20 January 2019

News Flash

आदरांजली : कार्यकर्ता वैद्य

वैद्य प. य. वैद्य खडीवाले ऊर्फ दादा ही एक चालतीबोलती संस्थाच होती.

विख्यात आयुर्वेदाचार्य आणि ‘लोकप्रभा’चे लोकप्रिय सदरलेखक वैद्य प. य. वैद्य खडीवाले ऊर्फ दादा ही एक चालतीबोलती संस्थाच होती. त्यांचे पुत्र वैद्य विनायक खडीवाले यांनी रेखाटलेले त्यांचे व्यक्तिचित्र.

समाजासाठी जे काही चांगले करणे आवश्यक असेल ते स्वत:पासून सुरू करायचे आणि सुरू केलेले असे काम निष्ठेने करत राहायचे हा दादांचा गुणविशेष होता. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार हा तर दादांचा ध्यास होताच, पण या कामाव्यतिरिक्त दादांनी वेगवेगळय़ा विषयांमध्ये जे काम केले आहे त्याची व्याप्ती पाहिली की आश्चर्य वाटते. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९३२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील नवीन मराठी शाळेत आणि माध्यमिक शिक्षण रमणबाग प्रशालेत झाले. ते १९४८ मध्ये मॅट्रिक झाले. पुढे नोकरीसाठी म्हणून सतराव्या वर्षी त्यांनी हवाई दलात प्रवेश केला आणि तेथील १९-२० वर्षांची नोकरी संपवून १९६८ मध्ये दादा पुण्यात परतले. या नोकरीतही निष्ठा हा गुण दादांच्या कामातून सदैव प्रगट होत राहिला. पुण्यात परतल्यावर त्यांनी पुन्हा शिकण्याचा निश्चय केला आणि पुण्यातील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्षांचा आयुर्वेदप्रवीण हा अभ्यासक्रम दादांनी तेथे पूर्ण केला. शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या कामाला प्रारंभ झाला. विद्यार्थी असतानाच दादांनी हरी परशुराम काष्ठौषधी आणि आयुर्वेद औषध विक्री केंद्राची स्थापना केली आणि काम सुरू झाले. त्यानंतर ४० वर्षे ते वेगवेगळय़ा कामांमध्ये सक्रिय राहिले. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेची स्थापना त्यांनी १९७४ मध्ये केली आणि या संस्थेच्या माध्यमातून फार मोठे काम उभे केले. आयुर्वेद सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुर्वेद प्रचारक मासिकाचा प्रारंभ दादांनी १९७६ मध्ये केला. एकीकडे पुण्यात हे काम सुरू असतानाच त्यांनी सामाजिक कामाच्या दृष्टीने बीड जिल्हय़ात ‘सर्वासाठी आरोग्य’ या उपक्रमाचा प्रारंभ १९८२ मध्ये केला. बीड जिल्हय़ातील खेडय़ापाडय़ात दादांनी शेकडो आरोग्य शिबिरे नि:शुल्क भरवली आणि त्याचा लाभ हजारो जणांनी घेतला. त्यानंतर दादांनी १९८३ मध्ये जनकल्याण रक्तपेढीची स्थापना केली. नेत्रसेवा केंद्राचा प्रारंभही १९८५ मध्ये केला. आयुर्वेदाच्या क्षेत्रात जिल्हा, तालुका पातळीवर आणि खेडय़ापाडय़ातही अनेक जण चांगले काम करत आहेत. अशा सर्वाचे काम समाजासमोर आले पाहिजे आणि त्यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, या हेतूने दादांनी महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार हा उपक्रम १९८६ मध्ये सुरू केला आणि पुरस्काराचा हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला. आयुर्वेदाच्या क्षेत्रातील सर्वाना एकत्र करणारे विश्व वैद्य संमेलन दादांनी १९९२ मध्ये आयोजित केले. नंतर १९९८ मध्ये दुसरे आणि १९९९ मध्ये तिसरे संमेलन आयोजित करण्यात आले. ही संमेलनेदेखील दादांच्या संघटनकौशल्याची ओळख करून देणारी ठरली. अशाच प्रकारची आणखी काही कामे महाराष्ट्रात जिथे जिथे कुठे सुरू झाली तेथे जाऊन दादांनी त्या त्या कामांना स्वत:हून निधी दिला आणि ते अशा कामांच्या मागे उभे राहिले. महाराष्ट्र आयुर्वेदीय औषधी उत्पादक संघाची स्थापना हेही दादांनी सुरू केलेले असेच एक काम. महिला वैद्य संमेलन हेही दादांचे असेच एक उल्लेखनीय काम.

बीड जिल्हय़ात डोमरी येथे दादांनी सुरू केलेल्या प्रकल्पात मुलांना सुसंस्कारित करण्याचे काम कितीतरी वर्षे झाले. ग्रामीण तरुणांच्या रोजगारासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठीही त्यांनी तेथे अनेक उपक्रम केले. तळेगाव येथे वं. ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही त्यांनी महिला सक्षमीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने उभे केले. आयुर्वेद प्रसारासाठी दादांनी महाराष्ट्रात आयोजित केलेली प्रदर्शने हेही असेच एक काम. याच विषयावर त्यांनी महाराष्ट्रात कितीतरी स्नेहसंमेलनेही भरवली. ठाणे जिल्हय़ात मोखाडा तालुक्यात त्यांनी औषधी वनस्पती आणि वृक्षलागवडीचा उपक्रम केला. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दीड एकरामध्ये औषधी वनस्पती उद्यानही विकसित केले. निराधार मुलांसाठी त्यांनी आधार केंद्र सुरू केल्यामुळे अनेक निराधार बालकांना एक मोठा आधार या केंद्राच्या माध्यमातून मिळाला.

‘आयुर्वेद प्रचारक’ हे मासिक आणि ‘हिंदू तन मन’ हे साप्ताहिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. ‘हिंदू तन मन’ या साप्ताहिकात ते स्वत: अग्रलेख लिहीत असत. अकराशेहून अधिक अग्रलेख त्यांनी लिहिले. अग्रलेख लिहून देण्याचा वार बुधवार असे आणि दादांचा हा वार कधीही चुकला नाही. ही दोन्ही प्रकाशने दादा वैयक्तिक खर्चातून चालवत असत आणि त्याचे अंक हजारो जणांपर्यंत नि:शुल्क पोहोचवत असत. या शिवाय प्रासंगिक स्वरूपातही दादांनी भरपूर लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या अशा लेखांची संख्या हजारोंच्या घरात आहे. दादांचे ग्रंथ, पुस्तके आणि पुस्तिकांची संख्याही दीडशेच्या वर आहे. या सर्व साहित्याचा प्रसार ते सातत्याने करत राहिले. घरी आलेल्या कोणालाही दादांनी कधी विन्मुख पाठवले नाही. मग तो सल्ला मागण्यासाठी आलेला कोणी असो किंवा अन्य कामासाठी आलेली कोणी व्यक्ती असो, ‘सदैव देत रहा’ याच वृत्तीने ते जगले. आपल्याकडे जे काही आहे ते समोरच्याला कसे देता येईल आणि समोरच्या माणसाला आपण कसे उपयोगी ठरू  शकू, एवढा एकमेव विचार त्यांच्या मनात असे. कित्येक संस्थांना, कित्येक छोटय़ामोठय़ा सामाजिक कामांना त्यांनी उदारपणे आणि अगदी सढळ हस्ते मदत केली आणि या मदतीचे हे विशेष, की ती कुणालाही कळू दिली नाही. या मदतीचा त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही. लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या वास्तूही त्यांनी अशाच निरपेक्ष वृत्तीने सामाजिक संस्थांना दिल्या आहेत. आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसाराचा ध्यास घेऊन ते अखंडपणे चालत राहिले. अखंड कार्यात राहणे हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्टय़ होते. दिवसातले १६ तास ते अत्यंत उत्साहाने काम करत असत. ते अष्टावधानी होते. मराठीबरोबरच इंग्रजी, हिंदूीवरही त्यांचे चांगले प्रभुत्व होते. आयुष्यभर ते अत्यंत साधेपणानेच राहिले. पांढरा सदरा आणि पांढरा पायजमा हाच त्यांचा वेष होता. ते जसे आयुर्वेदात म्हणजे त्यांच्या विषयात निष्णात होते तसेच त्यांना लेखनकलाही अवगत होती. सर्व विषयांतील त्यांचे वाचन जबरदस्त होते.

दादांचा आग्रह

जिथे कुठे काही प्रश्न दिसेल, समस्या दिसेल ती सोडवण्यासाठी आपल्याला शक्य असेल ती कृती करायची असा त्यांचा स्वभाव होता. कष्टकऱ्यांना उत्तम जेवण मिळाले पाहिजे या विचारातून त्यांनी कितीतरी वर्षे अत्यल्प दरात ‘श्रमाची पिठलं भाकरी’ ही योजना राबवली. समाजातील उपेक्षित, अनाथ, दुर्बल अशांविषयी दादांना विलक्षण तळमळ होती. त्यातूनच कारखान्यात दुपारच्या जेवणाचा परिपाठ सुरू झाला. त्याला निमित्त घडले ते औषध कारखान्यात येणाऱ्या कामगारांचे विशेषत: महिलांचे डबे दादांनी बघितल्याचे. कोणी शिळी पोळी, भाकरी आणलेली असे. कोणाच्या डब्यात एखादाच पदार्थ असे. दादांना ते रुचले नाही. लगेच त्यांनी उद्यापासून सर्वाना कारखान्यातर्फेच दुपारचे जेवण आणि दोन वेळा चहा द्यायचा हा निश्चय केला आणि ४५ वर्षे हे काम त्यांनी एखाद्या व्रतासारखे अखंडपणे सुरू ठेवले. कारखान्यात काम करणाऱ्या सर्वासाठी रोज दुपारी सुग्रास भोजन सुरू झाले. अगदी घरच्यासारखीच चव आणि सर्वाना गरम गरम भोजनाचा आग्रह करणारे दादा हा अनुभव प्रत्येकाला मिळत असे. दादा स्वत: दुपारी तेच जेवण घेत असत. दुपारच्या वेळी आलेल्या प्रत्येकाला दादा जेवणाचा आग्रह करत. त्यांनी जेवल्याशिवाय कोणाला जाऊ दिले असे कधीच झाले नाही. क्रीडाविश्वाची दादांना विशेष आवड होती. आमच्या घराशेजारी असलेल्या रमणबाग प्रशालेच्या मैदानावर शालेय विद्यार्थी आणि तरुणमंडळी फुटबॉल खेळण्यासाठी रोज एकत्र येत असल्याचे समजताच दादा थेट मैदानावर गेले आणि उद्यापासून खेळणे झाले की आमच्या संस्थेत नाश्त्यासाठी यायचे असे निमंत्रण त्यांना देऊन आले. त्यानंतर या खेळाडूंना रोज पोहे, शिरा असा नाश्ता दिला जाऊ लागला. आरोग्यासाठी खेळत आहेत याचे कौतुक म्हणून दादांनी अशा प्रकारे खेळाडूंना नाश्ता देऊन त्यांचे कौतुक केले. काही चांगले दिसले की दादा त्या गोष्टीचे कौतुक करायचे आणि अशा कामाचे कौतुकही ते अगदी मनापासून करायचे. तो त्यांचा स्वभावच होता. ते कौतुकही असे उत्स्फूर्त असायचे.

नि:शुल्क आयुर्वेद वर्ग

आयुर्वेदाचा प्रचार करायचा हा विचार सर्वांपर्यंत पोहोचवायचा तर ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हे दादांनी ओळखले आणि त्यातून आयुर्वेद परिचय वर्ग हा नि:शुल्क उपक्रम सुरू झाला. जून ते मार्च या कालावधीत आठवडय़ातून तीन दिवस आयुर्वेद परिचय वर्ग हा उपक्रम दादांनी सलग ४० वर्षे चालवला. या वर्गात ते स्वत: शिकवत. अनेक प्रात्यक्षिकेही दादा स्वत: दाखवत. आयुर्वेद सर्वासाठी हा विचार त्यांनी या वर्गाच्या माध्यमातून कृतिरूप केला. त्यांनी या वर्गाच्या माध्यमातून हजारो जणांना या विषयाची ओळख करून दिली. ज्या महाविद्यालयात त्यांनी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले तेथे सलग दहा वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. दादांचा प्रवासाचा झपाटाही असाच थक्क करणारा होता. हातात ३०-३० किलो वजनाच्या औषधांच्या पिशव्या घेऊन ते रेल्वेतून प्रवास करत. कित्येक वर्षे त्यांचा क्रम कायम होता.

दादांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास सखोल होता. अनेक विषयांची त्यांना आस्था होती. त्यांच्या कामाची तडफही त्यांच्या कामातून लक्षात येत असे. दादांचा लोकसंग्रहही मोठा होता. ते स्पष्टवक्ते होते तसेच मनाने अत्यंत प्रेमळही होते. कोणतीही गोष्ट नेमकेपणानेच झाली पाहिजे यासाठी ते आग्रही असायचे. स्वत: निवडलेल्या क्षेत्रात फार मोठे काम त्यांनी स्वकर्तृत्वातून उभे केले. दादांचं वर्णन करायचं झाल्यास ‘परिपूर्ण वैद्य’ असं करता येईल. वयाची पर्वा न करता दादांनी कित्येक वर्षे शब्दश: अपरिमित कष्ट केले आणि श्रमात कधीही कमीपणा मानला नाही. चार दशके ते समाजसेवा करत राहिले. ते उत्तम योजक होते. त्यांचे वडील यशवंत हेही वैद्य होते आणि छोटय़ा स्वरूपात ते आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करत असत. हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. आजोबांची वृत्तीही अखंडपणे देण्याची होती आणि दादांवरही तोच संस्कार झाला. अनेकांशी परिचय करून घ्यायचा आणि प्रत्येकातील काही ना काही गुण घ्यायचा, अशा पद्धतीने ते काम करत राहिले. आयुर्वेद वैद्यांचे तर ते पालक होते. प्रत्येक कामातील त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असे. त्यांच्यासारखे वागण्याची सद्बुद्धी आम्हाला मिळो!

स्वखर्चाने प्रकाशन व वितरण

आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी दादांनी जे कार्य केले त्याला खरोखरच तोड नाही. या कामाचे विशेष म्हणजे यातील प्रत्येक काम त्यांनी स्वत:पासूनच सुरू केले. त्याचा भार कोणावरही पडू दिला नाही. दादांनी ‘आयुर्वेद प्रचारक’ हे मासिक आणि ‘हिंदू तन मन’ हे साप्ताहिक २०-२२ वर्षे चालवले. या दोन्ही नियतकालिकांचे हजारो अंक नि:शुल्क वितरित केले जात असत. हा सर्व खर्च दादा स्वत: करत. हाती घेतलेला विषय सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी ते अशा प्रकारे काम करत. नियतकालिकांबरोबरच आयुर्वेदाच्या प्रचारासाठी त्यांनी अनेक पुस्तके व पुस्तिका लिहिल्या आणि त्यांचे अत्यल्प दरात वितरण केले. त्यांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. कितीतरी ग्रंथही दादांनी मोठय़ा तळमळीने सिद्ध केले आणि त्यांचेही वितरण नि:शुल्क केले. त्या ग्रंथाचे मूल्य म्हणून ज्यांनी कोणी काही निधी दिला तो निधीही त्यांनी सामाजिक कामांना देऊन टाकला.

आर्थिक भार कधीही, कोणावरही टाकायचा नाही हा दादांचा शिरस्ता होता. अनेक लेखक त्यांच्याकडे स्वत:चे नव्याने प्रकाशित झालेले पुस्तक भेट देण्यासाठी येत असत. अशा वेळी त्या लेखनाचे कौतुक करून दादा त्या लेखकाकडे त्या पुस्तकाचे मूल्य आग्रहाने देत. या प्रकाशनासाठी तुला काहीतरी खर्च आला आहे ना, मग मी ते असे भेट घेणार नाही, असे दादा सांगत आणि आग्रहाने पुस्तकाचे मूल्य लेखकाकडे देत.

आरोग्याचा मंत्र

दादांनी आयुर्वेद आणि संबंधित विषयांवर शेकडो व्याख्याने दिली. ही व्याख्याने म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणी असे. प्रत्येक व्याख्यानात ते भाकरी खाण्याचा आग्रह आवर्जून करत. तुम्ही सकाळी ज्वारी खा, दुपारी जोंधळा खा आणि रात्री शाळू खा असे ते गमतीने म्हणत. मीठ, मैदा आणि साखर या तीन पदार्थापासून दूर राहिले पाहिजे आणि आले, लसूण, पुदिना, ओली हळद यांची चटणी आपल्या आहारात रोज असली पाहिजे, हा आग्रहदेखील ते व्याख्यानांमध्ये आणि सहज संवादांमध्येही करत असत.
वैद्य विनायक खडीवाले
(शब्दांकन : विनायक करमरकर)
response.lokprabha@expressindia.com

First Published on January 5, 2018 1:06 am

Web Title: ayurvedacharya vaidya khadiwale