खबर राज्यांची
विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
काल्लेक. अवघ्या १३ उंबरठय़ांचं गाव. निम्मे गावकरी निरक्षर आणि उरलेल्यांपैकी बरेचसे अर्धशिक्षित. इथे पोहोचणारा गाडीरस्ता गावापासून १० किमी दूरवर थांबला आहे. त्यामुळे गावात पोहोचायचं तर तब्बल तीन तास पायपीट करण्याशिवाय गत्यंतर नाही. महामार्गापासून गावापर्यंत १० किमीचा रस्ता बांधण्याचं काम तब्बल २० र्वष रखडलं आहे. रस्ता नाही म्हणून, शिक्षण नाही, विकास नाही. हे दुष्टचक्र गावातल्या एका विस्तीर्ण झाडामुळे थांबेल, अशा आशेने हे ग्रामस्थ एका रबराच्या झाडाकडे (स्थानिक भाषेत अतांग आने) डोळे लावून बसले आहेत. ५९.८ मीटर एवढा अवाढव्य परीघ असलेलं, अनेक वर्षांपूर्वीचं झाड आणि त्याच्या अंगाखांद्यांवर बागडणारे विविध प्रजातींचे पक्षी पाहण्यासाठी पर्यटक येतील आणि पर्यटकांच्या सोयीसाठी तरी स्थानिक प्रशासन रस्त्याचं काम पूर्ण करेल, अशा आशेने इथले गावकरी या वृक्षाचं संवर्धन करतायत. पर्यटकांना गावापर्यंत ट्रेकिंग करत येण्यासाठी, हा वृक्ष पाहण्यासाठी, पक्षीनिरीक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करतायत.

अरुणाचल प्रदेशमधलं सर्वात विस्तीर्ण झाड शोधण्याचं आवाहन २०१२ मध्ये तत्कालीन राज्यपाल जोगिंदर सिंग यांनी केलं होतं. राज्यातील पर्यटन आकर्षणांमध्ये आणखी एका पर्यटनस्थळाची भर घालणं, हा सिंग यांचा उद्देश होता. काल्लेकमधील ताकोम तामक या गावकऱ्याने हा प्रशस्त वृक्ष शोधून काढला. त्याबद्दल, त्यांना १५ हजार रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरवण्यातही आलं.

सुमारे ६० मीटर रुंद असलेल्या या झाडाची उंची ६४८ मीटर आहे. या वृक्षाच्या वाढीचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे योग्य काळजी घेतली गेल्यास येत्या काळात ते आणखी विस्तारेल. साधारण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात काल्लेकमधले रहिवासी सिबेंग तामुक यांनी लावलेल्या एका छोटय़ाशा रोपटय़ाचं रूपांतर आज या अवाढव्य झाडात झाल्याचं, इथले रहिवासी सांगतात. झाड ब्रह्मदेशातून आणलं होतं. झुम लागवडीच्या काळात म्हणजेच मुख्य पीक घेतल्यानंतर शेतातील झाडेझुडपे जाळून केल्या जाणाऱ्या लागवडीच्या काळात ते लावण्यात आलं होतं. रबर मिळवणं एवढाच त्यांचा त्यामागचा उद्देश होता. पण आज या झाडाने गावकऱ्यांसाठी विकासाच्या आशेची किरणं आणली आहे.

या झाडाकडे पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी येथील ग्रामस्थ आणि इटानगरमधील एका पर्यटन संस्थेने मिळून काल्लेकमध्ये १५ आणि १६ डिसेंबर २०१८ ला एक ट्रेक आयोजित केला होता. त्यात राज्यभरातील ३० पर्यटक त्यात सहभागी झाले होते. दिब्रुगडपासून रोत्तुंग गावापर्यंत कारने प्रवास करून नंतर इथल्या उंचसखल वाटांवरून तीन तास ट्रेक करत ते काल्लेकला या महाकाय झाडापाशी पोहोचले. जवळच असलेला धबधबा पाहण्याची आणि पक्षीनिरीक्षणाची संधीही त्यांना मिळाली.

सियांग परिसरात तब्बल २५२ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास असल्याचे २०१० ते १६ या सहा वर्षांत करण्यात आलेल्या अभ्यासात आढळले. अरुणाचल प्रदेशचा राज्यपक्षी असलेला हॉर्नबिल, सनबर्ड, व्हाइट टेल्ड रॉबिन, पॅरटबिल असे विविध पक्षी इथे आढळतात. या झाडाजवळच वटवाघुळांची एक मोठी गुहा आहे, ही गुहादेखील पक्षीनिरीक्षक आणि पर्यटकांचे आकर्षणस्थळ ठरू शकेल. येत्या काळात गावात वन्यजीव पर्यटन, आदिवासींच्या संस्कृतीचा परिचय, स्थानिक आदिवासींच्या मासेमारी पद्धती जाणून घेण्याची संधी, सियांग नदीत राफ्टिंग, रात्रभर अनाघ्रात निसर्गाच्या सान्निध्यात तंबूमधील निवास असे पर्यायही पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आता ग्रामस्थ करत आहेत. यातूनच आपल्या विकासाचा मार्ग प्रशस्त होईल, असा विश्वास त्यांना आहे.