अरूपाचे रूप
विनायक परब – @vinayakparab, response.lokprabha@expressindia.com
तीन चित्रकार तीन टप्पे तीन शैली
जहांगीर कलादालनात गेल्या आठवडय़ात मनोजकुमार साकळे, भाऊसाहेब ननावरे आणि अ‍ॅड. नितीन पोतदार या तिघांची प्रदर्शने पार पडली. यातील मनोज साकळे हा सातत्याने नवीन प्रयोग करणारा आणि थेट जनसामान्यांच्या विषयांना भिडणारा चित्रकार म्हणून कला जगतास परिचित आहे. गेल्या अनेक वर्षांत त्याने स्वतची शैली विकसित केली आहे. तो या खेपेस काय सादर करणार याचे एक लहानसे आकर्षण निश्चितच त्याच्या प्रदर्शनापूर्वी रसिकांच्या मनात असते. भाऊसाहेब ननावरे हे सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अमूर्त चित्रांमध्ये स्वत:चा जीव ओतून काम करणारा चित्रकार म्हणून तेही परिचित आहेत. तर अ‍ॅड. नितीन पोतदार हे तुलनेने तसे नवखे. कारण तीन-चार वर्षांपूर्वीच त्यांनी ब्रश हाती धरला. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांनीही चित्रकलेत स्वत:ला झोकून घेतलेले दिसते. तिन्ही चित्रकार वेगवेगळ्या टप्प्यावरचे असले तरी तिघांनीही आयुष्याचा पोत आपापल्या कामांतून वेगवेगळ्या शैलींमध्ये हाताळलेला दिसतो.

मनोज साकळेने विविध रूपात समोर येणारे वर्तुळ वेगवेगळ्या रूपाकारात हाताळलेले दिसते. कधी शाळेतील परेड करणारी मुले-मुली गोलात फिरताना दिसतात. कधी गोलाकारात बसून लहान मुलांच्या नाटय़ात्म गप्पा रंगलेल्या दिसतात. तर कधी नटराजाच्या शिल्पकृतीसमोर गुरूसोबत एकत्र गोलाकारात उभे राहून कार्यक्रमापूर्वी प्रार्थना करणारे शिष्यगण पाहायला मिळतात. नेहमीप्रमाणे मनोजचा हातखंडा असलेला विषय म्हणजे व्यक्तिचित्रे तीही त्याने या प्रदर्शनात सादर केली होती, एका िभतीवर. दोन महत्त्वाच्या बाबी या प्रदर्शनात प्रामुख्याने जाणवल्या त्यातील पहिली म्हणजे गेल्या खेपेस त्याने वहीच्या पानांवर केलेली चित्रमालिका याही खेपेस सुधारित आवृत्तीत सादर केली होती. त्यातील काही चित्रे केवळ अप्रतिम होती. पानावरील दोन ओळींमध्ये अवघडलेल्या लहान मुलीचे चित्र तर लक्षात राहण्याजोगे आहे. शिवाय सर्वच्या सर्व मोठय़ा आकारातील चित्रांमध्ये लक्षात राहणारा होता तो चित्रातील पोत. लहान आकाराच्या चित्रांमध्येही तो लक्षवेधीच होता. ‘तळे’ या शीर्षकाचे चित्र आणि नटराजाजवळ प्रार्थना करणाऱ्या शिष्यांचे चित्र यातील रंग अतिशय वेधक व जलरंगाचा अप्रतिम आभास निर्माण करणारे होते.

भाऊसाहेब ननावरे यांची चित्रे ही वरकरणी तशी अमूर्त वाटावीत अशीच होती. मात्र ती व्यवस्थित पाहिली तर निसर्गातील विविध दृश्यप्रतिमा सहज आठवाव्यात. कुठे पाण्यावर पडलेले कोवळे प्रकाशकिरण चमकताना तर कुठे पिवळ्या फुलांचे प्रतििबब पाण्याच्या जाळी वलयांवर चमकताना भासमान होते. कुठे उभ्या राहिलेल्या सोनहिरव्या शेतावर भल्या पहाटे भरून राहिलेले दाट धुके भासमान व्हावे. निसर्गाची ही अशी अनंत रूपे ननावरे यांच्या चित्रांमध्ये भासमान होत राहतात. त्या अमूर्त चित्रांमधील तो बोलका पोत त्यातील अनुभूतीसाठीची वातावरण निर्मिती नेमकी करताना दिसतो.

नितीन पोतदार यांचे हे पहिलेच प्रदर्शन. त्यांचा व्यवसाय वकिलीचा. या पेशातच नानाविध प्रकारच्या, वृत्ती असलेल्या व्यक्तींची भेट सातत्याने होत असते त्यांच्या गुणावगुणांसह. कधी ही भेटणारी मंडळी कधी स्वत:ची मते ठाम असलेली असतात तर कधी त्यात थोडी लवचीकताही असते विचारांची. कधी ती अतिशय पारदर्शी असतात तशीच प्रेरणादायीही असतात. तर कधी ती यशस्वी, कर्तृत्ववान आणि प्रकाशवाटेवर असलेली असतात. हे सारे या अमूर्त चित्रांमध्ये चितारण्याचा प्रयत्न पोतदार यांनी केला आहे. त्यासाठी त्या त्या विषयानुरूप अशी रंगरचना तर त्यांनी केली होतीच, पण वैशिष्टय़ लक्षात राहणारे होते ते त्या चित्रांचा पोत हेच. त्यातील रंग हाताळणीमध्ये आता कुठे हात बसू लागला आहे. ‘पोत’दार चित्रप्रयोग सुरू आहेत हे रसिकांना सहज जाणवावे असे होते. अर्थात अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण सुरुवात आश्वासक आहे, असे म्हणायला हरकत नाही.

तीन चित्रकार, तीन शैली, हाताळण्याचे तीन वेगळे प्रकार असा अनुभव या निमित्ताने गेल्या आठवडय़ात रसिकांना घेता आला. यातील मनोजची चित्रे ही दिसायला मनुष्याकृती प्रधान दिसली तरी त्यातील विचार व हाताळणी ही अमूर्ताच्या दिशेने जाणारी वाटावी अशी होती. तिघांनीही हाताळलेला पोत तिघांच्याही चित्रातील वातावरणनिर्मितीला वेगळा परिपोष देणारा होता. यातील भाऊसाहेब ननावरेंची त्या संदर्भातील हाताळणी उजवी ठरावी. अखेरीस मनावर परिणाम करून गेला तो या चित्रांमधील पोत!