यंदाचं वर्ष हे सुप्रसिद्ध चित्रकार कै. म. कृ. केळकर यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांच्या नातीने  त्यांच्या जागवलेल्या त्यांच्या आठवणी-

माझे आजोबा यवतमाळसारख्या लहान गावातून १९३५ साली चित्रकलेचा ध्यास घेऊन याच कलेच्या शिक्षणासाठी मुंबईला आले. चित्रमहर्षी सा. ल. हळदणकर यांच्यासारखे सुप्रसिद्ध गुरू त्यांना लाभले. पाच वर्षे गुरुगृही राहून कलेचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चित्रकलेचे शिक्षक म्हणून काही काळ काम केले. १९४२ ते ४५ च्या काळात स्वत:स स्वातंत्र्याच्या लढय़ात झोकून दिले. चित्रकलेचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे वचन त्यांनी गुरूंना दिले होते. त्यासाठी शिक्षकाचा पगार पुरेसा नाही हे लक्षात आल्यावर छपाई, ब्लॉक मेकिंग, कमíशयल आर्ट हे उभरते क्षेत्र आहे हे जाणून त्याचा अभ्यास केला आणि कमíशयल आर्टस्टि म्हणून स्वतंत्र व्यवसाय चालू केला. चरितार्थासाठीच केवळ हा व्यवसाय करून कलेची जोपासना चालू ठेवली. दर वर्षी एक-दोन महिने कामातून राखून ठेवून ते प्रवास करीत. त्या त्या ठिकाणची वैशिष्टय़े, निसर्गसौंदर्य, लोकांचे पोशाख यांची चित्रे काढीत. जलरंगावर त्यांचे प्रभुत्व होते. ते तलरंगातील चित्रेही काढीत. भारतात व परदेशातही कित्येक ठिकाणी प्रवास करून ते चित्रे काढीत. ‘ऑन द स्पॉट’ चित्रे काढणे ही त्यांची आवड व खासियत होती. निसर्गाच्या आविष्काराचे कित्येक क्षण त्यांच्या चित्रात गोठवून त्यांनी अजरामर केले आहेत.

चित्रकलेबरोबरच त्यांना अनेक कलांची आवड होती. बागकाम, सुतारकाम, फोटोग्राफी व ट्रेकिंग हे त्यांना प्रिय होते. बागेत नवीन रोपे लावणे, त्यांचे खतपाणी करणे, त्यांची जोपासना करणे यांत तर ते एखाद्या लहान मुलासारखे हरवून जात. त्यांनी झाड लावले आणि ते जगले नाही, असे कधी झाले नाही. पुण्यात काकांच्या बंगल्याच्या आजूबाजूच्या ओसाड जागेत त्यांनी अत्यंत सुरेख बाग तयार केली. काकांच्या गच्चीत त्यांनी तयार केलेल्या बागेस १९६६ साली पुणे नगरपालिकेचे पारितोषिक मिळाले. निर्मितीचा आनंद त्यांच्यासाठी सर्वोच्च होता.

त्यांच्या पाच नातवंडांपकी मी एक. माझे लहानपण मुंबईत गेल्यामुळे मला माझ्या आजी-आजोबांचा सहवास सर्वात जास्त मिळाला. १९८२ साली आजी-आजोबा काकाकडे लंडनला जाणार होते. त्या वेळी शाळेला सुट्टी असल्यामुळे मी त्यांच्यासोबत गेले. मी तेव्हा आठ वर्षांची होते. काकाच्या घराजवळच थेम्स नदी होती. आम्ही रोज नदीवर फिरायला जात असू. तेथे बसून आजोबांनी चित्रे काढायची व ते पहायला जमलेल्या गर्दीची आठवण अजूनही ताजी आहे. तसेच एक दिवस आजी-आजोबा व आम्ही तीन नातवंडे ‘मादाम तुसां’चे मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन पाहायला गेलो होतो. प्रदर्शन पाहून झाल्यावर तेथेच एका बाकावर बसलो असताना आजोबा एकदम म्हणाले, ‘‘आता मी मेणाचा पुतळा हं!’’ त्यांनी पोझ घेतली. निश्चल बसून राहिले. पाच मिनिटे झाली तरी त्यांनी पापणीसुद्धा हलवली नाही. आम्ही त्यांच्याकडे पाहात उभे राहिलो होतो. आमच्यामागे हा ‘पुतळा’ पाहायला आणखी काही लोक जमा झाले. गर्दी वाढली तशी आजी म्हणाली ‘‘आता पुरे हो’’ तेव्हा आजोबा हलले. आमच्यासह सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. कडक शिस्तीचे असले तरी असे मिश्कील होते माझे आजोबा.

आजोबांना प्राणीही खूप आवडत आणि प्राणीही त्यांच्यावर प्रेम करत. एकदा कुणाच्या घरी गेले असता त्यांचा मोठा अस्लेशियन कुत्रा समोर आला. मी कुत्र्यांना खूप घाबरत असे, पण आजोबा म्हणाले, ‘‘घाबरू नकोस, काही करणार नाही.’’ त्यांनी कुत्र्याकडे प्रेमाने पाहिले व जवळ बोलावले. तो आजोबांच्या खांद्यावर पुढचे पाय ठेवून उभा राहिला. आम्ही तेथून परत निघेपर्यंत तो आजोबांच्या जवळच बसला होता. आजोबा त्याच्या पाठीवरून, गळ्यावरून हात फिरवत होते व तो त्यांच्याकडून लाड करून घेत होता.

आजोबांची पावले आमच्या छोटय़ा हातांनी चेपून देणे, पाठीला पावडर लावून चोळून देणे, त्यांचे खांद्यापर्यंत आलेले मऊ, रुपेरी केस िवचरणे अशी कामे आम्हा नातवंडांना खूप आवडत असत.

चित्रांची प्रदर्शने नेहमी होत असत. त्या वेळी घरात उत्साह संचारलेला असायचा. गॅलरीत चित्रे लावली की, अतिशय सुंदर दिसत. बघणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, की छान वाटायचे. प्रदर्शनाच्या वेळी घरातल्या प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी असे. माझ्याकडेही एक मुख्य काम असे. कोणी चित्र विकत घेतले की, आजोबा मला हाक मारीत. मग मी लाल टिकल्यांची डबी घेऊन जायची व त्या चित्राला टिकली लावायची. अर्थात त्या वेळी त्याचा अर्थ नीट कळला नाही तरी आपण काही तरी मोठे काम केले असे वाटे आणि जबाबदारी पार पाडल्याचा आनंद होई. अशा प्रकारे आजोबा सर्वाना आनंद होईल अशा रीतीने कामात सामावून घेत.

आजोबांच्याकडे अनेक विद्याíथनी मार्गदर्शनासाठी यायच्या. आजोबांनी त्यांची विद्या निरपेक्षपणे सर्वाना दिली. त्यांनी चित्रकलेवर चार पुस्तके लिहिली आहेत. उज्जनच्या एका विद्यार्थिनीने त्यांच्या जीवनावर व चित्रकारितेवर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली आहे. वयाच्या ८५व्या वर्षीही रशियाच्या आमंत्रणावरून आजोबा तेथे गेले होते. तेथेही प्रदर्शन भरविले, प्रात्यक्षिके केली. वयाच्या ८८व्या वर्षी कर्करोगासारख्या दुर्धर रोगाशी त्यांनी न खचता सामना केला. त्यातून बाहेर येऊन आणखी सहा वष्रे ते कार्यरत राहिले. २००८ साली माझे लग्न झाले. आजारातून उठले होते तरी लाडक्या नातीच्या लग्नास ते आवर्जून हजर होते. माझ्या लहानपणी त्यांनी माझे तलरंगात चित्र काढले होते. तसेच लग्नात त्यांनी भेट म्हणून दिलेले एक जलरंगातील चित्र माझ्या दुबईच्या घरात लावले आहे

वयाच्या ९३व्या वर्षी आजोबांचे निधन झाले. शेवटपर्यंत त्यांचा हात स्थिर होता. त्यांची मानसिकता आणि आत्मिकता कायम सक्षम व आनंदी राहिली. त्यांनी त्यांचे जीवन कलेच्या प्रेमाने व स्वभावाच्या निरनिराळ्या पलूंनी समृद्ध केले. अशा माझ्या आजोबांचा मला खूप अभिमान आहे.

‘जलरंगाचे बादशहा’ असलेल्या माझ्या आजोबांच्या म्हणजेच कै. म. कृ. केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नेहरू सेंटर, वरळी येथे भरावे म्हणून माझ्या आजीने (तेव्हा ८३ वर्षांची असलेल्या प्रतिभा केळकर हिने) चार वर्षांपूर्वी  कोणाचीही मदत न घेता स्वत: नेहरू सेंटर येथे जाऊन सभागृहाचे आरक्षण केले. आपण या प्रदर्शनापर्यंत नुसती हयात असणार असे नाही तर, त्या प्रदर्शनाचे नियोजन व आयोजन जातीने करणार या तिच्या सकारात्मक विचारांचा मला राहून राहून हेवा वाटतो, या जिद्दीकरिता माझा तिला सलाम.

त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ३ मे ते ६ मेच्या दरम्यान त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नेहरू सेंटर, वरळी मुंबई येथे आयोजिलेले आहे. त्यांच्या चित्रांबरोबरच त्यांच्या प्रेरणेने वयाच्या ७२ व्या वर्षी चित्रे काढायला लागलेली माझी आजी, तसेच घरातले आम्ही सर्व, ज्यांनी आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे, यांनी काढलेली चित्रे या प्रदर्शनात असतील.
आरती केळकर – कुसरे – response.lokprabha@expressindia.com