08 July 2020

News Flash

दखल : ‘अस्तु’ला तथास्तु

एखाद्या समस्येवर चित्रपट काढताना सर्वात महत्त्वाचे असते ते त्याचा माहितीपट किंवा आक्रोशपट होऊ न देणं.

‘अस्तु’ हा नितांतसुंदर सिनेमा तब्बल दोन वर्षे निधीअभावी प्रदर्शित होऊ शकला नव्हता. आता त्यासाठी ‘क्राऊड फंिडगचा पर्याय अवलंबला जाणार असून तो मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

एखाद्या समस्येवर चित्रपट काढताना सर्वात महत्त्वाचे असते ते त्याचा माहितीपट किंवा आक्रोशपट होऊ न देणं. संवाद, संगीत, अभिनय यांची सांगड घालत दिग्दर्शकाने मांडलेल्या सहजसुंदर गोष्टीतून  द्यायचा तो संदेश आपोआप जातोच. असं नेमकं जुळून आलं आहे ते ‘अस्तु’ या चित्रपटाबाबत. पण हे सारं प्रेक्षकांनी पडद्यावर पाहावं यासाठीच्या व्यावसायिक गोष्टी काही गेली दोन वर्षे जुळून येत नाहीयेत. अनेक महोत्सवातून गाजलेला आणि तब्बल २६ पुरस्कारांवर मोहोर उमटवलेला हा चित्रपट निर्मितीनंतर दोन वर्षे प्रदर्शित होऊ शकला नाही. अखेरीस अनेक पर्यायानंतर आता क्राऊड फंडिंगचा मार्ग या चित्रपटाने स्वीकारला असून असा प्रयोग करणारा हा मराठीतील पहिलाच चित्रपट असणार आहे.

विस्मरण, अगदी नजीकच्या काळातील घटना न आठवणे, त्याच वेळी अगदी फार पूर्वीची एखादी घटना ठळकपणे समोर येणे, वर्तमानाशी असलेला संबंध तुटणे, मग आपल्याच तंद्रीत, वेळ-काळ-वयाचा भान न राहता एका वेगळ्या जगात वावरणे. मानसशास्त्रीयदृष्टय़ा अल्झायमर म्हणून ओळखला जाणारा हा आजार. मुळात हा एक आजार आहे हेच अनेकांना कळत नाही. त्यातून मग सुरू होते ती त्या व्यक्तीला सांभाळणाऱ्यांची एक असह्य़ कुचंबणा. म्हटले तर काही प्रमाणात सर्वत्र आढळणारी ही समस्या. या मध्यवर्ती संकल्पनेवर असलेला ‘अस्तु’ मांडण्यासाठी लेखकांनी एक सहजसुंदर अशी गोष्ट रचली आहे. मोजक्याच पण प्रभावी पात्रांचा आधार घेत ती पडद्यावर मांडली आहे. त्यामुळे समस्या अधोरेखित तर होतेच पण त्याचबरोबर एक चांगला चित्रपट पाहल्याचे समाधानदेखील लाभते.

सिनेमा माध्यमाची पुरेपूर जाण आणि ताकद जर कथा-पटकथा-संवाद लेखकाला आणि दिग्दर्शकाला असेल तर एक चांगली कलाकृती कशी घडू शकते त्याचे ‘अस्तु’ हे उत्तम उदाहरण आहे. अगदी साधी मांडणी ठेवत वेगवेगळ्या पात्रांची, भावभावनांची एक सुरेख गुंफण करीत चित्रपट पुढे जातो. हे श्रेय सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक जोडगोळीचे.

मोहन आगाशे म्हणजेच अप्पा हे संस्कृतचे निवृत्त प्राध्यापक. पत्नी निवर्तलेली. दोन मुली. मोठी इरावती संसारात व्यग्र. तर धाकटी करिअरच्या वाटेवर. संस्कृतचे गाढे अभ्यासक असणाऱ्या अप्पांना उतारवयात अल्झायमरचा विकार जडतो. वर्तमानाचा हात सोडून ते दुसऱ्याच गोष्टीत रमू लागतात. हे सारे इरावतीला असह्य़ होत असते. त्यातच अप्पांच्या नोकरीदरम्यानच्या एका सहकारी महिला प्राध्यापकाबद्दलचे निर्माण झालेल्या कथित संशयाचे जाळेदेखील तिच्या या असह्य़पणाची तीव्रता वाढवत असते. पण ती कर्तव्यभावनेने सारे काही करीत असते. एके दिवशी हे अप्पा स्मृतिभ्रंशामुळे एकटेच एका हत्तीच्या मागे जातात. आपल्या कुटुंबापासून दूर होत माहुताच्या पालावर पोहोचतात.

वृद्धापकाळातील हरवणे मांडण्यासाठी थेट एक हत्तीणच येथे आली आहे. स्मरणशक्तीत शक्तिमान म्हणून ओळखला जाणारा हत्तीचा  वापर हा अत्यंत सूचक असाच म्हणावा असा आहे. दुसरीकडे मोहन आगाशे हे स्वत:च मानसोपचारतज्ज्ञ असल्यामुळे त्यांना या आजारातील सर्व खाचाखोचा माहीत आहेत. भूमिका साकारताना त्याचा फायदा नक्कीच झाला आहे.

चित्रपटातील हत्तीण एक निमित्त म्हणून असली तरी ते एक पात्रच आहे. माहुताच्या पालावर माहुताच्या बायकोने केलेला अप्पांचा स्वीकार, त्यांची परिस्थिती जाणून त्यांना आईच्या वात्स्यल्याने दिलेली वागणूक हा चित्रपटातील टर्निग पाइंट म्हणावा असा भाग. माहुताच्या बायकोच्या भूमिकेत अमृता सुभाषचा वावर अतिशय सहज झाला आहे. खास कानडी हेल असलेले तिचे संवाद आणि तिने स्वत: चक्क कानडीतून गायलेली दोन अंगाई गीते भावणारी आहेत.

हल्ली अशा प्रकारच्या चित्रपटांना लोकप्रिय वर्गाकडून आर्ट फिल्म वगैरे नावाने हेटाळण्याची वृत्ती दिसून येते. पण ‘अस्तु’च्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. कारण त्यात नाटय़ आहे, गंमत आहे, भावभावनांचे असंख्य पदर आहेत, भाषेचे खेळ आहेत, निव्र्याज प्रेमाची अनुभूती आहे. एक सहजसुंदर भाव आहे. चित्रीकरणात अनेक प्रयोग आहेत. हत्तीचा प्रभावीपणे वापर केला आहे आणि सर्व कलाकारांचा मिळून एक सुंदर मेळ बसला आहे.

कथेतील आशयघनता हे मराठी चित्रपटाचे वैशिष्टय़ पुन्हा एकदा अधोरेखित करणारा असा हा चित्रपट आहे. तसाच मराठी चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक उणीव अधोरेखित करणारादेखील आहे असे म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांत आशयघन चित्रपटांनी मराठीत आपली मुद्रा प्रभावीपणे उमटवली आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील त्यांना बऱ्यापैकी यश लाभले आहे. पण ‘अस्तु’ला अजून तरी ती संधी मिळालेली नाही.

चित्रपट निर्माता म्हणून शीला राव यांची ही पहिलीच निर्मिती. चित्रपटनिर्मितीसाठी जवळपास एक कोटी खर्च झाल्यानंतर वितरण आणि प्रमोशन यासाठी पुरेसा निधी नसल्याचे त्या नमूद करतात. सुरुवातीच्या उपलब्ध निधीमध्ये पुण्यापुरता हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. तब्बल सहा आठवडे त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाददेखील लाभला. मात्र वितरण प्रदर्शनानंतर निर्मात्याच्या हाती उरणाऱ्या तुटपुंज्या रक्कमेच्या जोरावर नंतर अन्य कोठेही तो प्रदर्शित करता आला नाही. शीला राव सांगतात की, अनेक पर्याय अवलंबल्यावर आता आम्ही हा क्राऊड फंडिंगचा फंडा वापरत आहोत. दाक्षिण्यात चित्रपटांसाठी हा पर्याय सर्रास वापरला जातो. मराठीत प्रथमच असा प्रयोग होत आहे.

आशय-विषय आणि मांडणी पाहता अभिनयापलीकडे जाऊन हा चित्रपट पूर्णत्वाला जाण्यासाठी मोहन आगाशे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ते सांगतात, ‘मराठी सिनेमा वितरणाच्या टप्प्यावर अशा प्रकारे अडकणे म्हणजे ऑपरेशन टेबलवर पेशंटचे पोट उघडून ठेवले आहे आणि डॉक्टर गायब अशीच परिस्थिती म्हणावी लागेल. पण हा चित्रपट पूर्ण झाला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत गेला पाहिजे याच भूमिकेतून म्हणूनच माझ्या आयुष्यातील बचत यामध्ये गुंतवली आहे.’’

आज भारंभार चित्रपट येत असताना आणि त्यातून रोज एक कलाकार जन्माला येत असताना डॉ. मोहन आगाशेंसारख्या कलाकाराने अशा प्रकारे चित्रपटाच्या वितरण टप्प्यावर निर्मितीत भाग घेऊन त्यासाठी थेट आर्थिक मदत करण्याचे हे उदाहरण विरळाच म्हणावे लागेल.

आज आपल्याकडे वर्षांला सुमारे शंभरच्या आसपास चित्रपट तयार होतात. त्यातील काही प्रदर्शितदेखील होत नाहीत. मोजकेच चालतात. अशांमध्ये निव्वळ मसालापटदेखील असतात. विशेष म्हणजे अशांना निर्मातेदेखील मिळतात आणि प्रभावी मार्केटिंगचा फंडा वापरून बॉक्स ऑफिसवरदेखील फायदा मिळतो. बॉक्स ऑफिसवर न चाललेल्या चित्रपटात अनेक निव्वळ खोगीरभरती म्हणावी असेदेखील अनेक चित्रपट असतात. टिपिकल फॉम्र्युलाधारित या चित्रपटांची संख्या भारंभार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीची अशी परिस्थिती असेल तर ‘अस्तु’सारख्या आशयघन आणि व्यावसायिक फायदा मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या चित्रपटाबाबत ही अवस्था का, असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. चित्रपट केवळ आक्रोश किंवा माहितीपटाच्या वळणाने गेला असता तर गोष्ट वेगळी. पण सिनेमा माध्यमाचा अगदी व्यवस्थित उपयोग करून तयार झालेला चित्रपट इंडस्ट्रीतल्या धुरिणांकडून टाळला जात असेल तर मराठी चित्रपटसृष्टीची दिशा नेमकी काय असादेखील प्रश्न निर्माण होतो. अर्थात प्रभावी मार्केटिंग आणि आर्थिक पाठबळाअभावी अनेक चांगले चित्रपटदेखील आपल्याकडे मागे पडल्याची उदाहरणे आहेत. पण एक उद्योग व्यवसाय म्हणून आज आपण बऱ्यापैकी स्थिरावत आहोत. अशावेळी फक्त मोजक्याच लोकांनी मोजकाच फॉम्र्युला वापरायचा आणि इतरांनी त्यासाठी फारसा प्रयत्नच करायचा नाही असं असेल तर उद्योगाचा कलाधारित सर्वागीण विकास होणं अवघड आहे, हेच यातून अधोरेखित होत आहे.

क्राऊड फंडिंग ‘अस्तु’ला तारणार का?

एखाद्या कामासाठी थेट लोकांमधूनच पैसे जमा करण्याची पद्धत आपल्याकडे अनेक सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. पण हेच काम वेबसाइटच्यामार्फत ऑनलाइन करण्याची सुरुवात झाली ती अमेरिकेत. साधारण २००७-०८च्या आसपास भारतातदेखील क्राऊड फंडिंगचा फंडा वापरण्यास सुरुवात झाली. अर्थात आजवर तरी आपल्याकडे हा पर्याय सामाजिक उपक्रमांसाठी अधिक वापरला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून टेक्नॉलॉजी आणि क्रिएटीव्ह क्षेत्रासाठीदेखील याचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला असल्याचे कॅटापुल्ट या क्राऊड फंडिंग वेबसाइटचे सतीश कटारिया सांगतात. ‘अस्तु’चे क्राऊड फंडिंगचे काम कॅटापुल्टकडेच आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून निर्मात्यांना सुरुवातीला किमान राज्यभरातील ४५ चित्रपट-गृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करायचा आहे. त्यासाठी ४० लाख रुपयांची आवश्यकता आहे.

क्राऊड फंडिंग ही संकल्पना ‘अस्तु’ला कितपत उपयोगी पडेल याबद्दल सतीश कटारिया सांगतात की, ‘‘चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पैसे देण्याच्या आधीच त्यांचा सहभाग या प्रक्रियेत केला जातो. ५०० ते एक लाख या दरम्यानची मदत या माध्यमातून स्वीकारली जाते. मदतीच्या रकमेनुसार प्रत्येक दात्याला विशिष्ट असे रिवॉर्ड दिले जाते.’’ कटारिया सांगतात की, क्राऊड फंडिंग ही संकल्पना अस्तित्वात नव्हती तेव्हा श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’साठी पाच लाख लोकांनी प्रत्येकी दोन दोन रुपये जमा केले होते. कॅटापुल्टतर्फे गेल्या एकदोन वर्षांत आम्ही ‘मंजुनाथ’, ‘लाजवंती’ या चित्रपटांसाठी मदत मिळवली आहे.

चित्रपट हा जीवनावश्यक की चैनीचा विषय आहे हा चर्चेचा किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण एखाद्या चांगल्या कलाकृतीमध्ये प्रेक्षकांना रस असेल आणि ती जर पडद्यावर पाहता यावी असे जर वाटत असेल, तर त्यासाठी अशाप्रकारे फंडिंगच्या माध्यमातून जर एक वेगळे व्यावसायिक गणित मांडता येत असेल, तर असे प्रयोग व्हायला काही हरकत वाटत नाही. ‘भेजा फ्राय’च्यावेळी रजत कपूरने निधीच्या कमतरतेबाबत समाजमाध्यमांवर टाकलेल्या स्टेट्समुळे त्याला इतका निधी मिळाला, की त्याने प्रदर्शनानंतर आलेल्या रक्कमेतून लोकांचे पैसे तर परत केलेच, पण त्याला फायदादेखील झाला. ‘लूसी’ या कन्नड चित्रपटाबाबत नुकताच हा पर्याय अवलंबला गेला आहे. आता ‘अस्तु’ला क्राऊड फंडिंग तथास्तु म्हणणार का हे रसिक प्रेक्षकांच्याच हातात आहे.
सुहास जोशी –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 1:26 am

Web Title: astu marathi movie
टॅग Marathi Movie
Next Stories
1 प्रासंगिक : कोकणचा ‘दशावतार’
2 तंत्रज्ञान : व्हिजन २०३५
3 विचार : उज्ज्वल भविष्य पेलतो आम्ही
Just Now!
X