूपातून घडते तो सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा काळ! हा काळ वनस्पतींच्या इतिहासात महत्त्वाचा आहे, कारण याच काळात पृथ्वीवर सपुष्प वनस्पतींचे प्रकार विकसित होऊ लागले. घुघवामध्ये आवळा, केळी, नारळ, आंबा, रुद्राक्ष, जांभूळ, निलगिरी या झाडांचे जीवाश्मही पाहायला मिळतात. या झाडांच्या खोडांचे, फांद्यांचे, पाना-फुलांचे, फळा-बियांचे जीवाश्म इथे आहेत. तसेच कवचधारी जलचरांचे जीवाश्मही आढळले आहेत. आता जिथे नदी, सरोवर किंवा समुद्रच नाही, तिथे कवचधारी जलचरांचे, शंख-शिंपल्यांचे जीवाश्म कसे? तसेच नारळ, आंबा, निलगिरी, रुद्राक्ष अशा भिन्न हवामानात वाढणाऱ्या झाडांचे जीवाश्म इथे एकाच ठिकाणी कसे? या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत कोटय़वधी वर्षांपूर्वीच्या पृथ्वीच्या रचनेत आणि त्याचे दुवे मिळतात या जीवाश्मांमध्ये. आज जरी पृथ्वीवर सात वेगवेगळे खंड दिसत असले तरी २० कोटी वर्षांपूर्वी ते तसे नव्हते, एकच विस्तीर्ण भूभाग होता, ज्याला पॅनेजिया म्हटले जाते. नंतर सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी हा पॅनेजिया विभागला गेला. त्याच्या उत्तर भागाला लॉरेशिया तर दक्षिण भागाला गोंडवन नाव देण्यात आले. सुमारे दहा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींनी या भागांचेही तुकडे झाले. गोंडवनाचे तुकडे होऊन त्यातून आजचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत वेगळे झाले. सर्वात शेवटी पाच कोटी वर्षांपूर्वी उरलेल्या गोंडवनातून ऑस्ट्रेलिया आणि अंटाक्र्टिकाही वेगळे झाले. ही सगळी उलथापालथ होण्याआधीच्या काळात ऑस्ट्रेलिया आणि भारत एकाच भूभागाचा हिस्सा होते. याचा पुरावा म्हणजे घुघवा इथे सापडलेले निलगिरीचे जीवाश्म. लाखो वर्षांपूर्वी गाडला गेलेला हा जीवाश्मांचा खजिना जगासमोर आणण्याचे श्रेय दिले जाते मंडला जिल्ह्याचे स्टॅटिस्टिकल ऑफिसर डॉ. धर्मेद्र प्रसाद यांना. डॉ. प्रसाद ज्या ‘डिस्ट्रिक्ट आर्किऑलॉजी युनियनचे’ मानद सचिव होते त्याच संस्थेने इथल्या परिसरात रानोमाळ विखुरलेले जीवाश्म गोळा करून एकत्र केले. या सगळ्या जीवाश्मांचे शास्त्रशुद्ध वर्गीकरण करून नीटनेटका संग्रह केला. जबलपूर सायन्स कॉलेजचे एस. आर. इंगळे आणि बिरबल साहनी इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिओबॉटनीचे डॉ. एम. बी. बांडे यांनी. या सगळ्यांमुळेच मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील घुघवा जीवाश्म पार्क उभा राहिला.

इथे जशी उघडय़ावर मांडलेली वेगवेगळ्या झाडांची जीवाश्म पाहायला मिळतात त्याचप्रमाणे जीवाश्म कशी तयार होतात, लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरचे खंड कसे अस्तित्वात आले, याचे दर्शन घडवणारे एक उत्तम प्रदर्शन इथे पाहायला मिळते. त्यामुळे बांधवगडला भेट द्याल तेव्हा घुघवाला आवर्जून भेट द्या. घुघवासारखाच आणखी एक फॉसिल्स पार्क हिमाचल प्रदेशातही आहे. चंडीगडपासून फक्त ७० कि.मी. अंतरावर मरकड नदीच्या खोऱ्यात सिरमौर जिल्ह्य़ातील सुकेती गावाजवळ हा पार्क आहे. या ठिकाणी प्लेस्टोसिन काळातील प्राण्यांचे जीवाश्म मिळाले आहेत. त्यात कासव, हिप्पोपोटॅमस, घेरियल, मगर आणि प्राचीन काळातील हत्तींच्या अवशेषांचा समावेश आहे. या संग्रहालयाबाहेर प्राचीन काळातील पाणघोडा, हत्ती, घेरियल यांच्या भव्य प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत, तर आतमध्ये या प्राण्यांचे अश्मिभूत झालेले अवशेष पाहायला मिळतात. त्यात हत्तींच्या लांबच लांब सुळ्यांपासून ते इतर प्राण्यांच्या कवटय़ांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. जीवाश्म पार्क म्हणजे जणू भूतकाळाकडे उघडलेली खिडकी. या खिडकीतून डोकावल्यावर घडणारे लाखो वर्षांपूर्वीच्या निसर्गाचे दर्शन थक्क करते.

आपल्या पूर्वजांना सौंदर्य आणि उपयुक्तता यांची सांगड घालण्याची विलक्षण समज होती आणि त्याची खात्री पटवणाऱ्या अनेक वास्तू, वस्तू भारतभर पाहायला मिळतात. त्यातील एक म्हणजे राजस्थान, गुजरातमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळणाऱ्या पायऱ्यांच्या विहिरी अर्थात स्टेपवेल्स. दिल्लीतील अग्रसेन की बावडी, अहमदाबादजवळची अडालज बाव अशा काही विहिरी तर प्रसिद्ध आहेतच. पण याच विहिरींच्या पंगतीतील आणि जरा कमी माहीत असलेली विहीर म्हणजे ‘चांद बावडी’. आता विहिरीत काय पाहायचे, असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही अशा पद्धतीची विहीर पाहिलेलीच नाही हे नक्की. वास्तुकला, सौंदर्यदृष्टी आणि तंत्रज्ञान या सगळ्याचा संगम या विहिरींमध्ये बघायला मिळतो. राजस्थानातील ‘चांद बावडी’ ही याच प्रकारातली विहीर ‘आबानेरी’ या गावात आहे. जयपूरपासून आग्राच्या दिशेने जाताना ९० किलोमीटरवर हे गाव आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार हे गाव राजस्थानवर राज्य करणाऱ्या ‘गुर्जर प्रतिहारी’ राजवटीत वसवण्यात आले. याचे मूळ नाव होते ‘आभा नगरी’ म्हणजे प्रकाश नगरी. पुढे त्याचाच अपभ्रंश झाला ‘आबानेरी’. नवव्या शतकातील निकुभ्भ राजवटीतील राजा चंद याने या गावात ही देखणी, सजवलेली पायऱ्यांची विहीर बांधली, त्यामुळे ती ‘चांद बावडी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अशा प्रकारच्या औरसचौरस विहिरी बांधण्यामागे जलसंधारण हा मुख्य हेतू असतोच. तोच या चांद बावडीच्या निर्मितीमागेही आहे, मात्र तो तडीस नेताना बांधलेली विहीर भारतीय वास्तुकलेचा अद्वितीय नमुना ठरली आहे. मोठय़ा पेटीत लहान पेटी (बॉक्स इनसाइड बॉक्स) अशी या १३ मजली विहिरीची रचना आहे. वरून पाहताना ही एकूण साडेतीन हजार पायऱ्यांची रचना दृष्टिभ्रमाच्या चित्रासारखी वाटते. सुमारे १०० फूट खोल असलेल्या या विहिरीचे सगळे स्तर उतरून तुम्ही तळाशी पोहोचता तेव्हा काठावरचे तापमान आणि आतले तापमान यातला पाच ते सहा अंशांचा फरक लगेच जाणवतो.

या विहिरीच्या काठावर श्री हर्षदा माता मंदिर आहे. इतिहासकाळात हे मंदिर आणि ही विहीर गावातल्या सार्वजनिक समारंभांचे ठिकाण होती. विहिरीच्या भोवती लोकांना बसण्यासाठी केलेले सज्जे याची साक्ष देतात. इथे असलेल्या कोरीव मूर्ती आणि नक्षीकामाचे नमुने यामुळे ही कलाखजिन्याचीच विहीर वाटते. ताजमहाल, खजुराहो मंदिर आणि बृहदेश्वर मंदिरापेक्षाही प्राचीन असलेली चांद बावडी पर्यटकांची वाट पाहात असते. त्यामुळे जयपूरची भेट ठरवताना अर्धा दिवस या खजिन्याच्या विहिरीसाठी नक्की राखून ठेवा.

तुम्हाला एकदम आगळ्यावेगळ्या ठिकाणांना भेट द्यायची असेल तर जरा दूरवर प्रवास करायची तयारी ठेवायला हवी. भारताच्या परंपरेचा, निसर्गठेव्याचा आणि इतिहासाचा अविभाज्य हिस्सा असूनही सर्वसाधारण पर्यटकांना जरा दूरच आहे असं वाटणारा प्रदेश म्हणेज ईशान्य भारत. या ठिकाणच्या सात राज्यांमध्ये तर ऑफ बिट डेस्टिनेशन्सची खाणच आहे, असे म्हणावे लागेल. त्यातलेच एक अफलातून ठिकाण म्हणजे ‘माजुली आयलंड’. आसाम राज्यातील या बेटाची २०१६ मध्ये नदीमधले जगातले सर्वात मोठे बेट अशी नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. महानदी ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या प्रवाहात हे बेट निर्माण झाले आहे. सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना आश्रय देणाऱ्या या बेटाचा आकार मात्र दरवर्षी ब्रह्मपुत्रेच्या पुरामुळे आक्रसत चालला आहे. विसावे शतक सुरू होताना या बेटाचा आकार साडे बाराशे चौरस किलोमीटर होता आणि आता तो ३५२ चौरस किलोमीटर इतका झाला आहे. ‘माजुली’ या नावाचा अर्थच मुळी ‘दोन समांतर नद्यांमधला प्रदेश’ असा होतो. हे बेट आसाम राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. ‘नव वैष्णव’ संस्कृतीचे केंद्र ठरलेल्या या बेटावर १५ व्या शतकात ही परंपरा रुजवली ती थोर समाजसुधारक, संत श्रीशंकरदेव यांनी. या बेटावर मिशिंग, देवरी, सोनोवाल, कछारी या जमातींची वस्ती आहे. माजुलीवरच्या वैष्णव धार्मिक स्थळांना ‘सत्र’ म्हणतात. १५ व्या शतकात ‘सत्र’ स्थापन करण्याची परंपरा सुरू झाली आणि वेगवेगळ्या कला परंपरा, प्रथा, धार्मिक पद्धतींवरून सुमारे ६५ सत्र निर्माण झाले. आता मात्र त्यातील २२ सत्र इथे कार्यरत आहेत. त्यातील गरामुख, कमालाबारी, दाखिनपत, अन्नियती, बेन्गिती यांना प्रमुख मानले जाते. माजुली बेटाच्या मध्यवर्ती ठिकाणी कमलाबारी सत्र आहे. हे सत्र पारंपरिक नृत्य आणि नाटय़ कला जोपासण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच इथे काही जुनी हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. दाखिनापत सत्र हे तिथे साजऱ्या होणाऱ्या ‘रासलीला उत्सवा’साठी प्रसिद्ध आहे. या वेगवेगळ्या सत्रांमुळे मुखवटे निर्मितीची कला, कोरीव कामाच्या वस्तूंची परंपरा, बोटी बांधण्याची कला विकसित झाली आणि जतन केली गेली. याच परंपरेत उगम पावलेल्या ‘सत्तरिया’ या नृत्यनाटय़ाला संगीत नाटक अकादमीने शास्त्रीय नृत्याचा दर्जा दिला आहे. आपल्या नैसर्गिक रचनेमुळे माजुली हे बेट कला परंपरेप्रमाणेच नैसर्गिक वैविध्याचा ठेवाही आहे. इथल्या पाणथळींमधले पक्षीजीवन निसर्गप्रेमींना आकर्षित करते. त्याचप्रमाणे या बेटावरचे ‘मोलाइ अरण्य’ हे जादव पायेंग या एकांडय़ा शिलेदाराच्या प्रयत्नातून उभे राहिलेले अनोखे नैसर्गिक अरण्य आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत जादव पायेंग यांच्या मेहनतीमुळेच या अरण्यात आता पट्टेरी वाघ, एकशिंगी गेंडे, हरण, ससे, माकडं आणि अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. म्हणूनच या अरण्याला जादवचे नाव ‘मोलाइ’ देण्यात आले आहे. त्यामुळे ‘फाल्गु’, ‘पोराग’सारखे इथले उत्सव असोत, इथले पारंपरिक कला प्रकार असोत किंवा इथले निसर्ग वैभव असो, आसामच्या सहलीत माजुलीला भेट द्यायलाच हवी. जोरहाट हे माजुलीसाठी सर्वात जवळचे (फक्त २० किलोमीटरवरचे) शहर आहे. जोरहाटला विमानतळ आहे जिथे कोलकाता, दिल्ली, गुवाहाटीहून विमानसेवा आहे. जोरहाटच्या निमती घाटावरून माजुलीसाठी फेरीबोट सेवा आहे.

काही वर्षांपूर्वी लडाख निश्चितच ऑफ बीट ठिकाणांपैकी एक होते पण गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये लडाखची वाट बऱ्यापैकी रुळली आहे, मात्र तरीही भारतातील या ‘लिट्ल तिबेट’मध्ये काही अनवट जागा आजही शिल्लक आहेत. त्यातील एक म्हणजे ‘तुर्तुक’. हे चिमुकले गाव नुब्रा व्हॅलीमध्ये आहे. नुब्रा व्हॅलीमधील डिस्किट मॉनेस्ट्री, मैत्रेय बुद्धाची भव्य प्रतिमा आणि डबल हम्प कॅमल राइड पर्यटकांच्या परिचयाच्या आहेतच, पण याच व्हॅलीच्या टोकावर श्योक नदीकाठचे तुर्तुक मात्र आजही ‘जरा हटके’ आहे. इतिहासकाळात वेगवेगळ्या राजवटी अनुभवणारे हे गाव १९४७-४८च्या युद्धात पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. ७१च्या भारत-पाक युद्धात ते पुन्हा भारताच्या आधिपत्याखाली आले. इतिहासातील वेगवेगळ्या राजवटींमुळे या गावावर बौद्ध आणि मुस्लीम परंपरांचा संमिश्र ठसा पाहायला मिळतो. या गावाला जितके अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेले आहे त्याचप्रमाणे पारंपरिक कलाकुसरीची बहारदार परंपराही लाभली आहे. जर्दाळू आणि अक्रोडांच्या बागांनी वेढलेल्या या गावात बाल्टी पद्धतीच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येतो. बाल्टी हेरिटेज म्युझियम, जुन्या शासकांचे शाही निवासस्थान, पारंपरिक हातमाग, प्राचीन पाणचक्की यामुळे इतिहासातील एखाद्या गावाला भेट दिल्याचा भास तुर्तुकमध्ये फिरताना होतो. मग लडाखच्या सहलीत नुब्रा व्हॅलीच्या भेटीत तुर्तुकसाठी अवश्य वेळ ठेवा.

नेहमीच्या, लोकप्रिय पर्यटनस्थळांपेक्षा वेगळ्या, अनोख्या पर्यटनस्थळांना भेट द्यायची असेल तर अशा ठिकाणी पर्यटकांचा राबता जास्त नसल्याने सुविधा कमी असतील हे लक्षात घ्या. शिवाय अनेकदा तिथल्या प्राचीन वास्तूंचे, इमारतींचे, स्मारकांचे जतन केलेले असण्याची शक्यताही कमी असेल. कदाचित यातल्या काही ठिकाणी पर्यटकांना करण्यासारख्या नौकाविहार, घोडेस्वारी अशा गोष्टी नसतील. पण तिथला अस्पर्शित निसर्ग आणि शांतता, निवांतपणा हीच त्या ठिकाणची खासियत आहे, हे विसरू नका. त्यामुळे वेगळ्या वाटांवरली अनोखी ठिकाणे बघायला जाताना मनात कोणतेही किंतु घेऊन जाऊ नका. न रुळलेल्या वाटांवर भटकंती करायची, तर मनावरही ओझं नकोच घ्यायला.

(छायाचित्र सौजन्य : विकिपीडिया)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2021 3:20 am

Web Title: article about tourist places in india madhya pradesh tourism zws 70
Next Stories
1 पडद्यामागचे : साथ-संगत
2 शोध वारशाचा : लोहगड परिक्रमेतला पुरातन खजिना (पूर्वार्ध)
3 निमित्त : पासवानांचं राजकीय कुटुंब
Just Now!
X