12 December 2019

News Flash

नदीच्या खोऱ्यात : कुलंगकन्या दारणा

सह्याद्रीच्या कळसूबाई रांगेची शान काही औरच. खुद्द महाराष्ट्राची शिखरसम्राज्ञी कळसूबाई या रांगेमध्ये विराजमान झालेली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आशुतोष बापट

दारणा नदीचे आयुष्य तसे जेमतेम ७०-८० किलोमीटर इतकेच. आयुष्य लहान असले तरी चालेल परंतु ते समृद्ध, संपन्न असावे असा संदेश देत ती गोदावरीत आपले अस्तित्व विलीन करते.

सह्याद्रीच्या कळसूबाई रांगेची शान काही औरच. खुद्द महाराष्ट्राची शिखरसम्राज्ञी कळसूबाई या रांगेमध्ये विराजमान झालेली आहे. आणि सम्राज्ञी विराजमान आहे म्हटल्याबरोबर तिचे सरदारदेखील तेवढय़ाच तोलामोलाचे हवेत. आणि अर्थातच ते सम्राज्ञीच्या आजूबाजूला हवेत. सखा सह्यद्रीने या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसते. आपली लेक शिखरसम्राज्ञी होत असेल तर तिचे सवंगडीसुद्धा तसेच रांगडे, देखणे, राकट हवेत याची जाणीव त्या नगाधिराजाला असल्यामुळे त्याने असेच बेलाग, बेजोड, बुलंद डोंगर कळसूबाईच्या आजूबाजूला निर्माण केले. त्याच बुलंद डोंगरांवर नंतरच्या राज्यकर्त्यांनी तटबंदीचे शेलापागोटे चढवले आणि बळकट-भक्कम अशी जणू दुर्गशृंखलाच निर्माण केली. एका बाजूला आहेत आड-औंढा-पट्टा-बितगा हे किल्ले, तर दुसऱ्या बाजूला आहे सह्यद्रीतील सर्वात सुंदर, देखणे आणि राकट असे अलंग-मदन-कुलंग हे खणखणीत दुर्गत्रिकुट. या सुंदर निसर्गचित्राला एक देखणी नदीसुद्धा हवीच, तशी ती आहे ना, दारणा नदी. कुलंग किल्ल्याच्या उत्तरेकडे हिचा जन्म झालाय. कुलंगचीच ही कन्या. इतक्या राकट आणि रांगडय़ा सह्यद्री चित्रात ही नदी एखाद्या रत्नजडित माळेसारखी शोभून दिसते. तिचा सुंदर निळाशार प्रवाह या किल्ल्यांवरून निरखताना भान हरपून जाते.

 

दारणेचा उगम असलेला हा प्रदेश ऐन सह्यद्रीच्या कण्यावर आहे. पश्चिमेला आहे खोल खोल दरी आणि मग अपरान्त अर्थात कोकण प्रांत. आणि एका बाजूला आहे नगर जिल्ह्यची सीमा. या सगळ्यातून वळणे वळणे घेत वाहते आहे दारणा. एक हजार ६४८ मीटर म्हणजेच पाच हजार ४०० फूट उंचीचे शिखर कळसूबाई या परिसराचा मानिबदू. सन १८६० साली आर्चडिकन गेल हा ब्रिटिश ऐन रात्री हा डोंगर चढून गेला. पहाटे पहाटे तिथून दिसलेल्या सूर्योदयाने तो प्रभावित होऊन नाचायलाच लागला. त्याच आनंदात त्याने ‘द किंग ऑफ दि डेक्कन हिल्स’ असं एक प्रशस्तिपत्रक या शिखराला देऊन टाकलं. ‘कळसूबाई’ या नावामागेसुद्धा एक सुंदर दंतकथा आहे. कोणे एके काळी कळसू नावाची एक कोळ्याची पोर या ठिकाणी राहात होती. पुढे ती इंदोरे गावी कुणाकडे कामाला म्हणून राहिली. मात्र केरवारे आणि भांडी घासणे ही कामे सांगायची नाही या बोलीवर ती तिथे राहिली होती. कुणीतरी ही कामे करण्यासाठी तिच्यावर बरेच दडपण आणले, त्यामुळे ती हे काम सोडून निघून गेली. तिला जिथे भांडी घासायला भाग पाडले तो भाग ‘थाळेमेळ’ नि केर काढायला लावला ती जागा ‘काळदरा’ या नावाने परिचित झाले. संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्या या कळसूने आपला देह जिथे त्यागला त्या शिखरालाच लोक कळसूबाई म्हणू लागले. शिखराच्या माथ्यावर एक छोटेसे मंदिरही आहे. तेराव्या शतकात कोण्या बावाजी कोळ्याकडे या डोंगराची व्यवस्था होती.

कळसूबाईच्या उत्तरेला दारणेचा उगम असलेला कुलंगचा परिसर  ट्रेकर्ससाठी नंदनवन आहे. प्रत्येक ट्रेकर हा आयुष्यात एकदा तरी या प्रदेशात यायला धडपडत असतो. काही किल्ले नाही पाहिले तरी चालतील पण अलंग-मदन-कुलंग हे त्रिकुट मात्र झालेच पाहिजे अशी प्रत्येकाची धारणा असते. सह्यद्रीची सगळी विशेषणे शोभून दिसतील असे हे तीनही किल्ले. त्यातला कुलंग हा सगळ्यात उंच, देखणा आणि डौलदार असा किल्ला आहे. पाण्याची मुबलक टाकी आणि गुहा या किल्ल्यावर पाहायला मिळतात. याच्या उंचीमुळे शेजारीच असलेले मदन आणि अलंग हे दोन बेलाग दुर्ग फारच भेदक दिसतात. त्याचबरोबर सूर्योदयाच्या वेळी खूप लांबवरचा प्रदेश आणि त्यात जागोजागी विखुरलेले किल्ले कुलंगवरून पाहता येतात. एकामागे एक असलेल्या सह्यद्रीच्या रांगा आणि त्यावर जागोजागी वसलेले किल्ले पाहावेत तर कुलंगवरूनच. याच कुलंगच्या उत्तर भागात आहे कुरंगवाडी आणि त्याच्या उत्तरेला दारणा उगम पावते. दारणा नदीचे आयुष्य तसे जेमतेम ७०-८० किलोमीटर इतकेच. पण तिचे खोरे फार समृद्ध आहे. तिच्या प्रवाहाला विविध फाटे-उपफाटे फुटलेले आहेत. त्यावर पुढे जलाशय निर्माण झालेले आहेत. संपूर्ण परिसराची शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची तहान दारणा भागवते. उगमापासून पुढे लगेचच तिच्यावर भावली धरण बांधून तिचा प्रवाह अडवलेला आहे. कुरंगवाडी, जामुंडे, मनवेडे अशा सगळ्या परिसरात महामूर पाऊस पडतो. हा सगळा पडणारा पाऊस विविध नाले-ओहोळांच्या रूपाने भावली धरणात साठवला जातो. तिथून पुढे सुरू होतो दारणेचा प्रवास.

रमतगमत प्रवाहित होत असताना इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यतील मोठे गाव दारणेच्या डावीकडे राहते. इगतपुरी हेदेखील कसारा घाट चढून आल्यावरचे देखणे ठिकाण आहे. पुणे जिल्ह्यतील लोणावळ्यासारखेच याचे स्थानमाहात्म्य. तिथल्यासारखेच विविध डोंगररांगांनी गराडा घातलेले सुंदर ठिकाण. अशा या निसर्गरम्य परिसरातून पुढे निघालेल्या दारणेला उत्तरेकडून वाकी नदी येऊन मिळते. वाकी नदी मुंबई-आग्रा महामार्गाच्या पलीकडे त्रिगलवाडीवरून येते. त्रिगलवाडीला एक मोठा जलाशय तयार झालेला आहे. त्रिगलवाडी हा एक छोटेखानी सुंदर किल्ला. पायथ्याशी जैन लेणी आहेत. काहीशा पडझड झालेल्या अवस्थेमधील ही लेणी. आतमध्ये बसलेल्या स्थितीतील र्तीथकरांची एक मूर्ती असून तिच्या पायावर संस्कृत भाषेतला शिलालेख कोरलेला आहे. त्रिगलवाडीवरून येणारी वाकी नदी, इगतपुरी आणि घोटीच्यामध्ये दारणेला मिळते. वाकीला सामावून दारणेचा प्रवाह पुढे घोटीला येऊन पोहोचतो. घोटी हे गाव इगतपुरीवरून शिर्डीकडे जाण्यासाठीच्या रस्त्यावर वसलेले आहे. इथूनच बारी या कळसूबाईच्या पायथ्याच्या गावावरून पुढे शेंडी म्हणजे भंडारदरा आणि पुढे अकोले, संगमनेर असे जाता येते. सुंदर ठिकाणी वसलेल्या घोटीवरून दारणा वळण घेते आणि एका भव्य अशा जलाशयात येऊन विसावते. हा जलाशय म्हणजेच दारणा धरण. प्रचंड मोठा जलाशय या धरणामुळे तयार झालेला आहे. सन १८९२ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळाची झळ नगर जिल्ह्यला मोठय़ा प्रमाणावर बसलेली होती. तत्कालीन ब्रिटिश सरकारने गोदावरीच्या खोऱ्यात धरणे बांधायचे धोरण अंगिकारले. त्यानुसार दारणा नदीवर नांदगाव इथे धरण बांधायचे निश्चित झाले. १९०७ साली इथे धरण बांधायला सुरुवात झाली आणि १९१२ ला हे धरण बांधून तयार झाले. त्यासाठीचा खर्च त्याकाळी जवळजवळ २७ लाख रुपये इतका होता. या सर्व कामावर देखरेख करायला एच. एफ. बिल हे सुपरिटेंडेंट इंजिनीयर होते. त्यांनी दुष्काळ निवारणार्थ केलेल्या पाटबंधाऱ्याच्या कामात हे सर्वात पहिले काम. त्याप्रीत्यर्थ या जलाशयाला ‘लेक बिल’ असे नाव दिले गेले. दारणेच्या या जलाशयामुळे कित्येक गावांना त्याचा फायदा झालेला आहे. मोगरे, उभाडे, बेलगाव तरळे, मुरंबी, माळुंजे अशी कित्येक गावे दारणेमुळे सुखावलेली आहेत. या लेक बिल जलाशयाचा फुगवटा खूप मोठा आहे. आणि मुळातच दारणेचा प्रवाह हा काही सरळ नाही. तो विविध दिशांनी वळत वळत वाहतो आहे. त्यामुळे तिच्या खोऱ्यात आजूबाजूची विविध ठिकाणे जोडली गेलेली आहेत. असेच एक ठिकाण म्हणजे टाकेदतीर्थ. हे ठिकाण दारणा जलाशयाच्या काहीसे दक्षिण अंगाला आहे.

टाकेदतीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाची कथा आपल्याला थेट रामायणात घेऊन जाते. टाकेद या ठिकाणी आहे जटायूचे मंदिर. भारतीय संस्कृतीने माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी, पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश पाहिला आहे. त्यांना योग्य तो सन्मान दिला आहे तसेच त्यांचे पूजनही केले आहे. रामायणातील जटायूच्या कथेमध्ये हेच महत्त्वाचे तत्त्व दाखवलेले दिसते. ‘सीताहरण आणि जटायू’ ही कथा रामायणातली एक प्रसिद्ध कथा समजली जाते. या कथेनुसार सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमाग्रे घेऊन जात असताना जटायू पक्षी (गिधाड) रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला. रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्रांची वाट पाहात थांबला. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली. प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून उत्पन्न झालेले पाणी जटायूला पाजले. ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यमधील टाकेद तीर्थ हे होय. येथे पक्षी रूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला. नाशिकवरून इगतपुरी घोटी माग्रे टाकेदचे अंतर ४८ कि.मी. होते. जटायूमुळे हे टाकेद तीर्थ पावन झाले. नाशिकपासून जवळच असलेले हे ठिकाण. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि मंदिर उभारलेले दिसते. ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारून पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधले आहे, त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात. आड-औंढा-पट्टा-बितिगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. इथेच वसले आहे टाकेदतीर्थ. भंडारदरा इथून सुद्धा हे अंतर ४५ कि.मी. इतके आहे. रतनगड-भंडारदरा या सहलीतसुद्धा टाकेदला भेट देता येईल. काहीसा दुर्लक्षित असलेला हा परिसर आता कात टाकतो आहे. देवदेवतांची, ऋषीमुनींची अनेक मंदिरे आपल्याला भारतवर्षांत आढळतात, पण जटायू मंदिर मात्र दुर्मीळच म्हणायला हवे.

या टाकेदच्या उत्तरेला आणि दारणा जलाशयाच्या पूर्वेला अजून एक जलाशय आहे तो म्हणजे कडवा जलाशय. ही कडवा नदी पुढे दारणेलाच जाऊन मिळते. खरे म्हणजे ही नदीसुद्धा दारणेच्या खोऱ्यात येते असे म्हणायला हरकत नाही. कडवं टाकेद यांच्या पूर्वेला समोरच उभे आहेत दिग्गज किल्ले. औंढा आणि पट्टा. पट्टा किल्ला हा ऐतिहासिकदृष्टय़ा फार महत्त्वाचा आहे. नरपती-हयपती-गडपती असलेल्या राजराजेश्वर शिवरायांचे तब्बल महिनाभर वास्तव्य या किल्ल्यावर झालेले आहे. सन १६७२ साली मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला मुघलांकडून हिसकावून घेतला आणि स्वराज्यात दाखल केला. जालनपूर ऊर्फ जालना इथल्या मोहिमेनंतर छत्रपती शिवराय संगमनेर इथे आजारी पडले. मुघलांचा वेढा पडण्याच्या आत महाराजांना सुखरूपपणे या पट्टा किल्ल्यावर आणण्यात आले. महाराज पुढे जवळजवळ ३५ दिवस या किल्ल्यावर मुक्कामाला होते. विश्रांती घेण्यासाठी ते इथे राहिले म्हणून याचे नाव पडले विश्रामगड. राजगड, रायगड आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांचा एवढा सलग मुक्काम याच किल्ल्यावर होता. पट्टागडाचे केवढे हे भाग्य! आपल्या लाडक्या राजाचा इतका सहवास या किल्ल्याला मिळाला. पायथ्याच्या पट्टेवाडी गावातून किल्ल्यावर जायला चांगली मोठी वाट आहे. पायथ्याच्या गावातून आपल्या नजरेत हा किल्ला मावत नाही. जणू एखादा दांडपट्टा असावा असा हा किल्ला लांबलचक आहे. किल्ल्यावर अंबारखाना आणि काही अवशेष आजही पाहता येतात. तिथे पाण्याची टाकी, काही तोफा आहेत. समोरच दिसणारा औंढा किल्ल्याचा सुळका इथून भेदक दिसतो.

दारणा धरणापासून पुढे निघाल्यावर दारणेला डावीकडून औंध वहाळ येऊन मिळतो. यालाच उंदूहोळ नदी असेही म्हणतात. ही नदी अंजनेरीच्या डोंगरात उगम पावलेली आहे. ती दक्षिणेकडे वहात येते. पुढे तिला मुकणे इथे धरण बांधलेले आहे. मुकणे जलाशयातून आलेल्या उंदूहोळ नदीचा प्रवाह दारणेमध्ये येऊन मिसळतो. त्याला आपल्यात सामावून घेत दारणा शेणीत, लहावीट माग्रे वाहताना तिला उजवीकडून कडवा नदी येऊन मिळते. तिला घेऊन दारणा येते भगूरला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव असलेले भगूर.

या दारणेच्या पाण्यातच काहीतरी विशेष असणार. स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग सावरकरांच्या रक्तात भिनायला ही दारणा कारणीभूत ठरलेली असणार निश्चित. अफाट आणि नेत्रदीपक परंतु तेवढेच खडतर असे आयुष्य लाभलेल्या सावरकरांची ही जन्मभूमी. हे दारणेचेच नशीब की तिला सावरकरांचा सहवास लाभला असणार. भगूरवरून निघालेली दारणा देवळाली कॅम्प जवळून वाहते. देवळाली इथे आपल्या लष्कराचा मोठा तळ आहे. तिथे लष्कराचा तोफगोळ्यांचा सराव चालतो. देवळालीच्या समोर खरे तर दोन किल्ले आहेत. बहुला आणि गडगडा. गडगडसांगवी या गावाजवळ आहे गडगडा. हा किल्ला काहीसा लांब आहे. परंतु बहुला किल्ला मात्र या तोफगोळ्यांच्या टप्प्यात आहे. त्यामुळे इथे ट्रेकिंग करायला बंदी आहे. फक्त रविवारी हा तोफांचा सराव नसेल तर बहुला गावातल्या स्थानिकांना त्याची कल्पना दिली जाते. आणि मगच स्थानिक वाटाडय़ा घेऊन इथे जाता येते. अन्यथा बहुला किल्ला ट्रेकिंगसाठी पूर्णपणे वज्र्य आहे. इथून पुढे दारणेचा प्रवाह नाशिक रोडच्या दिशेने सुरू असतो. तेव्हा तिला वाटेत चेहडी गावी वाळदेवी नदी येऊन मिळते. अंजनेरीच्या पूर्व बाजूकडून उगम पावलेली ही वाळदेवी नदी दाढेगाव वरून वाहात येताना नाशिकला वळसा घालून येते आणि चेहदी इथे दारणेला मिळते. इथे दारणेचा प्रवाह खूप मोठा विस्तारलेला आहे. या ठिकाणी प्रवाहात नौका वापरल्या जातात. इथेच पुढे दारणा पुणे नाशिक महामार्गाला ओलांडून पलीकडे जाते. दारणेचे खोरे फार सुंदर आणि नयनरम्य आहे. तिचा उगम झालेला प्रदेश आणि तिच्या प्रवाहाचा सगळाच परिसर हा विविध डोंगर आणि किल्ल्यांनी वेढलेला आहे. नगर जिल्ह्यच्या उत्तरेचा भाग आणि नाशिक जिल्ह्यचा दक्षिण भाग यांच्या सीमेवरून ही नदी वाहते आहे. सह्यद्रीच्या अक्राळविक्राळ रांगांनी हिचे सौंदर्य अजूनच खुलवलेले आहे. आगळीवेगळी तीर्थक्षेत्रे आणि गावे हिच्या किनारी वसलेली आहेत. मुळातच हिचा प्रवाह जेमतेम ८० किलोमीटर इतकाच. त्यातही हिला चार-पाच लहान लहान नद्या येऊन मिळतात आणि हिचा प्रवाह अजून समृद्ध करतात. दारणा जलाशयासारखा मोठा जलाशय हिच्या नशिबी आलेला आहे. तसेच स्वातंत्र्यवीरांचे सान्निध्य हिला लाभलेले आहे.

आपल्या छोटय़ाशा आयुष्यात लाभलेला हा अनमोल ठेवा आपल्या उराशी बाळगून दारणा आता आपला प्रवास संपवण्याच्या दिशेने प्रवाहित होते आहे. तिची थोरली बहीण गोदावरी हिला आपल्यात सामावून घेण्यासाठी नाशिकवरून आलेली आहे. ब्रह्मगिरीच्या डोंगरावर उगम पावलेली, त्र्यंबकेश्वर या ज्योतिìलगाच्या पवित्र ठिकाणावरून निघालेली गोदावरी दारणेला भेटायला आलेली आहे. नाशिकच्या पूर्वेला २४ किलोमीटरवर दारणा सांगवी या ठिकाणी दारणा नदी गोदावरीत विलीन होते. इथे मात्र दारणेचा प्रवाह खूपच मोठा असून गोदावरीचा त्या मानाने लहान आहे. दारणा सांगवीला संगमावर शंकराचे अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आवारात कुठल्याशा प्राचीन मंदिराचे अवशेष ठेवलेले दिसतात. दारणा सांगवी या ठिकाणचे अजून एक महत्त्व आहे. इथेच शेजारी एक गाव आहे त्याचे नाव जोगलटेंभी. तसे पाहायला गेले तर अगदी छोटेसे खेडे. पण या गावाचे संबंध आहेत थेट इ.स.च्या पहिल्या शतकात असलेल्या सातवाहन आणि क्षत्रप या दोन महासत्तांशी. सातवाहन राजा गौतमीपुत्राने नहपान या क्षत्रप राजाचा पराभव केला. तत्कालीन पद्धतीनुसार त्याने नहपानाच्या चांदीच्या नाण्यांवर आपली मुद्रा उमटवली. उद्देश सोपा आणि सरळ असायचा. आधीच्या राजाची राजवट संपून नवीन राजवट सुरू झाली आहे हे तमाम प्रजेला समजावे आणि दुसरे म्हणजे चलनात असलेली नाणी तशीच पुढे वापरली जावीत, मात्र त्यावर नवीन राजवटीचा शिक्का असावा. जोगलटेंभी या गावी अशाच चांदीच्या नाण्यांचा खजिना सापडला. त्यात गौतमीपुत्राने त्याचा शिक्का मारलेली परंतु मूळची नहपान या क्षत्रप राजाची चांदीची जवळजवळ १३ हजार नाणी मिळाली होती. नाशिक हे क्षत्रपांचे सत्ताकेंद्र होते. नाशिक इथल्या लेणीमध्येसुद्धा आपल्याला सातवाहन राजे आणि क्षत्रप राजे यांचे शिलालेख वाचायला मिळतात. इतिहासाच्या एवढय़ा सुंदर दुव्याची साक्षीदार असलेली दारणा, गोदावरीमध्ये विलीन होता होता आपल्याला तिच्या अस्तित्वाची जाणीव जोगलटेंभी आणि दारणा सांगवी इथे करून देते. आपले आयुष्य लहान असले तरी चालेल परंतु ते समृद्ध, संपन्न असावे असा संदेश देत दारणा गोदावरीत आपले अस्तित्व संपवते.

response.lokprabha@expressindia.com

First Published on October 12, 2018 1:04 am

Web Title: article about traveling near darna river
Just Now!
X