02 March 2021

News Flash

वाघ-सिंहाच्या पलिकडे

सस्तन प्राण्यांचे प्रमुख वैशिष्टय़ं म्हणजे पाठीचा कणा असणे.

महाराष्ट्राचा ‘बायो’डेटा
प्राणिजीवन
महाराष्ट्रातील प्राणिजीवनाचा आढावा घेताना लक्षात येतात ते शेकरू, खवल्या मांजर, भेकर, चितळ असे वैशिष्टय़पूर्ण प्राणी.  त्यांच्या संवर्धनावर भर देण्याऐवजी आपण बाहेरच्या देशातून प्राणी आणण्यात आनंद मानतो आहोत.

‘लोकप्रभा’च्या ४५ व्या वर्धापनदिन विशेषांकाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा ‘बायोडाटा’ म्हणजेच राज्यातील जैविक विविधतेचा आढावा घेताना या लेखात आपण केवळ सस्तन प्राणी जीवांचा विचार करणार आहोत. सस्तन प्राणिजात इतर प्रकारच्या जीवांपेक्षा आगळीवेगळी आहे, खास आहे. म्हणून राज्यातील जीवसृष्टी व त्यामधील जैवविविधतेचे संरक्षण तथा संवर्धनचा विचार करताना, सस्तन प्राण्यांचा विचार वेगळाच व्हावयास हवा. प्रथम सस्तन प्राणिजातीची नेमकेपणाने वैशिष्टय़े काय आहेत हे पाहूया व नंतर महाराष्ट्रात या प्राणिजातीतील कुठले प्राणी येतात हे जाणून घेऊया.

सस्तन प्राण्यांचे प्रमुख वैशिष्टय़ं म्हणजे पाठीचा कणा असणे. या प्राण्यांतील मादीच्या शरीरात दूध स्रवणारी ग्रंथी असणे व पिल्लांनी दूध शोषून घेण्यासाठी मादीच्या ओटीपोटावर वा छातीवर दोन/चार किंवा त्याहून अधिक स्तनाग्रे असणे. अशा रचनेमुळे प्रसूतीनंतरदेखील आई आपल्या पिल्लांचे संगोपन अधिक प्रभावीपणे करू शकते. (सस्तन प्राण्यांचा उपप्रकार असलेल्या कांगारू या प्रजातीमध्ये  प्रसूती झाल्यावर माता आपले पिल्लू स्वतचे पोटावर असलेल्या पिशवीत ठेवते. पिशवीच्या आत असलेल्या दुग्ध ग्रंथीतून स्तनपान देते.) या ग्रंथीखेरीज सस्तन प्राण्यांची इतरही वैशिष्टय़े आहेत ती पुढीलप्रमाणे

ते उष्ण रक्तीय असतात. शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवू शकतात. अगदी शून्याच्या खाली तापमान असतानादेखील गोठून न जाण्याची त्यांच्याकडे शारीरिक क्षमता असते. अत्यंत उच्च तापमानातदेखील शरीर प्रक्रिया व्यवस्थितरीत्या चालू राहतील, अशी व्यवस्था त्यांच्या शरीरात असते.

त्यांच्या जबडय़ाचे अखंड एकच हाड असते आणि ते कवटीला सांधलेले असे असते. त्यामुळे त्यांना शिकार करण्यासाठी लागणारी पकड घट्ट ठेवणे शक्य होते. उदाहरणार्थ वाघाची पकड. त्यांच्या खालच्या व वरच्या जबडय़ात विविध प्रकारचे (पटाशी, सुळे, लहान व मोठय़ा दाढा) व दोन वेळा येणारे (दुघाचे व त्यानंतरचे) दात असतात. तसेच विविध प्रकारच्या दातांच्या रचनेमुळे खाद्य तोडून, कापून, ओरबाडून घेणे त्यांना शक्य होते. विविध प्रकारचे खाद्य ते (गवत, झाडपाला, किडे, मुंग्या, फळे, मांस इत्यादी, इत्यादी) खाऊ शकतात.

पोट व छातीचे पोकळीत फासळ्यांखाली असलेल्या पडद्यामुळे त्यांची श्वसन प्रक्रिया अधिक सुलभ व प्रभावी बनलेली आहे.

चार कप्पे असलेले हृदय असल्याने त्यांना शुद्ध रक्तपुरवठा अधिक चांगला होतो. यामुळे शरीर क्रिया अधिक परिणामकारक होऊन ते अधिक वेगवान, ताकदीचे तथा दमदार ठरतात.

मध्यकर्ण तीन हाडांचा असल्याने त्यांची श्रवणशक्तीत चांगली असते.

शरीरावर (काही अपवादात्मक प्रकार सोडून) केस असतात.

प्राणी जगतातील उत्क्रांतीत अशा अनेक सुधारणा होऊन बनलेली सस्तन प्राणी प्रजाती, जवळपास सर्वच परिसंस्थेत, जसे जळी-स्थळी-पाताळी तसेच अगदी आकाशात विहारणारी अशी आहे. या प्राण्यांची रूपे व आकारमानात जेमतेम अंगठय़ाएवढय़ा उंदीर, चिचुंद्रीपासून ते महाकाय हत्ती वा देवमाशापर्यंत खूपच वैविध्य आहे. सहाजिकच या समूहातील अनेक प्राणी अन्नसाखळीचे अग्रणी बनून शिरोभागी स्थिरावले आहेत.

सस्तन प्राण्यांचा आढावा

सस्तन प्राण्यांची पूर्वपीठिका पाहताना एक शतकापूर्वीचा संदर्भ म्हणून नोबल पारितोषक प्राप्त झालेले  रुडयार्ड कििप्लग यांचे ‘जंगल बुक’ माझ्यासमोर येते; पुस्तकात लांडग्याने जोपासलेले माणसाचे बाळ – मोगली व त्याचे सवंगडी बघिरा, भालू, इत्यादींच्या माध्यमातून त्याकाळच्या मध्य भारतातील वन्य प्राण्यांचे दर्शन होते. आजचा विदर्भ हा त्याकाळच्या मध्य भारताचा एक भाग होता. म्हणून हे तपशील काही प्रमाणात महाराष्ट्रालाही लागू होतात. अजून मागे जायचे असेल तर कौटिल्याच्या अर्थशास्त्राचाही हवाला देता येतो. पश्चिम महाराष्ट्रातून भानू शिरधनकर, व्यंकटेश माडगूळकर असे शिकार कथा लिहिणारे लेखक वन्य जीवांची माहिती देत होते. गेल्या २५ वर्षांत, मारोतराव चितमपल्ली यांनी त्यांच्या अरण्यवाचनातून, राज्यातील प्राणी विश्व अतिशय रोचकपणे मांडले आहे. या अशा साहित्यातून लक्षात येते की बहुतेक सस्तन प्राणी, भूचर असून त्यांचा वावर वनक्षेत्रात अधिक आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राचा अंदाजे १६ टक्के भाग वनाच्छादित आहे. या वनात, त्यातील गवताळ माळरान मिळून अनेक सस्तन प्राणी निवास करीत होते व बऱ्याच अंशी आजही करीत आहेत. महाराष्ट्रातील सस्तन प्राणिजातीचा थोडक्यात आढावा येथे घेत आहे. सर्व प्रथम शाकाहारी सस्तन प्राण्यांपासून सुरुवात करू या.

हरिण कुल

हरीण कुलातील सारंग (म्हणजे जे प्राणी दर वर्षी िशगे गाळतात;) या प्रकारात पिसोरी, भेकर, चितळ व सांबर येतात तर कुरंग प्रकारात (म्हणजे जे िशग गाळत नाहीत ते) चौसिंगा, चिंकारा, काळवीट, नीलगाय असे प्राणी येतात. सारंगातील पिसोरी, चितळ, भेकर व सांबर चांगल्या प्रतीच्या वनातच दिसतात; पिसोरी निशाचर, लाजरीबुजरी असल्याने तिचे दर्शन सुलभपणे होत नाही. हीच बाब भेकरालाही लागू आहे; पण त्याचा आवाज कुत्र्यासारखा असल्याने त्याच्याकडे लक्ष वेधले जाते. गौ कुळातील रानगव्यांमधील नर गडद चॉकलेटी रंगाचे असतात. मोजे घातल्यासारखे वाटणारे पांढरे पाय आणि एकूण शरीर असे गवे फार रुबाबदार दिसतात. हे बहुधा पश्चिम घाटातील दाट वनात वा विदर्भातील मेळघाट, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली भागांतच दिसतात. एखाद्या मल्लासारखा दाणगट नर एरवी मौन पाळतो. विणीचे काळात त्याची रंगेल शीळ केवळ अभ्यासकच ओळखूू शकतात. याच गटातील रानम्हशी गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागढ येथे इंद्रावती नदी खोऱ्यातच तग धरून आहेत; त्या नष्ट होण्याचे मार्गावर असल्याने त्यांच्या संवर्धनास सर्वाधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मार्जार कुल

मार्जार कुलात सुपरिचित मांसभक्षक रानमांजर, बिबट, ढाण्या वाघ असे प्राणी आहेत. विसाव्या शतकाचे अखेरीस सर्व जगभरातील वाघांची संख्या इतकी कमी झाली होती की एकविसाव्या शतकापर्यंत हा प्राणी नामशेष होईल असे भाकीत केले जात होते. या पाश्र्वभूमीवर सन १९७२-७३ पासून, तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने, भारतात व्याघ्रप्रकल्प सुरू झाला; व्याघ्र हा अन्नसाखळीचा परमोच्च िबदू असल्याने त्याच्या अधिवासाचे रक्षण झाल्यास, वाघ ज्या वन्य जीवांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे  अवलंबून असतो, त्या सर्वच वन्य जीवांचे अधिवास राखले जातील अशी धारणा होती. व्याघ्र प्रकल्पात प्रथम ज्या नऊ जागा निवडल्या गेल्या, त्यात महाराष्ट्रातील मेळघाट प्रकल्प अग्रणी होता. आजमितीस या योजनेअंतर्गत राज्यात ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव-नागझिरा, सह्य़ाद्री अशी अधिकची क्षेत्रे आलेली आहेत. देशभरातील सर्व प्रकल्पांचे व्यवस्थापनावर निगराणी ठेवणारे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA – National Tiger Conservation Authority) स्थापन केले गेले आहे.

वाघ व इतर मोठय़ा मार्जार कुळातील सिंह, बिबट या प्राण्यांबाबत प्रसारमाध्यमातून इतकी चर्चा होत आहे की महाराष्ट्रातील वाघ व बिबट यावर येथे नव्याने काही लिखाण वा टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. (पूर्वी ब्रिटिश राजवटीतील वा सरंजामी व्यवस्थेतील उच्चभ्रू लोक मोठय़ा प्राण्यांची शिकार करून दिवाणखान्यात त्यांना पेंढा भरून ठेवत असत. तसंच आज मोठय़ा मार्जार कुळातील (वाघ, बिबट) प्राण्यांची छायाचित्रे मिळविणे हा एक प्रकारे मिरवण्याचाच प्रकार झाला आहे. शहराचा उकिरडा झाल्याने कुत्री, डुक्कर यांचा झालेला सुळसुळाट म्हणजे बिबटय़ाला निमंत्रण हे माहीत असूनदेखील काही करायचं नाही आणि वन विभागाला बिबट सांभाळता येत नाही असा दोष द्यायचा, असे सध्या चालले आहे. त्यामुळे अशा प्रश्नांवर नुसती चर्चा होते पण ठोस स्वरूपाचे बिबट संवर्धनाचे काम होताच नाही. त्याच त्या  विषयावर केवळ दिवाणखान्यातील आक्रस्ताळी भाष्य करीत राहण्याची प्रथाच पडलेली आहे. मात्र मार्जारवर्गातील गौण प्रकार, अजूनही उपेक्षित आहेत.

पश्चिम घाटातील वाघाटी (Leopard cat) तसेच गंजासारखे ठिपके असलेली मांजर (Rusty spotted cat) हे प्राणी फारच दुर्लभ असूनही दुर्लक्षितच राहिले आहेत. काही वन्यजीव अभ्यासक, शशकर्ण (Caracal) व वाळवंटी मांजर अनुक्रमे सातपुडय़ात व मराठवाडय़ात पाहिल्याचा दावा करतात. बहुतेक सामान्यजन मात्र या बाबत अनभिज्ञ आहेत; म्हणून या प्रजातीवर केंद्रित करून असा प्राथमिक अभ्यास व त्यानंतर दीर्घकालीन संवर्धनासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहे.

श्वानकुल

श्वान कुलाशी निगडित प्राण्यांमध्ये सोनकुत्री, लांडगे, खोकड, कोल्हा असे प्राणी प्रकार आहेत. त्यापकी सोनकुत्री ही प्रजाती अन्य प्राणिमात्रास अगदी वाघासह, धोकादायक आहे असे मानून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ पूर्वी, या प्रजातीचा संपूर्ण नाश करावा अशी धारणा होती. पण नंतरच्या काळात झालेल्या सखोल अभ्यासातून ( उदाहरण – द व्हिसिलग हंटर्स) सिद्ध झाले की, सोनकुत्री एकंदर व्यवस्थेचा अविभाज्य हिस्सा असल्याने त्यांचाही सांभाळ करणे अत्यावश्यक आहे.

लांडगे भटकंती करणारे असतात. त्यांचा सर्वत्र संचार असतो. माळरान ते कृषिबहूल क्षेत्र असे ते फिरत असतात. एकदा मिग कारखाना व्यवस्थापनाकडून ‘वन्य प्राणी मिग विमानरोधक जाळी कुरतडत आहेत’ अशी तक्रार आली होती. त्यासंबंधात केलेल्या अभ्यासात वनविभागास दिसून आले की मिग विमानाच्या धावपट्टी परिसरात वास्तव्य करीत असलेली लांडग्याची जोडी, कदाचित दात शिवशिवतात म्हणून अधूनमधून जाड नायलॉनची दोरी असलेली जाळी कुरतडत होती. प्रचंड बंदोबस्त असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीपासून पार ५० कि. मी. लांबपर्यंत त्यांचा लीलया वावर होता. कर्मचारी उपाहारगृहातील खरकटे, शेतातील बोरे, द्राक्षे, कोंबडय़ा असे मिश्र अन्न ते खात होतेच, पण जमेल तशा शेळ्या मेंढय़ाही फस्त करीत होते. लांडगे, शेळी वा मेंढीचे भक्षण करीत असल्याने मेंढपाळांचे ते शत्रू ठरतात. लांडग्याने शेळी, मेंढी मारली तर साहजिकच झालेल्या नुकसानीमुळे मेंढपाळ ओरड करत आणि मगच लांडग्याचे आस्तित्व स्थानिक लोकांस समजत असे.

लांडग्यापेक्षा कोल्हा लहान चणीचा असतो. लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीतून त्याची हुशारी मनात रुजलेली असते. खेडय़ाच्या जवळचे माळरान हा त्याचा अधिवास, मात्र खेडय़ात शिरल्यावर तिथल्या पाळीव कुत्र्यांशी होण्याऱ्या संभाव्य सामन्यात तो टिकाव धरू शकत नाही. ‘गिदडकी जब मौत आती है- वो शहरके तरफ आता है’ ही िहदीतील म्हण रास्त आहे हे मला उमगले आहे. पण आता शहरेच कोल्ह्य़ाकडे सरकू लागलेली आहेत. खोकड हा, आकाराने कोल्ह्य़ाहूनही लहान, पण शेतकऱ्यांचा मित्र म्हणायला हवा असा प्राणी. कारण तो शेतातील उंदीर मारत असतो. मोठय़ा कानांमुळे तो फार गोंडस वाटतो. इंग्लिशमध्ये यालाच कोल्हा (Fox) असे संबोधले जाते. तो निशाचर असतो. अत्यंत लाजरा असल्यामुळे तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. तो नामशेष होण्याबाबत कोणालाच फारसे काही वाटत नाही, हे कटू सत्य आहे.

मिश्र आहारी प्राणी

मिश्र आहारी प्राण्यांची उदाहरणे म्हणजे रानडुक्कर, अस्वले. ही बहुतेक सगळ्या भागात असतात. अन्न साखळीत स्वतचे असे विशिष्ट स्थान असलेला तरस हा प्राणी निसर्गातला सफाई कामगार म्हणून महत्त्वाचा आहे.  विस्तृत क्षेत्रात त्यांचा आढळ असतो. तरसाचा अनेक वेळा तडश्या वाघ असा उल्लेख होतो. पण वाघ, बिबट बघायला जाण्यात जो थरार मानला जात असतो, तसा थरार तरस पाहण्यात नाही. अस्वलाचा आढळ बऱ्याच भागात आहे, मात्र मदारी अस्वलाच्या पिल्लांची तस्करी करत असल्याने त्यांची संख्या रोडावलेली आहे. अस्वलाच्या अवयवांची (विशेषत: प्लीहा) तस्करी होत असल्याचे सांगितले जाते.

झाडावर राहणारे प्राणी

सहसा झाडांवर आढळणाऱ्या खारींचे तीन प्रकार आहेत. सुपरिचित अशी पाठीवर तीन रेषा असलेली खारूताई, शेकरू आणि त्यामानाने क्वचित दिसणारी उडती खार. शेकरू गर्द झाडीत असल्यास पटकन दिसत नाही; पण सतत होणाऱ्या आवाजावरून त्याचे अस्तित्व जाणवत असते. शेकरूला महाराष्ट्र राज्याचे प्रतीक तसंच चिन्ह हा दर्जा मिळाल्यापासून त्याच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी स्पृहणीय असे काम होत आहे. उदा. दरवर्षी होणारी प्रगणना. शेकरूचे स्थलनिहाय असे अनेक उपप्रकार आहेत. उदा. भीमाशंकरची मोठी खार. तसंच निशाचर असल्याने सहसा न दिसणारी उडती खार.  दिवसभर झोपून संध्याकाळी ठरावीक वेळा ढोलीतून बाहेर येऊन सहजपणे तरंगत जाण्याची तिची सवय मेळघाटातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी हेरून ठेवली होती; तिथे येणाऱ्या पर्यटकांना उडत्या खारीचा शो नियमितपणे दाखविला जाई.

वटवाघुळ/ वाघुळ –

खऱ्या अर्थाने हवेत उडणारे, झाडावर वास्तव्य करणारे हे प्राणी. वन विस्तारण करण्यात ते माहीर आहेत. त्यापकी वटवाघुळ निशाचर असते. मोठय़ा आकाराचे व वसाहतीत रहात असल्याने परिचित असते. वटवाघळे दिवसा जिथे राहतात त्याजागी खूप घाण होते म्हणून त्यांचे स्थान केवळ पडक्या वाडय़ातच! दुर्दैवाने हा प्राणी भुताटकीचे प्रतीक बनला आहे आणि त्यामुळे तो अभद्र मानला जातो. वटवाघुळे फलाहारी असल्याने पक्व फळे खाऊन बीज प्रसारण करण्याचे काम त्यांच्याकडून होत असते.

वाघूळ हा प्रकार आकाराने लहान, नसíगक गुहांत मोठय़ा वसाहती करून राहणारा, पण कीटकभक्षक प्राणी आहे. कधीमधी चुकून घरात आला तर त्यास त्वरित हुसकावून देण्यात येते. याच्या अनेक प्रजाती आहेत पण एकंदर या प्राणी प्रकाराची माहिती आम जनतेस कमीच आहे.

उंदीर वा खारीसारखा भासणारा एक अजब प्राणी आहे झाड चिचुंद्री; मला त्याचे प्रथम दर्शन सातपुडय़ात मेळघाटात झाले. झाडावर दिसल्याने ती खार असावी असे प्रथमदर्शनी वाटले पण तिच्या पाठीवर खारीची ओळख असलेले पट्टे मात्र नव्हते. नंतर गोळा केलेल्या माहितीनुसार सस्तन प्राण्याचे उत्क्रांतीमधील हा एक आगळावेगळा जीव आहे हे लक्षात आले. या अजब प्राण्याचा अभ्यास व्हावयास हवा.

रामायणातील उल्लेखानुसार रामसेतू बांधण्यात खारीचाही वाटा आहे हे पाहून श्रीरामाने खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला. त्यामुळे म्हणे तिच्या पाठीवर हे पट्टे आले. मेळघाटातील कोरकू हे रावणपुत्र मेघनादाची पूजा करतात. म्हणून हा भाग म्हणजे लंका आहे. म्हणून इथल्या खारींच्या पाठीवर श्रीरामाने उमटविलेले पट्टे नसावेत अशी कपोलकल्पित गोष्ट सांगायला काय हरकत आहे असा गमतीशीर विचार सहज मनात आला.

खवल्या मांजर म्हणजे दुसरे टोक. हा फारच संथपणे फिरणारा, धोक्याची जाणीव झाली तर शरीराचे वेटोळे करून पडून राहणारा प्राणी. त्याच्या अंगावरचे खवले चांगलेच टणक असल्याने त्याने जणू काही चिलखत घातले आहे असे भासते. खवल्या मांजर केवळ मुंग्या, वाळवीसारखे कीटक खाते. अनेक वेळा ते चुकून घरात आले वा कुत्र्यांनी त्यास घेरले तर ते वन विभागास सुपूर्द केले जाते. पण त्यास काय व कसे खाऊ घालावयाचे हेच फारसे कुणालाही माहीत नसते ही वस्तुस्थिती आहे. रानातील उंदीर, घूस हे प्रकार सर्व साधारणपणे अनुल्लेखित राहतात.

मुंगूस /उदमांजर /हुंदाले (पाण कुत्रे) –

लहानपणी साप आणि मुंगूस यांच्या वैराची गोष्ट ऐकलेली असते.  गारुडी दाखवितो ती मुंगूस -सापाची झटापटही पाहिलेली असते. अगदी शहरातदेखील मुंगूस दिसते. लहान उदमांजर वा जवादी मांजर, आकाराने मुंगूस भासावे असे पण काळसर रंगाचे, लांब चणीचे पण झुपकेदार शेपटी असलेले असते; त्याचा वावर वनात तसेच वनेतर भागातदेखील असतो. ते ताडासारख्या उंच व चढायला दुष्कर अशा ठिकाणी राहणे पसंत करत असल्याने, त्यास पाम सिवेट असे संबोधले जाते. शेपटाखाली असलेली ग्रंथी ही याची खासीयत. शत्रू जवळ आल्यास तिच्यामधून तीव्र वासाचा पिवळट द्राव फवारला जातो ज्यामुळे शत्रू भांबावतो. पण अशा प्राण्यांचा फारसा अभ्यास झालेला नसल्याने त्यांची नेमकी संख्या किती, त्यांची सद्य:स्थिती काय आहे याची फारशी माहिती उपलब्ध नाही. उत्तर भारतातील काही भागात मुंगुस पुरलेल्या अर्भकास उकरून खाते, वेळप्रसंगी तान्ह्य़ा बाळावरही हल्ला करते असे गरसमज आहेत. त्यामुळे त्याला अशुभ मानले जाते.

सन १९६४-६६ साली मी मत्स्य- उद्योग खात्यात काम करीत असताना, मला योगायोगाने पाणकुत्रे वा हुंदाळेबाबतचे प्रकरण हाताळण्याची संधी मिळाली. वन्यप्राण्यांमुळे मासेमारीच्या जाळ्यांचे नुकसान होत आहे, अशी एक तक्रार आली होती. चौकशीचे वेळी स्थानिक मच्छीमार म्हणाले की झुंडीने आलेले हुदाळे, वाहत्या नदीत वा मोठय़ा तळ्यात टाकलेल्या जाळ्यात अडकलेले मासे खाऊन टाकतात. प्रत्यक्ष अभ्यासात तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. हे प्राणी अतिशय चपळ, जिगरबाज, अती जलद पोहणारे होते. त्यांची क्रीडा वा हुंदडणे लोभसवाणे होते. त्यांचे लहानपणापासून पालन पोषण केल्यास त्यांच्याशी मत्री करणे शक्य आहे. माशांची शिकार करण्यासाठी काही चिनी मासेमार  यांचा वापरही करतात असे सांगितले  जाते.  पुढे मी वनविभागात आल्यावर, केलेल्या सर्वेक्षणात दिसले की महाराष्ट्रात यांच्या दोन प्रजाती आहेत; पश्चिम महाराष्ट्रातील हुंदाल्या तर उत्तर विदर्भातील बिननखी पाणकुत्रा. या प्रजाती वन क्षेत्रातून वाहणाऱ्या बारमाही नद्या वा मोठय़ा आकाराच्या तळ्यात अपेक्षित आहेत; पण आज तरी स्थानिक कोळी ज्या पद्धतीने मासे मारतात (लहान भोकाच्या जाळ्या व डायनामाइटचाही वापर) त्या पाहता हुंदाल्याबरोबर सहजीवनाची शक्यताच उरलेली नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. सोनकुत्र्यास अभय मिळाले तसेच हुंदाळ्यास द्यावयास हवे. या प्रजातीसाठी महाराष्ट्रात विशेष संरक्षित क्षेत्र निर्माण व्हावे. आधी अभ्यास करूनच संरक्षण संवर्धनाचा मार्ग निघेल अशी आशा करूया.

रानडुक्कर, वराह –

विष्णूच्या अवतारापकी एक अशी मान्यता असलेला हा प्राणी शेतकऱ्याचा वैरी मानला जातो. पण वनव्यवस्थापनात तसेच वाघाच्या अन्न साखळीतील तो एक महत्त्वाची कडी आहे. याची शिकार करण्यासाठी परवानगी असावी, अशी सतत मागणी होत आहे. पण त्यावर तारतम्याने विचार व्हायला हवा.

दूरगामी संवर्धन कार्यक्रम

महाराष्ट्राची जडणघडण, लोकसंख्येचा उद्रेक, केवळ मानव प्राणी (जो स्वत सस्तन आहे) हाच केंद्रिबदू मानून होत असलेली विकास प्रक्रिया, अशा अनेक कारणांनी परिसंस्थेतील जवळजवळ सर्वच प्रकारचे सस्तन वन्यजीव, नामशेष होण्याच्या मार्गावर वा धोक्याच्या पातळीवर आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी त्वरित उपाययोजना हवी अशी निसर्गप्रेमींची मागणी आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हत्ती, वाघ, बिबट, रानडुक्कर, वानरे अशा वन्यप्राण्याचा उच्छाद होत असल्याने मानवी जीवन धोक्यात आहे, मालमत्तेची अपरिमित हानी होत आहे, म्हणून अशा प्राण्यांचे नियंत्रण करा अशी ओरड होते आहे. अशा प्रकारे दोन अगदी विरुद्ध टोकाच्या मागण्या होत आहेत. या दोन टोकातील सुवर्णमध्य साधणे अत्यावश्यक झाले आहे. खोलवर विचार करून नंतरच आवश्यकता असेल त्यानुसार दूरगामी स्वरूपाचे प्रभावी संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन कसे करावयाचे या बाबत काही विचार मांडणे आवश्यक आहे.

वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२

स्टॉकहोम येथे झालेल्या परिषदेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, यांनी पर्यावरणाचा ऱ्हास हे गरिबीचे मूळ कारण असून पर्यावरण सुस्थितीत असेल तरच शाश्वत विकास होईल, असा विचार मांडला होता. या विचारधारेनुसार, सर्व प्रकारचे वन्यजीव (वन्य प्राणी, पक्षी, वनस्पती) वाचविण्यासाठी आणि त्या संबंधातील सर्व विषयांशी निगडित परिस्थितीजन्य बाबीं लक्षात घेऊन, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उचलेलं पाऊल म्हणजे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२. तो संमत करण्यापूर्वी, म्हणजे १९७०-७१ या काळात, महावीर जयंतीचे औचित्य साधून कुठल्याही वन्यजीवाची शिकार होणार नाही अशी व्यवस्था केली गेली.

सन १९७२ मध्ये संमत केलेल्या अधिनियमानुसार प्राण्यांची शिकार करणे, व्यापार करणे यावर र्निबध आले. पण केवळ प्राण्यांची हत्या थांबविल्याने प्रश्न सुटत नाही, तर प्राण्यांचा अधिवास संरक्षित झाला तरच प्राणी वाचू शकतील हे लक्षात घेऊन अधिनियमात अभयारण्य, राष्ट्रीय उपवने (उद्याने) घोषित करण्याची प्रक्रिया ठरवून देण्यात आली. अशी संरक्षित क्षेत्रे निर्माण करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन लोकसहभागाने संरक्षित क्षेत्रे घोषित करण्याची पर्यायी सोय (कम्युनिटी व कन्झव्‍‌र्हेशन रिझव्‍‌र्ह) सन २००३ पासून उपलब्ध झालेली आहे. त्यानुसार नवीन संरक्षित क्षेत्रे निर्माण होत आहेत. त्यांचं स्वागत करायला हवं. पण गरजेच्या मानाने नवनिर्मितीचा वेग संथ वाटतो. राज्यातील सर्व प्रकारची कृषि हवामान परिमंडळे, प्रातिनिधिक स्वरूपात संरक्षित क्षेत्रांच्या जाळ्यात सामावून घेण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे तरतुदीनुसार मुख्यत वनात अंदाजे ५० ठिकाणी संरक्षित क्षेत्रे घोषित केली आहेत. या आधी नमूद केल्यानुसार, सस्तन प्राणीवैविध्याचा आवाका मोठा असून, वनक्षेत्राबाहेरदेखील काही प्रकारांचा अधिवास आहे. त्यामुळे वनविभागाकडून होत असलेले प्रयत्न अपुरे ठरतात याची नोंद घ्यायला हवी.

प्राणी संग्रहालये तथा वन्यप्राणी अनाथालये, प्राण्याचे अधिवास विकसित, संरक्षित करणे हा जसा एक मार्ग आहे तसा दुसरा मार्ग म्हणजे मानवनिर्मित अधिवासात त्यांचा सांभाळ करणे (in situ and ex situ conservation).  दुसऱ्या प्रकारात प्राणी संग्रहालय येते. अडचणीत असलेले वन्य प्राणी, अनाथालयात आणून, वाढवून, मोठे व सक्षम झाल्यावर त्यांना परत योग्य अधिवासात सोडणे हादेखील संवर्धनाचा एक चांगला मार्ग आहे. या विचारातून वन्यजीव (संरक्षण) अधिनियमात प्रकरण ४ अ कलम ३८ नव्याने घालण्यात आले आहे. गेल्या ३० वर्षांत या कार्यप्रणालीचा योग्य वापर झालेला नाही. धोरणात्मक निर्णयप्रणाली अजून सजग व तत्पर होण्यास वाव आहे. एका सुनिश्चित धोरणानुसार हे प्राणी राज्यातील प्राणीसंग्रहालयात वाढवून त्यांचा परतीचा प्रवास ठरला पाहिजे. वन्यप्राणी अनाथालये कल्पना स्तुत्य आहे पण अनेकदा अशी स्थाने व प्राणी संग्रहालय यात फरकच दिसत नाही.

घटनादुरुस्तीनुसार नागरिकांचे पर्यावरण रक्षणाचे कर्तव्य, जैववैविध्य, संसाधानाचे जतन तसेच संवर्धन याचा प्रचंड आवाका लक्षात घेता होत असलेले प्रयत्न तोकडे पडत आहेत. कायदा म्हणतो की वन्यजीव ही सरकारी संपत्ती आहे; म्हणून वन्यजीव ही केवळ सरकारची जबाबदारी आहे असा गरसमज झालेला आहे. वन्यजीव संरक्षणाचा एक पाईक म्हणून जवळपास तीन तप काम करीत असताना हे मी अनुभवले आहे. अधिक विस्तृत स्वरूपात, समाजाच्या जास्तीत जास्त घटकांकडून हे काम होणे अपेक्षित आहे. वन्यजीव संरक्षण तसेच संवर्धन ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून ते भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अगदी गाव पातळीपासून त्यापुढील सर्व स्तरावर ही जबाबदारी लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी अजून एक कायदेशीर तरतूद आता उपलब्ध आहे – ती म्हणजे जैव वैविध्य कायदा २००३. या अनुषंगाने काम करण्यासाठी मोठा वाव आहे म्हणून त्या संबंधातील माहिती येथे देत आहे.

जैवविविधता कायदा २००३

जगाच्या केवळ अडीच टक्के भूभाग असलेल्या भारतात, सर्व जीव प्रजातीपकी ७.८ टक्के प्रजातींची नोंद झालेली आहे. त्या संबंधित पारंपरिक व स्वदेशी ज्ञानाचा सार्वभौम अधिकार या कायद्याने मान्य केला आहे. जैववैविध्य संसाधानातील जाती-उपजाती, जनुके घटक यांचे सव्‍‌र्हेक्षण करणे, संग्रहण करणे, त्यातील गुणधर्म निश्चित करणे हे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. याकरिता ग्राम पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्व समावेशक अशा समित्या गठन करण्याचे प्राविधान आहे. आता कुठे या अधिनियमांचे आकलन सामान्य जनतेस होऊ लागले आहे. पुढील वाटचालीत याचा नक्की उपयोग केला जाईल अशी आशा करूया.

हे जैव वैविध्य निव्वळ वनांपुरते संबंधित नसून कृषी, मत्स्य यांसारख्या दैनंदिन उपजीविकेच्या साधनांशीही तितकीच निगडित आहे. तथापि इथेही ही वनविभागाची जबाबदारी आहे असे सोयीस्कररीत्या समजून झटकण्याची वृत्ती दिसते आहे. गाव पातळीवरील जैविक संपत्तीचे दोहन केल्यावर मिळणाऱ्या लाभातला वाटा जैववैविध्याच्या संवर्धनासाठी गावाकडे वळवण्याचे प्रावधान या कायद्यात आहे. गावास असा प्रत्यक्ष फायदा झाल्यास साहजिकच जैववैविध्य टिकवण्यामध्ये ग्रामस्थांना रस राहील. त्यामुळे जैव संसाधनांचा लाभ घेणाऱ्या कंपन्या व ग्रामस्थांचे या दिशेने उद्बोधन होणे गरजेचे आहे.
(लेखक राज्याचे सेवा निवृत्त मुख्य वन्य जीव रक्षक आहेत)
छायाचित्र : केदार भट, विलास बर्डेकर
माधव गोगटे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:03 am

Web Title: beyond tiger and lion
Next Stories
1 जमिनीवरचे मैत्र
2 भूमिका : नीरव मोदी, नेहरूनिंदा आणि आपण!
3 सनद हक्कांची : समान अधिकार हेच उत्तर
Just Now!
X