17 December 2017

News Flash

अरूपाचे रूप : मुद्राचित्रांचा ठसा!

शारीरिक त्रास असतानाही वयाची ऐंशी ओलांडल्यानंतर त्यांच्यातील प्रयोगशीलता कायम आहे.

विनायक परब | Updated: June 2, 2017 1:03 AM

वय झाले की, अनेक कलावंतांमधली प्रयोगशीलता संपत जाते. मात्र पुजारे सरांचे वैशिष्टय़ असे की, शारीरिक त्रास असतानाही वयाची ऐंशी ओलांडल्यानंतर त्यांच्यातील प्रयोगशीलता कायम आहे.

दामोदर गणेश पुजारे अर्थात डीजीपी हे कला क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वालावल गावी जन्म, तिथेच शिक्षण, गणपतीच्या मूर्ती तयार करणाऱ्या वडिलांकडूनच हाती आलेली मूर्तिकला अशी पाश्र्वभूमी. दहावीच्या पोरसवदा वयातच पुरुषभर उंचीची गणपतीची शिल्पकृती त्यांनी साकारली, त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे असे वडिलांना वाटत असतानाच त्यांनी मात्र कला क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. मुंबई गाठली. दादरला मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूटमध्ये प्रशिक्षण घेऊन १९५७ साली जूनमध्ये त्यांनी सर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीस गरजेपोटी पार्ले टिळक विद्यालयात पार्टटाइम नोकरीही केली. तिथेही जेजेतील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना सवलत देण्यात आली. नंतर मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूटमध्ये व्याख्याता म्हणून नोकरी मिळाली. नंतर व्याख्याता म्हणून ते बांद्रा स्कूल ऑफ आर्टमध्ये आले; निवृत्त झाले त्या वेळेस त्या संस्थेचे नाव रहेजा स्कूल ऑफ आर्ट असे झाले होते. याच महाविद्यालयात प्रिंट मेकिंग शिकविण्याची जबाबदारी सरांवर आली त्या वेळेस प्रयोग करून ते स्वत: शिकले आणि शिकता शिकता या मुद्राचित्रांच्या प्रेमातच पडले!

03-lp-art

या क्षेत्रातील जाणकार असलेले प्रा. पॉल िलग्रन यांच्यासारख्या तज्ज्ञांनीही त्यांच्या मुद्राचित्रांचे कौतुक करत जागतिक स्तरावरील एका प्रदर्शनासाठी त्यांच्या मुद्राचित्रांची निवड केली. वुडकट, लिनो अशा दोन प्रकारांतील मुद्राचित्रे आजवर प्रसिद्ध होती. मात्र अलीकडे प्लेटोग्राफी नावाचा नवा प्रकार अस्तित्वात आला. वयाची ऐंशी पार केलेल्या आणि सध्या कंपवाताने ग्रस्त असलेल्या सरांमधील कलावंताचे हात पुन्हा हे नवे तंत्र पाहून शिवशिवू लागले आणि मग अखेरीस त्यांनीच आधी केलेल्या चित्रांना प्लेटोग्राफीच्या तंत्रात आणण्याचे काम त्यांनी स्वत: या वयात केले, हे विशेष. त्यांच्या मुद्राचित्रांचे प्रदर्शन अलीकडेच जहांगीर कलादालनात पार पडले.

या नव्या तंत्रामध्ये ऑफसेट प्रिंटिंगसाठी वापरली जाणारी झिंक किंवा अ‍ॅल्युमिनिअम प्लेट वापरली जाते, मात्र या मुद्राचित्रासाठी वापरली जाणारी प्लेट फोटोसेन्सेटिव्ह नसते. तैलमाध्यम वापरून त्यावर चित्र रेखाटले जाते आणि मग प्लेट गरम केली जाते त्या वेळेस ते रेखाटन पक्के होते. उर्वरित प्रक्रिया ही इतर मुद्राचित्रांप्रमाणेच पार पाडली जाते. या तंत्राचा विशेष असा की, ती ओली असतानाच काम करावे लागते आणि या तंत्रामुळे छायांकित गोष्टींमध्ये खूप चांगल्या छटा मिळतात. खास करून नर्म छटा (सॉफ्टटोन्स) किंवा पेन्सिलच्या छटा या माध्यमात उत्तम पद्धतीने मिळतात.

02-lp-art

मुद्राचित्र हा प्रकार सर स्वत: शिकले. वय झाले की, अनेक कलावंतांमधली प्रयोगशीलता संपत जाते. मात्र सरांचे वैशिष्टय़ असे की, शारीरिक त्रास असतानाही प्रयोगशीलता कायम आहे. त्यांनी याही वयात प्लेटोग्राफीचे प्रयोग करून पाहिले, एवढेच नव्हे तर सोबत दिलेली त्यांची चित्रे पाहिली तर त्यांनी ते यशस्वीरीत्या सिद्धही केल्याचे जाणवते. खास करून नगर-वस्ती रचनेच्या चित्रांमध्ये त्या नर्म छटा खासच जाणवतात. माध्यमाचे वैशिष्टय़ ओळखून त्यानुसार प्रयोग करून पाहणे हा त्यांचा खाक्या त्यांनी इथेही व्यवस्थित वापरलेला दिसतो. सरांचेच विद्यार्थी असलेल्या शिरीष मिठबावकर आणि या विषयात पारंगत प्रीतम देऊसकर यांचे साहाय्य सरांना लाभले. या लेखासोबत अगदी सुरुवातीस दिलेल्या त्यांच्या निसर्गदृश्याच्या मुद्राचित्रामधूनही त्यांनी त्या नर्म छटा व्यवस्थित मिळविल्याचे दिसते. याही वयात त्यांनी साकारलेली ही मुद्राचित्रे त्यांच्या प्रयोगशीलतेचा ठसा उमटवणारीच आहेत.
विनायक परब –  @vinayakparab
response.lokprabha@expressindia.com

First Published on June 2, 2017 1:03 am

Web Title: artiest damodar ganesh poojare dgp