23 February 2019

News Flash

निमित्त : सायकलची ‘रुपेरी’ गोष्ट

‘सायकल’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावरील सायकलचा वेध घेणे रंजक ठरते.

कधी काळी सायकल हा सर्वाच्याच जगण्याचा अविभाज्य घटक होता, तेव्हा तीदेखील पडद्यावर आली नसती तरच नवल.

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com @joshisuhas2
आज स्वयंचलित दुचाकी वाहनांचा बोलबाला असला तरी एकेकाळी सायकल ही सर्वसामान्यांच्या जगण्याचा आणि भावविश्वाचा अविभाज्य भाग होती. त्याचंच प्रतििबब तत्कालीन चित्रपटांमध्ये उमटून  अनेक उत्तम चित्रपट निर्माण झाले. येत्या ४ मे रोजी ‘सायकल’ नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्या निमित्ताने रुपेरी पडद्यावरची ही सायकलसफर..

माणसाचे जगणे मांडण्यासाठी लेखन, चित्रकला वगरे अनेक माध्यमं असली तरी त्यातील प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट. रोजच्या जगण्याशी निगडित घटनांना नेमके पकडून त्याची गोष्टी रूपात मांडणी करण्याचे काम चित्रपटांनी केले. अर्थातच कधी काळी सायकल हा सर्वाच्याच जगण्याचा अविभाज्य घटक होता, तेव्हा तीदेखील पडद्यावर आली नसती तरच नवल. कधी काळी वाहतुकीसाठीचा सर्वात सोयीचा, सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणून सायकल ही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तरी आलेलीच असते. पण केवळ वाहन म्हणूनच तिचे महत्त्व नसून अनेकांची त्या सायकलशी काही ना काही भावनिक जवळीक असायची. सायकल स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्यांसाठी तर सायकल जीव की प्राणच. अर्थात या सायकलची मोहिनी निर्मार्त्यांना पडली नसती तरच नवल. जगभरात सायकल या विषयावर तयार झालेल्या किमान ३०-४० चित्रपटांची यादी सापडते. त्यात भारतीय चित्रपटांची संख्या अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. तरीदेखील ‘सायकल’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावरील सायकलचा वेध घेणे रंजक ठरते.

सायकलशी संबंधित चित्रपटांमध्ये सायकल स्पर्धावर आधारित चित्रपटांची संख्या तुलनेने अधिक आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असेदेखील काही चित्रपट आहेत. त्याकडे वळण्यापूर्वी सायकल हाच विषय मध्यवर्ती ठेवून साकारलेल्या एका भन्नाट अ‍ॅनिमेशनपटाची माहिती असलीच पाहिजे. २००३ साली आलेला ‘ट्रिपलेट्स ऑफ बेलव्हिल’ हा अनिमेशनपट फ्रेन्च असला तरी त्यातील संवाद हे इनमिन १५ वाक्यांचेच आहेत. ७८ मिनिटांचा हा धमाल चित्रपट जराही कंटाळवाणा होत नाही. ही गोष्ट आहे बेलव्हिल या गावातील आजी, नातू आणि तिच्या कुत्र्याची. आजीचा मुलगा आणि सून दोघेही अपघातात गेलेले असतात. नातवाला वाढवणं हेच आजीचं काम. आईवडिलांच्या विरहामुळे नातू सतत उदास असतो. त्याचे आई-वडील दोघेही सायकलपटू असतात. त्यांचे सायकलप्रेम या मुलातदेखील उतरलेले असते. आजीला नातवाची सायकलपटूंच्या कात्रणाची वही पाहून ते लक्षात येते. मग आजी नातवालादेखील सायकलपटू करण्याचा चंगच बांधते. त्यातून जी धमाल सुरू होते ती पडद्यावर अनुभवण्यासारखी आहे. हलक्याफुलक्या विनोदाचा बाज असलेले हे कथानक आहे. रोजच्या रोज नातवाचा सराव, त्याचा आहार यावर आजी पूर्ण लक्ष केंद्रित करते. त्यातदेखील ती अनोख्या युक्त्या करते. ग्रामोफोनवर गाणी ऐकण्यासाठीचे तबकडी फिरवायचे हॅन्डल ती सायकलच्या पायंडलला बांधत असते. गाणे ऐकणे आणि सराव एकाच वेळी. ही तयारी टूर दी फ्रान्स या प्रतिष्ठेच्या सायकल रेससाठी सुरू असते. नातू रेसमध्ये भाग घेतो. पण काही गुंड या नातवाबरोबरच आणखी दोन सायकलपटूंना पळवून नेतात. या गुंडांनी सायकलींचा वापर करून जुगार खेळायची एक अत्रंगी कल्पना राबवलेली असते. सायकलपटूंच्या सायकल चालवण्यावर सिनेमाचा प्रोजेक्टर चालवता येईल अशी यंत्रणा ते तयार करतात. आणि सायकलपटूंना अंमली पदार्थ देऊन त्यांना स्टॅण्डवर अडकवलेली सायकल चालवायला लावतात. त्यांच्या वेगावर जुगार खेळण्याची योजना असते. आजी त्या गुंडांचा माग काढत त्यांच्या शहरात पोहचते. पण ती एकटी हतबल असते. पण तिला बेलव्हिलेच्या ट्रिपलेट्स भेटतात. या ट्रिपलेट्स म्हणजेच त्या काळात किमान साधनांनी संगीताचे प्रयोग करणाऱ्या गाजलेल्या तिळ्या. आजी आणि त्या तिघी मिळून मग नातवाला वाचवतात.

हा भन्नाट चित्रपट कोणत्याही वयोगटाच्या प्रेक्षकाला आवडल्याशिवाय राहणार नाही. यातल्या आजीच्या एकेक क्लृप्त्या इतक्या अफलातून आहेत की पाहतच राहाव्या. नातू आणि कुत्रा हेच तिचं जग असल्यामुळे नातवाला वाचवण्यासाठी ती काहीही करत असते. या कथानकाची मांडणी जबरदस्त आहे. छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून दिग्दर्शकाने इतकी प्रतीकं वापरली आहेत की बस्स. या प्रतिकांसाठी त्याने अ‍ॅनिमेशनचा प्रभावी वापर केला आहे. फारसे संवाद नसलेला हा अ‍ॅनिमेशन सायकलपट सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी आवर्जून पाहावाच.

चित्रपटाच्या इतिहासात ज्या चित्रपटांकडे मास्टर पीस म्हणून पाहिले जाते, त्यापकी ‘बायसिकल थिव्हज’ हा एक महत्त्वाचा चित्रपट. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इटलीतील एका सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सायकल चोरीमुळे निर्माण झालेल्या अनावस्था प्रसंगाचे यात चित्रण आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. पण त्यापूर्वी १९२२ मध्ये आलेल्या ‘व्हील ऑफ चान्स’ या चित्रपटातून सायकल आणि माणसाच्या जगण्याचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १८९५ ते १९०५ या काळात सायकलमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात कसे आणि काय बदल झाले, विशेषत: महिलांना या सायकलने मुक्तता मिळवून देण्यात कसा हातभार लावला या आशयाच्या जे. एच. वेल्स यांनी लिहिलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

नराश्यात जगणारा कापडाच्या दुकानातील एक मध्यमवयीन नोकर त्याच्या दहा दिवसांच्या वार्षकि सुट्टीवर सायकल घेऊन दक्षिण किनारी फिरायला जातो. वाटेत त्याला सावत्र आईला कंटाळून सायकल घेऊन पळून निघालेली तरुणी भेटते. सुरुवातीला तो तिच्याशी फटकूनच राहत असतो. पण नंतर त्या दोघांची गट्टी होते. त्यापुढचा त्यांचा प्रवास, त्यात दोघेही एकमेकाच्या आयुष्याविषयी कसे बोलतात, त्या मुलीची सावत्र आई तिला शोधून परत कशी नेते आणि हा नोकर सुटी संपवून परत त्याच्या गावी येतो याचे मस्त चित्रण केले आहे. या मूकपटाचे काही तुकडे युटय़ुबवर पाहायला मिळतात. पूर्ण चित्रपट नाही.

१९४८ साली आलेला ‘बायसिकल थिव्हज’ हा चित्रपट आजही अगदी ताजातवाना वाटावा असाच आहे. तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली असली तरी बेरोजगारी, स्पर्धा, चोऱ्यामाऱ्या, जगण्याचा संघर्ष असा सारा आटापिटा आजही तसाच आहे. स्वत:ची सायकल असण्याच्या अटीवर चित्रपटाचा नायक अ‍ॅन्टोनिया रिकी याला शहरभर पोस्टर चिकटवण्याचे काम मिळते. पण त्याची सायकल गहाण पडलेली असते. शेवटी त्याची बायको घरातील बेडशीट गहाण ठेवून त्या बदल्यात सायकल सोडवून आणते. मोठय़ा खुशीत तो सायकल घेऊन कामावर निघतो. पण एके ठिकाणी पोस्टर चिकटवताना त्याची सायकल चोरीला जाते. पोलीस यंत्रणा त्याच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावते. शेवटी तो स्वत:च त्याचा छोटा मुलगा ब्रुनोसोबत सायकल शोधायला निघतो. रोमच्या गल्ल्याबोळातून सुरू असलेला त्यांचा दिवसभराचा शोध यातून दिसत जातो. दिवसाअखेरीस सायकल न मिळाल्यामुळे त्याला सायकल चोरायचा मोह होतो. पण तोदेखील व्यर्थ ठरतो.

सायकल हा चित्रपटाचा गाभा असला तरी त्यातून एकूणच सर्वसामान्य माणसाचा जगण्याचा संघर्ष काय असतो हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. यंत्रणा दाद देत नसतात, तथाकथित महिला धर्मगुरु थातूरमाथूर काही तरी सांगून कटवत असतात, चर्चच्या दारात पण त्याला चौकटीबद्ध धार्मिकतेचा अनुभव येतो. मित्र मदत करतात; पण तेदेखील त्याच्या मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाहीत. दिवसभरात त्याला ही सायकल असंख्य अनुभव देऊन जाते. गोळीबंद कथानक आणि प्रभावी दिग्दर्शनातून साकारलेल्या हा चित्रपट आजही नावाजला जातो. जगण्याचा संघर्ष इतक्या प्रभावीपणे टिपण्यासाठी सायकल ही मध्यवर्ती संकल्पना आणणारा हा चित्रपट तसा एकमेवच म्हणावा लागेल. आपल्याकडे मराठीत ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटात काही प्रमाणात सायकलचा जसा वापर झाला आहे. िहदीत तसा वापर कमीच.

नंतरच्या काळातील बहुतांश सायकलसंबधी चित्रपट हे स्पर्धाशी निगडित आहेत. त्यातही टूर द फ्रान्स आणि रेस अक्रॉस अमेरिका या प्रतिष्ठेच्या आणि आव्हानात्मक स्पर्धाचा त्यावर अधिक प्रभाव आहे. त्यापूर्वी काही छोटेमोठे प्रयोग झाले त्यामध्ये ‘जो द फेट’ (फ्रेन्च), ‘बॉय अण्ड द बायसिकल’, ‘अमेरिकन फ्लायर्स’ आणि ‘ब्रेकिंग अवे’ (तिन्ही इंग्रजी) ‘आयलंड इटय़ूूड’ (तवानी) अशा काही चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. यातील ‘अमेरिकन फ्लायर्स’ आणि ‘ब्रेकिंग अवे’बद्दल नंतर बोलूया, कारण त्याला बॉलीवूडचे काही संदर्भ आहेत.

१९४९ साली आलेला ‘जो द फेट’ (ख४१ ऊीोी३ी) हा फ्रेन्च सिनेमा म्हणजे धमाल विनोदीपट आहे. चार्ली चॅप्लिनच्या अभिनयशैलीच्या अंगाने जाणारा हा चित्रपट एका पोस्टमनच्या जीवनावर आधारित आहे. एका जत्रेत या पोस्टमनला अमेरिकन टपाल सेवा ही कशी प्रभावी काम करते हे पाहायला मिळते. ते पाहून तो ठरवतो की आपणदेखील अशा प्रकारे प्रभावी काम करायचे. टपाल पोहचवण्यासाठी त्याच्याकडे एकमेव वाहन असते ते म्हणजे सायकल. त्या संपूर्ण दिवसात तो त्याच्या सायकलवरून ज्या काही उडय़ा मारतो ते पाहून हसून हसून मुरकुंडी वळते. ‘जो द फेट’ म्हणजे इंग्रजीमध्ये सेलिब्रेशन डे.

प्रचंड वेगाने सायकल चालवत टपाल लवकर पोहचवण्यासाठी पोस्टमन ज्या काही क्लृप्त्या करतो, त्यात मजा आहे. शिक्के मारण्यासाठी कार्यालयात वेळ जाऊ नये म्हणून तो वाटेत एका ट्रकच्या मागच्या फडताळालाच सायकल बांधतो आणि त्यावर शिक्के मारणे, सॉìटग करणे ही कामे करतो. शेतावर टपाल पोहोचवताना मळणी यंत्रावर काम करणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्याला स्वत:लादेखील थांबावे लागू नये म्हणून तो त्या मळणी यंत्राच्या तोंडातच टपाल टाकतो. हे सारं करत असताना प्रचंड विनोदी गोष्टी होत असतात. रेल्वे क्रॉसिंगवर वेळ जाऊ नये म्हणून तो खाली वाकून ते पार करतो. तोच तो दांडा वर जातो आणि त्याबरोबर त्याला लटकून सायकलदेखील. चर्चमध्ये बेल वाजवण्याच्या सुमारास गेल्यामुळे बेल वाजवायची दोरी धरतो तर त्या दोरीबरोबर तो देखील वर खेचला जातो. एका दुकानात टपाल देताना सायकल जीपला टेकवून ठेवतो तर टपाल देऊन येईपर्यंत जीप सायकललाच घेऊन पुढे जाते. सगळ्यात शेवटी त्याला विमानाला टपाल द्यायचे असते, त्यासाठी तो इतक्या वेगात सायकल चालवतो की चक्क रेसमधील सायकपटूंनादेखील मागे टाकतो. पण अखेरीस विमान चुकतेच. या संपूर्ण चित्रपट सायकल आणि तो पोस्टमन हेच दोन महत्त्वाचे कलाकार आहेत.

‘बॉय अ‍ॅण्ड बायसिकल’ हा रूढार्थाने चित्रपट म्हणता येणार नाही. तो एक लघुपट आहे. रिडले स्कॉट या छायाचित्रण विषयाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने केलेला हा प्रयोग आहे. प्रयोगशील चित्रपटांसाठी ब्रिटिश चित्रपट संस्थेने दिलेल्या अर्थसाहाय्यातून १९६२ साली तो साकारला आहे. एका मुलाचा एक दिवसाचा सायकलवरून शहराच्या वेगवेगळ्या भागात मारलेला फेरफटका, त्यातून त्याला जाणवलेले शहर हा त्या लघुपटाचा विषय. संवाद नाहीतच, जे काही आहे ते सारे निवेदन. शहरीकरणाचा वेग, औद्योगिकीकरणाचे भीषण परिणाम यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न यातून दिसतो. यात कॅमेऱ्याचे अनेक प्रयोग दिग्दर्शकाने केले आहेत, त्याची दखल घ्यावी लागेल. मुख्यत: सायकल चालवणाऱ्याला दिसणारी दृश्य ही बुबुळाच्या हालचालीनुसार चित्रित झाली आहेत. हा प्रकार वेगळा आहे. पण उर्वरित लघुपट  कंटाळवाणा ठरतो.

आयलंड इटय़ूड हा अगदी अलीकडचा म्हणजे २००७ मधील तवानी चित्रपट. एका साधासुधा तरुण सात दिवसांच्या सायकल सफरीवर जातो तेव्हा त्याला जे काही दिसते ते म्हणजे हा चित्रपट. महत्त्वाचे म्हणजे या तरुणाला ऐकायला कमी येत असते. कधी कधी तो ऐकण्याचे यंत्र काढून ठेवत असतो. त्यातून आणखीनच वेगळे प्रसंग उद्भवतात. त्याचा संपूर्ण प्रवास समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने जाणाऱ्या महामार्गावरून होत राहतो. वाटेत त्याला अनेक नमुनेदार माणसे भेटतात, त्यांच्या घरी राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे अशी प्रक्रिया  यात टिपली आहे. मुळात हा तरुण स्पध्रेत सायकल चालवणारा नाही. तो केवळ आनंदासाठी म्हणून निघालेला आहे. त्यामुळे काळ, काम, वेगाचे गणित त्याला लागू होत नाही. वाटेत एका रेल्वे स्टेशनजवळ त्याला जगप्रवासाला निघालेली तरुणी भेटते. तिला तो मार्गदर्शन तर करतोच, पण तिची रेल्वे यायला उशीर होणार असतो तर तिला आजूबाजूच्या ठिकाणी फिरवूनदेखील आणतो. वाटेतील लोकदेखील त्याला मदत करत असतात. राहायला जागा मिळाली नाही तर तो समुद्रकिनारी खडकावर तंबू उघडून रात्र घालवतो. गिटारवर मस्त गाणी वाजवतो. पर्यटनस्थळांवर पर्यटकांसोबत जेवतो. लहान मुलांबरोबर खेळतो. लोकांची सुखदु:ख शेअर करतो. व्यवस्थेविषयी निषेध व्यक्त करणाऱ्या चित्रकारांबरोबर चित्रंदेखील काढतो. आत्मानंद मिळवून देणारा त्याचा हा सारा प्रवास शांतपणे मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहेच, पण ते पाहाताना आपल्यालादेखील हा आनंद अनुभवावा असे वाटू शकते.

भारतीय चित्रपटांमध्ये मुख्यत: ५० आणि ६० च्या दशकातील चित्रपटांमध्ये सायकल अनेक वेळा दिसून येते. अगदी ८० च्या दशकातील नायक नायिकांची गाणी (‘पडोसन’मधील म चली, म चली..) हमखास सायकलवर चित्रित केली जात. पण सायकल मध्यवर्ती ठेवून त्यावर चित्रपट बेतणे तसे अगदीच मोजके आहे. त्यातल्या त्यात िहदीतील ‘जो जिता वही सिकंदर’ आणि मराठीत ‘एलिझाबेथ एकादशी’ यांचे नाव घेता येईल. ‘जो जिता वही सिकंदर’ हा चित्रपट १९९२ मध्ये तुफान गाजला. एकतर तोपर्यंत श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्ग सोडल्यास सायकलचा वापर हा आपल्याकडे सर्वमान्य होता. त्यात परत चित्रपटाची कथा तरुणाईशी थेट निगडित होती आणि त्यामध्ये चुरस, स्पर्धा, प्रेमकथा अशा सर्व गोष्टी होत्या. गाणी तर प्रेक्षकांनी डोक्यावरच घेतली होती. आमिर खानच्या अगदी सुरुवातीच्या चित्रपटात ‘जो जिता’चा समावेश होतो. पण या चित्रपटाची कथा ही दोन इंग्रजी चित्रपटांच्या कथानकावरून बेतलेली दिसून येते. एक म्हणजे ‘ब्रेकिंग अवे’ आणि दुसरा ‘अमेरिकन फ्लायर्स’. यापकी ‘ब्रेकिंग अवे’वरून हे कथानक घेतले असावे अशी चर्चा त्याकाळी आणि नंतरदेखील झाली. पण ‘अमेरिकन फ्लायर्स’बद्दल फारसे बोलले गेले नाही.

पीटर येट्स या दिग्दर्शकाचा ‘ब्रेकिंग अवे’ हा चित्रपट १९७९ साली प्रदíशत झाला. अमेरिकेतील एका छोटय़ाशा गावातील हौशी सायकलपटूच्या आयुष्यावर हा चितारलेला आहे. स्टोन कटर म्हणजेच दगड फोडण्याचा (चुनखडीच्या खाणीचे व्यावसायिक) व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील डेव्ह या १९ वर्षीय तरुणाला सायकिलगची प्रचंड आवड असते. त्याला उत्तम सायकलपटू व्हायचे असते. माईक, सिरिल आणि मूचर या मित्रमंडळींबरोबर तो गावभर उनाडक्या करत फिरत असतो. त्याच गावातील एका खासगी विद्यापीठातील इटालियन तरुणी कॅथरिनावर त्याचा जीव जडलेला असतो. पण या खासगी विद्यापीठातील तरुण या स्थानिकांची कटर्स- दगडफोडे म्हणून हेटाळणी करत असतात. त्यातच कॅथरिनाचा बॉयफ्रेन्ड रॉड हा डेव्हशी भांडण काढतो. डेव्ह एकीकडे कॅथरिनाच्या मागे असतो तर दुसरीकडे त्याचे सायकलपटू होण्याचे प्रयत्न सुरूच असतात. त्याच वेळी गावात इटालियन सायकलपटूंची टिम येते. डेव्ह त्यांच्याबरोबर सायकिलग करू लागतो. पण ते काही त्याला सामील करून घेत नाहीत. एकदा तर ते चक्क डेव्हच्या चाकांमध्ये हवेचा पंप घुसवून त्याचा अपघात घडवून आणतात. त्या स्पध्रेत इटालियन जिंकतात, तर दुसरीकडे डेव्ह आणि कॅथरिनाचे संबंध दुरावतात.

डेव्ह मित्रांच्या जोडीने स्थानिक स्पध्रेत उतरायचे ठरवतो. ही स्पर्धा रिले पद्धतीची असते. डेव्हचे वडील ‘कटर्स’ असे लिहिलेले टी शर्ट त्याच्या टीमला देतात. डेव्हला मित्रांची फारशी मदत होत नाही. तो एकटाच अनेक राऊंड पूर्ण करून आघाडीवर राहतो. पण नेमका त्याला अपघात होतो. तेव्हा इतर तिघे काही प्रमाणात मदत करतात. अखेरीस जखमी डेव्ह पुन्हा सायकलवर स्वार होतो आणि अत्यंत अटीतटीच्या चुरशीमध्ये तो स्पर्धा जिंकतो. स्थानिकांच्या आनंदाला उधाण येते. बाहेरून आलेले आमच्या उरावर नाचतात या भावनेला या विजयाने एक प्रकारचे बळ प्राप्त होते.

‘ब्रेकिंग अवे’ला सर्वोत्तम ओरिजनल स्क्रिप्टचे ऑस्कर मिळाले होते. स्टिव्ह स्टेसिच हा पटकथाकार होता. हा चित्रपट थेट सायकिलगशी निगडित असला तरी त्यात जगण्याचे अनेक पलू दिसून येतात. एखाद्या नयनरम्य गावातील खासगी विद्यापीठ, त्यातील विद्यार्थ्यांचे ऐषोआरामी जगणे, स्थानिकांचा संघर्ष दिसून त्यांची जिंकण्याची जिद्द हे या चित्रपटात दिसते.

हे वाचल्यावर ‘जो जिता वही सिकंदर’च्या कथानकातील काही गोष्टी थेट स्पष्ट होतील. पण यात दोन भावांची कथा सापडत नाही. ती सापडते जॉन बॅडमनच्या ‘अमेरिकन फ्लायर्स’मध्ये. त्यामध्ये स्थानिक विरुद्ध इतर असा संघर्ष नाही. १९८५ मध्ये आलेला हा चित्रपट तीन टप्प्यांतील रॉकीज पर्वतरांगेत होणाऱ्या एका सायकल स्पध्रेवर बेतला आहे. मार्क्‍स आणि डेव्हिड या भावांची ही कथा आहे. मार्क्‍स हा कसलेला सायकलपटू. पण त्याला मेंदूची धमनी आकाराने मोठी होण्याचा आजार झालेला असतो. पण तो ते धाकटय़ा भावापासून लपवून ठेवतो. या स्पध्रेसाठी मार्क्‍स डेव्हिडलादेखील तयार करत असतो. स्पध्रेत दोघेही सामील होतात. पहिल्या टप्प्यावरच डेव्हिडची सायकल नादुरुस्त होते. मार्क्‍स त्याची सायकल झटपट दुरुस्त करतो आणि दुसऱ्या टप्प्याकरता तयार करतो. पण दुसऱ्या टप्प्यावर मार्क्‍सचा आजार उफाळतो. त्याचा अपघात होता होता वाचतो. सायकल पार दरीत कोसळते. आता तिसऱ्या टप्प्याच्या तोंडावर डेव्हिड भावाला सांभाळायचे की स्पध्रेत उतरायचे या द्विधा मनस्थितीत सापडतो. अखेरीस तो स्पध्रेत उतरतो. स्पध्रेच्या मार्गावर त्याला प्रतिस्पध्र्याच्या हाणामारीला तोंड द्यावे लागते. त्यातूनही तो पुढे जातो. शेवटी केवळ ११ सेकंदांनी स्पर्धा जिंकतो.

‘अमेरिकन फ्लायर्स’ला स्पध्रेची पाश्र्वभूमी असली तरी त्यात इतर बरीच धमाल आहे. दोघा भावांचा सायकल सराव एकदम भन्नाट आहे. त्यावर बरीच मिनिटे खर्च केली आहेत. त्याचे चित्रीकरण अफलातून आहे. त्याचबरोबर मार्क्‍सची गर्लफ्रेन्ड, तिचा पूर्वीचा नवरा, त्यांच्यातील तिढा असे आयामदेखील यात आहे. या चित्रपटालादेखील सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिप्टचे ऑस्कर मिळाले आहे.

या दोन स्क्रिप्टवरुन बेतलेला ‘जो जीता वही सिकंदर’ हा आपला भारतीय सायकलपट. या दोन्ही कथानकांचा आधार घेत नासिर हुसेन लिखित आणि मन्सूर खान दिग्दíशत या चित्रपटाला भारतीय टच दिला आहे. ‘जो जीता’ गाजण्यामागे त्यातील गाणी हादेखील महत्त्वाचा मुद्दा होता. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली गाणी मात्र १०० टक्के ओरिजनल होती. इतकेच नाही तर मुख्यत: त्यातूनच चित्रपट अधिक पकड घेतो. आमिर, आयेषा जुल्का यांचा अभिनय कथानकातील त्यांच्या वयाला साजेसा झाला हा एक पूरक घटक होता. ‘जो जीता’ ने एक काळ गाजवला हे निश्चित.

त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे २०१४ मध्ये आलेला परेश मोकाशी दिग्दíशत ‘एलिझाबेथ एकादशी’ हा मराठी चित्रपट थेट नावापासूनच सायकलशी निगडित आहे. पंढरपुरातील एक अगदी गरीब कुटुंब; वडील गेलेले. आई, एक मुलगा आणि त्याची धाकटी बहीण यांची ही गोष्ट. वडिलांनी तयार केलेल्या सायकलचं नाव एलिझाबेथ असतं. मुलांचा या सायकलवर दांडगा जीव. पण घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे आईला ही सायकलदेखील विकावी लागणार अशी परिस्थिती येते. सायकल विकावी लागू नये म्हणून मुलं एकादशीच्या गर्दीचा पसे मिळवण्यासाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार करतात आणि बांगडय़ा विक्रीचा स्टॉल लावतात. मुलांचा सायकलवरील जीव, त्यांचे भोळेभाबडे प्रयोग, दुसरीकडे आíथक तंगीने गांजलेली आई असा सारा पट परेश मोकाशी यांनी अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. सायकल हा जगण्याशी निगडित असलेला घटक आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती हीच चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. चित्रीकरण, संवाद, गाणी आणि लहान मुलांचा बेफाम अभिनय यामुळे या चित्रपटाने चांगलेच नाव कमावले. स्थानिक बाबींशी थेट निगडित असणं आणि काळाशी सुसंगत मांडणी करण्याचा प्रयत्न यामुळे हा चित्रपट नावाजला गेला. किंबहुना खराखुरा ओरिजनल म्हणता असा पहिलाच भारतीय सायकलपट म्हणायला हरकत नाही.

अशा सर्व सायकलपटांच्या पाश्र्वभूमीवर चार मे रोजी ‘सायकल’ हा मराठी चित्रपट येत आहे. त्याची कथा ही साधारण ५०-६०च्या दशकातील आहे. सायकल ही प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असणे, काही ठिकाणी तिच्याशी भावनिक नाते असणे असा तो काळ. पण हीच सायकल चोरीला गेली तर काय होते ते यातून मांडण्यात आले आहे. प्रकाश कुंटे या दमदार दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दíशत केला आहे, तर आदिती मोघे यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. लेखिकेला तिच्या वडिलांच्या सायकलप्रेमातून ही कथा सुचली आहे. थेट जगण्याशी निगडित असलेली ही कथा रुपेरी पडद्यावर उत्तमरित्या पाहायला मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

सायकल हा सर्वाच्या जगण्याचा अविभाज्य घटक होता तेव्हा त्याला चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केलेले हे काही मोजके चित्रपट. कुठे ती सायकल रोजच्या कामामुळे जवळची असेल तर कुठे स्पर्धेमुळे. आज तिशी-चाळिशीत असलेल्या प्रत्येकाला लहानपणी सायकल अगदी प्रिय असायची. पण भारतीय चित्रपटसृष्टीने मात्र सायकलीला म्हणावे तेवढे महत्त्व दिले नाही असे लक्षात येते. खरंतर जगणं उलगडून दाखवताना अशा गोष्टी सहज दिसू शकतात. पण तो प्रयत्नदेखील झाला नाही. तर दुसरीकडे सायकलिंग एक खेळ म्हणूनदेखील आपल्याकडे पूर्णपणे विकसित झाला नाही. म्हणजे त्यातदेखील आपण मागेच राहिलो. काही मोजके सायकलपटूच आपल्याकडे तयार झाले. गेल्या पाच वर्षांत विविध ब्रॅण्ड्सच्या मार्केटिंगच्या माध्यमातून सायकल पुन्हा घरोघरी दिसू लागली आहे. त्यातील प्रत्येकाचे भावविश्व सायकलशी जोडलेले असेलच असे नाही, पण अनेक ठिकाणी असं विश्व तयार होत आहे. आपल्याकडच्या सिनेमाकर्त्यांना त्याचा शोध घ्यावा लागेल.

सणकी पण भन्नाट ग्रॅम ओबरी

सायकलशी निगडित बहुतांश चित्रपट हे स्पर्धाशी संबंधित असले तरी त्यापकी ‘द फ्लाइंग स्कॉटस्मन’ हा चित्रपट सर्वानीच आवर्जून पाहावा असा आहे. ग्रॅम ओबरी या प्रसिद्ध आणि प्रयोगशील सायकलपटूच्या आयुष्यावर आधारित असा हा चित्रपट आहे. स्पध्रेत जिंकणे हे जरी त्याच्या मध्यवर्ती असले तरी ग्रॅम ओबरीच्या आयुष्यावर टाकलेला प्रकाश, त्याची मानसिकता, त्याच्या अवतीभोवती असणाऱ्यांची मानसिकता हे सारे खूप प्रकर्षांने त्यातून दिसून येते.

ही कथा आहे ९०च्या दशकातील. स्कॉटलंडमधील एका गावात वाढलेला ग्रॅम ओबरी हा शालेय वयात तसा लाजाळूच असतो. अगदी त्याच्या सहाध्यायींकडून त्याला सतत त्रास दिला जातो. पण त्याला सायकिलगची आवड असते. स्थानिक स्पर्धामध्ये तो भाग घेत असतो, उपजीविकेसाठी सायकलचे दुकान चालवत असतो. पण तो काही टिपिकल व्यापारी नसतो. त्याचा ध्यास सायकिलग हाच असतो. त्यामुळे त्याचा व्यापार फारसा किफायतशीर नसतो. त्यातच तो जरा बऱ्यापकी सणकीदेखील असतो. सणकी स्कॉटमन म्हणावा असा. एका तासात वेलोड्रममध्ये (गोलाकार रिंगण) सर्वाधिक अंतर कापण्याच्या स्पध्रेत तो भाग घेतो. त्याच्या सायकलवर तो प्रयोग सुरू करतो. मित्राच्या वर्कशॉपमध्ये तो त्याची सायकल तयार करू लागतो. पायडिलगचा वेग कसा वाढेल आणि अतिवेगाने पायडिलग केले तरी बेअिरग कसे टिकाव धरेल याचा विचार करताना त्याचे लक्ष वॉिशग मशीनकडे जाते. वॉिशग मशीनचे पार्ट उघडून तो त्याचे वेगाने फिरू शकणारे बेअिरग पायडलला बसवतो. बायको निरुत्तर होऊन पाहत राहते, पण त्याच्या पाठीशी उभी राहते. स्पध्रेत त्याचा व्यवस्थापक त्याला नवीन सायकल वापरायला देतो. परिणामी तो विक्रम मोडू शकत नाही. २४ तासांसाठी त्याने िरगण घेतलेले असते, मग तो २३व्या तासाला त्याच्या मूळ सायकलसहित पुन्हा उतरतो आणि एका तासात ५१ किमी सायकल चालवून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करतो. पण पुढील महिन्याभरातच त्याचा हा विक्रम मोडला जातो.

ग्रॅम अस्वस्थ होतो. तो आता पुढील स्पध्रेची तयारी सुरू करतो. चार किमी अंतर कमीतकमी वेळात पार करायचे. ग्रॅम त्या स्पध्रेतही यश मिळवतो. पण आता आयोजक चिंतेत पडतात. कारण ग्रॅमची सायकल ही कोणत्याही मोठय़ा ब्रॅण्डची नसते. ती त्याने स्वत:च तयार केलेली असते. त्याच्या सायकलचे मार्केटिंग होणार नाही, ब्रॅण्डेड सायकलची जाहीरातदेखील होऊ शकणार नाही, थोडक्यात सायकलच्या धंद्याला फटका बसणार, ही त्यांची चिंता असते. मग ते ग्रॅमच्या सायकलमध्ये त्रुटी शोधू लागतात. ग्रॅम त्यांच्या प्रत्येक त्रुटीनुसार दुरुस्ती करू लागतो. एकदा तर तो चक्क त्याच्या सायकलचे सीट पाच सेंटीमीटर पुढे आहे म्हणून कापतो. अखेरीस आयोजक आणि जागतिक संघटना त्याच्या सायकिलगच्या पद्धतीवरच आक्षेप घेतात. ग्रॅम थेट पुढे हॅण्डलवर झुकून हवेचा अवरोध कसा कमी होईल हे पाहून सायकल चालवत असतो. ही पद्धत सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे जागतिक सायकल संघटना जाहीर करते. अशा पद्धतीने सायकल चालवताना तीन वेळा छाती हॅण्डलला टेकली तर स्पध्रेतून बाद केले जाईल असे जाहीर केले जाते. ग्रॅम त्यावर आणखीनच धम्माल करतो. तो त्याच्या सायकलच्या मागील चाकाला दोन्हीकडे लहान चाकं जोडून लहान मुलांच्या सायकलसारखी सायकल तयार करतो आणि वृत्तपत्रांना जगातील सर्वात सुरक्षित सायकल म्हणून दाखवतो. पण सायकल संघटना भरपूर निरीक्षक नेमून अखेरीस ग्रॅमला स्पध्रेतून बाद करण्यात यशस्वी होतात.

मग निराश ग्रॅम आत्महत्या करायला जातो. त्यातून तो वाचतो. त्याच वेळी पहिल्या विश्वविक्रमाच्या वेलोड्रमचे नूतनीकरण करण्यात येत असते. त्यातील एक लाकडाची फळी ग्रॅमच्या विश्वविक्रमाचा सन्मान म्हणून त्याला पाठवली जाते. त्याने त्याला जरा उभारी मिळते. आणि त्याचबरोबर सायकल चालवण्याची नवीन पद्धतदेखील. सायकल चालवताना त्याला हवेचा अवरोध कमी करायचा असतो, पण आता हॅण्डलवर झुकता येणार नसते. मग तो ते हॅण्डलच लांब नेतो आणि सुपरमॅनप्रमाणे पोझिशन घेतो. आणि पुढील स्पर्धादेखील जिंकतो. पुन्हा एकदा तोच सणकी ग्रॅम ओबरी जगाला पाहायला मिळतो.

या चित्रपटातून ग्रॅमचे जगणे, त्याच्या पाठीशी उभं राहणाऱ्यांची मानसिकता, जागतिक संघटनांची धंदेवाईक वृत्ती अशा सर्वावर थेट भाष्य आहे. सायकलमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहित करणारा असा हा धमाल चित्रपट आहे. त्यातील नाटय़ अशा रीतीने फुलवले आहे की सर्वसामान्य प्रेक्षकदेखील त्याचा आनंद घेऊ शकतील. त्यामुळे तो आवर्जून पाहायला हरकत नाही.

First Published on May 4, 2018 1:04 am

Web Title: bicycle in movies