18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

अरूपाचे रूप : शुद्धतेची आस!

एका रंगावर दुसरा रंग का चढवायचा?

विनायक परब | Updated: May 26, 2017 1:02 AM

एका रंगावर दुसरा रंग का चढवायचा? मग त्या दुसऱ्या रंगाचा भार त्या पहिल्या रंगाने का सहन करायचा? आपण हे सारे जे जसे आहे तसे शुद्ध स्वरूपात का नाही भोगायचे?

एकदा एका राज्यामध्ये शेजारच्या देशाचा राजा काही राजनैतिक करारांसाठी येणार होता. त्या वेळेस त्या यजमान राजाने त्याच्या राज्यातील सर्वोत्कृष्ट कलावंताला बोलावले आणि सांगितले की, त्या येणाऱ्या राजाने डोळे दिपून जावेत, अशी काही कलाकृती या कलावंताने घडवावी. त्यासाठी लागेल तेवढे धन, संपत्ती देण्याची राजाची तयारी होती. मात्र कलाकृती जगावेगळी आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारी असावी. कलावंताने विचार करायला सुरुवात केली. एक-दोन दिवस गेले. राजाने परत पाचारण केले. त्या वेळेस कलावंत म्हणाला की, काहीच सुचत नाहीए. राजा म्हणाला, वाट्टेल ते कर. पण कलाकृती जगावेगळी असली पाहिजे. वाट्टेल तेवढे धन वापर. कलावंत बरं म्हणाला आणि निघून गेला. गावाबाहेर एक मोठा वटवृक्ष होता, त्याच्या सावलीत खाली बसून विचार करत असतानाच त्याला एक कल्पना सुचली की, असाच एक वटवृक्ष आपण साकारला तर. त्याने राजाकडे धाव घेतली. म्हणाला, सुमारे किमान अडीच हजार माणसे लागतील, त्यांना चांगले पैसे द्यावे लागतील. त्यांचा दर दिवसाचा दर एक हजार असेल तर अडीच हजार रुपये प्रतिदिन एवढे पैसे द्यावे लागतील. राजाही तयार झाला. लगेचच दवंडी पिटवण्यात आली. राजाचे काम, त्यात अधिक पैसे मिळणार म्हणून हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होण्यासाठी रांगेत आले. त्यातील नेमक्या हव्या असलेल्या माणसांची निवड चित्रकाराने गरजेनुसार केली. त्यानंतर कलाकृती साकारण्यास सुरुवातही केली.. त्याला त्या वटवृक्षासारखाच जसाच्या तसा दिसणारा, पण माणसांनी एकत्र येऊन तयार झालेला वटवृक्ष साकारायचा होता. प्रयत्नांती ते शक्यही झाले. पाहणारे खरोखरच अवाक होत होते..

तरीही थोडी काहीतरी कमी, उणीव त्या कलावंतालाही जाणवत होती. मग त्याने विचार केला की, त्या मूळ वटवृक्षाच्या जागी एखादा माणूस असेल जो त्या कृत्रिम आणि मानवी वटवृक्षाकडे पाहात असेल किंवा बोट दाखवत असेल तर.. मग त्याने त्या मूळ वटवृक्ष बुंध्यापासून छाटला आणि त्या बुंध्यामध्ये एका माणसाची कलाकृती साकारली. ती माणसाची कलाकृती त्या कृत्रिम मानवी वटवृक्षाकडे पाहात होती. कलावंताचे समाधान झाले.

अखेरीस तो दिवस उजाडला, शेजारचा राजा या राज्याच्या भेटीवर आला. समोर येताच ही कलाकृती पाहून तो अवाक झाला, त्याने आश्चर्याने बोटे तोंडात घातली. यजमान राजा आणि कलावंत दोघेही हरखून गेले. त्याच वेळेस राजाच्या लक्षात आले की, सर्व जण आजूबाजूचे राजाकडे पाहात आहेत आणि एकच माणूस त्या कलाकृतीपासून काही अंतरावर असलेला तो राजांकडे न पाहता त्या कलाकृतीकडे पाहतो आहे. म्हणून राजा त्याच्या जवळ गेला, त्या वेळेस त्याला लक्षात आले की, ती त्या बुंध्यात असलेली माणसाची कलाकृती आहे. आता तर त्या राजाला केवळ वेडच लागायचे बाकी होते. त्या शेजारच्या राजाने तर या कलावंताला आपल्या राज्यात येण्याचे आवताण दिले. राज्यांचे करारमदार झाले. तो आमंत्रित राजा परतही गेला.

त्यानंतर यजमान राजाने कलावंताला बोलावून घेतले. प्रचंड कौतुक केले. राजाने त्या कलाकृतीवर खूश होऊन कलावंताला दामदुप्पट पैसे देऊ  केले. कलावंत म्हणाला की, मला काही या पैशांची फार गरज नाही, पण खूश झालेले असालच तर ज्या माणसांनी यासाठी काम केले त्यांना दुप्पट पैसे द्या मग राजाचे अडीच हजार रुपये प्रत्येकी आणखी देऊ  केले. त्या पैशांच्या थैल्या घेऊन कलाकाराने ठरवले की, आपणच स्वत:हून प्रत्येकाला देऊ  करावे. त्या कलावंताने घरे गाठण्यास सुरुवात केली. प्रत्येक घरामध्ये कलाकृतीत सहभागी माणूस काही ना काही विकाराने ग्रस्त होता. कुणी त्या कलाकृती असलेल्या माणसाच्या झाडामध्ये तळात उभे होते. त्यांचा खांदा प्रचंड दुखत होता, सुजला होता. कुणाच्या तरी हातावर कुणी उभे होते. त्यांचा हात सुजला होता. प्रत्येकाला काही ना काही त्रास होतच होता. कारण त्याच अवस्थेत ते सारे जण २४ तासांपेक्षा अधिक काळ उभे होते. त्यामुळे पैसे प्रत्यक्षात घेण्यासाठी या साऱ्यांचे कुटुंबीय पुढे आले होते. नंतरच्या पुढच्या दोन दिवसांत साधारण दोन हजार माणसे दगावली.. कलावंतालाही मग प्रश्न पडला की हे सारे आपण कुणासाठी, कशासाठी केले, त्यातून काय मिळाले, काय मिळवले. त्याच्या मनात अनंत प्रश्न आले. त्याने विचार केला की, पुन्हा एकदा जाऊन शांतचित्ताने त्या वटवृक्षाखाली बसावे आणि विचार करावा. कदाचित सैरभैर झालेले मन शांत होईल. म्हणून तो गावाबाहेर गेला. पण तिथेही तो वटवृक्ष नव्हता. कारण माणसाची कलाकृती करण्यासाठी त्याने तो बुंध्यापासून छाटला होता. मग त्याला पुन्हा प्रश्न पडला की, हे आपण का बरे केले? यातून काय मिळवले. त्या माणसांवर जसे एकावर एक अत्याचार होत गेले तसे चित्रात आपण अत्याचार का करायचे म्हणजे रेषेवर रेषा का चढवायची? त्या कलाकृतीतील माणसांप्रमाणे मग त्या खालच्या रेषेवर वरच्या रेषेचा भार नाही का येणार?  एका रंगावर दुसरा रंग का चढवायचा? मग त्या दुसऱ्या रंगाचा भार त्या पहिल्या रंगाने का सहन करायचा? आपण हे सारे जे जसे आहे तसे शुद्ध स्वरूपात का नाही भोगायचे? ती शुद्धता, विशुद्धता का नाही भोगायची, प्रत्येकाने आपापल्या परीने. कारण रंग आपल्या आतमध्ये असतातच.. इति चित्रकार राजेंद्र घोसाळकर.

राजेंद्र घोसाळकर यांच्या चित्रांमध्ये असे विशुद्ध रंग पाहायला मिळतात. इथे त्या रंगांची मजा अनुभवायची आहे. एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की, केवळ एकच रंग चित्रांमध्ये सर्वत्र दिसतोय. हे काय चित्र आहे काय? याला चित्र म्हणायचे का? असा प्रश्न मनात आलाच तर थोडे थांबा. घोसाळकर यांच्याशी संवाद साधा, त्यांनी अलिबाग- रेवदंडा परिसरातील शाळांमध्ये निरागस असलेल्या मुलांकडून करून घेतलेल्या रंगचित्रांचे प्रयोग समजून घ्या. म्हणजे मग या कलावंताला असलेली विशुद्धतेची आस आणि त्यांची चित्रे दोन्ही समजावून घेता येतील. या चित्रांसमोर बराच एकटक पाहत राहिलात की, आधी जाणवलेला रंगही हळूहळू आणखी वेगळा जाणवू लागेल. कदाचित काळासोबत ते चित्र पाहिल्यानंतर मनात येणाऱ्या भावनांचा पडदाही हलता असेल.. त्यावरील भावचित्रही बदलत जातील! त्या रंगांसोबत येणारी ती भावनांची शुद्धताच या चित्रांचे मूळ आहे!

हॅट्स ऑफ राजेंद्र घोसाळकर, एका वेगळ्या दृश्यानुभवासाठी!
विनायक परब –  @vinayakparab
response.lokprabha@expressindia.com

First Published on May 26, 2017 1:02 am

Web Title: artist rajendra ghosalkar