इंग्लंडमधल्या लेक डिस्ट्रिक्ट या परिसरात बिअॅट्रिक्स पॉटर अॅट्रॅक्शन हे जादूई सेंटर लहान मुलांना भुरळ घालते. बिअॅट्रिक्स पॉटर या लेखिकेची पात्रंच या सेंटरमध्ये चिमुकल्यांना भेटतात.
इंग्लंडमधील सर्वात रमणीय अशा लेक डिस्ट्रिक्ट या परिसरात आम्ही सहलीसाठी गेलो असताना विंडरमियर तळ्याकाठी असलेल्या बॉवनेस या गावात मुक्काम केला होता. बॉवनेसच्या टाउन सेंटरच्या रस्त्यावर अनेक आकर्षक वस्तूंची आणि सोवनीरची दुकाने आहेत. एका सकाळी ती दुकाने पाहात, शॉपिंग करीत आम्ही हिंडत असताना बिअॅट्रिक्स पॉटर अॅट्रॅक्शन (Beatrix Potter Attraction) अशा मोठय़ा अक्षरांतली पाटी आम्हाला दिसली. ही अठराव्या शतकातील बालकथा लेखिका, तिची एक-दोन पुस्तके मी आमच्या रिसॉर्टवर पाहिली होती. शिवाय वाचनाची आवड असलेली छोटी आरोहीदेखील आमच्याबरोबर असल्याने आम्ही हे सेंटर पाहण्याचा निर्णय घेतला. आरोहीला ते पाहण्याची खूपच उत्सुकता होती.
प्राणीजगातील व्यक्तिचित्रांवर आधारित एकंदर तेवीस पुस्तके या लेखिकेने खास लहान मुलांसाठी लिहिली. प्राण्यांवर मानवी भावनांचे आरोपण करून तिने या छोटय़ा कथा गुंफल्या, अठराव्या शतकापासून आजतागायत या कथा लोकप्रिय आहेत. आजही जगभर ही पुस्तके वाचली जातात. तिच्या या बालकप्रिय कथांची निरनिराळ्या भाषेत भाषांतरे झाली. अॅनिमेशन फिल्म्स तयार झाल्या. बॅले व कवितांद्वारेही त्या सांगितल्या गेल्या. बालसाहित्य लिहिणाऱ्या कुठल्याही लेखक-लेखिकेला वाचकांचे एवढे प्रेम क्वचितच लाभले असेल.
तळहाताच्या आकाराची तिची ही तेवीस पुस्तके खास मुलांसाठीच असल्याने ग्लॉसी पेपर कार्डवर मोठय़ा अक्षरात छापलेली आहेत. त्या गोष्टींमधील रंगीत चित्रेही त्यासोबत टाकली आहेत. त्यामुळे ती आकर्षक तर झाली आहेतच, पण मुलांना हाताळण्यासाठी सोपी व सुलभ अशी झाली आहेत.
आम्ही सेंटरमध्ये प्रवेश केला तेव्हा आत मुलांची व पालकांची खूप गर्दी असून तिकिटासाठी रांग लागलेली दिसली. तिकिटे देणाऱ्या स्वागतिकेच्या टेबलावर माहितीपुस्तकांचा गठ्ठाही होता. आम्हीही त्या रांगेत उभे राहून तिकिटे आणि माहितीपुस्तिका घेतली. ती चाळल्यावर माझ्या लक्षत आले की हे सेंटर बघण्यास आपल्याला पन्नास मिनिटे ते एक तास लागणार आहे. पण आरोहीचा उत्साह पाहता तो वेळ घालवणे आवश्यकच होते.
तिकीट घेऊन आम्ही आत गेलो. पहिल्याच विभागात बिअॅट्रिक्स या लेखिकेच्या सर्व तेवीस पुस्तकांची ओळख एका फिल्मद्वारे करून देण्यात आली. तसेच या कथांमध्ये येणाऱ्या प्राण्यांची व पात्रांची रेखाटने दाखवून परिचय करून देण्यात आला.
पुढील विभाग या प्राण्यांचे प्रत्यक्ष पुतळे करून कथांमधील प्रसंगांचे देखावे मांडणारा होता. ते पाहताना मुलांचा आनंद आणि उत्साह बघण्याजोगा होता. इंग्लंडमधल्या मुलांना बिअॅट्रिक्स पॉटरच्या कथा आणि त्यातील विविध प्राणी परिचयाचे असल्याने पुतळ्यांच्या माध्यमातून ती पात्रे व त्या कथा अनुभवताना ही मुले अगदी हरखून गेली होती. पण जराही गलका, ओरडा न करता सगळेजण देखावे पाहात होते. व जमेल त्या व्यक्तिचित्रांसोबत आपले फोटोही काढून घेत होते.
पहिलाच देखावा ‘पीटर रॅबिट’ या बालकप्रिय कथेचा होता. पीटर नावाचा खोडकर ससुल्या, त्याची भावंडे आणि आई यांचे पुतळे बनवून त्यांचे जग दाखवण्यात आले आहे. मिस्टर मॅकग्रेगोरच्या बागेत जाऊन पीटर कसा उच्छाद मांडतो, मॅकग्रेगोर त्याला पकडण्यासाठी धावपळ करीत असताना पीटरचा कोट कंपाउंडच्या तारेत कसा अडकतो, हत्यारे ठेवण्याच्या शेडमधे तो कसा लपतो अणि बागेत त्याला कोण कोण भेटते ते सारे प्रसंग पुतळ्यांद्वारे सजीव करण्यात आले आहेत. त्यांच्यावर योग्य प्रकारे प्रकाशझोत पडेल, पण जंगलाचा, गुहेचा आभास तसाच राहील अशी व्यवस्था आहे.
ही गुहा जसजशी वळणे घेत पुढे जाते तसतसे इतरही व्यक्तिचित्रे (कॅरॅक्टर्स) साकार झालेली दिसतात. त्यात मिस्टर टॉडचे जमिनीखालचे घर आणि जमीमा पडल डकचे वुडलँडमधील झोपडे दाखवले आहे. विशिष्ट प्रकारचे नट्स गोळा करण्यासाठी होडय़ा वल्हवत घुबडाच्या बेटावर निघालेल्या खारी, त्यासाठी त्यांनी आपल्या गोंडेदार शेपटांचा शिडासारखा केलेला उपयोग हा प्रसंग साकारला आहे. तसेच झाडाच्या ढोलीत बसून पंजात दोन उंदीर पकडून तिसरा उंदीर मटकावत असलेल्या घुबडाचीही भेट घडवली आहे. स्क्वीरल नटकीन कथेतील हे प्रसंग आहेत. टॉम क्रिटन, कोल्हा, हेज-हॉग यांच्या गोष्टीतील प्रसंगही पुतळ्यांद्वारे साकारण्यात आले आहेत. लहान मुले मनापासून या जगात हरवून गेलेली दिसली.
१) द टेल ऑफ पीटर रॅबीट
२) द टेल ऑफ मिस्टर टॉड.
३) द टेल ऑफ मिसेस टिगी िवकल.
४) द टेलर ऑफ ग्लोसेस्टर
५) द टेल ऑफ सॅम्युअल व्हिस्कर्स
अशी तिच्या कथांची काही नावे सांगता येतील.
या केंद्रात एक दुकानही आहे. तेथे लहान मुलांसाठी कपडे व भेटवस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. बिअॅट्रिक्सच्या कथांमधील निरनिराळ्या प्राण्यांची सॉफ्टटॉइज तसेच पोर्सेलिनच्या प्रतितकृतीही लहान-मोठय़ा आकारात येथे मिळतात. की-चेन्स व इतर वस्तूंवरही प्राण्यांची चित्रे असतात. लहान मुलांच्या हट्टाखातर किंवा आठवण म्हणून पालक त्या खरेदीही करतात.
या केंद्रातील आणखी एक आकर्षण म्हणजे मुलांसाठी येथे एक सुंदर बाग तयार केली आहे. तेथे मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ व कोडी तयार केली आहेत. मुलांना ही कोडी सोडवण्यास मजा येते. निरनिराळ्या प्राण्यांची बागेत लपलेली घरे त्यांनी ओळखावीत किंवा ह्या प्राण्यांच्या खेळण्याच्या जागा शोधाव्या असे खेळ आहेत. भिंतीवर, झाडाच्या खोडांवर किंवा जमिनीवरच्या लाकडी पट्टय़ांवर लिहिलेली प्राण्यांची नावे ओळखण्यास सांगितले आहे. पीटरच्या सुंदर कोटाचा मॅकग्रेगोरने कसा उपयोग केला किंवा ल्यूसीचे काय हरवले होते, तिचे स्वागत कुणी केले अशी बिअॅट्रिक्सच्या कथांवर आधारलेली कोडी मुलांना घातली आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधत मुले इथे छान रमतात. आरोहीलाही बागेत जायचे होते. पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. मुलांचा खेळ संपेपर्यंत पालकांसाठी इथे छानसे कॉफी-शॉपही आाहे.
या सर्व प्रकारच्या विक्रीतून निर्माण होणारा पैसा नॅशनल ट्रस्टला मिळतो व नॅशनल पार्कच्या निगराणीसाठी तो खर्च केला जातो. करण या लेखिकेची सर्व आकर्षण केंद्रे नॅशनल ट्रस्टतर्फेच चालवली जातात.
एखाद्या विषयावर आधारित पर्यटन केंद्राचे अत्यंत आकर्षक आणि उत्कंठावर्धक स्वरूपात सादरीकरण कसे करावे याचा एक आदर्शच या केंद्राच्या रूपाने आपल्यासमोर साकार होतो.
बिअॅट्रिक्सचे चरित्र :- सहलीनंतर लंडनला परतल्यावर बिअॅट्रिक्स पॉटर या लेखिकेबद्दलचे माझे कुतूहल, उत्सुकता जागृत झाली. त्यामुळे मी तिची सर्व पुस्तके तर वाचलीच, पण तिच्या खाजगी आयुष्याबद्दलही जमेल तितकी माहिती मिळवली. हेलन बिअॅट्रिक्स पॉटर (Helen Beatrix Potter) या लेखिकेचा जन्म २८ जुलै १८६६ मध्ये झाला. ती मँचेस्टर येथील एका सुखवस्तू घरात जन्मली. तिला एक भाऊ होता. त्याचे नाव वॉल्टर बेरिटॅम (Walter Beritam) असे होते. हा तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होता. तरीही तिचे त्याच्याशी चांगले सख्य होते. त्या वेळच्या इंग्लंडमधील विचारसरणीनुसार बिअॅट्रिक्सच्या आईने तिचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येऊ दिला नाही. तिला शाळेत न पाठवता घरीच गवर्नेस ठेवून तिचे शिक्षण केले. तिला तीन गवर्नेसनी श्किावले. भाषा, साहित्य, इतिहास व शास्त्र हे विषय त्या शिकवत. चित्रकलेत तिला लहानपणापासूनच गती होती. बाहेरच्या जगात समवयस्क मित्र-मैत्रिणीत मिसळायला न मिळाल्याने तिच्यात एकाकीपणाची भावना वाढीस लागली होती. त्यामुळे तिने अनेक प्राणी पाळले होते. निसर्गावरही तिचे प्रेम होते. एकाकीपणाच्या भावनेतूनच ते निर्माण झाले. आणि ती स्वत:चे असे काल्पनिक जग निर्माण करून त्यात रमू लागली.
वाचनाचीही तिला खूप आवड होती. परीकथा, जादूई कथा तिला फार आवडत. त्याच जगाचे तिला आकर्षण वाटे. क्लासिक फेअरी टेल ग्रुपची ती सदस्या होती. इसापच्या कथाही तिने वाचल्या होत्या. त्यामुळे लेखनाचा तिचा पाया भक्कम झाला.
उन्हाळी सुट्टय़ांमध्ये त्यांचे कुटुंब स्कॉटलंड, लेक डिस्ट्रिक्ट अशा रमणीय ठिकाण्ी जाऊन राहात असे. त्यामुळे निसर्गाबद्दल तिला आकर्षण वाटू लागले. ती व तिचा भाऊ अशा सहलींना जाताना काही प्राणीही बरोबर न्यायचे. तिचा भाऊ हाच तिचा मित्र व सवंगडीदेखील होता. पुढे ती या प्राण्यांवर काल्पनिक कथा लिहू लागली व त्यातील व्यक्तिचित्रांची रेखाटनेही करू लागली. प्रथम तिने या कथा व त्यानुसार चित्रे गवर्नेसच्या लहान मुलाला पत्ररूपाने पाठवल्या. गवर्नेसने त्या कथा आपल्या मुलाला आवडत असून त्याच्या मित्रांनाही खूप आवडतात असे तिला सांगितले. या कथा तिने प्रसिद्ध कराव्यात असा आग्रही तिने धरला.
बिअॅट्रिक्स पंधरा वर्षांची असताना तिचे कुटुंब लेक डिस्ट्रिक्टमधील ‘रे कॅसल’मध्ये राहायला गेले. तिथे तिची फ्रेडरिक वॉर्न या प्रकाशकाशी भेट झाली. या प्रकाशकाने प्रथम तिचे पुस्तक नाकारले. त्यामुळे तिने स्वखर्चाने ते प्रकाशित करून नातेवाईकांना भेट म्हणून दिले. १९०१ मध्ये तिचे पहिले पुस्तक ‘द टेल ऑफ पीटर रॅबिट’ प्रसिद्ध झाले. पुढे ती मुलांसाठी लिहिलेल्या काल्पनिक कथांची लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली. त्यात ससे, बदके, खारी, साळींदरसारखा दिसणारा ‘हेज-हॉक’, घुबड, डुक्कर, कोल्हा अशा प्राण्यांचा समावेश होता. अशी तळहाताच्या आकाराची तेवीस पुस्तके तिने लिहली. याच सुमारास नॉर्मन वॉर्न या संपादकाच्या ती प्रेमात पडली. पण तिला आई-वडिलांचा विरोध होता. एका सामान्य संपादकाबरोबर तिने लग्न करू नये असे त्यांचे मत होते. तिची आई फार कडक शिस्तीची व आग्रही स्वभावाची होती. त्यामुळे बिअॅट्रिक्सची कुचंबणा झाली. पण १९०५ मधे नॉर्मनचा ल्युकेमियाने मृत्यू झाल्याने हे प्रेम बहरण्यापुर्वीच कोमेजले व संपुष्टात आले.
तिच्या पुस्तकांच्या विक्रीच्या पैशातून तिने लेक डिस्ट्रिक्टमधील ‘सावरे’ (sawarey) गावाजवळ हिल टॉप फार्म विकत घेतले. लेक डिस्ट्रिक्ट या अनेक नैसर्गिक तलावांमुळे आणि तलावांकाठी असलेल्या रम्य वनश्रीमुळे चित्ताकर्षक बनलेल्या स्थळाच्या ती प्रेमातच पडली होती. तिथल्या निसर्गसौंदर्याची तिच्यावर एवढी जबरदस्त मोहिनी होती की आपल्या उर्वरित आयुष्यात ती हिल-टॉप येथील घरातच राहिली. तिथे तिने आसपासच्या परिसरात हिंडून वनस्पतींचा सखोल अभ्यास केला.
१९१३ मध्ये सत्तेचाळीसाव्या वर्षी तिने विल्यम हिलीस या माणसाशी लग्न केले. हळूहळू तिने आसपासची बरीच जमीन विकत घेतली. त्यात शेती आणि मेंढय़ांची पैदास तिने केली. तिच्या या कामाबद्दल तिला नॅशनल अॅवॉर्डही देण्यात आले.
१९४३ साली वयाच्या ७७ व्या वर्षी तिचे निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर तिची सर्व मालमत्ता ‘नॅशनल ट्रस्ट’कडे सुपूर्द व्हावी अशी तिने व्यवस्था केली होती. लेक डिस्ट्रिक्ट नॅशनल पार्कचे श्रेयही तिचेच आहे. कारण त्यासाठी तिने बरीच जमीन राखीव ठेवली होती.
नॅशनल ट्रस्टतर्फे बिअॅट्रिक्स पॉटर अॅट्रॅक्शन सेंटर्स जगात निरनिराळ्या ठिकाणी नंतर उभी केली गेली. या केंद्रांना पर्यटक भेट देतात व त्यातून बराच पैसा मिळतो. पर्यटकांना आकर्षित करण्याची हातोटी पाश्चात्त्य देशांकडून शिकण्यासारखी आहे. ब्रिटिश त्यांच्या लोकप्रिय लेखक-कवींचे खूपच उदात्तीकरण करतात व त्यांच्या घरांचे अभिनव असे आकर्षण केंद्र बनवतात. वर्डस्वर्थची घरे, बिअॅट्रिक्सचे सावरे येथील फार्म हाउस, लंडनमधील शेरलॉक होम्सचे ऑफिस या ठिकाणांना पर्यटक भेट देतातच.
िवडरमियर हे बिअॅट्रिक्सच्या अनेक आकर्षण केंद्रांतील एक आहे. तिच्या पुस्तकांची व मुलांसाठी तिने निर्मिलेल्या अनेक प्राण्यांच्या व्यक्तिचित्रांची आठवण या सेंटर्समुळे आजही जागती राहिली आहे. रसिक वाचकांच्या मनात ती अजरामर व्हावी यासाठी ट्रस्टने मेहनत घेतली आहे.
एक बालकथा लेखिका म्हणूनच नव्हे, तर एक वनस्पती शास्त्रज्ञ, एक पर्यावरणवादी आणि स्वत:ची विशिष्ट शैली असलेली चित्रकार म्हणून अठराव्या शतकातील बिअॅट्रिक्स आजही प्रसिद्ध आहे.
जयश्री कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 25, 2015 1:18 am