05 August 2020

News Flash

मृत्युतांडवाच्या स्मृती जागवताना…

भोपाळमधील विषारी वायू दुर्घटनेतील मृत्युतांडवाचा मागोवा.

संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (आयएलओ) या संघटनेने नुकताच प्रकाशित केलेल्या अहवालात भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीची दुर्घटना ही विसाव्या शतकातील संपूर्ण जगातील एक सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना असल्याचे म्हटले आहे.

सहवेदना
पराग पोतदार – response.lokprabha@expressindia.com

संयुक्त राष्ट्रांच्या ‘आंतरराष्ट्रीय श्रम संघटन’ने (आयएलओ) नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे.  त्यामध्ये भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीची दुर्घटना ही विसाव्या शतकातील संपूर्ण जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना असल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेला त्या मृत्युतांडवाचा मागोवा.

काही घटना इतक्या महाभयंकर असतात की अनेक वर्षांनंतर त्यांच्या स्मृती जागवतानासुद्धा अंगावर काटा येतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केला आणि हिरोशिमा-नागासाकी ही शहरे बेचिराख केली. तेव्हा जो हाहाकार उडाला आणि त्याचे जे परिणाम भोगावे लागले ते आजतागायत विसरता आलेले नाहीत. अणुयुद्धाचा धोका किती मोठा असू शकतो याची तीव्र जाणीव त्या अणुहल्ल्यानंतर जगभरात निर्माण झाली. एखादी दुर्घटना घडते तेव्हा तिचे तात्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम खूप गंभीर असतात. अशा घटना काळाच्या पटलावर कायमची निशाणी मागे ठेवून जातात. भारतात ३४ वर्षांपूर्वी घडलेली अशीच एक भयावह आणि कटू घटना म्हणजे, भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीची दुर्घटना.

संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (आयएलओ) या संघटनेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. ‘द सेफ्टी अ‍ॅण्ड हेल्थ अ‍ॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क – बििल्डग ऑन हंड्रेड इयर्स ऑफ एक्स्पिरियन्स’ असे या अहवालाचे नाव आहे. त्यामध्ये भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीची दुर्घटना ही विसाव्या शतकातील संपूर्ण जगातील एक सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना असल्याचे म्हटले आहे. या दुर्घटनेत एकूण १५ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेच्या स्मृती आज केवळ आठवल्या तरीही भीती दाटून येते. या घटनेची भीषणता स्पष्ट करणारी असंख्य छायाचित्रे उपलब्ध आहेत. परंतु त्यापकी जमिनीत अर्धवट गाडल्या गेलेल्या लहान बालकाचे डोके आणि डोळ्यांच्या जागी दिसणाऱ्या दोन खाचा या छायाचित्रातून दुर्घटनेची विदारकता प्रकट झाली. असंख्यांच्या स्मृतीत कायमचे जाऊन बसले.

भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या तीन हजार ७८७ असल्याची अधिकृत नोंद शासनदरबारी आहे. परंतु प्रत्यक्षात कितीतरी पट अधिक निरपराध लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज वर्तवला जातो. ही संख्या १५ हजारांपेक्षा जास्त असावी असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेल्या अहवालातही नोंदवण्यात आला आहे. कारण भोपाळ वायुगळतीची घटना घडली तेव्हा जागीच मृत्युमुखी पडलेले तीन हजारांहून अधिक लोक होते, त्यानंतर उपचारादरम्यान तसेच त्यानंतरच्या काही दिवसांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे १६ हजारांच्या वर असावी असा अंदाज आहे. या दुर्घटनेचे दीर्घकालीन परिणाम तर आणखी भयावह स्वरूपाचे होते. या वायुगळतीने सुमारे साडेपाच लाख लोक बाधित झालेले होते. वायुगळतीचा दुष्परिणाम म्हणून सुमारे चार हजार लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. तर ३८ हजारांहून अधिक लोकांना काही ना काही स्वरूपाचे गंभीर व्यंग निर्माण झाले. यावरुन या एका दुर्घटनेची व्यापकता किती मोठी होती हे लक्षात येऊ शकेल. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही त्या घटनेचे स्मरण झाले तरी अस्वस्थता दाटून येते.

‘युनियन कार्बाइड इंडिया लि.’ ही कीटकनाशके बनवणारी एक अमेरिकी कंपनी भोपाळमध्ये १९६९ पासून कार्यरत होती. भारतासारख्या विकसनशील देशात या कंपनीने जाणीवपूर्वक प्रकल्प सुरू केला होता. या कंपनीमध्ये मिथाइल आयसोसायनेट आणि इतर काही द्रव्यांपासून ‘सेविन’ नावाचे एक कीटकनाशक तयार केले जायचे. मिथाइल आयसोसायनेट वायुरूपात आले तर किती घातक ठरू शकते याची या प्रकल्पात सहभागी सर्वानाच पुरेशी कल्पना होती. त्यामुळे जमिनीखालच्या थंड टाक्यांमध्ये हा विषारी वायू साठवला जात असे. सर्वतोपरी आवश्यक खबरदारी आपण घेतली आहे अशी कंपनीच्या लोकांची धारणा होती. मात्र, अनावश्यक बेफिकिरी आणि निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो हे त्यांच्या नंतर ध्यानात आले. दुर्घटना घडण्याच्या आदल्या रात्री पाण्याच्या टाक्यांच्या सफाईच्या वेळचा निष्काळजीपणा भोवला आणि द्रवरूपात वायू साठवला जात होता त्या ठिकाणी पाणी शिरले. त्यातून विषारी वायू तयार होऊन अत्यंत धोकादायक आणि जीवघेण्या अशा वायुगळतीला सुरुवात झाली. ३ डिसेंबर १९८४ ची ती मध्यरात्र सगळे शहर गाढ झोपेत असताना त्यांच्यासाठी काळरात्र बनली. कंपनीतील वायू भरलेल्या ‘ई-६१०’ क्रमांकाच्या टाकीतून गळती सुरू झाली. ‘मिथाइल आयसोसायनेट’ हा अत्यंत प्राणघातक असा विषारी वायू या टाकीतून बाहेर पडू लागला. या टाकीमध्ये ४२ टन इतका वायू द्रवरूपात साठवलेला होता. पकी ३० टन विषारी वायू हवेत मिसळला. प्राणघातक असा मिथाइल आयसोसायनेट आणि तयार झालेले इतर वायू यांचा हवेत एक ढगच तयार झाला. हा वायू जड असल्याने तो जमिनीच्या खालच्या पातळीवरून वाहू लागला. या विषारी वायूच्या ढगामध्ये फॉस्जेन, हायड्रोजन सायनाइड, कार्बन मोनोक्साइड, हायड्रोजन क्लोराइड, नायट्रोजन ऑक्साइड, मोनोमेथील अमीन, कार्बनडाय ऑक्साइड असे विषारी व घातक वायू मिसळलेले होते. दुर्दैव असे की या विषारी वायूंनी भरलेला ढग भोपाळच्या दिशेने निघाला.

कसला तरी वायू हवेत पसरल्याची बातमी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भोपाळमध्ये पसरली आणि लोक भीतीने सरावैरा पळू लागले. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी ही माहिती तत्परतेने वरिष्ठांना कळवली. कार्बाइड कंपनीतून वायुगळती होत असल्याची बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली. पोलिसांनी तातडीने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. सावधगिरीचा उपाय म्हणून ‘जास्तीतजास्त पाणी प्या म्हणजे वायूचा काही त्रास होणार नाही’ असे संदेश पोलिसांनी लोकांपर्यंत पोहोचवले.  परंतु, वायुगळतीच्या भीषण परिणामांची कल्पना त्यांनाही नसावी. उजाडल्यानंतर वास्तव समोर आले. कारण सगळीकडे या विषारी वायूने अक्षरश: हाहाकार माजवला होता. ती रात्र काळाचा घाला घालणारी ठरेल असे तेव्हा कुणाच्या स्वप्नांतही आले नसेल. विषारी वायूच्या तांडवाच्या भीषण परिणामांची कुणालाही कल्पना नव्हती.

सकाळ झाली तसतसे मृत्यूचे तांडव लक्षात येत गेले. हा विषारी प्राणघातक वायू जड असल्याने तो हवेमध्ये काहीसा खालच्या पातळीवर स्थिरावत होता. त्यामुळे लहान मुले, स्त्रिया आणि कमी उंचीचे लोक या वायूचे पहिले भक्ष्य ठरले. जो श्वास घेऊन माणूस जिवंत राहतो तो श्वासच मृत्यूचे कारण बनू लागला. विषारी वायू फुप्फुसामध्ये गेला की अल्पावधीत लोकांच्या जिवावर बेतायचे. अक्षरश: डोळ्यांदेखत माणसे तडफडून मरताना दिसत होती. वैद्यकीय यंत्रणा हतबल झाल्या होत्या. सकाळी रुग्णालयांसमोर मृतदेहांचा खच पडला होता.  आदल्या रात्री मृत्यूचे कसे थमान होते हे तेव्हा लक्षात येऊ  लागले. रुग्ण ठेवायलादेखील रुग्णालयांत जागा उरलेली नव्हती. उपचारांना प्रतिसाद देण्यापूर्वीच माणसे तडफडून जीव सोडत होती. पुढील काही दिवस भोपाळमध्ये केवळ मृत्यूचे साम्राज्य होते. कितीतरी दिवस मृत्यूचा हा खेळ सुरू होता.

या दुर्घटनेनंतर केंद्र शासनाने हा औद्योगिक प्रकल्प तातडीने बंद केला आणि तिच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु फारसे काही हाती लागले नाही. विषारी वायुगळतीचा सामना करू शकेल अशी सुसज्ज यंत्रणा आपल्याकडे नव्हती ही वस्तुस्थिती मात्र या घटनेनंतर अधोरेखित झाली. लोकांच्या मनात मात्र भीती भरून राहिली होती. हवा, पाणी, अन्न या तिन्हीतून विषबाधा तर होणार नाही ना, याची धास्ती लोकांच्या मनात होती. या काळात तब्बल ७० हजारांहून अधिक लोकांवर उपचार करण्यात आले, तर दोन हजारहून अधिक मृतदेह पुरावे लागले. या विषारी वायूने किती झाडे मृत पावली याची तर गणतीच नाही. पाणी हाच एक प्रभावी उपाय असल्याने हेलिकॉप्टरमधूनही भोपाळवर सातत्याने पाण्याचा शिडकावा करण्यात येत होता. लोकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ‘ऑपरेशन फेथ’ या नावाने एक मोहीम हाती घेण्यात आली. ‘युनियन कार्बाइड’ या अमेरिकी कंपनीचा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरन अ‍ॅण्डरसन याच्यावर या दुर्घटनेचा ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो पुढे भारत सोडून पळून गेला. त्याचे पुढे काही झाले नाही आणि लोकांच्या मनात राग कायम राहिला.

भोपाळवासीयांचा संघर्ष मात्र अद्याप संपलेला नाही. पीडितांच्या वतीने भारत सरकारने अमेरिकेच्या कोर्टात आव्हान दिले आणि ३.३ अब्ज डॉलर्स इतक्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात यातील निम्मेही मिळाले नाहीत. आज ३० वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही हा संघर्ष सुरू आहे. यातली धोकादायक बाब अशी आहे की पुन्हा दुसरे भोपाळ घडणारच नाही याची अजूनही शाश्वती देता येत नाही. भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीची दुर्घटना घडली तसे प्रकार अन्यत्र कुठेही घडू शकण्याची टांगती तलवार कायमच आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या विकसनशील देशांचा कसा सोयीस्कर वापर करतात आणि त्यानंतर हात कसे वर करतात याचे बोलके उदाहरण म्हणजे भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीची दुर्घटना असल्याची टीका या विषयाचे अभ्यासक आजही करतात. त्यामुळे, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ज्या पद्धतीने हा एकूण विषय हाताळला तो पाहता त्यांची असंवेदनशीलता आणि त्याच वेळी जबाबदारी ढकलून हात वर करण्याची बेदरकार प्रवृत्तीही भोपाळमधील विषारी वायुगळती दुर्घटनेच्या निमित्ताने उघड झाली.

भोपाळमधील विषारी वायुगळतीच्या दुर्घटनेकडे केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्ष करणे खचितच योग्य नाही. कारण त्यानंतर ३० वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही लोकांच्या मनातील अस्वस्थता आणि भय अजूनही कायम आहे. देशात कुठेही कधीही अशी घटना घडू शकते ही धास्ती या इतक्या गंभीर घटनेनंतरही संपलेली नाही. त्यातून शिकण्यासारखे आणि सुधारण्यासारखे खूप काही आहे. भोपाळमधील विषारी वायुगळतीच्या दुर्घटनेनंतर तातडीने समिती स्थापन करून त्या वेळी आढावा घेण्यात आला होता. परंतु, तो तेवढय़ापुरताच! आताही देशभरात अनेक अशा छोटय़ा-मोठय़ा घटना घडतात तेव्हा आपल्याकडील आपत्कालीन यंत्रणा किती सक्षम असणे गरजेचे आहे याचा प्रत्यय येत असतो. भोपाळमधील विषारी वायुगळतीच्या दुर्घटनेच्या भयावह अशा परिणामांनंतर जगभरातील कारखान्यांनी त्याचा धडा घेतला आणि आपल्या सुरक्षाविषयक नियम व यंत्रणा राबवण्याच्या पद्धतीत अधिकाधिक काटेकोरपणा आणण्याचा प्रयत्न केला. सतर्कता अधिक वाढली. परंतु हे सारे एका मर्यादेपर्यंतच होत राहिले.

उत्तर प्रदेशात केवळ वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येक लहान बाळांना जीव गमवावा लागला होता. त्या वेळीसुद्धा अशा ऐनवेळच्या परिस्थितीत काय करायचे याचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांचे डोळ्यांदेखत मृत्यू झाले. विषारी वायूंची विल्हेवाट, विषारी कचऱ्याचे विघटन यासारखे गंभीर विषयदेखील आपल्या व्यवस्थेत सर्रास दुर्लक्षिले जातात. ही मानसिकता बदलणे हे नितांत गरजेचे आहे. देशभरात जितके विविध प्रकारचे कारखाने, उद्योग कार्यरत आहेत त्यांची सुरक्षितता किती आणि कशा पद्धतीची आहे हे तपासून पाहण्याची यंत्रणा विकसित व्हायला हवी. तीन दशकांपूर्वी घडून गेलेल्या भोपाळमधील विषारी वायुगळतीच्या त्या स्मृती जागवताना बोध घ्यायचा तो हाच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 1:03 am

Web Title: bhopal gas leakage tragedy union carbide dow chemical
Next Stories
1 प्रसारण मुत्सद्देगिरी
2 हायटेक बळीराजा
3 आईची स्थित्यंतर
Just Now!
X