17 December 2017

News Flash

दीप निमाला

पत्रकार म्हणून असलेली जागरूकता त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली.

वैशाली चिटणीस | Updated: September 29, 2017 1:09 AM

अरुण साधू गेले. पत्रकारितेपुढची आव्हानं अधिकच गुंतागुंतीची होत असतानाच्याच काळात, म्हणजे ज्या काळात त्यांच्यासारख्या माणसाची समाजात फार गरज आहे, असं वाटावं अशा काळात अरुण साधू गेले. इंग्रजी-मराठी माध्यमांमधली पत्रकारिता, मराठी साहित्याच्या क्षेत्रातलं भरीव योगदान आणि पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र संज्ञापन विद्या विभागात सहा वर्षे प्रमुखपद या त्यांच्या कारकीर्दीतल्या प्रमुख गोष्टी.

पत्रकाराला त्याच्या कामामुळे समाजाचे वेगवेगळे पैलू जवळून बघायला मिळतात. राजकीय पत्रकारिता करताना अरुण साधूंनाही ते पाहायला मिळाले. पण आपल्याला दिसलेल्या वास्तवाला फिक्शनचं स्वरूप द्यायला एक ताकद लागते. पत्रकार म्हणून असलेली तुमची संवेदनशीलता एका वेगळ्याच पातळीवर नेणारी ही बुद्धीची ताकद असते. तुम्हाला जे सांगायचं आहे ते बातमीच्या रूपात म्हणजेच तथ्यांच्या रूपात सांगणं आणि दुसरीकडे तेच कादंबरी, नाटक हे फॉम्र्स वापरून कलात्मक पद्धतीने सांगणं ही अरुण साधूंची ताकद होती. हे त्यांच्याआधीही आणि नंतरही कुणी फारसं केलं नाही, यावरूनच ही दोन टोकं सांधणारी बुद्धिमत्ता किती दुर्मीळ आहे, हे लक्षात येतं. राजकीय पत्रकारिता करताना ‘सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’ या राजकीय कादंबऱ्या लिहिणाऱ्या अरुण साधूंच्या याच कादंबरीवर मराठीतला पहिला राजकीय सिनेमाही निघाला, हा त्यांचा आणखी एक पैलू. आजही ‘सिंहासन’ हा सिनेमा मराठी सिनेमांच्या इतिहासातला मैलाचा दगड समजला जातो, यावरूनच त्यांच्या साहित्याचं मोल लक्षात येतं.

सत्तरच्या दशकातलं महाराष्ट्रातलं, देशातलं राजकारण काय होतं त्याची जाणीव त्यांनी ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या कादंबऱ्यांमधून करून दिली होती. पत्रकार म्हणून त्यांना एकूण परिस्थितीचं भान होतं. राज्यातलं शिवसेनेचं राजकारण, काँगेसचं राजकारण, इथले प्रांतिक वाद याचं त्यांना अचूक आकलन होतं. हे त्यांच्या लिखाणातून, व्याख्यानांतून दिसतं. पत्रकार म्हणून संतुलित भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या मोजक्या पत्रकारांपैकी ते एक होते. अरुण साधू विचारांनी डावे; पण डाव्यांची पोथीनिष्ठा त्यांनी स्वत:मध्ये येऊ दिली नाही. राजकीय, आर्थिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय घडामोडींचं त्यांचं आकलन अत्यंत उत्तम होतं. पण तरीही त्यांची मांडणी अतिशय संयमी, संतुलित असायची. कोणत्याही एका गोष्टीचं टोक गाठणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं.

प्रत्यक्ष पत्रकारिता केल्यानंतर ते बाजूला झाले, पण पत्रकार म्हणून असलेली जागरूकता त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. प्रत्यक्ष दैनिकातलं काम थांबलं तरी त्यांनी स्वत:ला कधीच गंज चढू दिला नाही. समाजात घडणाऱ्या घडामोडींबाबत ते कायम सजग राहिले. काळानुसार स्वत:च्या धारणा तपासून पाहत राहिले. राजकीय, सामाजिक पातळीवरचे नवनवे बदल समजून घेण्याचा खुलेपणा त्यांनी कायम जोपासला. स्वत:च्या भूमिकेवर ते ठाम असत, पण म्हणून त्यांनी कधी टोकाच्या भूमिका घेतल्या नाहीत.  आपली पत्रकारिता सरकारला जाब विचारण्याची, भान देण्याची असते, हे आज विसरलं जात असताना अरुण साधूंचं  हे आकलन कायम तेवढंच तीव्र राहिलं.

पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी सहा वर्षे काम केलं. तिथे त्या काळात त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तींना विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला बोलावलं. पत्रकारिता शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना जगाचा एक व्यापक आवाका मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी रुजवलेली बीजं कधीतरी, कुठेतरी उगवतील अशी आशा करायला हरकत नाही.
वैशाली चिटणीस 
response.lokprabha@expressindia.com

First Published on September 29, 2017 1:09 am

Web Title: arun sadhu