बऱ्याच वर्षांनी भरत जाधव यांनी टीव्ही या माध्यमात पुन:पदार्पण केलं. काही वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा ते पुन्हा सिनेमांमधून झळकायला सज्ज झाले आहेत. सिनेमांचा अनुभव, नाटकांशी असलेलं नातं, टीव्ही माध्यमातलं पुन:पदार्पण, पुरस्कारांची वाढती संख्या, सिनेसृष्टीतील कंपूशाही अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांच्याशी बातचीत.
– भरत जाधव
बऱ्याच वर्षांनी तुम्ही पुन्हा टीव्हीवर येता आहात. त्यासाठी ‘आली लहर केला कहर’ या शोचीच निवड का केलीत?
– ‘आली लहर..’ हा कार्यक्रम स्वीकारण्यामागे तीन कारणं आहेत. कार्यक्रमाची संकल्पना, कलर्स मराठी वाहिनी आणि कार्यक्रमाची संपूर्ण टीम! सभोवतालच्या घडामोडींवर नर्मविनोदाने भाष्य करणारा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल असं मला वाटलं. सामान्य माणसांचे प्रश्न अभ्यासपूर्वक कार्यक्रमात मांडण्याचं मला समाधान मिळेल, याची खात्री वाटली म्हणूनच या कार्यक्रमासाठी मी होकार दिला. अशा धाटणीचा कार्यक्रम आताच्या ट्रेंडमध्ये वाहिनीवर आणणं हे आव्हान होतं. कलर्स मराठीने ते स्वीकारलं आणि पेललंही. विविध प्रयोग करण्याऱ्या या वाहिनीवर काम करायला मिळतंय म्हणून या कार्यक्रमात सहभागी झालो. आणि तिसरं म्हणजे कार्यक्रमाची संपूर्ण टीम. या टीममधल्या काहींसोबत पूर्वीही काम केलंय. काहींसोबत पहिल्यांदाच करतोय. पण तरी सगळ्यांसोबत चांगलं टय़ुनिंग जमलंय. सगळेच कलाकार उत्तम अभिनय करतात. सगळ्यांना रंगभूमीची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सगळ्यांसोबत काम करताना नाटक करण्याचा फील येतो. या सगळ्या गोष्टींसाठी मी हा कार्यक्रम स्वीकारला. कोणत्याही प्रकारची स्पर्धा, सेलिब्रेटींची उपस्थिती, नाच-गाणी असं काहीही नसतानाही या कार्यक्रमाला प्रेक्षक पसंती देत आहेत.
बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत टीव्हीवर कार्यक्रम करता आहात..
– केदारसोबत अनेक र्वष काम केलंय. त्यामुळे त्याच्यासोबत काम करायचा अनुभव नेहमीप्रमाणे चांगलाच आहे. त्याचं व्हिजन खूप चांगलं आहे. तसंच विशिष्ट गोष्टीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. विविध प्रयोग करण्यासाठी तो नेहमी तयार असतो. त्याच्या क्लृप्त्या फार छान असतात. जी कलाकृती करू त्याबाबत आम्ही नेहमी चर्चा करतो. या चर्चेचा आम्हाला आजही तितकाच फायदा होतो. बऱ्याच वर्षांनी टीव्हीवर त्याच्यासोबत काम करत असलो तरी अनुभव पहिल्यासारखाच आहे. समाधान देणारा!
टीव्ही माध्यमातील काम करण्याच्या पद्धतीबद्दल तुमची नाराजी आहे.
– हो, पण, ही नाराजी मालिका करण्याच्या पद्धतीबद्दल आहे. ती पद्धत मला फारशी पटत नाही. मालिकांमधले कलाकार वीस-चोवीस तास काम करतात. हे मला खटकतं. अशा प्रकारे काम करायला मला कधीच आवडणार नाही. ‘आली लहर केला कहर’ या कार्यक्रमाचं शूटिंग फक्त एक दिवस सकाळी सात ते रात्री दहा असं असतं. पण, ते एकच दिवस असल्यामुळे आणि वेळेत नियमितता असल्यामुळे त्याचा त्रास होत नाही.
कार्यक्रमात काय हवं, काय नको याबद्दल चॅनलचा हस्तक्षेप असतो. तुम्हाला याचा काही अनुभव?
– चॅनलच्या हस्तक्षेपाबद्दल मी माझ्या काही कलाकार मित्रांकडून ऐकलंय. ‘या मालिकेत असंच करा’ किंवा ‘अमुक एका कलाकाराचा रोल कमी करा’ असं काहीबाही सांगत असतात, असं त्यांच्याकडून ऐकलंय. पण, सुदैवाने आमच्या कार्यक्रमात असं काही होत नाही. कोणत्या एपिसोडमध्ये कोणता विषय हाताळणार आहोत याचीच फक्त माहिती चॅनलला दिली जाते. त्या विषयासाठी होकारही लगेच मिळतो. पण, तो मांडायचा कसा, त्यात काय करा-करू नका, चार वाक्यं वाढवा-कमी करा अशा चॅनलच्या सूचना अजिबात नसतात. विषयानुसार व्यक्तिरेखांना आणि ती साकारणाऱ्या कलाकारांना महत्त्व दिलं जातं.
विनोदनिर्मितीसाठी कार्यक्रमांमध्ये पुरुष कलाकार स्त्री व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. ‘आली लहर..’मध्येही अशी एक व्यक्तिरेखा आहे.
– पुरुष कलाकार स्त्री व्यक्तिरेखा साकारणं यात मला काही गैर वाटत नाही. विनोदनिर्मितीसाठी आणि विषयाची गरज असेल तर करायला काहीच हरकत नाही. पण, ती भूमिका साकारताना काही गोष्टींचं भान असणं गरजेचं आहे. ते बीभत्स होता कामा नये. भान ठेवून भूमिका साकारली पाहिजे. संवादांमध्ये कमरेखालचे विनोद नकोत. कारण संपूर्ण कुटुंब एकत्र बसून तो कार्यक्रम बघत असतं. प्रेक्षकांना मनोरंजन वाटेल तिथवर हा प्रकार ठीक वाटतो. पण, त्याचा अतिरेक झाला की प्रेक्षक कंटाळतो, टीका करू लागतो. त्यामुळे मर्यादा या सांभाळल्या गेल्याच पाहिजेत. आमच्या कार्यक्रमातही संतोष पवार स्त्री व्यक्तिरेखा साकारतो. पण, ती व्यक्तिरेखा सरसकट सगळ्याच भागांमध्ये असतेच असं नाही.
‘महाराष्ट्राची लोकधारा’सारखे कार्यक्रम आता वाहिन्यांवर लोकप्रिय होऊ शकतात का की मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमुळे ते झाकले जातील?
– का नाही होऊ शकतं? मध्यंतरी झी मराठीने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. लोककलेवर आधारित कार्यक्रम येणं गरजेचं आहे; कारण आपली लोककला येणाऱ्या पिढीला कळायला हवी. नाही तर आजच्या इंटरनेटच्या युगात आपली संस्कृती, संस्कार बाजूला राहतील. शाहीर साबळेंनी आमच्यापर्यंत लोककला पोहोचवली; आता आमचं काम आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं. त्यामुळे असे कार्यक्रम अधिकाधिक व्हायला हवेत आणि ते प्रेक्षकांपर्यंत- विशेषत: तरुणांपर्यंत नक्की पोहोचवायला हवेत.

हिंदीत जाऊन नोकरांच्या भूमिका करण्यात मला अजिबात रस नव्हता. हिंदीतले लोक बोलवणार आणि ते सांगतील ते काम आपण करायचं, हे पटत नाही.

मधल्या काही वर्षांत तुम्ही सिनेमांमध्ये दिसला नाहीत. याचं काही खास कारण?
– हो, मी दोन-अडीच र्वष सिनेमे केले नाहीत. कारण, त्याआधी मी भरपूर काम केलं होतं. सतत काम केल्यामुळे तोचतोचपणा आला होता. त्यामुळे ब्रेक घेण्याची गरज वाटू लागली. घर, गाडी, बंगला, लोन वगैरे अशा प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. मी ज्या क्षेत्रात आहे त्याच क्षेत्रात काम करून मला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणून मी त्या दरम्यान चार पैसे जास्त मिळतील या उद्देशाने सतत काम करत राहिलो. नाटकांचे प्रयोग करायचो. कलेवरील श्रद्धा म्हणून मी या क्षेत्रात असलो तरी व्यावहारिकदृष्टय़ाही विचार करायलाच हवा. चरितार्थ चालवण्यासाठी पैसा हा लागतोच. याचा विचार करणं गैर नक्कीच नाही. तोच मीही केला. काही काळाने स्थिरावल्याची शाश्वती मिळाल्यानंतर ‘आता थांबू या’ असं वाटू लागलं. ब्रेक घेतलेल्या काळात मी स्वत:ची नाटक कंपनी सुरु केली. त्याच वर्षांत नाटकांसाठी पुरस्कारही मिळाले. कंपनीला अधिक चांगलं प्रस्थापित करण्यासाठी काम करत राहिलो. नाटकांचे प्रयोग सुरूच होते. आता एकेक सिनेमांच्या कथा आवडू लागल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा सिनेमांकडे वळतोय. लवकरच गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘शासन’ हा माझा सिनेमा येतोय. त्यात मी खलनायकाची भूमिका साकारतोय.
काही सिनेमे तुम्ही करायला नको होते, असं वाटतं का?
– मी हे अगदीच मान्य करतो. पण त्याला कारणंही आहेत. तद्दन सिनेमे करण्यामागे पैसा मिळतोय हे एकमेव कारण नाही. कारण एका सिनेमातून नाही तर दुसऱ्या सिनेमातून पैसे मिळतातच. त्यामुळे पैसा हे एकमेव कारण नाही. मधल्या काळात माझे काही सिनेमे चालले नाहीत. त्याचं कारण असं की, दिग्दर्शकाने सांगितलेली कथा मला आवडायची, मी होकार द्यायचो. पण, शूटिंग सुरू झाल्यानंतर सेटवर गेल्यावर मला कळायचं की या सिनेमाचं काही खरं नाही. असे अनेक सिनेमे आहेत. त्यातले काही जुन्या निर्माते-दिग्दर्शकांना, मित्रांना मदत म्हणून केले. अशा सिनेमांमध्ये भरपूर पैसे मिळायचे असंही नाही. पण त्यातही मी माझं काम चोख करायचो. आता मात्र मी स्थिरावलो आहे. त्यामुळे कोणतीही कथा माझ्याकडे आली की मी काम कसं होणार आहे, असं थेट विचारतो. आता विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. किंबहुना तितका वेळ मी आता घेतो.
पण, या सगळ्यात कलाकार म्हणून नुकसान होत नाही का?
– यात कलाकाराचं अजिबात नुकसान होत नाही. कारण कलाकार त्याचं काम चोख आणि चांगलंच करत असतो. त्याचे दोन सिनेमे यशस्वी झाले नाहीत; पण तिसरा सुपरहिट झाला, तर आधीचे दोन विसरलेही जातात. कलाकाराने प्रत्येक प्रकारचा, धाटणीचा सिनेमा करायलाच हवा. त्याशिवाय त्याला अनुभव कसा येणार? कधी कधी दिग्दर्शकाला हवा तसा अभिनय करणारा अभिनेता असतो तर कधी दिग्दर्शक चांगला नसून उत्तम अभिनय करण्याची जबाबदारी अभिनेत्याचीच असते. अशा अनेक गोष्टी मी या प्रक्रियेतून शिकलो. कलाकाराची नेहमी शिकाऊ वृत्ती हवी. चुकीचे सिनेमे केले तरी त्यातून काय शिकलो हे महत्त्वाचं असतं. असा विचार केला तर कलाकारांचं अजिबात नुकसान होत नाही.
याच काळात तुम्हाला हिंदीकडे वळावसं नाही वाटलं?
– खरंच वाटलं नाही. तसं चांगलं काम आलंच नाही. हिंदीत जाऊन नोकरांच्या भूमिका करण्यात मला अजिबात रस नव्हता. हिंदीतले लोक बोलवणार आणि ते सांगतील ते काम आपण करायचं, हे पटत नाही. एकवेळ असं करायलाही हरकत नाही पण ते काम चांगलं असायला हवं. त्यांनी विचारलेलं काम पटलं नसेल तर ‘पटलं नाही’ असं सांगण्याची तुमची ताकद हवी. मी सतत नाही म्हणत आलोय. हिंदीत काम मिळवायचं म्हणून वाट्टेल ते काम करेन, याला माझा विरोध आहे. मधल्या काळात कुंदन शहा यांचा ‘पी से पीएम तक’ हा हिंदी सिनेमा केला. यातली ७२ वर्षांच्या वृद्धाची माझी व्यक्तिरेखा चांगली होती. हा सिनेमा का चालला नाही, हे माहीत नाही.
आताच्या मराठी सिनेमांमध्ये वैविध्य आहे. व्यावसायिकदृष्टय़ाही मराठी सिनेमा प्रगती करतोय. या संपूर्ण चित्राबद्दल काय सांगाल?
– वैविध्यपूर्ण विषयांचे दर्जेदार सिनेमे येताहेत. अर्थातच ही सकारात्मक बाब आहे. मराठी सिनेमांमधले विषय इतर कुठेही दिसत नाहीत. पण, काही वेळा असं होतं की, लहान मुलांचा सिनेमा आला की, साधारण त्याच पठडीतले सिनेमे येऊ लागतात. प्रेमकथांचा ट्रेंड येतो. ही लाट ठरावीक काळानंतर अडवली पाहिजे. आपल्याकडचे कलाकारही उत्तम आहेत. बालकलाकार तर अप्रतिम अभिनय करताहेत. आपण फक्त बजेटच्या मुद्दय़ावर अडतो. ते वाढायलाच हवं. आपली स्पर्धा थेट बॉलीवूडशी लावली जाते. मराठी आणि हिंदी सिनेमांची प्रदर्शनाची तारीख एकच आली की आपल्याकडच्यांना भीती वाटायची. पण, आता हिंदी सिनेसृष्टीलाही आपली भीती वाटू लागली आहे. या बदलाचं श्रेय जातं मराठी सिनेमांच्या विषयांनाच!
हिंदीप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतही विशिष्ट कंपू आहेत. हे चांगलं आहे की वाईट?
– कंपूपेक्षा आपण त्याला ‘गट’ म्हणू या. असे गट असावेत. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांचंच सगळ्यांशी पटतं असं नसतं. काहींची काम करण्याची पद्धत सारखी असते. त्यामुळे सारखी पद्धत असणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्या तर ते काम उत्तम दर्जाचं होतं. त्यामध्ये त्यांचं एकमेकांशी चांगलं टय़ुनिंग जमलेलं असतं. टय़ुनिंग चांगलं जमल्यामुळे कामाला जलद गती मिळते. केदार आणि मी असे अनेक सिनेमे केले आहेत. पण, अट्टहास म्हणून मी त्याच्या सगळ्याच सिनेमांमध्ये काम करतो असंही नाही. केदारचंही असं अजिबात म्हणणं नसतं. ‘अगं बाई अरेच्चा’ या सिनेमाच्या कथेची चर्चा आम्हा दोघांमध्ये झाली होती. पण, त्या सिनेमात मी नव्हतोच. त्या सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी केदारला संजय नार्वेकरच योग्य वाटला. पण, त्यात मी हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे असे गट असावेत. त्यामुळे दर्जेदार कलाकृती निर्माण होतात.
अलीकडे पुरस्कारांची संख्या वाढली आहे. सिनेसृष्टीत काम करणारे त्याकडे प्रोत्साहन म्हणून बघत असले तरी वाढलेल्या संख्येमुळे पुरस्कारांचं महत्त्व कमी होतंय असं वाटतं का?
– पुरस्कार जेव्हा मोजके असतात तेव्हा ते दीर्घकाळ लक्षात राहतात. पण, पुरस्कारांचा इव्हेंट होतो तेव्हा ज्या नावाचा पुरस्कार आहे त्याचं महत्त्व कमी होत जातं. तिथून इव्हेंटला महत्त्व द्यायला सुरुवात होतं. त्यामुळे पुरस्कारांची संख्या फार असू नये. कलाकारांना ते कोणत्या पुरस्कारांना गेले होते हे आठवणार नाही, इथवर तर अजिबातच वेळ येऊ नये. सगळ्याच पुरस्कारांना नकळतपणे इव्हेंटंचं स्वरूप येतंय.
टीव्ही, सिनेमा, नाटक या सगळ्याच माध्यमांमध्ये सतत नवे चेहरे येताहेत. यामुळे कलाकारांची पिढी कमी कालावधीत बदलतेय असं वाटतंय का?
– कलाकारांची पिढी बदललीच पाहिजे. नवे चेहरेही यायला हवेत. प्रेक्षकही कलाकारांच्या एकाच फळीला किती दिवस बघणार ना. बरीच र्वष ठरावीक चेहरे बघून प्रेक्षकही कंटाळू शकतात. त्यामुळे उत्तम अभिनय करणाऱ्या नव्या चेहऱ्यांचं इथे स्वागतच आहे. मी याकडे सकारात्मक दृष्टीनेच बघतोय.
‘मराठी नाटकं चालतील का’ याबद्दल पूर्वी बोललं जायचं. पण, आज परिस्थिती बदलतेय.
– ‘नाटकांना वाईट दिवस आहेत’, असं मी कधीच मानलं नाही आणि मानणारही नाही. कारण गेली १४ र्वष मी ‘सही रे सही’ करतोय. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे नाटय़क्षेत्रातही चढउतार होतेच. भारतातील अनेक राज्यांमध्ये नाटकं सुरू आहेत. पण, मराठी नाटकांचा प्रेक्षक अजूनही आवडीने नाटकं बघतो. आपल्याकडचे प्रेक्षक नाटक बघण्यासाठी खास वेळ काढतात. त्यामुळे नाटय़क्षेत्राचं चांगलं चाललंय आणि असंच सुरू राहणार.

कलाकारांना ते कोणत्या पुरस्कारांना गेले होते हे आठवणार नाही, इथवर तर अजिबातच वेळ येऊ नये. सगळ्याच पुरस्कारांना नकळतपणे इव्हेंटंचं स्वरूप येतंय.

नाटय़गृहांच्या अवस्थेबद्दल कलाकार नाराजी व्यक्त करतात. या अवस्थेबद्दल तुम्हीही नाराज आहात का?

– महाराष्ट्रातल्या नाटय़गृहांची अवस्था अतिशय वाईट आहे हे खरंय. पण त्यामुळे कलाकाराने तिथल्या प्रेक्षकांना तोडायचं का?, याचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्रात माझ्या नाटकांचे प्रयोग होणाऱ्या नाटय़गृहांच्या आयुक्तांना नाटय़गृहाच्या अवस्थेबद्दल सांगतो. नाटय़गृह सुधारण्याच्या आवश्यकेतबद्दल पटवून देतो. या परिस्थितीबद्दलची माहिती स्थानिक, नेतेमंडळी, सरकार यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. यासाठी तिथल्या मीडियाची मदत होते. कारण केवळ चर्चा करून प्रश्न सुटत नाही. येत असलेल्या अडचणी संबंधितांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं असतं. पण यावर नाटकाचे प्रयोग थांबवणं हा पर्याय होऊ शकत नाही. ठरावीक ठिकाणापर्यंतच प्रयोग करणार असं काही कलाकार ठरवतात. पण, मला हे चुकीचं वाटतं. असं केलं तर गावागावातल्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचणार कसे? टीव्ही या माध्यमाचा त्यासाठी वापर करता येईल असं असलं तरी कलाकारांना प्रत्यक्ष बघण्यात प्रेक्षकांना अधिक रस असतो.
निर्माता आणि कलाकार म्हणून पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत?
– नाटय़संपदा या संस्थेद्वारे एप्रिलमध्ये एक नाटक रंगभूमीवर येणार आहे. त्याबाबत अधिक माहिती लवकरच सांगण्यात येईल. सध्या तरी कलाकार म्हणून ‘ढॅण्टढॅण’ आणि ‘पुन्हा सही रे सही’ या दोनच नाटकांमध्ये काम करणार आहे. नवीन नाटकांमध्ये मी स्वत: काम करणार नाही. भरत जाधव एंटरटेन्मेंटमधून एका नाटकाची निर्मिती करतोय. ‘कल्ला’, ‘शासन’, ‘चिरंजीव’, ‘एक फुल चार मिनार’, ‘आता माझी हटली’ असे काही सिनेमे येताहेत. ‘कल्ला’मध्ये मी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव असे तिघे आहोत.