18 February 2019

News Flash

तरल सुरांचा तारा

अरुण दाते यांनी गायलेल्या गीतांकडे एक सहज नजर टाकली तरी लक्षात येते त्यात एक शांत भाव आहे.

अरुण दाते

श्रद्धांजली
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
साधारण तीसएक वर्षांपूर्वीचा काळ असेल. तरुणांच्या ग्रुप पिकनिकमध्ये एखाद्या हौशी गायक-गायिकेकडून ‘शुक्रतारा मंद वारा..’ हे गीत हमखास गायले जायचे. खरं तर तो काळ काही अरुण दातेंचा नव्हता. नुकतेच जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. मात्र आजच्यासारखा करमणुकीचा विस्तार झालेला नव्हता. टीव्हीदेखील मर्यादितच होता, चित्रपट हे चित्रपटगृहातच पाहिले जात होते, ऑडिओ कॅसेट अजूनही अस्तित्वात होती. जागतिकीकरण पूर्व आणि जागतिकीकरणोत्तर अशा टप्प्यांमध्ये असलेली ती पिढी होती. ग्रेस, सुरेश भट अशांची प्रयोगशील कविता आणि त्यांना चाल लावलेली गाणी लोकप्रिय होती. पण तरल भावनांना मोकळीक देताना १९६२ साली अरुण दातेंनी गायलेल्या ‘शुक्रतारा’चा आधार मात्र चाळीस वर्षांनंतरदेखील तसाच होता.

हा प्रभाव कवीचा, संगीतकाराचा की गायक-गायिकांचा हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो. पण जनमानसावर प्रभाव असतो तो ज्यांच्या तोंडून गाणे ऐकतो त्यांचाच. त्यामुळेच अरुण दाते यांचा हा प्रभाव चाळीस वर्षांनंतरदेखील टिकून होता. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे दाते यांच्या स्वरातील तरलता. दाते यांनी भावगीतांच्या दालनात प्रवेश केला त्यापूर्वीच्या पिढीत गजानन वाटवे आणि प्रभृती अशांनी हे दालन चांगलेच समृद्ध केले होते.

दातेंना घरून गायकीचा फार मोठा वारसा लाभला होता. पण सुरुवातीच्या काळात त्यांनी गायन हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारलेला नव्हता. पण भावगीतांच्या दालनातील त्यांचा वावर इतका वाढला की त्यांनी या कार्यक्रमांसाठी नोकरी सोडली.

भावगीत हा थेट सर्वसामान्यांना भिडणारा प्रकार. दाते यांनी रूढार्थाने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले असले तरी त्यांनी या सहज सोप्या भावगीतांना अधिक जवळ केले आणि ते सर्वसामान्यांच्या हृदयात जाऊन विसावले. दातेंच्या गाण्यांची ओळख व्हायची ती महाविद्यालयीन वयात. साठच्या दशकानंतरच्या पाच पिढय़ांपैकी एखादाच तरुण/तरुणी अशी असावा किंवा असावी की ज्यांना दातेंच्या भावगीतांची भुरळ पडली नसेल.

शुक्रताराने त्यांना पहिली ओळख मिळवून दिली आणि मंगेश पाडगावकर यांच्याशी त्यांची जोडी जमली. पाडगावकरांची सोपी साधी पण भिडणारी गाणी, त्यातून व्यक्त होणारा भाव हे सारं अरुण दाते यांनी त्याच साधेपणाने आणि तरलतेने श्रोत्यांपर्यंत पोहोचवले.

दाते यांनी गायलेल्या गीतांकडे एक सहज नजर टाकली तरी लक्षात येते त्यात एक शांत भाव आहे. काही तरी बिंबवण्यापेक्षा प्रत्येकाच्या अंतर्मनाला साद घालण्याची ताकद त्यात आहे. मग ते सखी शेजारणी असो, मान वेळावूनी धुंद बोलू नको किंवा येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील किंवा स्वरगंगेच्या काठावरती असो की भातुकलीच्या खेळामधली असे कोणतेही गीत असो; ही तरलता श्रोत्यांना अधिक भिडली. तरुणांना जरा अधिकच. अल्लड भावनांना घातलेली साद, प्रेमिकांचे गाऱ्हाणे असं त्या वयाला आवडणारे सारे काही त्यात होते. ती आर्तता अधिक भिडणारी होती. दाते यांच्या स्वरातील मार्दवता हे त्यामागचे खरे कारण.

दाते यांनी कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली तेव्हा सादरीकरणांना अजून आजच्या काळातील इव्हेंटचा वारा लागला नव्हता. अर्थातच दाते यांच्या मृदू बोलण्यातून, सहज गायनातूनच ते सादर होत असत. कोणी वन्स मोअर मागितलाच तर त्याच शांत भावाने, गालात हसून ते गाण्याचे एक कडवे पुन्हा गात. ना कोणता आविर्भाव ना अतिउत्साह. आजच्या काळातील गायन कार्यक्रमातील अतिउत्साही आक्रस्ताळीपणा त्यांच्यामध्ये कधीच आढळला नाही. किंबहुना तो त्यांचा स्वभावच नव्हता. इतकेच नाही तर लोकप्रियतेच्या शिखरावर असतानादेखील त्यांनी कधी अहंकाराचा स्पर्श लागू दिला नाही, त्यात वाहवत जाणे तर दूरच. दातेंचे ऋजुपण हे त्यांच्या गायनाला पूरकच ठरले.

गेल्या वीस वर्षांत सर्वच अस्मिता टोकदार होत असताना अशा मार्दवतेची आठवण नक्कीच होते. दाते यांची गाणी आवडणारा श्रोता हा एक ठरावीक सुखवस्तू वर्गातील होता आणि त्यांच्या गाण्यांना त्या वर्गाच्याच भाषेची, भावनांची असायची असा एक आरोपदेखील होत असतो. पण दाते यांना जे भावले, जे मांडता आले ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडले. सुखवस्तूंना आवडणारे असे जरी त्यांचे गाणे असले त्यात एक मर्यादा होती, त्यात कोणत्याही प्रकारचा स्वैराचार अथवा कोणाचा उपमर्द नव्हता. त्यामुळेच त्यांना अशा साच्यात बसवणे हेच मुळात चुकीचे ठरते.

त्यामुळेच आज व्यक्त होण्याची माध्यमं, भाषा आणि संगीताची भाषादेखील बदलत असली तरी भावनेतील तरलता पोहोचवायची असेल तर शुक्रतारा मंदवारा हे आठवल्याशिवाय राहणार नाही, यातच अरुण दातेंचे गाणे सामावले आहे.

अशा अरुण दाते यांना ‘लोकप्रभा’ परिवाराकडून श्रद्धांजली.

First Published on May 11, 2018 1:04 am

Web Title: arun date