‘लोकसत्ता’चे परभणी वार्ताहर आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी गप्पा-

* तुमच्या ‘आलोक’ या कथासंग्रहाला नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. दोन कथासंग्रह, त्यात असलेल्या बारा कथा आणि थेट साहित्य अकादमी पुरस्कार.. तुम्ही मोजक्या लिखाणातून खूप मोठी मजल मारली आहे. पण तुम्ही एवढं मोजकंच का लिहिता ?

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

– या दोन कथासंग्रहात असलेल्या बारा कथांनंतर आता पुढच्या पाच कथा तयार आहेत. आता आणखी एक कथा लिहून झाली की तिसरा कथासंग्रह येऊ शकतो. पण ही सहावी कथा कधी लिहून होईल हे मला सांगता येणं कठीण आहे. माझा कथालेखनाचा वेग वर्षांला एखादी किंवा दोन कथा एवढाच आहे. हा वेग तसा फार नाही, हे मला माहीत आहे. त्यामुळे दिवाळी अंकाच्या काळात कथा मागितल्या जातात, तेव्हा मी देऊ शकत नाही. कारण मी मला जोपर्यंत आतून वाटत नाही, तोपर्यंत लिहीत नाही. निव्वळ जुजबी माहितीवर लिहिण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. मी प्रामाणिकपणे लिहितो. आपल्या लिखाणाने वाचक हलला पाहिजे, अंतर्मुख झाला पाहिजे, असं मला वाटतं. लेखन निव्वळ औपचारिक असता कामा नये. आपलं लिखाण संपतं तिथे वाचकाचा प्रवास सुरू झाला पाहिजे, ते ते वाचून अस्वस्थ झाला पाहिजे. त्याची दृष्टी बदलेल, असं काही तरी देता आलं तरच लिहावं. निव्वळ किश्श्यांची वर्णनं मी लिहीत नाही. आपला अनुभव शब्दात चांगल्या भाषेत, चांगल्या पद्धतीने उतारवता आला पाहिजे असं मला वाटतं. रूढ किश्शांची गोष्ट सांगण्यात मला रस नाही. त्यामुळे भारंभार लिहिण्यापेक्षा मोजकं लिहिणं केव्हाही चांगलं असं मला वाटतं.

* पण त्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं का?

– जयंत पवार यांचेही आत्तापर्यंत दोनच कथासंग्रह आले आहेत. त्यांच्या तर पहिल्याच संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. याचा अर्थच असा की गांभीर्याने लिहिलं तर त्याची नोंद घेतली जाते. तशा लेखनाकडे गांभीर्याने पाहिलंही जातं. ‘इडापीडा टळो’ या माझ्या पहिल्या कथासंग्रहाची चांगली चर्चा झाली. आता ‘आलोक’लाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. समीक्षकांमध्येही चांगली प्रतिक्रिया आहे. ‘इडापीडा टळो’ला तर मराठी साहित्यातली महत्त्वाची पारितोषिकंही मिळाली आहेत. माझ्या काही कथांचा कानडी भाषेत अनुवादही झालाय. ‘कोटेमनी’म्हणजेच चिरेबंद  या नावाने ते पुस्तक प्रकाशित झालंय. माझ्या काही कथा अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. अर्थात मान्यतेचं पारितोषिक हा काही एकमेव निकष नाही. पारितोषिकांचा फायदा इतकाच की लोक पुन्हा त्या पुस्तकांकडे वळतात. आता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘आलोक’ पुन्हा वाचलं जातंय. गांभीर्याने पाहतात. शेवटी आपण लिहितो त्याची गांभीर्याने नोंद घेतली जावी, ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावं हीच कोणत्याही लेखकाची अपेक्षा असते.

* या मोजक्या लिखाणातही तुम्ही कथेलाच प्राधान्य दिलेलं दिसतं. तुम्हाला हाच वाङ्मयप्रकार जवळचा का वाटतो?

– आत्तापर्यंत मी कथा लिहिल्या आहेत, पण यापुढे मी फक्त कथाच लिहीन असंही नाही. आता मला कादंबरी लिहायची आहे. त्यासाठीच्या नोंदीही तयार आहेत. हे वर्ष कादंबरीसाठी द्यायचं असं ठरवलेलंच आहे. पण कादंबरीला लेखनाची दीर्घ बैठक लागते. निवांतपणा लागतो. मी पत्रकार असल्यामुळे वर्तमानपत्रात काम करताना खूप धावपळ असते. त्या व्यस्ततेतून वेळ काढता येत नाही. तरीही कथा लिहीत गेलो. आता मात्र कादंबरीला हात घालायचा आहे.

* पण तरीही इतक्या गंभीर, ठोस कथा लेखनामागे तुमचं कथेबद्दलचं काही चिंतन म्हणून असेलच ना..?

– भारतीय परंपरेतली गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहीत असते. ती ऐकतच आपण सगळे जण लहानाचे मोठे होतो. गोष्ट सांगणं आणि ऐकणं हा मानवी स्वभाव आहे. एकच घटना वेगवेगळ्या लोकांनी पाहिली आणि मग त्यांना ती सांगायला सांगितली तर ते वेगवेगळं काही तरी सांगतील. कारण प्रत्येकाची भाषिक क्षमता, कल्पनाशक्ती, सांगण्याची शैली वेगळी असते. त्यामुळे त्यात एकच अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जाऊ शकतो. हीच गोष्ट पुस्तकात छापून आल्यानंतर आपण तिला कथा म्हणायला लागलो. पण ती असते गोष्टच.

* ती कुणाला तरी सांगावी असं लोकांना का वाटत असेल, तुम्हाला काय वाटतं..?

– असं आहे की माणसाच्या जगण्यात अनेक वेदना आहेत, दु:खं आहेत, ते सगळं त्याला कुणाला तरी सांगायचं असतं. एकीकडे पाहिलं तर गोष्टी सांगणं हा रिकामटेकडा उद्योग. तो त्यांनी का करावा तर त्या गोष्टींमध्येच त्यांच्या आकांक्षा, सुख-दु:ख, राहून गेलेल्या गोष्टी असतात. या राहून गेलेल्या गोष्टींमुळे खचून न जाता आपलं जगणं-सावरणं, हा मनुष्यस्वभाव आहे. त्यातून गोष्ट विकसित होत गेली आहे. आपल्याकडे तिची मोठी विविधता दिसते. आदिवासींच्या, दुर्गम भागातल्या लोकांच्या, डोंगराळ भागातल्या लोकांच्या, भटक्या-विमुक्तांच्या, शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने लोककथांमध्ये परिसरानुसार किती तरी वैविध्य आढळतं. ती छापील स्वरूपात प्रसिद्ध व्हायला लागली तेव्हा वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, नियतकालिकं यामधून चटपटीत, मनोरंजक झाली. ज्यांना लिहिता येतं, भाषिक कलाकुसर करता येते त्यांनी गोष्टी लिहायला सुरुवात केली. त्या किरकोळ घटनाप्रसंगांवर आधारित किस्सेवजा गोष्टी असतात. त्यातून जीवनविषयक साक्षात्कार होत नाही, जीवनदर्शन होत नाही, जगण्यासंबंधी तत्त्वज्ञान मिळत नाही. अशा वरवरच्या तकलादू गोष्टींनी मराठी साहित्याचा बराच काळ व्यापला आहे. हौस म्हणून गोष्टी लिहिल्या गेल्या, त्या वर्तमानपत्रात छापल्या गेल्या. त्यामुळे चाकोरीतल्या घटना, प्रसंग, अनुभव उचला आणि लिहा गोष्टी आणि द्या पाठवून असं काही काळ झालं. अर्थात असं करमणूकप्रधान लिखाण हीसुद्धा एका विशिष्ट वाचकवर्गाची गरज असते. पण अशा लेखकांचा दबदबा नाही निर्माण होत. तो होतो गांभीर्याने लिहिणाऱ्यांचा.

* असे गांभीर्याने लिहिणारे लेखक मराठीत अपवादात्मक आहेत की भरपूर?

– आहेत ना, कारण एक तर आजची मराठी कथा विशिष्ट परिघातूनच येते असं नाही. ती वेगवेगळ्या समूहातून येते. वेगवेगळ्या बोली भाषांतून येते. वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून येते, वेगवेगळ्या महानगरांतून येते, त्यातून ती समृद्ध होते आहे. आज जयंत पवार, प्रतिमा जोशी, समर खडस यांच्यासारखे गांभीर्याने लिखाण करणारे लेखक आहेत. ग्रामीण भागातून येणारी किरण गुरवची कथा आहे. त्यामुळे ग्रामीण भाग असो की महानगर, तुम्ही कुठलाही स्तर पाहिला तर गंभीर कथा लिहिली जात आहे.

*  तुमचं वर्णन काही जण ग्रामीण कथाकार असं करतात. तुम्हालाही तसंच वाटतं का?

– मी काही टिपिकल ग्रामीण कथाकार नाही, असं मला वाटतं. कारण माझी गोष्ट माणसांच्या जगण्याचं सुख-दु:ख, पेच, ताणतणाव, कसोटीच्या प्रसांगांत ती जगण्याला कशी सामोरी जातात, त्या क्षणांच्या अनुभूतीची गोष्ट आहे, असं मला वाटतं. त्यामुळे ती ग्रामीण आहे, असं मी तरी मानत नाही. अर्थात त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की जे चांगल्या दर्जाचं साहित्य असतं ते अशी सगळी वर्गवारी पार करून पुढे जातं. त्याला कोणतीही लेबलं चिकटतच नाहीत.

* तुम्ही सामान्य माणसाच्या सुख-दु:खाच्या गोष्टी जर लिहिता तर त्याच्या जगण्यातून तुम्हाला साहित्यापलीकडे काय आणि कसं सापडलं आहे ?

– सर्वसामान्य लोकांचे रोजचे जगण्याचे प्रश्न खूप भीषण आहेत. ते अगदी जगण्या-मरण्याचे प्रश्न आहेत, ते तीव्र आहेत आणि ते सुटत नाहीत. सामान्य माणसाला न्याय मिळणं इथे दुरापास्त झालं आहे. भूक, शिक्षण हे प्रश्न गंभीर आहेत. हे सगळं सहन करणारा तळपातळीवरचा सामान्य माणूस मला नेहमीच महत्त्वाचा वाटतो. मी ज्या माणसाच्या सुख-दु:खाची गोष्ट लिहितो तो माणूस आणखी वेगळा. तो या व्यवस्थेत अगदी निमूटपणे जगतो. त्याला स्वत:चा आवाज नाही. त्याच्या गोष्टी मी मांडतो असं मी म्हणेन.

* या माणसाच्या जगण्यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय अस्वस्थ करतं?

– या माणसाचं जगणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. या सर्वसामान्य माणसाला आवाज नाही. आजच्या गलबल्यात, कोलाहलात त्याचा आवाज अगदी क्षीण आहे. त्याच्या जगण्यावर होणारं आक्रमण मला जास्त गंभीर वाटतं.

* मराठी साहित्यात बराच काळ ग्रामीण वातावरणाविषयीचा एक प्रकारचा रोमँटिसिझम मांडला गेला. त्यामुळे खेडं म्हणजे रम्य असाच बराच काळ सामान्य वाचकाचा समज होता. तुम्ही या ग्रामीण भागाकडे कसं पाहता?

– आज तरी असं काही रोमँटिक मांडलं जात नाही. आज ग्रामीण भागातले प्रश्न वाढले आहेत, त्यातली गुंतागुंत वाढलेली आहे. राबणाऱ्या माणसाच्या आशा-आकांक्षांचा कायम चक्काचूर होत आला आहे. शेतमजुरांचं जगणं, असंघटित कामगाराचं जगणं, दूरवरच्या दुर्गम आदिवासी पाडय़ातलं जगणं भीषण आहे. त्याला इथल्या व्यवस्थेनं काहीच दिलेलं नाही. शिक्षण नाही, आरोग्याच्या सोयी नाहीत, जगण्याच्या किमान सोयी नाहीत. तो कायमच या सगळ्यापासून पूर्ण वंचित राहिला आहे. त्याचे प्रश्न गंभीर आहेत. आणि दुर्दैव म्हणजे त्यात कोणालाही रस नाही. असं मानलं गेलं की आहे शहरांनी खेडय़ावर आक्रमण केलं, की खेडय़ातलं सगळं सत्त्वच नष्ट झालं आहे वगैरे, पण ग्रामीण भागातही त्यांची म्हणून शोषणाची पद्धतशीर परिमाणं आहेत. उदाहरणच द्यायचं तर ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून तरुण मुलं सरकारी अधिकारी वगैरे होतात, पण ते खेडय़ाकडे, खेडय़ांच्या प्रश्नांकडे आस्थेने पाहत नाहीत. ग्रामीण भागातून निर्माण झालेला जो उद्दाम नवश्रीमंतवर्ग आहे, त्याची एकूण प्रश्नाकडे पाहण्याची बेफिकिरी, त्यातून सामान्यांच्या जगण्याचा होत असलेला भीषण जाच ही गोष्ट मला जास्त चिंताजनक वाटते.

*  हा सगळा संघर्ष पेलण्याचं आव्हान आजच्या मराठी साहित्यात आहे, असं वाटतं का?

– ग्रामीण महाराष्ट्राच्या या प्रश्नांवर आजचे मराठीतले लेखक ताकदीने भिडत आहेत, असं मला वाटतं. मुख्य म्हणजे ते रोमँटिक अंगाने ग्रामीण भागाचं चित्रण करत नाहीत. त्यांच्याकडे प्रश्न मांडण्याची  मोठी क्षमता आहे. महानगरी साहित्यातूनही मराठी साहित्यातूनही नव्वदोत्तरी कालखंडानंतरची परिस्थिती परिणामकारतेने मांडली जाते आहे. कवितेतून तर ते अधिक चांगल्या प्रकारे येतं आहे. मला तर असं वाटतं की साहित्य ग्रामीण भागातून येणारं असो की महानगरी भागातून, गांभीर्याने लिहिणारे त्यातला जो पेच आहे, त्याला ताकदीने भिडतात.

*   ‘इडापीडा टळो’ ते ‘आलोक’ हा तुमचा कथालेखनाचा जो वीस वर्षांचा प्रवास आहे, त्याने काय दिलं असं तुम्हाला वाटतं?

– या प्रवासाने मला लिहिण्याचं समाधान दिलं, प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. बाकी मला मान्यता, पुरस्कार वगैरे गोष्टी फार महत्त्वाच्या वाटत नाहीत. अर्थात याचा अर्थ मी त्या नाकारतो असं नाही. मी त्यांचा नम्रतेने स्वीकारच करतो. पण त्यापलीकडे मी जे काही लिहितो, त्याची सर्वदूर दखल घेतली जाते याचं मला समाधान आहे.

*  तुम्ही गेली सोळा वर्षे ‘लोकसत्ता’चे परभणी वार्ताहर म्हणून काम करता आहात आणि सिद्धहस्त लेखकही आहात. तर पत्रकार आणि लेखक दोन्ही भूमिका एकमेकींना पूरक ठरतात की कधी कधी एकमेकींवर कुरघोडी करतात?

– पत्रकारितेचा फायदा असा होतो की कोणत्याही गोष्टीकडे, घटनेकडे तो पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून, झापडबंदपणे पाहत नाही. खुलेपणाने पाहतो. एरवी सामान्य माणसांची अनुभवांची जी ठरलेली चौकट असते त्यापेक्षा व्यापक अर्थाने पाहतो. पत्रकारितेच्या माध्यमातून तो राजकारण, समाजकारण चळवळी, आंदोलनं, सामाजिक प्रश्न हे सगळं जवळून पाहतो. त्या सगळ्यातून त्याचं अनुभवविश्व व्यापक होत जातं. समाजातल्या सर्व थरांशी त्याचा संबंध येतो. समाजाशी त्याचा जिवंत संपर्क असतो. ऐकीव माहितीपेक्षा तो वेगवेगळ्या घटना, दैनंदिन वास्तव प्रत्यक्ष आणि जवळून पाहतो. त्याला राजकारणातले, समाजकारणातले वेगवेगळे अनुभव जवळून पाहता येतात. या सगळ्यातून लेखनासाठी कच्चा ऐवज मिळतो. अर्थात हे सगळे तपशील असतात. कलाकृती किंवा साहित्य हे त्याच्या पुढच्या टप्प्यावर असतं. भाषेच्या माध्यमातून तुम्ही आशयाला कलाकृती म्हणून कसं परिमाण प्राप्त करून देता, ते महत्त्वाचं ठरतं. मुख्य म्हणजे पत्रकारितेमुळे वास्तव जवळून आणि तटस्थपणे पाहता येत असलं तरी लेखकाला ते अनुभव तटस्थ राहू देत नाहीत. आत ओढून घेतात. लेखक लिहिताना ते जगणं पुन्हा एकदा जगतो, तेव्हा तो तटस्थ नाही असू शकत. अर्थात लेखक म्हणूून जी नजर असते, तिचा उपयोग पत्रकारितेसाठी होतोच.

मोजकं, दर्जेदार लिखाण

आसाराम लोमटे गेली सोळा वर्षे परभणीत ‘लोकसत्ता’चे वार्ताहर आहेत. परभणी जिल्ह्य़ातील सेलू तालुक्यातील गुगुळी धामणगाव हे त्यांचं गाव. घरात कुणी शिकलेलं नव्हतं. लिहिण्यावाचण्यासाठी अनुकूल असं वातावरणही नव्हतं. गावात दहावीपर्यंत शाळा. तालुक्याच्या गावाला कुणी गेलंच, त्याने वर्तमानपत्र आणलंच तर ते गावात सगळे जण आलटून पालटून, पुरवून पुरवून वाचायचे. त्यातच गावात प्रौढ साक्षरता वर्ग सुरू झाला. नवसाक्षरांसाठी पुस्तकं, वर्तमानपत्रं यायला लागली. त्यातल्या कथा वाचल्यानंतर आसाराम यांनीही ‘एक भाकर’ नावाची कथा लिहिली आणि ‘दै. मराठवाडा’ला पाठवून दिली. दीड महिन्यानंतर ती प्रसिद्ध झाली. त्यांनी अकरावीला सेलू इथं म्हणजे तालुक्याच्या गावी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि अधाशासारखं वाचन केलं. बीए करायला परभणीला गेल्यावर मराठी शिकवायला होते कवी इंद्रजीत भालेराव. त्यांनी वाचनाचे संस्कार केले. मग हळूहळू कथालेखन सुरू झालं. साखर कारखान्याचं राजकारण, दलित-सवर्ण संघर्ष अशा विषयांवर दीर्घकथा लिहिल्या आणि तिथून गंभीर कथालेखन सुरू झालं. त्यांनी ग्रामीण वास्तव आणि मराठी कादंबरी या विषयावर पीएच.डी.ही मिळवली आहे. ‘इडापीडा टळो’ आणि ‘आलोक’ हे दोन कथासंग्रह आणि त्यातील बारा कथा हे त्यांचं साहित्यलेखन आहे. मोजकं पण दर्जेदार, आशयघन लिखाण करणाऱ्या लेखकांमध्ये आसाराम यांची गणना केली जाते. ‘इडापीडा टळो’ने बरेच पुरस्कार मिळवले आहेत, तर ‘आलोक’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com