News Flash

कथा : सायकल

काहीही करून त्याला गुड्डी झोपायच्या आत घरी पोहोचायचं होतं.

संध्याकाळची वेळ होती. अंधार पडत चालला होता. दिवसभराचं काम संपवून नामदेव तालुक्याच्या गावाहून आपल्या गावाकडे निघाला होता. त्याच्या खांद्यावर एक नवी कोरी लहान मुलांची सायकल होती. ती त्याने चौकातल्या दुकानातून विकत घेतली होती. त्याच्या पायाला जणू पंख फुटले होते. काहीही करून त्याला गुड्डी झोपायच्या आत घरी पोहोचायचं होतं.

नामदेव राहात होता ते गाव तालुक्याच्या ठिकाणाहून दोन कोसांवर होते. गावात त्याचं लहानसं घर होतं. त्यात तो, त्याची बायको नि त्यांची पाच वर्षांची मुलगी गुड्डी राहायचे. नामदेवाचा गुड्डीवर फार जीव होता. गुड्डीलाही बाप म्हणजे सर्वस्व होतं. रात्री तो घरी आल्याशिवाय ती जेवत नसे. त्यामुळे कधी कधी ती रात्री न जेवताच झोपी जायची. नामदेव तालुक्याच्या गावी मोलमजुरी करायला जायचा. मिळेल ते काम करून चार पैसे मिळवायचा नि त्यावर आपलं घर चालवायचा. एकदा जत्रेच्या दिवसांत तो गुड्डीला नि तिच्या आईला तालुक्याला घेऊन गेला. बाजारात फिरता फिरता गुड्डीचं लक्ष एका दुकानातल्या नव्या कोऱ्या लहान मुलांच्या सायकलीकडे गेलं. तिने नामदेवला ती सायकल दाखवली आणि आपल्याला ती हवी म्हणून हट्ट धरून बसली. नामदेवनी किंमत पाहिली. चारशे रुपये! त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. त्याने तिला समजून सांगितलं. ती गप्प बसली नि आईबाबांबरोबर पुढे जाऊ  लागली, पण पुन्हा पुन्हा मागे वळून सायकलीकडे पाहात होती. नामदेवला तिच्या मनातलं कळत होतं. त्याने विचार केला, दोन महिन्यांनी हिचा वाढदिवस आहे, तोपर्यंत ४०० रुपये सहज जमतील. आणि समजावणीच्या स्वरात त्याने तिला तसं सांगितलं. तिचं समाधान झालं. त्यानंतर काही दिवस ती रोज आपल्या बाबाला माझा वाढदिवस केव्हा आहे म्हणून विचारायची. नामदेव तिला अजून वेळ आहे म्हणून सांगायचा. पण त्यालाही केव्हा एकदा आपल्या लाडक्या लेकीला ती सायकल घेऊन देतो नि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतो असं झालं होतं. त्याला एकच काळजी वाटत होती ती म्हणजे आपण घ्यायच्या अगोदर कोणी दुसरं गिऱ्हाईक तर ती सायकल घेणार नाही ना? त्यासाठी तो जेव्हा जेव्हा तालुक्याला जाई तेव्हा तेव्हा त्या सायकलच्या दुकानावरून चक्कर मारी, नि गुड्डीची सायकल अजूनही तिथेच असल्याची खात्री करून घेई.

शेवटी आज तिचा वाढदिवस उजाडला. कामावर जाताना नामदेवनी मुलीला प्रेमाने जवळ घेतलं नि तिच्या पाठीवरून हात फिरवत तो तिला म्हणाला, ‘आज मी तुझी सायकल घेऊन येतो हं! पण मी येईपर्यंत तू झोपायचं नाही.’ गुड्डीने आनंदाने त्याला मिठी मारली नि म्हणाली, ‘बाबा, लवकर घरी ये तू. तू आल्याशिवाय नाही झोपणार मी.’

संध्याकाळपर्यंत आपलं मोलमजुरीचं काम संपवून नामदेव दुकानात गेला. मुलीच्या सायकलीसाठी जमवलेले ४०० रुपये दुकानदाराला देऊन त्याने गुड्डीची सायकल घेतली आणि ती खांद्यावर टाकून भराभर पावलं टाकीत तो आपल्या गावाकडे घरी निघाला. त्याच्या डोळ्यांसमोर गुड्डीचा आनंदी चेहरा येत होता आणि आपण घरी जाईपर्यंत ती झोपू नये म्हणून मनातल्या मनात तो देवाची प्रार्थना करीत होता.

अंधार वाढत होता. गावात घरोघरी दिवे लागले होते. गावाच्या वेशीजवळ दगडूशेठचा वाडा होता. फाटकाशी आल्यावर नामदेवाची नजर सहज वाडय़ाकडे वळली. दगडूशेठ ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसले होते. नामदेव कधी कधी त्यांच्याकडे कामाला जायचा आणि अडीअडचणीला ते त्याला मदत करायचे, त्यामुळे त्यांना न भेटता पुढे जाणं शक्यच नव्हतं. क्षणभर फाटकाजवळ थांबून त्याने ‘राम राम मालक’ अशी हाळी दिली. दगडूशेठनी फाटकाकडे पाहिलं आणि जागेवरूनच ‘कोण रे? नाम्या का?’ म्हणून विचारलं. ‘होय मालक’. नामदेव म्हणाला. शेठनी त्याला आत बोलावलं. नामदेवला वाटलं, शेठकडे काही काम निघालं असेल, ते आपल्याला मिळेल. पुढची काहीतरी सोय होईल या आशेने तो फाटकातून आत गेला नि ओसरीजवळ उभा राहून म्हणाला, ‘काय मालक?’

दगडूशेठचं लक्ष त्याच्या खांद्यावरच्या नव्या कोऱ्या सायकलकडे गेलं; त्यांनी त्याला उलट प्रश्न केला, ‘सायकल कोणासाठी रे’ ‘लेकीसाठी मालक. आज वाढदिवस आहे तिचा’, नामदेव उत्तरला. त्याची लवकरात लवकर सटकायची इच्छा होती. ‘बघू जरा’ म्हणत दगडूशेठ पुढे सरकले. नामदेवला ती खांद्यावरून उतरवून खाली ठेवावी लागली.

सायकलला निरखून पाहात शेठ म्हणाले, ‘केवढय़ाला घेतली रे?’ ‘चारशे रुपये मालक’, नामदेव म्हणाला. त्याला थांबायला सांगून दगडूशेठ आत गेले. नामदेवला पुढलं काम मिळण्याची आशा वाटायला लागली. पण दगडूशेठ हातात नोटा घेऊन बाहेर आले. त्या नामदेवपुढे करीत ते म्हणाले, ‘हे साडेचारशे घे आणि सायकल सोड इथेच. भाचा आलाय. अगदी कंटाळलाय. त्याला खेळायला काहीतरी हवंच होतं. अनायसे तू सायकल घेऊन आलास. म्हणून ५० रुपये ज्यास्त दिलेत. तुझाही फायदा आणि माझंही काम झालं. तिन्हीसांजेच्या वेळी हातात आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नकोस.’ नामदेवच्या डोळ्यांसमोर सायकलची आतुरतेनी वाट पाहणारी गुड्डी आली. ‘मालक..’ नामदेवनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. तेवढय़ात दगडूशेठनी गडय़ाला सायकल आत न्यायला सांगितलं आणि नंतर स्वत: ‘बरंय नामा, नीघ आता. अगोदरच उशीर झालाय. जपून जा’, असं सांगून आत गेले.

नामदेव जड पावलांनी आपल्या गावाची वाट चालू लागला. खांद्यावर सायकलचं ओझं राहिलं नव्हतं तरीही नामदेवचे पाय त्यांना अवजड वजनं लावल्यासारखे सावकाश पडत होते. चालता चालता मनातल्या मनात तो देवाची प्रार्थना करीत होता, देवा, मी पोहोचायच्या आत गुड्डीला गाढ झोप लागू दे.

(‘डाची’ या हिंदी कथेचे स्वैर रूपांतर)
शरद कोर्डे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:11 am

Web Title: bicycle 3
टॅग : Story
Next Stories
1 कथा : वारी
2 कथा : सत्यमेव जयते
3 कथा : सिरिअल अटॅक
Just Now!
X